घरफिचर्सभाऊ आजोबा

भाऊ आजोबा

Subscribe

भाऊ आजोबांचं बहुतेक सर्व लिखाण मोडी लिपित असायचं. घरातली पत्र मात्र सर्व देवनागरीत असायची. त्याकाळातदेखील मोडी वाचू शकतील अशी फार कमी माणसं कणकवली, देवगड तालुक्यात होती. त्याकाळातले नामवंत वकिल जमिनीसंदर्भातील मोडी लिपितली कागदपत्रे वाचायला बोलावतं. त्याचं इंग्रजी वाचन देखील दांडगं होतं. वर्डस्वर्थच्या बहुतेक कविता त्यांच्या मुखोद्गत होत्या.

काल घरातले सर्व बसून निवांत गप्पा मारत होतो. माझी मोठी मुलगी श्रेया कसल्या तरी कारणासाठी माझ्या बाबांकडे हट्ट करत होती. बाबांनी लगेच कपडे घातले आणि तिला घेऊन दुकानात गेले आणि तिला हवी असलेली वस्तू घेऊन आले. मी लगेचच म्हणालो, आजोबांनीच लाड करुन ठेवले आहेत, त्यामुळे ही कोणाचं ऐकत नाही. त्यावर लगेचच बाबांनी नातीची बाजू घेत तुझे पण तुझ्या आजोबांनी असेच लाड केले होते. बाबांचे हे वाक्य मी कोणा न कोना वडील माणसाकडून, काकांकडून, मोठ्या काकीकडून वरचेवर ऐकत असतो.

माझ्या पणजोबांना तीन मुलगे. मोठे कृष्णाजी म्हणजे आण्णा. दुसरे माझे आजोबा ज्यांना सर्व भाऊ म्हणायचे आणि सर्वात लहान यशवंत म्हणजे आबा आजोबा. मोठे आण्णा स्टन्डर्ड मिलमध्ये चांगल्या हुद्यावर होते. ते चांगले उंच धीप्पाड, गौरवर्ण होते त्यांचे एकंदरीतच व्यक्तिमत्व राजबींडं होतं. धाकटे आबा आजोबा तेदेखील उंच असून पोलीस खात्यात होते. त्यांच्या एकंदरीतच वागण्याबोलण्यात कमालीची शिस्त असायची. त्यांचा स्वभाव अतिशय कडक होता. माझे आजोबा थोडे बुटके आणि कृश प्रकृतीचे होते.

- Advertisement -

माझी पणजी त्याकाळी शिकलेली होती. तिला वाटे की, यशवंत प्रकृतीने काटक आहे, त्याने गावी राहून शेती करावी आणि काशीरामने म्हणजे माझ्या आजोबांनी मुंबईला जाऊन शिक्षण घ्यावे आणी वडील भावासोबत नोकरी करावी. कारण त्याची कृश प्रकृती पाहता गावातील शेती वाडी त्याच्याने होणार नाही. पुढे आण्णाबरोबर भाऊ मुंबईत आले. आण्णांनी भाऊंना परेलच्या आर. एम. भट शाळेत दाखल केलं. आजोबा फायनलपर्यंत शिकले, पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. फायनलच्या परीक्षेनंतर आजोबा गावी गेले आणि तिथेच रमले. त्यांना मुंबईला जाणे नकोसे वाटू लागले. दरम्यान आबा आजोबा मुंबईला गेले आणि पोलीस भरतीत उत्तीर्ण झाले.

. . आजोबाचं आयनलातलं वास्तव्य सुरू झालं. पूर्वापार मिळालेल्या इनामदारीवर दिवस काढणे मुश्किल होतं. कारण त्या दरम्यान कुळकायदा आला, कसेल त्याची जमीन या न्यायाने बर्‍याच जमिनी कुळकायद्याने गेल्या. त्यात भावकीमध्ये जमिनीचे वाद सुरू झाले. आजोबांना कोर्ट कचेर्‍यांचा प्रचंड त्रास व्हायचा. त्याचदरम्यान त्यांना प्रचंड न्यूनगंडाने ग्रासल होतं. त्यामुळे त्यांचा स्वभाव अत्यंत चिडचिडा झाला होता. पण हे चिडचिडेपण फक्त घरातल्या पुरते मर्यादित होतं विशेषतः आजीपर्यंत .गावातल्या बाकी कोणत्याही माणसाबरोबर त्यांचा वाद झाला नव्हता.

- Advertisement -

. . . . कोणत्याही माणसाने त्यांना उलट उत्तर दिलं की ते मनातून अस्वस्थ होतं पुन्हा पुन्हा ते त्या गोष्टींचा विचार करत बसत, पण त्या बोलणार्‍या माणसाला त्याबद्दल जाब विचारावं हे त्यांच्या मनातदेखील येत नसे.आजोबा भल्या पहाटे उठतं. त्यांच्या आधी आजी उठलेली असायची. आत जात्याची घरघर सुरू झाली की आजोबा खळ्यात घाल घाल पिंगा वार्‍या……किंवा तुकोबांचे अभंग म्हणत व हाताने झाडू बनवण्यासाठी हिर तासत असतं. तुकोबा हे त्यांचे आवडते संत. तुकोबांना त्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक गुरूचे स्थान होतं. तुकोबांचे पुष्कळ अभंग त्यांना मुखोद्गत होते, आर्या साक्या त्यांना येत होत्या. आधी बिज एकले, बीज अंकुरले……हे त्यांचे आवडते गाणे .सकाळच्या प्रसन्न वातावरणात आजोबा हे सर्व म्हणत. त्यामुळे घरातल्या वातावरणात एक प्रसन्नता येत असे. त्याचं प्रेम घरातल्या गाईगुरांवर व झाडापेडांवर जास्त होतं. आगरात नारळांची झाडं लावल्यापासून रोज आजोबा आगरात जात, त्या झाडांना पाणी मिळावं म्हणून त्यांनी पाटाच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांनी लावलेले नारळ आजही उत्तम फळ देतात.

पाटाच्या जवळ एक सोनचाफ्याचं झाड आहे तेदेखील आजोबांनी लावलं आहे. त्यांचा एकंदरीत वावर बागेत किंवा गोठ्यात जास्त असायचा. बागेतलं पाणी देऊन झालं की ते थेट गोठ्यात जायचे. गोठ्यात त्यांचे सहा बैल, म्हशी, तिची रेडकं, गाई, तिची वासऱं त्यांची वाट बघायची. घरात दुधदुभत्याची कोणताही कमी नव्हती. एकावेळी दोन दोन म्हशी दुभत्या असतं. त्याचं चारा पाणी, गवत वैरण आजोबा स्वतः बघत. म्हशीला कोणती दुखापत झाली किंवा कोणता रोग झाला की ते स्वतः औषधपाणी करायचे. एकदा घरातल्या म्हशीला तोंडात इजा झाली. तिच्या तोंडात किडे पडले. आजोबा स्वतः ते किडे आपल्या हाताने काढत. अशी कामं करताना त्यांना कधी घाण वाटली नाही. त्यांना कुठल्याही राजकारणात रस नव्हता. दिल्लीतल्या तर सोडा पण वाडीतल्यासुद्धा नाही. ते फार व्यासंगी होते. गावच्या घरात त्यावेळी ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोधासारखे ग्रंथ असतं. दर श्रावण महिन्यात स्वतः आजोबा ग्रंथ वाचून त्याचे निरूपण गावकर्‍यांना सांगत. श्रावण महिना सुरु झाला की गावकरी न बोलवता रात्री आमच्या घरात जमायचे आणि कंदीलाच्या प्रकाशात आजोबा वाचन करुन निरूपण सांगत.

इतर वेळीदेखील त्यांचे वाचन चालू असायचे. त्यावेळी आमच्या घरात ‘रत्नाकर’, कीरात सारखी साप्ताहीकं येत असतं. वाचन आणि पानं हे त्यांचं व्यसन होतं. आजोबा पान खायचे पण कसं ? एका पानाचे साधारण चार तुकडे करायचे आणि जाता येता एकेक तुकडा तोंडात टाकायचा. त्यांचा स्वभाव आणि चेहरेपट्टी साने गुरुजींसारखी होती. बसतानादेखील ते उकिडवे होऊन बसत. अशी बैठक घालून ते किमान तासभर सहज बसायचे. त्याचं बहुतेक सर्व लिखाण मोडी लिपित असायचं. घरातली पत्र मात्र सर्व देवनागरीत असायची. त्याकाळातदेखील मोडी वाचू शकतील अशी फार कमी माणसं कणकवली, देवगड तालुक्यात होती. त्याकाळातले नामवंत वकिल जमिनीसंदर्भातील मोडी लिपितली कागदपत्रे वाचायला बोलावतं. त्याचं इंग्रजी वाचन देखील दांडगं होतं. वर्डस्वर्थच्या बहुतेक कविता त्यांच्या मुखोद्गत होत्या.

कोकणातला तो काळ शेतकर्‍यासाठी फार जिकीरीचा होता. आजोबांचे मोठे भाऊ आण्णा तसे धड़ाडीचे होते. त्यांचा सर्वात मोठा आधार भाऊंना होता. भाऊंची मोठी दोन्ही मुलं म्हणजे माझी आत्या, उषा आणि माझे बाबा आण्णांकडेच रहायला होते. माझे बाबा नोकरीला लागले, आत्येच दरम्यान लग्न झालं. घरातली परिस्थिती आटोक्यात येईल असं वाटतं असतानाच आण्णांचं अचानक निधन झालं. त्यानंतर घरातील आर्थिक जबाबदारी बाबांच्या शिरावर आली. माझी आजी वरचेवर आजारी असायची. या सर्व घटनांनी आजोबा मनातून धास्तावले होते. मुळात त्यांचा स्वभाव भित्रा होता. प्रसंगी लागणारी निर्णय क्षमता त्यांच्याकडे नव्हती. ते देवभोळे होते. त्यांच्याकडून पुष्कळ पुण्यकर्मे झाली. त्यांचा लोकसंग्रह खूप चांगला होता.

पण त्यांच्याकडे नेतृत्व अजिबात नव्हतं. त्यांचा स्वभाव बाळबोध होता. माझा प्राध्यापक असलेला भाऊ बाळा त्यांच्या खूप जवळ होता. त्याने सांगितलेली एक आठवण -एका रात्री घराच्या पडवित तो स्वतः, माझे चुलते आणि स्वतः भाऊ झोपले होते. त्या वाटेने कोणी गावकरी मद्यधुंद अवस्थेत जात होता. तो त्या अवस्थेत आजोबा जिथे झोपले होते तिकडे आला. त्याची खडबड ऐकून आजोबांना जाग आली. त्या माणसाला अशा अवस्थेत बघून आजोबा घाबरले. पण आजोबांना बघितल्यावर तो माणूस शरमिंदा झाला. त्याने त्या अवस्थेत आजोबांचे पाय धरले.

दातृत्वाच्या बाबतीत आजोबांचा हात कोणी पकडू शकणार नाही. घरची परिस्थिती नाजूक असतानादेखील दारात आलेला कोणी माणूस विन्मुख गेला नाही. कित्येक भूमीहीन लोकांना आपल्या हिश्याच्या जमीनी दिल्या. व्यवहारी जगाच्या दृष्टीकोनातून आजोबांचे वागणे मुर्खपणाचे ठरेल, पण आजोबांची गणना व्यवहारी जगात होऊ शकत नाही. त्यांच्या प्रकृतीला हेच वागणे शोभून दिसते. आजीच्या मृत्यूनंतर मात्र आजोबा खचून गेले. आजीला प्रसंगी ते ताडताड बोलत, पण मागाहून त्यांना त्यांचे वाईट वाटे. त्यांना नंतर त्यांच्या मुलांची खूप काळजी वाटे. मोठा बबन-माझे बाबा-नोकरी करत होते. पण त्यांच्या मागे सतत दगदग आहे. दुसरा विजय त्याचं घरादारात, शेतीकडे लक्ष नाही. धाकटा सुधीर अजूनही शिकत आहे.

मुलं अजूनही स्थिर नाहीत. जन्माची सोबतीन इहलोक सोडून गेलेली. अशा परिस्थितीत विजयने गावात गिरण सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजोबांसारख्या माणसाला विजयचा हा निर्णय कसा मानवेल?बरं मोठा बबन आणि त्याची बायकोदेखील विजयला साथ देते. अशावेळी कोणाला काय बोलणार? ते चूप बसायचे. अशा प्रसंगी स्वत:च्या नातवाला खेळवण्यात त्यांना धन्यता वाटे. बबनचा मुलगा वैभव त्यांच्याकडे असायचा. त्याला फणसाच्या पानाचे केलेले बैल आवडायचे. म्हणून भाऊ सकाळी उठल्यावर बैल बनवून ठेवतं.

. . . . काळ पुढे जात होता. 7 ऑक्टोबर 1980 चा दिवस उजाडला. आजोबांना कसेसेच होत होतं. विजयने डॉक्टरकडे नेण्यासाठी रिक्षा बोलावली. तोपर्यंत आजोबांचे नेत्र पैलतीरी लागले. भाऊ गेले तेव्हा त्यांचा नातू वैभव फार तर दीड दोन वर्षांचा होता. त्याला आपले आजोबा कसे होते हे आठवत नसेल, पण आपल्या तान्हेपणी कोणी एक माणूस आपणास फणसाच्या पानाचे बैल बनवून देत होता असं पुसटस त्याला आठवतं. ती व्यक्ती कुठे गेली? अशा प्रश्नार्थक नजरेने त्याने कुणाकडे पाहिलं तर त्याला कोणी वडील माणूस सांगायचे भाऊ पंढरपूरला गेले. लहान वैभव सर्वांना सांगे भाऊ पंढरपूरला गेले. आपल्या आजोबांची तेवढी आठवण तरी त्याच्याकडे आहे. त्याच्या पाठीशी जन्मलेली या बाबतीत कमनशीबी समजायची का?

आजोबा पंढरपूरला गेले असे लहानपणी कोणी सांगितलं तरीही मला वाटत आजोबा आपल्या लाडक्या तुकोबासोबत पहाटे म्हणत असतील आधी बीज एकले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -