घरताज्या घडामोडी‘हिंदुत्वा’वरून तांडव..!

‘हिंदुत्वा’वरून तांडव..!

Subscribe

भाजप वगळता कोणताही राष्ट्रीय स्तरावरील पक्ष हिंदुत्व ही संकल्पना स्वीकारत नसल्यामुळे हिंदुत्व ही भाजपची एकहाती अत्यंत बलशाली हुकमी व्होट बँक बनत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली, तेव्हापासून शिवसेनेला मिळणारे हिंदुत्वाचे लाभ हेतूपुरस्पर तोडण्यास भाजपने सुरुवात केलेली आहे. एमआयएमने नुकताच आघाडीला दिलेला प्रस्ताव त्याचाच भाग मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलेल्या भाषणाचा सगळा रोख भाजपवर मात करणारा होता, त्यामुळे हिंदुत्वावरून सुरू असलेले हे तांडव कुठले टोक गाठते, हे येणारा काळच सांगू शकेल.

2014 मध्ये भारतात नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक भाषण शैलीने अत्यंत प्रभावशाली अशी हिंदुत्वाची लाट भारतीय राजकारणात आली. या मोदी लाटेने काँग्रेससारख्या स्वातंत्रपूर्व काळातील देशातील अत्यंत बुजुर्ग पक्षाचीदेखील घरटी उध्वस्त करून टाकली. जिथे काँग्रेससारखा या देशाचे राजकारण गेली साठ-सत्तर वर्षे कोळून प्यायलेला पक्षदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर टिकाव धरू शकला नाही तिथे राज्या-राज्यात विभागलेल्या प्रादेशिक आणि छोट्या-मोठ्या पक्षांचा काय निभाव लागणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांनी 2014 नंतर भारतीय राजकारणाने जी कलाटणी घेतली आहे ती नेमकी हेरली आहे. या देशातील 80 ते 82 टक्के समाज हा हिंदूधर्मीय आहे आणि जोपर्यंत देशातील हिंदू समाज हा हिंदू मतदार म्हणून विचार करून मतदान करणार नाही तोपर्यंत काँग्रेसची सर्वधर्मसमभावाची संकल्पना या देशावर अखंडपणे राज्य करत राहील याची पुरेपूर कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालादेखील आहे. त्यामुळेच देशातील हिंदू व्होट बँक मोठ्या प्रमाणावर जागृत करणे आणि या हिंदू बँकेच्या माध्यमातून देशावर भाजपचा एकसंध अंमल कसा राहील याची पुरेपूर दक्षता घेणे हाच एकमेव अजेंडा आता राजकीय पक्ष म्हणून भाजपने स्वीकारलेला स्पष्टपणे दिसत आहे.

- Advertisement -

भाजप वगळता कोणताही राष्ट्रीय स्तरावरील पक्ष हिंदुत्व ही संकल्पना स्वीकारत नसल्यामुळे हिंदुत्व ही भाजपची एकहाती अत्यंत बलशाली हुकमी व्होट बँक बनत आहे, हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा आणि त्या अनुषंगाने झालेल्या विविध विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिलेच आहे. अगदी काल परवा झालेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्येदेखील हिंदुत्वाने भाजपला तारले हेच अधोरेखित होत आहे. याचा भाजपला सर्वाधिक लाभ याकरता मिळत आहे, कारण हिंदुत्वमध्ये भाजपचा वाटेकरी कोणीही नाही. भाजप ज्याला बरोबर घेईल तो हिंदुत्वाचा वाटेकरी होऊ शकतो, मात्र भाजपाप्रमाणे स्वतंत्र बाण्याने, स्वतंत्र धोरणाने हिंदुत्वाची मशाल खांद्यावर घेणारा राष्ट्रीय स्तरावर अन्य दुसरा कोणताही राजकीय पक्ष नाही हेच भाजपच्या सर्वाधिक पथ्यावर पडलेले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेना 2019 मध्ये जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन करती झाली तेव्हापासून शिवसेनेला मिळणारे हिंदुत्वाचे लाभ हेतूपुरस्पर तोडण्यास भाजपने सुरुवात केलेली आहे. एमआयएमकडून शिवसेनेला अथवा महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या आघाडीला प्रवेशाचा दिलेला प्रस्ताव हादेखील शिवसेनेबरोबरच आघाडीची कोंडी करण्याचा डाव आहे.

देशातील राजकारणात हिंदुत्वाचा झेंडा हा पूर्णपणे भाजपच्या खांद्यावर आहे तर महाराष्ट्रात मात्र शिवसेना हा हिंदुत्वामध्ये भाजपचा मोठा वाटेकरी आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राने भाजपचे 23 खासदार निवडून दिले त्याचप्रमाणे शिवसेनेचे देखील 18 खासदार निवडून दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून येण्यामागे हिंदुत्व हा या दोन्ही पक्षांचा भक्कम आधारस्तंभ होता. त्यामुळेच जर या पुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अथवा लोकसभा निवडणुकांमध्येदेखील जर भाजपला शिवसेनेची साथ मिळणारच नसेल असे गृहीत धरून भाजपला राजकारण करायचे म्हटले तर हिंदुत्वाचा लाभ सेनेला कमीत कमी कसा मिळेल याची पूर्वतयारी भाजपने सुरू केली आहे. त्यामुळेच आज झालेल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजपपासून दूर गेली असली तरीही हिंदुत्वापासून गेलेली नाही हे त्यांना वारंवार बजावून सांगावे लागले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसंपर्क मोहिमेची सुरुवात करताना राज्यातील शिवसेनेचे नेते जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आणि या संवादात अर्थातच त्यांचा सारा रोख हा यापुढील भाजपच्या राजकारणावर शिवसेना कशाप्रकारे रिअ‍ॅक्ट करेल हे दर्शवणारा होता. उद्धव ठाकरे यांचे निम्म्याहून अधिक भाषण हे भाजपवर आणि हिंदुत्वावर आधारित होते. भाजपला शिवसेनेची हिंदुत्वाची ताकद क्षीण करायची आहे. त्यादृष्टीने भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जनाब सेना’ असे संबोधून शिवसेनेला खिजवायला सुरुवातदेखील केली आहे. हे सर्व करण्यामागे एमआयएम जरी फ्रंटवर असली तरी प्रत्यक्षात हा सगळा भाजपचा डाव असल्याची शंका शिवसेनेसह आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे एमआयएमचे आक्रमक मुस्लीम धोरण स्वीकारायचे की नाकारायचे अशा संभ्रमात सध्या राज्यातील राष्ट्रवादी नेते पडले आहेत. मुळात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या आघाडीत एमआयएमलादेखील येण्याची इच्छा असल्याने तशी ऑफर जाहीररीत्या दिली आहे. एमआयएम हा मुस्लीम धर्मीयांचा अत्यंत आक्रमक पक्ष म्हणून गेल्या काही वर्षात नावारूपाला आलेला आहे. त्यामुळे वास्तविक एमआयएम जर महाविकास आघाडीत सामील झाला तर मुस्लीम समुदायाची मते ही काँग्रेस-राष्ट्रवादीला तरी किमान पडू शकतील, शिवसेनेला पडतील की नाही याची शाश्वती आताच देता येणार नाही, परंतु एमआयएमसोबत युती केल्याचा निश्चित फायदा हा काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा अधिक होऊ शकतो. राज्यातील तसेच दिल्लीतील काँग्रेसचे नेते एमआयएमबाबत सावध असतात, याचे कारण मुस्लीम व्होट बँक जी पूर्वी पारंपरिक पद्धतीने काँग्रेसकडे होती, ही बँक फोडून एमआयएमच्या माध्यमातून ती अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे असते. एमआयएमला जेवढे यश मिळेल तेवढे ते काँग्रेसचे नुकसान असते. भाजपला कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचे अधिकाधिक नुकसान कसे होईल हे पाहायचे आहे, त्यामुळे एक वेळ एमआयएम वाढली तरी चालेल, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून आपचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या तरी चालतील, मात्र कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला तळागाळातदेखील सत्ता मिळू नये याची पुरेपूर दक्षता भाजप नेतृत्व 2014 सालापासून घेत आहे.

त्यामुळे एमआयएमची जी ऑफर आहे ती आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी पोषक आहे, मात्र शिवसेनेसाठी घातक आहे. शिवसेना एमआयएमबरोबर कदापि जाणार नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यातच स्पष्ट केलेले आहे. भाजपा नेतृत्वालादेखील याची जाणीव नक्कीच आहे की हिंदुत्व सोडून शिवसेना एमआयएमबरोबर जाऊ शकणार नाही. त्यामुळेच एमआयएमच्या ऑफरवरून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी आणि काँग्रेस अथवा राष्ट्रवादी यांनी एमआयएमचा प्रस्ताव स्वीकारला तर शिवसेनेने या आघाडीतून बाहेर पडावे ही या मागची खरी खेळी आहे. अर्थात भाजपच्या चाणक्यांची ही खेळी न ओळखण्याइतपत राज्यातील आघाडीचे नेते नक्कीच अपरिपक्व नाहीत. दोन आमदार असलेल्या एमआयएमसाठी शिवसेनेबरोबर पंगा घेणे म्हणजे राज्यातील सत्ता गमावून बसण्यासारखे आहे, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्के जाणून आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीदेखील एमआयएमच्या प्रस्तावावर सावध भूमिका घेत, असा प्रस्ताव प्रदेश पातळीवर देता येत नसल्याची भूमिका मांडली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व म्हणजे केवळ भाजप नव्हे तर शिवसेना हीदेखील हिंदुत्ववादी पार्टी आहे हे आपल्या जहाल विधानांमधून दाखवून देताना राजकीय वर्तुळात स्पष्टपणे बजावले आहे. अर्थात, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिका या वेळेनुसार बदलत असतात. आजच्या परिस्थितीत एमआयएमपेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ता असणे ही काँग्रेस-राष्ट्रवादीची आत्यंतिक गरज आहे. शिवसेनेलादेखील भाजपपेक्षाही त्यांचे हिंदुत्व प्रखर आणि राष्ट्रभक्त असल्याचे जनमानसामध्ये अधिक बिंबवायचे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकस्मात पाकिस्तान भेट, तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कापलेला केक, बॅरिस्टर जिना यांच्या समाधीस्थळाला लालकृष्ण अडवाणींनी दिलेली भेट, काश्मिरात मुक्ती मोहम्मद सईद यांच्याबरोबर भाजपने सत्तेसाठी केलेली हातमिळवणी ते अगदी वाजपेयींनी सुरू केलेली कराची बस सेवा या सार्‍या मुद्यांवरून भाजपचे हिंदुत्व हे बेगडी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदुत्वावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तांडव अधिक रंगल्यास आश्चर्य वाटू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -