घरफिचर्सपोलिसांच्या नेमक्या समस्या 

पोलिसांच्या नेमक्या समस्या 

Subscribe
अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे पोलीस खात्यालाच नव्हे तर राज्यातील जनतेलाही धक्का बसला. या निमित्तानं पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या हे मुद्दे नव्यानं चर्चेत आले. या संदर्भात पोलिसांच्या कार्यपध्दतीत सुधारणा तसंच प्रशासनात लोकसहभाग वाढवणं गरजेचं ठरणार आहे. त्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबींचा वेध…
अलिकडच्या काळात विविध छोट्या -मोठ्या गुन्ह्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे  तपासाचा वाढलेला ताण, वेळी-अवेळी कामावर जावं लागणं, कामाचे अधिक तास, पुरेशा सुट्ट्या न मिळणं आणि वेळेवर, योग्य आहाराचा अभाव याचा पोलीस खात्यातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: पोलिसांमध्ये मानसिक अनारोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. मानसिक ताण असह्य होऊन पोलिसांनी आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याच्या काही घटना उघड झाल्या आहेत. त्या त्या वेळी एकूणच पोलीस कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांच्या आरोग्यविषयक तसंच इतर समस्यांबाबत बोललं वा लिहिलं गेलं आहे. मात्र, त्यातून पोलिसांना दिलासा देणारं काही धोरण समोर आल्याचं किंवा त्या संदर्भात शासनानं काही निर्णय घेतल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे आजही पोलीस कर्मचारी तसंच अधिकारी अनेक समस्यांचा, आव्हानांचा सामना करत आपलं कर्तव्य बजावत आहेत.
पोलिसांच्या वेळोवेळी करण्यात आलेल्या आरोग्य तपासण्यांमधून त्यांच्यामध्ये कोणते विकार बळावत आहेत किंवा बळावण्याची शक्यता आहे, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, या संदर्भातील अहवालावर फारसा विचार करण्यात आलेला नाही. एकीकडे गुन्ह्यांची वाढती संख्या आणि दुसरीकडे अपुरं मनुष्यबळ अशा स्थितीत पोलीस खात्याची वाटचाल सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या घटनेनं पोलीस खात्यालाच नव्हे तर राज्यातील जनतेलाही धक्का बसला. गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाच्या विकाराशी लढा देणाऱ्या रॉय यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये खासगी रिव्हॉल्व्हरने तोंडात गोळी झाडून आत्महत्त्या केली. रॉय यांनी आपल्या तडफदार कामगिरीनं पोलीस खात्यात स्वत:ची छाप उमटवली होती. एक कर्तबगार अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. तपासाच्या दृष्टीने अतिशय कठीण वाटणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यात रॉय यांचा हातखंडा होता. त्यांनी पोलीस दलातील कार्यकाळात विविध पदांवर वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. मुंबई क्राईम ब्रँचचे सहपोलीस आयुक्तपद भूषवताना रॉय यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला फाशी देण्याच्या प्रक्रियेत बजावलेली भूमिका महत्त्वाची होती. या शिवाय आयपीएल क्रिकेट बेटींग, पत्रकार जे. डें.ची हत्या तसंच शक्ती मिलमधील तरूणीवरील बलात्कार प्रकरणाच्या तपासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी रॉय यांनी उत्तमरित्या पार पाडली. अशा या निधड्या छातीच्या, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाèयाच्या आत्महत्येनं हळहळ वाटणं साहजिक आहे.
हिमांशू रॉय हे दबंग ऑफिसर होते. त्यांनी अशा पध्दतीनं जीवन संपवणं धक्कादायक आहे. मात्र, या घटनेच्या निमित्तानं एकूणच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या ताण-तणावाचा तसंच त्यांच्या स्वास्थ्याचा पुन्हा एकदा विचार होण्याची आवश्यकता आहे. जगात दोन प्रकारच्या व्यवसायांमध्ये प्रचंड तणाव असतो, असं दिसून येतं. एक म्हणजे रूग्णवाहिकेच्या सेवेत काम करणारे आणि दुसरे म्हणजे पोलीस. यात पोलिसांवर विविध प्रकारच्या जबाबदाèया असतात. त्यात भीषण अपघाताचे पंचनामे करणं, मृतदेहांचा पंचनामा करणं या कामांचा समावेश होतो. यात छिन्नविछिन्न मृतदेहांचे पंचनामे तसंच ते शवविच्छेदनासाठी पाठवण्याचं काम पार पाडताना पोलिसांची मानसिक अवस्था बिकट होत असते. रूग्णवाहिकेच्या सेवेत काम करणाऱ्यांना गंभीर अवस्थेतील रूग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते.
एकीकडे त्या रूग्णाचा जीव वाचला पाहिजे हा विचार आणि दुसरीकडे रस्त्यावरील वाहतुकीचा प्रचंड ताण त्यातून रूग्णवाहिका कमीत कमी वेळेत संबंधित हॉस्पिटलपर्यंंत पोहोचवण्यासाठी करावी लागणारी कसरत याचा सामना करावा लागतो. यातून संबंधितांवर किती ताण येत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. अशा प्रकारच्या ताणातून निर्माण होणाऱ्या विकाराला  ‘पोस्ट ट्रौमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर अर्थात ‘पीटीएसडी’ असं म्हटलं जातं. या आजाराची लक्षणं अशी घटना पाहिल्यानंतर सात महिन्यांनी दिसू लागतात. काहीजणांमध्ये या आजाराची लक्षणं ३० वर्षांनी आढळल्याचीही उदाहरणं आहेत. त्या घटना कशा घडल्या हे या विकारानं पीडित व्यक्तींच्या लक्षात येत नाही. शिवाय त्यांना प्रचंड भीती वाटत असते. एक प्रकारची हतबलता येते आणि जगण्याला काही अर्थ नाही असं वाटू लागतं.
हिमांशू रॉय यांना हाडाचा कॅन्सर झाल्याचं निदान २००१ मध्ये करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते या विकाराचा सामना करत होते. अशा रितीने सातत्यानं गंभीर विकाराला तोंड देणारे रूग्ण हळूहळू ‘पीटीएसडीङ्कमध्ये जातात. मग त्यातून येणारी हतबलता, नैराश्य तसंच आता जगण्यात काही अर्थ नाही असं वाटणं यातून आत्महत्येची घटना घडू शकते. या काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेता ‘माणसाला डिप्रेशन का येतं किंवा ‘माणसं तणावाखाली का जगत असतातङ्क याचा विचार करणं आवश्यक आहे. या संदर्भात तीन प्रमुख कारणं समोर येतात. यामागे लैंगिक संबंधांबाबतचा ताण वा लैंगिक संबंधांचा अतिहव्यास हे प्रमुख कारण असल्याचं प्रख्यात तत्त्ववेत्ता फ्राईडनं सांगितलं होतं. फ्राईडचा विद्यार्थी अँडसरने मात्र वाढत्या तणावामागे लैंगिकता हे कारण नसून सत्तेची, श्रेष्ठत्वाची वा उच्चपदाची भूूक (हंगर फॉर पॉवर) हे कारण असल्याचं स्पष्ट केलं होतं. पदाच्या, प्रतिष्ठेच्या हव्यासापायी माणसं वाट्टेल त्या थराला जावू शकतात, याची उदाहरणं कमी नाहीत. पोलीस खात्यातही पदासाठी स्पर्धा लागल्याचं पहायला मिळतं. मग सत्तेतून मालमत्ता उभी करणं, विविध बाबींचा उपभोग घेणं असे प्रयत्न होत राहतात. व्हिक्टर फ्रँकल या तत्त्ववेत्त्यानं पूर्वीच स्पष्ट केलं होतं की, लैंगिकतेबाबतच्या इच्छा-आकांक्षा वा सत्ता मिळवणं आणि त्याचा उपभोग घेणं यापेक्षाही जगण्याचा अर्थ शोधणं हे अनेकांचं ध्येय असतं. अशा वेळी बाकीच्या बाबी गौण ठरतात. याचं कारण जगण्याचा अर्थ शोधताना बाकीच्या गोष्टी मेंदूपर्यंत जाण्याची संधीच मिळत नाही.
– सुरेश खोपडे, निवृत्त अभ्यासू पोलीस अधिकारी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -