कर्नाटक विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती! घोडेबाजाराला उधाण!

Bjp
प्रातिनिधीक फोटो -

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत  कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे घोडेबाजाराला उधाण आले आहे. जनता दल (सेक्युलर) चे  ११ आणि काँग्रेसचे ४ नवनिर्वाचित आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे भयभीत झालेल्या काँग्रेसने संपूर्ण निकाल लागण्याच्या अगोदरच जनता दलासोबत सत्ता स्थापनेसाठी  राज्यपालांकडे दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपनेही येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यास आपण समर्थ असल्याचे म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. त्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप बहुमत मिळवेल, असे चित्र होते. मात्र त्यानंतर भाजप १००-१०४ जागांंवरच अडकणार असल्याचे दिसू लागताच काँग्रेसमधून हालचाली सुरू झाल्या.
निवडणुकीच्या दरम्यान, काँग्रेसचे ४ तर जनता दलाचे ११ आमदार भाजपच्या गळाला लागल्याची माहिती काँग्रेसला मिळाली. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व १५ आमदार निवडून आले होते. त्यांच्या मदतीने भाजप सरकार स्थापणार हे उघड होताच काँग्रेसकडून जनता दलाशी  थेट संपर्क करण्यात आला. मुख्यमंत्रीपद  जनता दलाला देऊन सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी दुपारी अडीचच्या सुमारास काँग्रेसने थेट राज्यपालांकडे धाव घेतली.
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सोनिया गांधी आणि आझाद यांच्यात चर्चा झाली. सोनिया यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर आझाद यांनी देवगौडा यांच्याशी चर्चा करून जनता दलाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. जनता दलाने ही ऑफर स्वीकारली आणि काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडून येडीयुरप्पा यांनीही सरकार स्थापनेचा दावा केला. त्यामुळे आता सर्व लक्ष राज्यपालांच्या निर्णयाकडे लागले असून कर्नाटकात घोडेबाजाराला उधाण आले आहे.

राहुल गांधी नको रे बाबा!

कर्नाटकातील पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना कमालीचा धक्का बसला आहे. ज्या-ज्या राज्यात राहुल गांधींनी प्रचार केला त्या राज्यात काँग्रेस हरली. पंजाबमध्ये राहुल गांधींनी  विशेष लक्ष दिले नव्हते. तेथे काँग्रेस विजयी झाली. पण उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथे राहुल गांधी ठाण मांडून बसले होते. पण तेथे मात्र काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे निवडणुकांपासून राहुल गांधींना दूर ठेवण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते दबक्या आवाजात करत आहेत.

येडीयुरप्पांना मानाचे स्थान

कर्नाटकात लिंगायत समाजाची १५ टक्के मते आहेत. लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव कर्नाटकातील काँग्रेसने संंमत केला. मात्र लिंगायत समाजात येडीयुरप्पांना मानाचे स्थान आहे. मागील विधानसभा निवडणूक जेव्हा येडीयुरप्पांनी वेगळा पक्ष स्थापन करून लढवली होती, तेव्हाही हा समाज येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वामागे उभा राहिला. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी लिंगायत समाजाने केल्याचे दिसू आले.

काँग्रेसचे तेलही गेले तुपही गेले

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन येडियुरप्पांना शह देण्याची काँग्रेसची कल्पनाच चुकीची होती. कारण लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा दिल्याने कर्नाटकातील वीरशैव दुखावले गेले. त्यांनी बाकीचे राजकारण सोडून काँग्रेस विरोधातला पवित्रा घेतला. ते काँग्रेसला महागात पडले. नवी मते जोडण्यापेक्षा असलेली वा निष्पक्ष मतदार आपल्या विरोधात ढकलण्याचे काम काँग्रेसच्या बाजूने नेमके कोणी केले हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पक्ष                     लीड +जिंकलेल्या जागा
भाजप                           १०७
काँग्रेस                           ७०
जनता दल (से.)                ४३
इतर                             ०२

भाजपने मागितला ८ दिवसांचा अवधी

कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने राज्यपालांकडे ८ दिवसांचा अवधी मागितला आहे. काल भाजप नेते येडीयुरप्पा, अनंतकुमार आदींनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेची तयारी दर्शवली आहे.  मात्र त्यासाठी ८ दिवसांचा अवधी द्यावा, असे भाजपने राज्यपालांना सांगितले.