घरमनोरंजनपु.लं.चा ‘भाई’ आगाऊ तेवढाच भावूक

पु.लं.चा ‘भाई’ आगाऊ तेवढाच भावूक

Subscribe

 महेश मांजरेकरने आजवर जेवढ्या म्हणून चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे त्यातील ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘परळ लालबाग सोन्याची मुंबई’ हे त्याचे चित्रपट प्रेक्षकप्रिय ठरलेले आहेत. त्याच्या दिग्दर्शनात ‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. पूर्वार्ध, उत्तरार्ध असे त्याचे दोन भाग आहेत. पु. ल. देशपांडे यांचे समग्र दर्शन यात घडवलेले आहे. त्यांच्या सान्निध्यात जे अनेक महनीय व्यक्ती आलेले आहेत त्यांच्यासुद्धा वृत्ती प्रवृत्तींचे दर्शन यात घडवलेले आहे. पु.लं.चा ‘भाई’ यात जेवढा आगाऊ तेवढाच भावूकही आहे.

पु. ल. देशपांडे हे व्यक्तिमत्त्व कोणाला माहीत नाही असे होणार नाही. परदेशातही त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. पु.लं.च्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर ते साहित्यिक म्हणून जेवढे परिचयाचे होते, तेवढेच ते अभिनेते, नाटककार, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते म्हणूनही परिचयाचे होते. त्यामुळे अनेक नामवंतांचा सहवास त्यांना त्यावेळी लाभला होता. यंदा त्यांची जन्मशताब्दी सर्वत्र साजरी केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांचे समग्र दर्शन घडवणारा ‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ही पु.लं.च्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आहे. शालेय जीवनापासून ते अंतिम श्वास घेईपर्यंतचा कालखंड या चित्रपटात घेण्यात आलेला आहे जो दोन भागांत चित्रीत केलेला आहे. त्यातला एक भाग ज्याला पूर्वार्ध म्हणता येईल त्यात त्यांनी शालेय, महाविद्यालयीन जीवन, प्रेम, विवाह असा प्रवास करत नाट्यकलेत स्वत:ला आजमावत असताना दिग्गज गायकांचा लाभलेला सहवास असा कालखंड पूर्वार्धात घेतलेला आहे.

चौकसबुद्धी, हजरजबाबीपणा, मिश्किल बोलणे असे पु.लं.चे व्यक्तिमत्त्व लहानपणापासूनच होते. काहींना हा आगाऊपणा वाटत होता तर काहींसाठी आत्मविश्वासाने बोलणे वाटत होते. प्रश्न विनोदी असो किंवा गंभीर पण त्यावर पु.लं.चे बोलणे हे मार्मिक होते. चित्रपटामध्ये त्यांच्या आयुष्याचे जे वेगवेगळे टप्पे दाखवलेले आहेत त्यात हा स्वभाव खुलेल असे लेखकाने पाहिलेले आहे. पटकथा गणेश मतकरींची असून संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले आहेत, त्याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे. पु.लं.चे व्यक्तिमत्त्व हसरे असले तरी त्यामुळे त्यांच्या घरातील सदस्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यांची नाटकावरची निष्ठा घरातल्यांना त्रासदायक ठरत होती. केवळ नाटकात करिअर करता यावे यासाठी मूल होऊ न देण्याचा निर्णय घरातल्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यांच्या विसराळूपणाचा त्रास पत्नी, आई यांना अधिक होत होता. या व्यक्तींच्या सामंजस्यामुळे पु.लं.ना मुक्तपणे वावरणे शक्य झाले होते. यातून अनेक माणसं जोडली गेली. वृद्धावस्थेमुळे पु.ल. अखेरचा श्वास घेत असताना त्यांची पत्नी सुनिता यांना ज्या आठवणी दाटून येतात त्यांचा उलगडा या पहिल्या भागात दिग्दर्शकाने केलेला आहे. या निमित्ताने कुमार, युवा, प्रौढ, वृद्ध अशा चार टप्प्यात पु.लं.चे दर्शन या चित्रपटात घडते.

- Advertisement -

पु.लं.ची युवावस्थेतली मुख्य व्यक्तिरेखा सागर देशमुख या अभिनेत्याने केलेली आहे. पु. लं.चे निधन हे अलीकडचे असल्यामुळे जुन्या-नव्या पिढीला त्यांचे व्यक्तिमत्त्व ज्ञात आहे. भूमिकेवर त्यांची असलेली हुकूमत एकपात्री प्रयोगाची चित्रफित उपलब्ध असल्यामुळे पु.लं.चा स्वत:चा कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन यात दिसतो. त्यामुळे नक्कल म्हणण्यापेक्षा हुबेहूब व्यक्तिरेखा साकार करणे ही मोठी जबाबदारी असते. मिश्किल हसणे, हातवारे करून बोलणे, चेहर्‍यावरचे ठरावीक हावभाव जसे आहेत तसे व्यक्त झाले तर ती व्यक्तिरेखा प्रभावी ठरू शकते. सागरने या सार्‍या गोष्टी आपल्या भूमिकेत आणलेल्या आहेत. महेशच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे पु.लं.च्या सान्निध्यात ज्या नामांकीत व्यक्ती आलेल्या आहेत त्यांचा संवादात आवर्जून उल्लेख केल्यामुळे चित्रपट पाहणे आणि व्यक्ती जाणून घेणे हे अधिक सोपे झालेले आहे.

पूर्वार्धात सुनिता देशपांडेंची युवा अवस्थेतली मुख्य व्यक्तिरेखा ईरावती हर्षे हिने केलेली आहे. सुनिता देशपांडे यांचे राहणे, वागणे हे सामंजस्याचे होते. ते सगळे गुण भूमिकेत येतील असे ईरावतीने पाहिलेले आहे. या पहिल्या भागात सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे, सुनिल बर्वे, स्वानंद किरकिरे, अजय पूरकर, वीणा जामकर, विद्याधर जोशी यांचे दर्शन घडते. यांच्याही भूमिकेत खास असे वैशिष्ट्य पहायला मिळते. त्यांनी ज्यांच्या व्यक्तिरेखा साकार केलेल्या आहेत; त्यांच्या बारीकसारीक लकबी आपल्या अभिनयात येतील हे प्रत्येकाने पाहिलेले आहे. त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे हे कळायला मदत होते. या चित्रपटातून पु.ल. तर कळतातच; पण त्यांचा कलेकडे आणि वैक्तिक जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन काय आहे हे यात अधोरेखित झालेले आहे. कुटुंब सदस्यांसाठी त्यांचे वागणे त्रासाचे असले तरी त्यांच्या चाहत्यांसाठी आनंददायी आहे हे बहुदा उत्तरार्धात पहायला मिळेल. अजित परब यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे. आवर्जून पहावा असा हा चित्रपट आहेच परंतु उत्तरार्धाचीही प्रतीक्षा करायला लावणारा त्याचा शेवट आहे,जो प्रेक्षकांना आनंद देऊन जातो.

- Advertisement -

 प्रथमच कुतूहल निर्माण
प्रेक्षकांकडून पाहिली जाणारी मालिका पुढेही त्यांनी पहावी यासाठी आगामी भागात काय असेल याची क्षणचित्रे दाखवली जातात. मोजके आणि आवश्यक दाखवले गेल्यामुळे प्रेक्षकांत उत्सुकता निर्माण होते. तो प्रयत्न प्रथमच या चित्रपटाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. ८ फेब्रुवारीला या चित्रपटाचा उत्तरार्ध प्रदर्शित होणार आहे. पूर्वार्धात जी नामावली दाखवली जाते; त्यात उत्तरार्धाची काही क्षणचित्रे दाखवली जाऊन प्रेक्षकांत कुतूहल निर्माण केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -