१०३ वर्षांच्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं निधन

yamunabai vaikar
यमुनाबाई वाईकर लावणी कलावंत

जिवलगा, तुम्ही माझे सावकार, शेत जमीन गहाण ठेवीते, घेते मी रोखा करुनी, तुम्ही माझे सावकार… अशा शब्दात फड रंगवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, पारंपरिक पद्धतीने बैठकीची घरंदाज लावणी गाणाऱ्या एकमेव गायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्या १०३ वर्षांच्या होत्या. बुधवारी साताऱ्यातील, वाई येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने लावणीच्या इतिहासातील लखलखता तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

यमुनाबाई वाईच्या, कोल्हाटी समाज वस्तीत राहत होत्या. ही वस्ती म्हणजे एक लोककलेचे माहेरच होते. यमुना, तारा, हिरा या तीन बहिणी. आईचे नाव गीताबाई. त्याही गायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून डोंबारी खेळातून पोट भरता भरताच यमुनाबाई वाईकरांनी गाणं गायला सुरुवात केली. त्यांना आईकडूनच गाण्याचा वारसा मिळाला. त्याच त्यांच्या पहिल्या गुरू ठरल्या. त्यानंतर त्या ‘रंगू आणि गंगू’ फडावर दाखल झाल्या. तिथे त्या ठेका आणि नाचणे शिकल्या. नंतर वाईला परत आल्यावर ‘यमुना हिरा तारा संगीत पार्टी’ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या कलेची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. त्यांना टागोर अॅकॅडमीचा जीवन गौरव, माणिक वर्मा प्रतिष्ठान, संगीत अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा लावणी सम्राज्ञी पुरस्कार, जागतिक मराठी परिषद, पहिला लोकरंगभूमी पुरस्कार, वसुंधरा पंडित पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ‘मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. ‘महाराची पोर’ नाटक बघायला साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.

एका रसिकासाठी रात्रभर गायल्या

यमुनाबाई वाईकर या अस्सल जातीवंत, कलाकार होत्या. लावणी गाताना त्या तल्लीन होऊन गात. त्या समोर किती रसिक बसलेत याचा विचारही करत नसत. एकदा औरंगाबादला संगीतबारी चालू होती. आसपास सगळे फड लागलेले. सगळीकडे खूपच गर्दी होती, पण त्यांच्या फडावर एकच तिकिट विकले गेलेले. त्यांनी त्या रसिकाचे पैसे परत करण्यास मॅनेजरला सांगितले, पण तो रसिक काही ऐकेना, तो म्हणाला, मी इतका लांबून आलोय, मी त्यांची लावणी ऐकल्याशिवाय जाणार नाही. त्याचा आग्रह बघून यमुनाबाइंर्नी कार्यक्रम सादर केला. यमुनाबाई त्या एका रसिकासाठी गायला बसल्या खऱ्या, पण एक-दोन गाणी झाल्याबरोबर चारी बाजूने गर्दी उसळली. कार्यक्रम तर हाऊसफुल झालाच, मैफिलही रात्रभर रंगली. सकाळी नमस्कार करून यमुनाबाई उठल्या तशा मागे इतर फडावरच्या बाया उभ्या होत्या. त्या चटचट पाया पडायला लागल्या. म्हणाल्या तुमच्या गाण्याची नक्कल करूनच तर आम्ही पोट भरतो.

यमुनाबाई वाईकर माझ्या आईच्या पिढीतल्या थोर कलावंत होत्या. माझी आईही कलावंतच होती. पण यमुनाताईंच्या तोडीचे आजवर मला कुठे दिसले नाही. त्यांची अदाकारी आणि गायन आगळेच म्हणावे लागेल. त्या तारुण्यात होत्या त्यावेळी तर मी जन्मलेही नव्हते. मात्र आठेक वर्षांपूर्वी माझा कार्यक्रम वाईला होता. त्या कार्यक्रमानंतर ताईंच्या घरी जाऊन मी त्यांची भेट घेतली. दोनेक तास त्या खूप जिव्हाळ्याने गात्या-बोलत्या झाल्या. उंच माडीवरती चला… ,सोडा मनगट… या लावण्या त्यांनी मला अदाकारीसकट गाऊन दाखवल्या. मग आठवणीतला जुना काळ जागवला. त्या म्हणाल्या, मी तमाशातही काम केले. आर्यभूषण थिएटरमध्ये बराच काळ होते. आमच्या वेळी तंबूत कार्यक्रम करायचो. दिवसभर स्टेज नीट करून माती टाकून संध्याकाळी त्यावर कार्यक्रम करावे लागायचे. सगळ्याच प्रकारचे कष्ट खूप होते आणि पैसा कमी. जळते टेंभे असायचे. त्याच्या प्रकाशात कार्यक्रम केले. अगदी साधा लाऊडस्पीकरही नसायचा. मात्र तेव्हाचा प्रेक्षक खरा रसिक होता. मी स्वत: नव्या पिढीतली एक कलावंत आहे. त्यांची एकदाच झालेली भेट मनात खोल रुतून राहिली. आई सांगायची, की यमुनाताई मैफलीत आल्यावर प्रेक्षकांची नजर त्यांच्यावरून क्षणभरासाठीही हटू देत नसत. गाण्याच्या शब्दाशब्दातून त्यांचा संवाद असायचा. एकेका शब्दाचा अर्थ त्या देहबोलीतून उलगडायच्या. शब्दफेक पण तशीच लाजवाब होती. ताईंनी कमालीच्या प्रतिकूल काळात कला जगवली. आज तुलनेने तसा खूप अनुकूल काळ आहे. यमुनाताई शब्दश: फुफाट्यात नाचल्या! आज पैसा भरपूर, पण कला दुर्मिळ झाली आहे. त्यांच्याएवढी मेहनत आता कुठला कलावंत घेत नाही. एक खूप मोठा काळ त्यांनी बघितला. स्वत: एका उंचीवर जाताना इतर अनेक कलावंतांना त्यांनी उभे केले, जगवले हे मला सर्वात महत्वाचे वाटते. – सुरेखा पुणेकर, लावणी कलावंत

यमुनाबाईंच्या गाजलेल्या लावण्या….

  • नेसली पितांबर जरी गं, जरी गं जरतारी लाल साडी, गं चालताना पदर झाडी
  • सजना पहाट झाली, चल उठ उठ आता सजना पहाट झाली
  • अर्धा विडा आपण घ्यावा, अर्धा मला द्यावा
  • सोडा सोडा नाद सवतीचा
  • पंचकल्याणी घोडा अबलख
  • कुठवर पाहू वाट सख्याची
  • ऐका चतुरा जीवलगा, नाही गेले बालपण, आहे माझी ओळख