सोशलमीडियामुळे संवाद झाला स्मार्ट, मात्र माणसे गेली नजरेआड

स्मार्ट फोन आले आणि दूरचं जग खरेच जवळ आले

Year End 2021 story social media Review during the year 2021 work from home zoom goole meet
Year End 2021 : आता ‘सबकुछ’ सोशल मीडियाच!

स्मार्ट फोन आले आणि दूरचं जग खरेच आले की आपल्या मुठीत पण जवळची माणसे नजरेआड झाली हेही मान्य करावेच लागेल. २० वर्षांपूर्वी कुठे कुणाकडे होते फोन. फारच तातडीचं काही असले की मग एस. टी. डी. बूथवरून फोन केले जायचे, तेही बिलाच्या आकड्याकडे लक्ष ठेऊन अगदी भीत भीतच!

स्थानिक फोन केला असेल तर रुपयाच्या नाण्याची घटका भरलेली अंतिम बीप ऐकू येताच दुसर्‍या नाण्याची वाट लागायच्या आधी घाईने मोजके बोलत फोन ठेवला जायचा. गल्ली-कॉलनीत एखाद्याच्या घरी लँडलाईन फोन असणे म्हणजे मोठी प्रतिष्ठेची बाब मानली जायची. अडीअडचणीला, तातडीला त्याच एका फोनचा आधार असायचा सार्‍यांना, त्या अमक्याचा दूरध्वनी क्रमांक आपल्या सार्‍या नातेवाईकांकडे असायचा आणि तो व्यक्तीही पंचक्रोशीत प्रसिद्ध असायचा. त्यापूर्वी व त्याही काळात पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रांना चांगले दिवस होते. लिफाफे, पोस्टाची तिकिटं यांना चांगली मागणी होती. पत्र लिहिली जायची, पाठवली जायची. हीच पत्र आप्तांना गावोगावी खुशाली पोचवायची. दिवसातल्या विशिष्ट वेळेला पोस्टमनची वाट बघितली जायची. पत्र यायची-जायची, पत्रांचा प्रवास सतत सुरू असायचा. लोक एकमेकांची काळजी करायची पाहुण्याला निघताना आवर्जून काळजीने सांगायची, पोहचताच पत्र पाठवा. आजही म्हंटले जाते, पोहचले की, फोन करा किंवा मिसकॉल द्या. पण त्यात पत्रातल्या आत्मीय-प्रेमळ भावनांचा ओलावा-ओढ कुठे ?

पत्र येत जात असायची आणि नाती ताजीतवानी राहत, अधिक घट्ट होत. घरातली वडीलधारी माणसे बाहेरू आली की आधी विचारत, कुणाचे काही पत्रबित्र आलेय का? अशी पत्रांशी माणसांची नाळ जोडली गेली होती. पत्र यायची कधी परीक्षा पास झाल्याच्या बातम्या घेऊन, कधी लग्न ठरल्याच्या, कधी घर बांधल्याच्या, कधी नोकरी लागल्याच्या तर कधी अपत्य झाल्याची बातमी घेऊन. नाना बातम्या पत्रातून दूरदूर गावोगावी आनंदाचा शिडकावा करीत, कितीतरी चेहर्‍यांवर हसू फुलवीत. तातडीची नोकरी मुलाखत वा जवळच्या माणसाच्या मृत्यूची बातमी मात्र तारेने धाडली जायची. क्वचित एखादी आनंदाची बातमी तारेने धाडली जायची कारण तारेचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसायचा म्हणून ‘तार आली’ म्हणजे वाईट बातमी असणार हे सर्वमान्य गृहीतक होतं व ते बहुतांशी खरंही असायचं त्या काळात.

गावाकडे तर ‘तार आलीय’ हेही रडारडीस पुरेसे असायचे, वाचण्याच्या आधीच नकारात्मक शंकाकुशंकांनी काळजाची धडधड भयंकर वाढलेली असायची. आजारी, ज्येष्ठ नातलगांचे चेहरे झरझर डोळ्यांपुढे फिरत. हा ’तात्काळ तारकाळ’ ज्यांनी अनुभवला असेल त्यांना हे सगळं आठवत जाईलच. पत्र लिहिणे, ते पोस्टाच्या पेटीत टाकणे मग काही दिवसांचा प्रवास करून ते नातलगांना मिळणार, नंतर ते त्यांच्या सवडीने उत्तराचे पत्र लिहिणार ,पुन्हा त्या पत्राचा परतीचा प्रवास. असे संदेश देवाणघेवाणीचे एक वर्तुळ पूर्ण व्हायचे. अर्थात संयम, समज असणारी सोशिक मनं होती तेव्हा माणसांकडे आणि आता…असो ! हा झाला अधिकृत पत्रांचा प्रवास पण चोरटी प्रेमपत्रांचा तर एक वेगळाच काळ आणि गंमत होती. त्यासाठी पोस्टाच्या तिकीटांची गरज ना पोस्ट कार्डची गरज. वहीच्या शेवटच्या पानावर देखील ही प्रेमपत्र जन्मास येत. टपालपेटी वगैरे भानगड नव्हती तर कधी गल्लीतला लहानगा पोस्टमनही चालायचा वा ते पत्र-चिठ्ठी घराच्या विशिष्ट कौलाखाली ठेवली तरी अपेक्षित व्यक्तिपर्यंत ती हमखास पोहचायची. चांगली ‘पत्र लेखनकला’ अवगत असणार्‍या ‘अनुभवी’ मित्रांना विशेष महत्व प्राप्त व्हायचे. आवडती व्यक्ति समोर येताच शब्द ओठातच गोठून जात मग ‘जे व्यक्त करायचे ते अव्यक्तच राहून जाई. अशावेळी प्रेमपत्र हळव्या-कोवळ्या प्रेमभावनांचे वाहक होत. पण नको त्या हातात हे प्रेमपत्र पडले तर होणारे रणकंदन असायचे. तीही एक वेगळी मजा होती.

तंत्रज्ञान व त्यात पावलागणिक होणारी प्रगती, नवीन शोध यामुळे पत्रांचा काळ नामशेष होत आहे. पत्रलेखन आता केवळ परीक्षेत पाच गुणांपुरतेच उरलेय हे आजचे वास्तव आहे. कारण आता ’स्मार्ट’फोन आलेत आणि माणसांची डोकी बधीर झालीत. पत्रात प्रारंभी लिहायचा एक ठराविक मजकूर होता पण आता स्मार्टफोनमध्ये टाइप केले जाणारे संदेश एका विशिष्ट भाषेत नसतात तर विभिन्न भाषा एकत्र करून कमी शब्दात ते अधिक बोलतात. कधी ते मिंगलीश, कधी हिंग्लीश तर कधी ’मिहिंग्लिश’ असतात. सारीच सरमिसळ आणि खिचडी! शब्द कमी ‘इमोजी’ अधिक बोलतात हल्ली. हे बरंय बुवा हल्ली भावमुद्रा निर्विकार ठेवून आभासी संवादात कितीतरी मुद्रा चिकटवत सुटतात लोकं बघा ना! कोणतीच भावना भूमिका ठाम ना सच्ची, सारेच खोटेखोटे कृत्रिम. यंत्र आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्याने भावनिक ओलावा आटत गेला आहे

हल्ली हळवं होऊन डोळ्यात पाणी दाटत नाही. कुणाच्या वा समोरची परिचित व्यक्ती नजरेआड झाल्यावरही स्मित रेंगाळत नाही ओठांवर कुणाच्या. खोटे कौतुक होते, खोटा आदर होतो, खोटी स्तुती आणि खोटी नातीही जुळतात हल्ली स्मार्टफोनवर. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर अनेक अपरिचित, समविचारी भेटतात, सख्यही जुळतं. आभासी जगातले लोक एकमेकांना ठरवून भेटतातदेखील. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर विविध समूह निर्माण केले जातात. त्यांचे नाना विषय, नाना उद्देश आणि नाना नियम! या सगळ्यात मला व्हॉट्सअ‍ॅप समुहांची भारी गंमत वाटते. कधी नियम मोडला की, समूहप्रशासक छडी घेऊन तयारच असतो, त्याला समुहात मानपान असतो. त्याचे निदान समूहात तरी बरेच लोक ऐकतात. कोणत्या प्रकार-विषयांचे मजकूर समूहात यावेत याकडे त्याचे लक्ष असते. तो खमक्या असला तर बरे नाहीतर काही महाभाग त्याचीच ’शोभायात्रा’ काढून घरचा आहेर देत राहतात. समूहात त्याच्या मर्जीतील सदस्य असतात, त्यांच्यासाठी बरेचदा नियम शिथील वगैरे असतात.

व्हॉट्सअ‍ॅप समूहात दिवसरात्र मजकूर आवकजावक सुरू असते. खरे-खोटे, मोठे-छोटे, फसवे- हसवे, काही मनातून तर काही जनातून आलेले मजकूर, कधी कोपरखळ्या कधी आत्मीयता, कधी श्रद्धांजली कधी वाढदिवस, कधी उत्सवसण तर कधी शाब्दिक व्रण, कधी तिरकस वाकुल्या तर कधी शिव्यांच्या लाखोल्या, कधी अहंकाराचे बाण तर कधी अविचारांची घाण, कधी मदतीचे हात तर कधी कपट घात, इथे कधी नाती जुळतात तशी तुटतातसुद्धा. येथे आपलीच टिमकी वाजवणारे असतात तसे गुणग्राहकदेखील असतात. वास्तव जीवनात इतरांशी संवाद न साधणारी लोकं वेळात वेळ काढून येथे रात्रंदिवस भांडतही बसतात. श्रद्धांजली वाहून लगेच विनोदावर दातही काढतात. मीच कसा ग्रेट आहे? सांगताना कधी स्तर सोडतात त्यांनाही कळत नाही अन एकदा स्तर सोडला की त्यांना समुहही सोडतो किंवा त्यांनाच तोंड लपवून पळ काढावा लागतो. काय गंमत आहे बघा आभासी जगात भानगडी करून लोक वास्तव आयुष्यात दुःखी होतात, अपमानित होतात आणि लज्जितही होतात. बाहेर कुठेही संधी वा मंच न मिळालेली माणरे येथे सतत धुडगूस घालत अतृप्त आत्म्यासारखे अगदी कुणाच्याही मजकुरावर बाह्या सरसावून सुसाट वेगात टायपत सुटतात.

समूहात काही लोक केवळ बघे असतात. खरं तर हे बघेच ‘हुशार’ असतात. कोणता मजकूर कोणत्या ठिकाणी ‘अचूक’ पोहचवायचा हे त्यांना बरोबर ठाऊक असते. मजकूर ‘डिलीट फॉर एवरीवन’ व्हायच्या आत स्क्रीनशॉट काढून अयोग्य ठिकाणी योग्य पद्धतीने पोहचविण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. येथे काही लोक बख्खळ वेळ असलेले ‘वादाभिलाषी, खुमखुमीतज्ज्ञ’ वगैरेही असतात. मुद्दा काहीही असो, कुणाशीही संबंधित असो, कधीही, कुठेही त्यांचा संबंध नसो, त्यांना काही आपला उत्साह आवरता येत नाही. त्यांची उत्साही ‘मती’ त्यांची कैकदा ‘माती’ही करते. पण हे काही सुधारत नसतात. काही दिवस ते अडगळीत पडून राहिल्यासारखे समुहात गप पडून राहतात आणि परत ‘ये रे माझ्या मागल्या!’ काही लोक सकाळी उठल्याबरोबर आद्यकर्तव्यास जागत ‘सुप्रभातीच उगवतात, समूह कशासाठी? आणि काय चाललंय? याच्याशी त्यांना काडीमात्र स्वारस्य नसते. ते ह्याबाबतीत अगदीच विरक्त ‘साधूबाबा’ असतात. संदेश टाकून जे गायब होतात ते दुसर्‍या दिवशी सुप्रभातीच उगवतात.

आणखी एक प्रकारचे प्रेमळ, काळजीवाहू लोक यात असतात. ते अनोळखी नवीन समूहातील ललनांचे प्रोफाईल फोटो अगदी व्यवस्थितरित्या नियमित चेक करून व्यक्तिगतरित्या ‘नाईस डीपी हं!’ म्हणून सौंदर्यास दाद देतात किंवा ‘जेवण झालं का?’ हा महत्वाचा प्रश्न विचारायला अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. ठराविक मोठ्या व हितसंबंध असलेल्या स्वार्थी संधीसाधू लोकांची जमातही येथे असते. समुहात विशिष्ट लोकांच्याच पोष्टींना तात्काळ प्रतिक्रिया देणारे महाभागही असतात. हव्या त्या माणसाची पोस्ट पडल्याबरोबर न वाचताच दुसर्‍याच क्षणाला प्रतिक्रिया म्हणून अंगठे, बदाम, फुलं वा अजून काहीबाही वार्‍याच्या वेगाने ते चिकटवत सुटतात. अर्थात सगळ्यांच्या आधी प्रतिक्रिया देण्याचे व आपण ‘फारच वेगळे’ असल्याचे थ्रील त्यांना अनुभवायचे असावे. एवढे वेगाने प्रतिक्रिया आल्यावर पोस्टकर्त्यालाच प्रश्न पडतो, ‘हे त्याने वाचले असेल का? धन्यवाद तरी कसे मानावे? समुहातल्या काही लोकांना इतरांच्या यशाच्या, अभिनंदनाच्या पोस्ट्सची भयंकर अ‍ॅलर्जी असते. कुणाच्या यशाची बातमी समूहात पडताच त्यांना लागलीच वांत्या, मळमळ, जळजळ, हगवण वा यासदृश्य त्रास होऊ लागतो. पिसाळल्यासारखे ते त्यांच्या ‘समगुणी’ नगांच्या साथीने मग ते समूहात तिथे आडवा, तिरकस, टोचरा धिंगाणा घालू लागतात. खरं तर त्यांची असूया ते लपवूच शकत नाही हे खरे दुखणे त्यांचे असते.

‘धूप का तो नाम बदनाम है, गालिब जलते तो लोंग एक दुसरेसे है’ ही वस्तुस्थिती असते. खरेतर त्यांना अमूकसारखे बनायचे असते पण तसे बनण्याची क्षमता, कौशल्य नसल्याने ते ‘बर्नऑल’ मलमाचे कायमस्वरूपी ग्राहक बनलेले असतात.

सर्वात जास्त घटना तर साहित्यिकांच्या व्हॉट्सअ‍ॅप समुहावर घडतात. सारीच ‘थोर कवी, लोककवी अन महाकवी’ मंडळी येथे असतात. म्हणजे सारी मज्जाच मज्जा. काही सन्माननीय अपवाद वगळता येथेही अहमहमिका, तू मोठा की मी मोठा? लिखाणावर टीकाटिप्पणी, त्रुटी-उणिवा, टक्केटोणपे होतात. ही सारी चर्चा निरोगी वातावरणात, स्वच्छ दृष्टिकोनातून होते तोपर्यंत ठीक. चर्चा एखाद्याच्या फारच जिव्हारी लागली मग ते भाष्य समतोल न राहता बेताल होते. बरेचदा काही ‘थोर’ लोकांचा तोलही सुटतो. आभासी जगात अतिशहाणपणा करीत जो शब्दांचा मार त्यांनी इतरांना दिलेला असतो, तो वास्तवात मात्र त्यांनाच भार होतो, हेही तितकेच
खरे आहे.