घरमनोरंजनडॉ. श्रीराम लागू म्हणजेच कलासक्त लमाण

डॉ. श्रीराम लागू म्हणजेच कलासक्त लमाण

Subscribe

अभिनय क्षेत्रात वयाच्या ४२व्या वर्षी डॉक्टरांचा प्रवेश झाला होता. ते पाहता त्यांच्या वाट्याला काही निवडक भूमिकाच आल्या. असे असूनही डॉक्टर लागूंनी मात्र त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे, त्यांच्या अभिनयाने सोने केले.

आज डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्मदिवस. डॉक्टर लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये झाला . एक इ एन टी सर्जन म्हणून त्यांच्या वैद्यकीय कारकीर्दीची सुरुवात झाली होती. परंतू एक अभिनेता म्हणून मराठी रंगभूमीवरील आणि हिंदी-मराठी सिनेमाजगतातील त्यांच्या कर्तुत्वाचा पसारा प्रचंड आहे.

डॉक्टर श्रीराम लागू पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये शिकत होते. या शाळेमध्ये नाटकावर विशेष लक्ष दिले जाई. डॉक्टरांबद्दल असे म्हटले जाते की, लहानपणीच ते अनेकांची नक्कल करायचे. हे पाहून त्यांच्या अवतीभवतीची बरीचशी मंडळी त्याच्या आई-बाबांना, “ हा एक दिवस खूप चांगला अभिनेता होईल !” असे म्हणत असत. डॉक्टरांबद्दल एक असाही किस्सा सांगितला जातो की, श्रीराम लागूंना एकदा त्यांच्या शिक्षकांनी तुला नाटकात काम करायचे आहे असे सांगितले. लागूनींही जोरदार तयारी केली, मात्र प्रत्यक्ष जेव्हा रंगमंचावर उतरले तेव्हा ते प्रचंड घाबरले होते. पण त्याही परिस्थितीत त्यांनी सादरीकरण केले. त्यांच्या अभिनयाची प्रशंसाच झाली. लागूंबाबत असेही म्हटले जाते की, त्यांना स्वतःचेच नव्हे तर आपल्या सोबतच्या सहकलाकारांचेही संवाद तोंडपाठ असायचे !

- Advertisement -

Dr. Shreeram Lagoo (1927-2019) : www.MumbaiTheatreGuide.com

डॉक्टर लागू मुळातच त्यांच्या अभ्यासात खूप हुशार होते. असे असूनही त्यांचे अभिनयाचे वेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मेडिकल कॉलेजला गेल्यानंतरही त्यांनी अभिनयाची साथ सोडली नाही. महाविद्यालयीन कालखंडातही डॉक्टरांनी दहा एकांकीका आणि पाच नाटकांमध्ये काम केले होते. डॉक्टरांची इच्छा तर अभिनय क्षेत्राकडे वाळण्याची होती. परंतु त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी डॉक्टर व्हावे असे वाटत होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी काही काळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये डॉक्टरकिची प्रॅक्टिस केली.

- Advertisement -

डॉक्टरांवर लहानपणापासूनच मराठी नाटकांचा प्रभाव होता. त्यावेळचे नामवंत अभिनेते नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे आणि मास्टर दीनानाथ आदींच्या अभिनयाचा डॉक्टर लागूंवर प्रचंड प्रभाव होता. त्याच दरम्यान काही अभिनेत्यांकडूनही ते प्रेरित झाले होते. त्यामध्ये पॉल म्युनी, स्पेन्सर ट्रेसी , लॉरेन्स ऑलिव्हिएर, ग्रेटा गार्बो अशी अनेक कलावंतांची नावे घेता येतील. नाटक आणि अनेक रंगकर्मी सतत डॉक्टरांच्या डोक्यात फिरत होते. दुर्दैवाने त्याच दरम्यान तीन वर्षांसाठी वैद्यकीय व्यवसायानिमित्त डॉक्टर लागूंना आफ्रिकेला जावे लागले. नियतीच्या या फेऱ्यांमध्ये डॉक्टरांना असं वाटलं की, त्यांचे सर्व जीवनच स्तब्ध झाले आहे !… परंतु लवकरच ती वेळ आली जेव्हा आफ्रिकेतून परतता क्षणीच डॉक्टर लागूंनी त्यांच्या वैद्यकीयक्षेत्राला पूर्णविराम दिला आणि नेहमीसाठी अभिनयाची कास धरली.

Sale > marathi chitrapat pinjra > in stock

डॉक्टर लागूंच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 1969 साली वसंत कानेटकर यांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाने झाली. डॉक्टर लागूंना रंगभूमीवर येताच यश मिळाले असे झाले नाही. सुरुवातीची त्यांची काही नाटके खूप चालली असेही म्हणता येणार नाही. मात्र दुसऱ्या वर्षी पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे ‘नटसम्राट’ हे नाटक रंगभूमीवर आले आणि डॉक्टर लागूंना त्यातील ‘अप्पासाहेब बेलवलकर’ या पात्राने एक नवी ओळख मिळवून दिली. रसिक प्रेक्षकांनी हे नाटक डोक्यावर घेतलं. रंगभूमीला डॉक्टर लागूंच्या रूपात खरा ‘नटसम्राट’ लाभला ! मराठी रंगमंचावर विजय तेंडुलकर तसेच अरविंद देशपांडे यांसारख्या अभ्यासू वव्यक्तिमत्वांसोबत काम करून डॉक्टर लागूंनी मराठी रंगभूमीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अभिनय क्षेत्रात वयाच्या ४२ व्या वर्षी डॉक्टरांचा प्रवेश झाला होता. ते पाहता त्यांच्या वाट्याला काही निवडक भूमिकाच आल्या. असे असूनही डॉक्टर लागूंनी मात्र त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे, त्यांच्या अभिनयाने सोने केले. प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा त्यांच्या ‘सिनेमा के सौ साल’ या मुलाखतीत म्हणतात की, “मी श्रीराम लागू यांना भारतातील सर्वात महान रंगकर्मी मानतो. इतकंच नव्हे तर मी जगभरातील सर्वोच्च कुशल अभिनेत्यांमध्ये त्यांना ठेवू इच्छितो. दुर्दैवाने त्यांना मिळालेले चित्रपट त्यांना न्याय देऊ शकलेले नाहीत.”

Amole Gupte pens a loving tribute to Dr Shriram Lagoo | Entertainment News,The Indian Express

1972 साली डॉक्टर लागूंना प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ‘ द ब्ल्यू एंजेल्स’ या जर्मन सिनेमावरून प्रेरित होऊन हा चित्रपट बनविण्यात आला होता. यातील डॉक्टर लागूंची ‘मास्तर’ ही व्यक्तिरेखा खूप गाजली. पुढे व्ही. शांतारामांनी हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित केला, परंतू त्याला मराठी एवढं यश मिळाले नाही. असे असूनही हिंदीमधील डॉक्टर लागूंची भूमिका प्रभावी ठरली. यानंतर मात्र डॉक्टर लागूंनी कधीही पाठी वळून पाहिले नाही. मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्ये त्यांना अनेक कामे मिळत गेली. सुपरस्टार अमिताभसोबत एक सहकलाकार म्हणून त्यांनी अनेकदा भूमिका बजावली आहे. अमोल पालेकर आणि वहिदा रहेमान सोबतचा त्यांचा ‘घरोंदा’ चित्रपट उल्लेखनीय ठरला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आले. हिंदीतील त्यांच्या काही खास चित्रपटांमध्ये ‘घरोंदा’ सोबतच किनारा, इंकार, इंसाफ का तराजू, साजन बिना सुहागन, एक दिन अचानक आणि एक पल या चित्रपटांमधून त्यांनी उल्लेखनीय काम केले. खरे तर हिंदी चित्रपटांमधील प्रमुख भूमिकांसाठी डॉक्टर श्रीराम लागूंचा विचार व्हायला हवा होता, परंतु बॉलीवूडने याबाबत त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या त्यांच्या एकूण कारकिर्दीत त्यांनी जवळजवळ अडीचशे चित्रपटांमधून काम केले.

डॉक्टर लागूंना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात 2006 मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, 1997 मध्ये कालिदास पुरस्कार, 2007 मध्ये पुण्यभूषण पुरस्कार, 2010 मध्ये संगीत नाटक अकादमीचा फेलोशिप सन्मान आणि 2013 मध्ये लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. डॉक्टर लागू जसे अभिनेता होते तसेच त्यांच्यात एक लेखकही वसला होता. त्यांनी स्वतःचे जे आत्मचरित्र लिहिले आहे ‘लमाण’ त्यातून हे सिद्ध होते. ज्या ‘नटसम्राट’ या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागूंनी साकारली त्याच भूमिकेतील एक वाक्य आहे, ”आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.” अर्थातच ‘लमाण’ म्हणजे मालवाहू कामगार. आपल्या अभिनयप्रवासात हे तथाकथित लमाणाचे काम डॉक्टर श्रीराम लागूंनी विलक्षण निष्ठेने, जिद्दीने आणि सचोटीने केले आहे. यातून बहुदा असेच काही त्यांना सुचवायचे असावे !


हे ही वाचा – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून नवाजुद्दीन सिद्दीकीचा सत्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -