Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

Related Story

- Advertisement -

दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्रींचे नाव द्वारकाबाई. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर १८८५ साली ते तेथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. पुढे १८९० मध्ये बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच वास्तुकला व साचेकाम यांचाही त्यांनी अभ्यास केला. याच सुमारास प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफ्टोन ब्लॉक करणे याचा त्यांना छंद जडला.

कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनाने रतलाम येथे तीनरंगी ठसे बनविण्याची प्रक्रिया (थ्री कलर प्रोसेस), प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथो) व छायाचित्रण इ. क्षेत्रांत प्रयोग करण्याची त्यांना संधी मिळाली होती. त्यानंतर काही दिवस बडोदा येथे धंदेवाईक छायाचित्रकार तसेच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केले. हौशी कलावंतांना अभिनय शिकविणे, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे यांचीही त्यांना आवड होती. अहमदाबादला १८९२ मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी पाठविलेल्या आदर्शगृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले होते. १९०१ साली त्यांनी एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पत्करले. पुष्कळ ठिकाणी जादूचे प्रयोगही करून दाखविले. प्रो.‘केल्फा’ (फाळके या नावाचा उलटा क्रम) यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले.

- Advertisement -

१५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपटनिर्मितिविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. मध्यंतरीच्या काळात परदेशातून चित्रपटविषयक वाङ्मय मागवून त्याचा अभ्यास त्यांनी चालू ठेवला. पुढे आपली बारा हजार रूपयांची विमा पॉलिसी गहाण टाकून १ फेब्रुवारी १९१२ रोजी ते इंग्लंडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामुग्री व कच्च्या फिल्मची मागणी नोंदवून १ एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परत आले. सर्व सामुग्री १९१२ च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले.

दादासाहेबांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर आपले चित्रपटनिर्मितीगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र सहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला. दादासाहेब पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात व चित्रपट दाखवीत. अशा या महान चित्रपटसृष्टीच्या जनकाचे १६ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले.

- Advertisement -