घरफिचर्सपत्रकार स्वातंत्र्याचा भाजपेयी पुळका!

पत्रकार स्वातंत्र्याचा भाजपेयी पुळका!

Subscribe

ज्यांना आतापर्यंत मोदी मीडिया म्हणून संबोधलं जात होतं त्या मीडियाचं एक पात्र म्हणून अर्णब गोस्वामींचा बोलबाला गेल्या सहा वर्षांपासून लोक झेलतायत.

रिपब्लिक वाहिनीचे पत्रकार आजवर कोणासाठी आपली पत्रकारिता झिजवत होते, हे बुधवारच्या अटक नाट्यानंतर उघड झालं, ते बरंच झालं. भाजप नेते काय शोधून कशाचं समर्थन करतात त्याचं हे उत्तम उदाहरण होय. ज्यांना आतापर्यंत मोदी मीडिया म्हणून संबोधलं जात होतं त्या मीडियाचं एक पात्र म्हणून अर्णब गोस्वामींचा बोलबाला गेल्या सहा वर्षांपासून लोक झेलतायत. एखाद्या विचारसरणीला एखाद्या संपादकाने वाहून घेणं ही गोष्ट आजवरच्या पत्रकारितेने आत्मसात केली आहे. पण त्या संपादकांनी तो शिक्का आपल्या वाहिनीवर किंवा वृत्तपत्रावर कधी थेट बसू दिला नाही. अर्णब संघाचा किंवा विद्यार्थी परिषदेचाही असू शकतो. पण त्याची वाहिनी कोणासाठी जाणीवपूर्वक काम करत असेल तर दर्शकांना त्याचा विचार कधीतरी करावाच लागणार होता. यानिमित्ताने अर्णब आणि त्याची वृत्तवाहिनी पूर्णतः भाजपमय झाल्याचं त्याने आणि भाजपच्या तमाम नेत्यांनी दाखवून दिलं आहे.

अन्वय नाईक या वास्तुविशारदाच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी तसेच फिरोज शेख आणि नितेश सारडा हे दोन व्यावसायिक जबाबदार असल्याचं उघड असताना माजी मुख्यमंत्री आणि गृह खात्याची जबाबदारी सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे ते प्रकरण पोलिसांनी दप्तरबंद करून टाकलं. दोन जिवांचा मृत्यू झाला असताना अशा प्रकरणाची समरी रद्द करण्याची हिंमत कोणीही पोलीस अधिकारी करू शकणार नाही. राज्याचा मुख्यमंत्री वा एखादा बडा मंत्रीच हे करू शकतो. कोणा ऐर्‍यागैर्‍याचं हे काम नाही. आत्महत्येला कारण ठरलेल्यांना वाचवणारेच आज रस्त्यावर आहेत. हा योगायोग नाही. जो आपल्यासाठी राबतो त्याच्यासाठी अश्रू ढाळलेच पाहिजेत. ते अश्रू भाजपचे नेते अर्णबसाठी ढाळत आहेत. एकही पत्रकार संघटना ज्या पत्रकारासाठी साधा निषेध नोंदवत नाहीत त्यासाठी भाजपचे नेते रस्त्यावर येत असतील तर या नेत्यांची पाळी काय असेल?

- Advertisement -

अन्वय नाईक यांच्या सुसाइड नोटमध्ये अर्णब आणि फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांचा उल्लेख असूनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. हा आपल्या पतीवर अन्याय आहे आणि त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा अधिकार घटनेने अन्वय यांच्या पत्नीला जरूर दिला आहे. एका उच्चशिक्षित व्यावसायिकाच्या आत्महत्येत नाव येत असताना अशा व्यक्तीची उघड बाजू घेणारे सगळ्याच पक्षात असावेत, असा अर्णब याचा तर्क असेल तर तो कधीतरी मोडायलाच हवा होता. तो उध्दव यांच्या सरकारने मोडला हे चांगले झाले. असं सगळं असूनही भाजपचे नेते लोकांना मूर्खात काढणारी कृती करणार असतील तर अशा नेत्यांनाही त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या प्रकरणात भाजपचा अंतस्थ हेतू काय हे कळलं हे बरंच झालं. आज अर्णबसाठी गळे काढणारे भाजपचे हे नेते महिन्याभरात घडलेली घटना नजरेआड करतात आणि आणीबाणीच्या इतिहासाच्या गप्पा मारतात, याचं नवल वाटतं. हाथरसमध्ये एका युवतीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं प्रकरण उत्तर प्रदेशचे पोलीस सहज म्हणून घेतात आणि तिथे गेलेल्या पत्रकारांचा घटनास्थळी जावू देण्याचा मार्ग रोखतात. या घटनेचा देशभरातील पत्रकार निषेध करत होते तेव्हा भाजपच्या या नेत्यांचा धर्म कुठे होता? कुठे होते राम कदम आणि किरीट सोमय्या. देशात एकटा अर्णब पत्रकारिता करतो अशी भावना भाजपच्या या मंडळींची झालेली दिसते. कारण या पक्षातील नेत्यांचा खोटेपणा अर्णब कायम दुर्लक्षित करत आला. आता इतर पत्रकारांकडून असला खोटेपणा स्वीकारला जात नसल्याने भाजपवाले त्यांना जुमानत नाहीत. अन्वय नाईकच्या मृत्यूला अर्णब कारणीभूत असल्याचं उघड सत्य भाजपच्या नेत्यांना ठावूक आहे. तरीही ते अर्णबची बाजू घेत आले. कारण हाच अर्णब आजवर त्यांच्यासाठीच खपत आणि राबत होता. तेव्हा त्याची परतफेड करणे ही भाजपवाल्यांची जबाबदारी आहे. ती त्यांनी रस्त्यावर येऊन पार पाडली आणि स्वतःचं हसं करून घेतलं.राज्यात अर्णबवर दाखल झालेले सगळे गुन्हे हे समाजाशी द्रोह करण्याच्याच पठडीतील आहेत. अशा समाजद्रोही पत्रकारांसाठी वेळ घालवण्याऐवजी देश आणि राज्य घडवण्याचे काम केलं असतं तर भाजपचं कौतुक झालं असतं.

टीआरपी घोटाळ्यात त्याने ज्यांच्याशी गद्दारी केली त्यांना न्याय देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. टीआरपीच्या खोट्या रेटिंगचा वापर करणार्‍याने जाहिरातदारांना फसवलेच. पण आपल्या दर्शकांनाही मूर्ख ठरवलं. या देशात वाहिन्यांचे मायाजाळ 1980 पासून खर्‍या अर्थाने उदयास आले. तेव्हापासून आजवर आपल्याच प्रेक्षकांना उल्लू बनवण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही. हे उद्योग एका अर्णबने केले आणि जगात भारतीय माध्यमांची छी थू झाली.राज्यात आणि देशात पत्रकारांविरोधी गुन्हे दाखल झाले नाहीत असं नाही. यातल्या अनेकांवर खोटेही गुन्हे गुदरले गेले. पण जेव्हा केव्हा असे गुन्हे नोंदवून पत्रकारांची मुस्कटदाबी झाली तेव्हा तमाम पत्रकार रस्त्यावर उतरले. अर्णबवर इतका गंभीर गुन्हा नोंदवला जावूनही एकही पत्रकार बाहेर आला नाही आणि एकाही संघटनेने कारवाईचा साधा निषेध केला नाही याचा अर्थ काय? एव्हाना जगाला शहाणपणा शिकवणार्‍या भाजपच्या नेत्यांना इतकीही अक्कल येऊ नये?

- Advertisement -

माणूस कितीही मोठा असला तरी त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. पत्रकारांची बांधिलकी ही सत्तेशी नव्हे तर जनतेशी असली पाहिजे. जेव्हा ती सत्तेशी जवळीक साधते तेव्हा सामान्यांशी तिची नाळ तुटते. असं होतं तेव्हा सामान्यही तिच्याशी फटकून वागतात. अर्णबबाबत पत्रकार आणि जनता फटकून वागण्याचं कारणच हेच आहे. त्याचे पाय जमिनीवर राहिले नसल्याने तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही एकेरीने उच्चारतो. गृहमंत्र्यांना आव्हान देतो आणि पोलीस अधिकार्‍यांची औकात काढतो. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा पद्धतीने मोजलेलं राज्यातील जनतेला आवडलेलं नाही. अपवाद भाजप. या पक्षाच्या नेत्यांचे डोळे सत्तेवर केंद्रित झालेले आहेत. सत्तेशिवाय त्यांना चैन पडत नाहीए. यामुळे मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणार्‍या अर्णबचा साधा निषेध त्यांनी केला नाही. यातून अर्णब आणि भाजपच्या नेत्यांची मानसिकता कळून येते.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात त्याने केलेला कहर जगाने पाहिला. इतके आकांडतांडव केवळ मानसिकदृष्ठ्या विचलित झालेला माणूसच करू शकतो. या प्रकरणाची सीबीआय चौकशी लावण्यापासून आदित्य ठाकरे यांना शिक्षा करण्याचं फर्मान काढून अर्णबने सारी नीतिमूल्ये काखोटीला मारली. सरकार टिकणार नाही असं किंचाळून सांगणारा अर्णब भाजप नेत्यांना वरदान वाटत होता. कारण काहीही होऊन सरकार पडत नाही, हे लक्षात आल्यापासून भाजप नेते अशा पत्रकारांना चार्ज करण्यात धन्यता मानत होते.भारतीय जनता पक्षाच्या शक्तीवर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. अखेर यातही तोंडावर अपटण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. त्याच्याच वाहिनीवर अर्णबला शिव्या घालणारे त्याच्या उद्धटगिरीची साक्ष देतात. ‘पूछता भारत’ या कार्यक्रमात, तो कसाही वागू शकतो. मात्र इतरांना तो कस्पटाचीही किंमत देत नाही. तो मुंबईच्या पोलीस आयुक्तांना जसा जाब विचारतो तसा कोणालाही तो तुरुंगात पाठवण्याची शिक्षा करू शकतो. या कारणानेच न्यायालयाला त्याच्या शाब्दिक मुस्कटात वाजवावी लागली. यावरून तो काय पातळीचा आहे हे जगाला कळलं, ते भाजप नेत्यांना कळलं नाही, हेच त्या पक्षाचं दुर्दैव होय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -