Coronavirus: महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर केली मात

bollywood actor amitabh bachchan
अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते घरी येऊन विश्रांती करतील, अशी माहिती अभिनेता अभिषेक बच्चन यांने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. तसेच सर्वांनी बच्चन कुटुंबियांसाठी प्रार्थना केल्याबद्दल अभिषेकने सर्वांचे आभार मानले आहेत.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्यामुळे मी अजूनही रुग्णालयात आहे. माझ्या कुटुंबियासांठी प्रार्थना केल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मी देखील कोरोनाचा पराभव करीन’, असे ट्विट अभिषेक बच्चनने केले आहे.

११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलगा अभिषेक बच्चन याचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नातं आराध्या बच्चन या दोघींचा देखील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. या सर्व जणांवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ऐश्वर्या आणि आराध्याने कोरोनावर मात केल्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी देखील कोरोनाला हरवले आहेत. सध्या अभिषेक बच्चन याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण