घरफिचर्सतत्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

तत्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

Subscribe

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृतिदिन. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२-६७) व पाश्चात्त्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८रोजी वीरस्वामी व सिता (सिताम्मा) या दाम्पत्यापोटी आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला. तिरुत्तनी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. उच्च शिक्षण चेन्नई येथील ख्रिश्चन महाविद्यालयामध्ये झाले.

नंतर चेन्नईचे प्रेसिडेन्सी महाविद्यालय (१९०९-१६), म्हैसूर विद्यापीठ (१९१६-२१), कलकत्ता (सध्याचे कोलकाता) विद्यापीठाचे ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’ (१९२१-३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर महाविद्यालयामध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे (१९३१-३५) व बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९-४८) होते. तसेच लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले.

- Advertisement -

राधाकृष्णन यांनी आपल्या लिखाणात शंकराचार्यांच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली, ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. शिवाय त्यांनी नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करणही केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल, असे त्यांनी दाखवून दिले.

राधाकृष्णन यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. ‘द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी’ हा ग्रंथ १९२० मध्ये प्रसिद्ध झाला. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) साली प्रसिद्ध झाला. इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्यांचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानले. त्यांनी प्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज-१९६०) व भगवद्गीता (द भगवद्गीता-१९४८) या वेदान्ताच्या प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिले. याशिवाय द एथिक्स ऑफ वेदान्त अँड इट्स मेटॉफिझिकल प्रीसपोझिशन्स (१९०८), द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची काही महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय ग्रंथरचना होय.

- Advertisement -

धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही राधाकृष्णन् यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते. अशा या महान तत्वचिंतकाचे १7 एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -