घरफिचर्सनाटक, युवा आणि करिअर

नाटक, युवा आणि करिअर

Subscribe

नाटक केवळ करिअर (career) नाही तर सत्याचे संवाहक (carrier) आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या या संकल्पनेने दृष्टी अगदी स्पष्ट होते की नाटक, रंगकर्म किंवा थिएटर हे फक्त पोट भरण्याचे, मनोरंजनाचे आणि पैसे किंवा प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम नाही तर नाटक वैचारिक, भावनिक, सामाजिक, राजनैतिक, वैश्विक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे, मानवीय जीवनाला उन्मुक्त दिशा प्रदान करण्याचा कलात्मक मार्ग आहे.

नाटक किंवा थिएटर यात करिअर करणे नक्कीच संभव आहे, मी स्वतः मागील सात वर्षांपासून थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताअंतर्गत रंगकर्म करत आहे, त्यावर जिवंत आहे, कारण रंगकर्म हे माझ्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनले आहे. सुरुवातीला जेव्हा मला जाणीव झाली की माझ्यात अभिनय हा कलागुण आहे तेव्हा मी ठरवले मला माझ्या अभिनयाप्रती असलेल्या उत्कटतेला वाढवायचे आहे. एक अत्यंत उत्साही युवती जिला नुकतीच अभिनयाची आवड निर्माण झालेली अशी मी हा समज करून बसले की नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर केलेला अभिनय आहे.. त्याच जोरावर मी प्रस्थापित व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून पाऊल ठेवले. रंगभूमीवर जसजशी प्रसिद्धी मिळायला लागली तसतसे सिरीयलचे द्वार ही माझ्यासाठी उघडले. अभिनेत्री म्हणून प्रस्थापित होत होते, फेम, ग्लॅमर, प्रसिद्धी याचा आनंद ही घेत होते, पण त्या चंदेरी जगात माझ्यातल्या ‘स्व’ला मी हरवत चाललेले. कलेच्या महासागराचा मी वरवरून आनंद घेत होते. पण कलासत्वाचे मोती हे महासागरात उतरल्याशिवाय कसे साध्य होतील ?

एका रटाळ आयुष्याची सुरुवात होऊ लागली. रंगमंचावर मी मालक, पण त्यानंतर प्रयोगाचे पाकीट मिळण्यासाठी निर्मात्यासमोर हात पसरवणे, अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध पण व्यक्ती म्हणून अनोळखी, कधी रात्री उशिराचे प्रयोग तर कधी दिवसभराची शूटिंग. ही धावपळ मी माझ्या अभिनयाची आवड जोपासण्यासाठी, एक स्थिरता मिळवण्यासाठी करत होते, पण समाधान काही साध्य होत नव्हते. मला माझ्यात एक जडत्व जाणवायला लागले. ज्या उत्कटतेने मी या क्षेत्रात पदार्पण केलेले ते हळूहळू कमी होऊ लागले, कारण ध्येयच स्पष्ट नव्हते. मला नवीन करायचे आहे, पण माझ्याभोवती असलेले रटाळ जग मला नवीन क्षितिज पाहण्यास मदत करत नव्हते. नोकरी कर लवकर सेटल होशील! रात्रीचे प्रयोग लागले तर प्रवास कसा करशील.. नाटकातून असे किती पैसे मिळतात ग ? हौस म्हणून कधीतरी ठीक आहे पण त्यावर आयुष्य नाही जगता येत.. अशा अनेक प्रश्नांना मी सामोरे गेले आहे. म्हणून मी संधी स्वतःत निर्माण करण्याऐवजी बाहेर शोधू लागले. वाट पाहू लागले की कधी काळ माझ्याबद्दल विचार करेल ?

- Advertisement -

खरंच जेव्हा एक युवा म्हणून आपण आपला निर्णय घेतो, दुनियादारीच्या पलीकडे जाऊन वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा विचार करतो तेव्हा व्यवहार कसा आपल्याला मागे खेचतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. या सामाजिक चौकटींनाच अंतिम सत्य समजून आपण आपल्या जिद्दीला, स्वप्नांना आणि उत्कटतेला कैद करतो आणि एक रटाळ आयुष्य जगायला भाग पाडले जातो. पण मी थांबले नाही, मी माझी अभिनेत्री होण्याची जिद्द कायम ठेवली. मला गरज होती एका सकारात्मक दिशेची, ठाम विचारांची, भक्कम तत्वांची आणि स्वत्वाची. अशाच शोधात दोन कलात्मक स्पंदनं जुळली. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मी अश्विनी नांदेडकर यांसोबत माझी भेट झाली. सहकलाकाराचे नाते वैचारिक मैत्रीत बदलले. कला, कलात्मकता, कलासत्व याची ओळख झाली. व्यक्तीचे मुखवटे काढून नाटकात काम करायचे आहे ! ही कल्पना ऐकूनच मी उडाले. तेव्हा मी थिएटर ऑफ रेलेवन्समध्ये माझे पहिले पाऊल ठेवले. इथे कलेच्या नावावर दिखावा नाही होत. केवळ रंगमंच नाही तर आयुष्यात ही मुखवटे लावून जगणारी मी, मुखवट्यांशिवाय आयुष्य आणि कलाविश्वाला पाहू लागले आणि ते मला आणखी सुंदर दिसत आहे कारण मी सत्याला पाहतेय.

माझी कलाकार म्हणून जगण्याची नवीन सुरुवात रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित अनहद नाद – unheard sounds of universe या कलात्मक नाटकातून झाली, आणि या नाटकाने माझे कलाकार म्हणून जगण्याचे ध्येय, विचार आणि तत्व स्पष्ट केले. मी प्रॉडक्ट नाही, मी कठपुतली नाही आणि मी प्रेक्षकांचे केवळ आणि केवळ मनोरंजन करणारी अभिनेत्रीही नाही. मी अभिनेत्रीच्या पलीकडे काळाला आकार देणारी कलाकार आहे. नाटक म्हणजे विचार, नाटक म्हणजे शोध, नाटक म्हणजे सत्याची अभिव्यक्ती, नाटक म्हणजे विचारांचे कर्म ही जाणीव माझ्यात जसजशी निर्माण होऊ लागली तसतसा माझ्यातला कलाकार आणि व्यक्ती दोघेही सक्षम आणि समृद्ध होऊ लागले.

- Advertisement -

या नाटकातून आम्ही कलाजगतात नवे मापदंड प्रस्थापित केले. स्वतःच्या कलात्मक प्रस्तुतीचे मालक झालो. कोणत्याही निर्मात्यावर, सरकारी-गैरसरकारी अनुदानावर आणि स्पॉन्सर्सवर अवलंबून न राहता स्वतःचे रंगविश्व स्वतः निर्माण केले. नाटकाची खरी आवश्यकता हे कलाकार आणि प्रेक्षक आहेत. आणि म्हणूनच आम्ही थेट प्रेक्षकांशी रंगसंवाद साधून त्यांना थिएटर ऑफ रेलेवन्सच्या वैचारिक परिवर्तनशील नाटकांचा अविभाज्य भाग बनवले. खर्‍या अर्थाने विचारांचे कर्म करणारे रंगकर्मी म्हणून आम्ही प्रस्थापित झालो आणि रंगभूमीवर तसेच प्रेक्षकांच्या आयुष्यात रचनात्मक बदल घडवून आणले. नाटकाच्या संकल्पनेला समाजात पोहोचवले आणि रंगभूमीला घडवण्याचा संकल्प अंमलात आणला. वैचारिक नाटक पाहायला प्रेक्षक येतील का? या स्वतःच्या आणि समजाच्या जडत्वाला तोडले आणि नाटक म्हणजे वैचारिक सृजन प्रक्रिया या नव्या दृष्टीला रोपित केले. आमच्या प्रत्येक नवीन पुढाकाराला प्रेक्षकांकडून मिळणारी स्वीकारार्हता, सहभागीता आणि सहयोग आमच्या रंगकर्माच्या विश्वासाला अजून दृढ करत गेली. कोण येणार? पासून नाटक हाउसफुल्ल इथपर्यंतचा प्रवास आम्ही स्वतःच्या तत्वांवर आणि प्रेक्षक सहभागीतेवर गाठला. आणि इथूनच माझी दृष्टी व्यापक झाली की नाटकाला केवळ करिअरपर्यंत सीमित न पाहता समाजात चेतना पेटवण्याचे सशक्त माध्यम म्हणून पाहणे आवश्यक आहे.

कला कोणतीही असो जेव्हा ती केवळ व्यावसायिकतेच्या जाळ्यात अडकते तेव्हा तिचा मुख्य हेतू नष्ट होतो आणि ती व्यवहारापर्यंत सीमित होऊन जाते. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून शरीरापलीकडे माणूस म्हणून जगण्याचे अस्तित्व घडवले, समाजात न्यायसंगत विचार रुजवले, परंतु आज तेच माध्यम बाजारीकरणाच्या चौकटीत अडकून केवळ पैसे आणि नोकरी मिळवण्याचे साधन झाले आहे. आज शिक्षण माणसाला ज्ञान मिळवण्यासाठी नव्हे तर उत्तम नोकरी कशी मिळवता येईल, जीवन सोयीस्कर आणि सुविधा संपन्न कसे करता येईल हाच समज समाजात प्रस्थापित आहे. कला माणसाला माणूस म्हणून जगण्यास उत्प्रेरीत करते, पण सध्या स्वतःला आधुनिक, प्रगतीशील म्हणवून घेणारा समाज याच बाजारीकरणाच्या षङ्यंत्राचा बळी पडला आहे आणि कला केवळ मनोरंजनासाठी या मानसिकतेत अडकलेला आहे. आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सचे प्रतिबद्ध रंगकर्मी हे ठामपणे मांडतो की जगण्यासाठी अर्थ नियोजन आवश्यक आहेच, पण जीवनाच्या अर्थाचा शोध घेणे अनिवार्य आहे.

आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सच्या अनेक नाटकांचे स्वतंत्र प्रयोग, कार्यशाळा, सलग तीन दिवसांचे आठ नाट्य महोत्सव केवळ मुंबईतच नाही तर भारतभर आयोजित करून प्रस्तुती केली. एक युवा रंगकर्मी म्हणून मला स्वतःवर अभिमान वाटतो की, मी या प्रक्रियेच्या माध्यमातून माझी उपजीविका तर चालवतेच त्याचसोबत आपल्या रंगकर्मातून मी माझ्या परिवाराला, समाजाला, देशाला आणि विश्वाला माणुसकीसाठी प्रतिबद्ध होण्यास उत्प्रेरीत करत आहे. नाटक, रंगकर्म, थिएटर यात युवांनी सक्रीय सहभाग घ्यायला हवा आणि हे कायम लक्षात ठेवायला हवे की समाजासाठी जे रंगकर्मी प्रतिबद्धतेने आपले रंगकर्म करतात त्यांना समाज कधीच उपाशी राहू देत नाही, कधीच एकटे पाडत नाही ! हम हैं !

– कोमल खामकर
( लेखिका प्रयोगकर्ती आणि रंगकर्मी आहे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -