दाक्षिणात्य स्टार विजय ‘या’ चित्रपटातून करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

vijay deorkonda

अर्जून रेड्डी हे नाव घेतलं की डोळ्यासमोर एकच अभिनेता तो म्हणजे साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवली. अर्जून रेड्डीने विजयला यशाच्या शिखरावर नेलं. केवळ दक्षिणेतच नव्हे तर संपूर्ण भारतात या चित्रपटाचा बोलबाला झाला. विजय देवरकोंडा तरूणांच्या गळ्यातला ताईत बनला. लवकरच विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटात तो दिसणार आहे. खुद्द करणनेच ट्विटरद्वारे याविषयीची माहिती दिली.

डिअर कॉम्रेड हा विजयचा तेलगू चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच करणने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. आता लवकरच करण या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या आधी विजयच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला होता. ‘कबीर सिंग’ या नावाने त्याचा हिंदी रिमेकसुद्धा बॉक्स ऑफिसवर गाजला. त्यावेळी कबीर सिंगसाठी देखील विजयलचा विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे ही भुमिका शाहीद कपूरने केली. पण आता डिअर कॉम्रेड च्या रिमेक मध्ये काम करायला विजयने होकार दिला आहे. त्यामुळे विजयच्या चाहत्यांसाठी ही खूष खबर असणार आहे.

डिअर कॉम्रेडच्या रिमेक मध्ये विजय मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री रम्या कृष्णनचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या चित्रपटासाठी विजयने बरीच मेहनत घेतली असून त्यातील लूकसाठी त्याने विशेष डाएटसुद्धा केला आहे.