घरमनोरंजनकैलाश खेरला बसली #MeToo ची झळ

कैलाश खेरला बसली #MeToo ची झळ

Subscribe

गायक कैलाश खेरला शेवटची #MeToo ची झळ बसली आहे. उदयपूरमधील एका दिवाळीच्या कार्यक्रमातून कैलाश खेरची हकालपट्टी करण्यात आली आहे.

दिवाळी म्हटली की, सर्व कलाकारांचे सुगीचे दिवस. त्यातही गायकांचे तर पैसे कमावायचे दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र सध्या बॉलीवूडमध्ये #MeToo ची झळ बर्‍याच जणांना बसत आहे आणि त्यामध्ये सध्या आघाडीवर नाव आहे ते म्हणजे गायक कैलाश खेरचं. गायिका सोना महापात्रा आणि वर्षा सिंह या दोघींनीही कैलाश खेरवर विनयभंगांचा आरोप #MeToo चळवळी अंतर्गत केला होता. याची गंभीर दखल घेत आता कैलाश खेरला एका कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अर्थात कैलाश खेरला या कार्यक्रमातून हटवण्यात आले आहे.

नक्की काय झाले?

कैलाश खेरवर दोन गायिकांनी विनयभंगाचा आरोप केल्यानंतर आता ३० ऑक्टोबर रोजी उदयपूरमध्ये होणार्‍या दिवाळीच्या कार्यक्रमातून कैलाश खेरची हकालपट्टी करण्यात आली आहे. एका म्युझिकल नाईटसाठी कैलास खेरचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र #MeToo ची झळ या कार्यक्रमापर्यंत पोहचली असून आयोजकांनी या कार्यक्रमातून कैलाश खेरला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उदयपूरचे महापौर चंद्रसिंह कोठारी यांनी सांगितले की, हा एक सरकारी कार्यक्रम असून आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नको असल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता कैलाशच्या जागी गायक दर्शन रावल हा कार्यक्रम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

- Advertisement -

आरोपांबाबत कैलाशचं काय होतं म्हणणं?

कैलाश खेरवर आरोप झाल्यानंतर कैलाशनेही आपले म्हणणे स्पष्ट केले होते. जी माणसं मला ओळखतात, त्यांना माहीत आहे की, मी मानवतेचा किती सन्मान करतो. महिलांची इज्जतही किती करतो याची त्यांना कल्पना आहे. ज्या महिला मीडियामध्ये काम करतात त्यांचा तर मी जास्तच सन्मान करतो कारण त्यांचे काम अतिशय कठीण असते. दरम्यान हे आरोप करण्यात येत असले तरीही अशी कोणतीही गोष्ट माझ्या लक्षात नाही. अशा तर्‍हेचं स्पष्टीकरण कैलाशने दिले होते. मात्र आता कैलाशला याची झळ बसत असून पुढे #MeToo चळवळीची झळ कोणाला आणि कशी बसते हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -