घरफिचर्सभाजपला आणीबाणीच्या कळा!

भाजपला आणीबाणीच्या कळा!

Subscribe

इंदिरा गांधींच्या आणीबाणीबाबत ऊर बडवणाऱ्या भाजपवाल्यांची मोदींच्या अघोषित आणीबाणीबाबत बोलती बंद आहे. देशात केवळ विरोधकांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशा लावायच्या. आपल्यापुढे नतमस्तक झालेल्यांना मोकळे सोडायचे. नीरव, चोक्सी यांच्यासारख्या आपल्याच सहकाऱ्यांना पळून जाण्यात मदत करायची, माध्यमांची गळचेपी करायची, अधिकाऱ्यांचे जिणे हैराण करायचे अशा एक ना अनेक घटना देशात घडूनही मोदीभक्तांना त्याची आठवण होत नाही. हा त्यांचा दोष नाही, दोष आहे तो सत्तेच्या भस्म्याचा.

भारतीय जनता पक्षाच्या कारभाराचा हळूहळू लोकच पंचनामा करू लागले आहेत. २०१४  च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. या यशाच्या शिखरावर बसून त्यांच्या सरकारने लोकांच्या अपेक्षांना दिलेली चालना पाहता आता या सरकारचे कुणी काहीही बिघडवू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या अपेक्षांचा पुरता चुराडा झाला. लोक आता स्वत:लाच दोष देऊ लागले आहेेत. या लोकांना आपल्याकडे खेचण्याचे आजवरचे पर्याय आता मागे पडले आहेत. पुन्हा आपल्याला लोकांच्या जवळ जायचे असेल, तर गंभीर विषयाला हात घालण्याशिवाय भाजपपुढे पर्याय राहिलेला नाही.

- Advertisement -

आपले पाप झाकण्यासाठी सरकार कुठल्याही थराला जाऊ शकते, हा भाजपविषयीचा अनुभव बोलका आहे. मोदी आणि मोदींच्या भक्तांना लोकांना दिलेल्या आश्वासनांचा पध्दतशीर विसर पडला आहे. ही आश्वासने आता भाजपच्या बोकांडी येऊ लागली आहेत. कोणी त्यासंबंधी विचारले की भाजपवाले खेकसतात. विचारणाऱ्यांची जेवढी करता येईल, तितकी अवहेलना करतात. कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानबरोबर भाजपविरोधी कट केल्याचा उघड आरोप करतात. नंतर त्याबाबत साधा खुलासाही करत नाहीत. आठ दिवस संसद ठप्प होते तरी पंतप्रधान मौन धरतात, याचा अर्थ काय काढावा? निवडणुका पार पडल्यावर अरुण जेटली हे मोदींच्या त्या आरोपावर बोलतात आणि हा निवडणूक मामला असल्याचे सांगतात. हा तर लोकांना शुद्ध मुर्ख बनवण्याचा प्रकार झाला. इतके खोटे बोलणारे पंतप्रधान जगाने पाहिले नसतील. सीमेवर होणाऱ्या सर्जिकल स्ट्राईक हा नियमित कारवायांचा भाग मानला जातो. पण गेल्या वर्षी बारामुल्लाच्या सीमेवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे श्रेय घेऊन भाजपने ही जणू मोदींनीच लढलेली लढाई होती, असा आवेश धारण केला होता.

सीमेवरील शत्रूराष्ट्रात प्रवेश करून लपलेल्यांना खोदून काढण्याबरोबरच त्या राष्ट्राला ताकदीचा अंदाज देणे हे संरक्षण विभागाचे कामच असते. ते या हल्ल्यात आपल्या लष्कराने यथोचित पार पाडले. या कारवाईचा भाजपच्या नेत्यांनी फायदा घेतला. या कारवाईच्या बॅनरवरील फोटोत चक्क मोदी चमकले. ५५  देशांच्या जगप्रवासात कोट्यवधी रुपयांची दैना उडवणाऱ्या मोदींच्या दौऱ्यांमधून काय हाती लागले, असे विचारले तर आपली छबी जगभर मिरवण्यात मोदी यशस्वी झाले इतकेच म्हणता येईल. आता हा प्रश्न कोणी विचारलाच तर त्याला मोदी…मोदी…चे नारे सोशल मीडियावर ऐकवले जातात. भाजपच्या या बालीशपणाला काय म्हणावे तेच कळत नाही.

- Advertisement -

अशा या भाजपला आता इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीची आठवण झाली आहे. विरोधक म्हणून ज्याचा निषेध करायचा तेव्हा भाजपचे नेते झोपले होते. त्यांना या आणीबाणीचा तेव्हा विसर पडला होता. आता सत्तेत आल्यावर त्यांना याची आठवण व्हावी, यात काहीही आश्चर्य नाही. नापास विद्यार्थ्याला इतरांचे गुणही कमी दिसतात. तसे नापास झालेल्या भाजपला जळी स्थळी काष्टी पाषणी काँग्रेसच दिसते आहे.

२६ जून १९७५ चा तो दिवस. ज्या दिवशी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. आपली राजकीय पत रसातळाला जाते, असे पाहून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज तेव्हा तमाम विरोधकांना आला होता. त्या तमाम कार्यकर्त्यांनी या हुकुमशाही कृतीला ठासून विरोध केला. या सरकारला आता याची आठवण झाली हे अजबच म्हटले पाहिजे. गेल्या चार वर्षात या सरकारला आणीबाणीच्या झळा पोहोचल्या असे वाटले नव्हते. आताच हे सारे घडवून आणण्यामागे भाजपचे सुपीक डोके आहे, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. महाराष्ट्र तर याहून चार हात पुढे गेला आहे. या सरकारने आणीबाणीच्या लढ्यात भाग घेतलेल्यांना पेंशन देण्याची घोषणा केली. सरहद्दीवर लढणाऱ्या सैनिकांना काय कमी पडते, त्यांचे वेतन किती त्यांचे काम किती याची जराही चिंता नसलेल्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणीबाणीसाठी ६० कोटींचा चुराडा करावा, याचे त्यांना काहीच वाटत नसेल, असे कसे समजायचे? हे केले की काँग्रेसविरोध आपोआप पुढे येतो हीच तर त्यांची यातील खरी कमाई आहे. तेव्हा राज्याचे पैसे गेले म्हणून काय झाले?

इंदिरा गांधींच्या आणीबाणीबाबत ऊर बडवणाऱ्या भाजपवाल्यांची मोदींच्या अघोषित आणीबाणीबाबत बोलती बंद आहे. देशात केवळ विरोधकांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशा लावायच्या. आपल्यापुढे नतमस्तक झालेल्यांना मोकळे सोडायचे. नीरव, चोक्सी यांच्यासारख्या आपल्याच सहकाऱ्यांना पळून जाण्यात मदत करायची, माध्यमांची गळचेपी करायची, अधिकाऱ्यांचे जिणे हैराण करायचे अशा एक ना अनेक घटना देशात घडूनही मोदीभक्तांना त्याची आठवण होत नाही. हा त्यांचा दोष नाही, दोष आहे तो सत्तेच्या भस्म्याचा.

आणीबाणीचा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत आले आणि त्यांनी काँग्रेसवर झोड उडवली. एका कुटुंबासाठी हे सगळे केले जात असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला. आजारी पडलेल्या जेटलींनी तर इंदिरा गांधींवर टीका केली. त्यांना हिटलरचा अवतार म्हटले. असा नामकरण करण्याचा पहिला अधिकार भाजप नेत्यांचाच आहे. ते कोणालाही काहीही संबोधू शकतात. आणीबाणीची ही आठवण २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपर्यंत जागीच राहील. नव्हे ती जागीच राहावी, म्हणून हा सारा खाटाटोप सुरू आहे. आणीबाणीविरोधातील आंदोलनात एकटे संघवाले होते, असा समज भाजपच्या आजच्या नेत्यांचा झाला आहे. या आंदोलनात संघाच्या नेत्यांबरोबरच मार्क्सवादी कम्युनिस्ट, समाजवादी संघटना, सर्वोदयी नेते, शेकाप अशा अनेक संघटनांनी भाग घेऊन जीव तोडून विरोध केला होता. ज्यांचा संघाशी काडीचा संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांनी तर आणीबाणीविरोधात आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. हा सगळा इतिहास दूर ठेवून भाजपने आपली मनोकामना पूर्ण करायचा घाट घातला आहे.


प्रविण पुरो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -