घरफिचर्सइतिहास संशोधक सेतुमाधव पगडी

इतिहास संशोधक सेतुमाधव पगडी

Subscribe

सेतुमाधव पगडी हे इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी निलंगा, हैदराबाद राज्यातील (आता महाराष्ट्राचा भाग) जमीनदार ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण गुलबर्गा, उस्मानाबाद आणि पुणे येथे झाले. त्यांनी १9३० मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून कला पदवी आणि तीन वर्षांनंतर अलाहाबाद विद्यापीठातून कला पदवी प्राप्त केली.

इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, सेतुमाधव पगडी यांनी विपुल प्रमाणात स्फुट लेखन व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा अभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला. मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे ग्रंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशंसा केली. मराठवाडा साहित्य परिषद, इंदूर साहित्य सभा, मराठी वाङ्मय परिषद आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधव पगडींनी भूषविले होते. हैदराबाद येथील तेलंगण राज्य मराठी साहित्य परिषदेने ‘समग्र सेतुमाधव पगडी’ हा ग्रंथ संच प्रसिद्ध केला.

- Advertisement -

या ग्रंथ संचात सेतुमाधव पगडी यांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे ५ खंड, तसेच इंग्रजी लेखनाचे २ खंड आहेत. मराठी संचाची दुसरी आवृत्ती मे २०१७ मध्ये काढण्यात आली. ‘मराठ्यांच्या इतिहासातील बारीक-सारीक धागेदोरे, मराठा घराण्यांच्या नात्या-गोत्यांचे अनेक तपशील, महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेमधील अनेक बारकावे यांचा तपशील सेतुमाधव पगडी यांना परिचित असल्यामुळे त्यांच्या अनुवादाला अधिकच भरीवपणा आला आहे’. स.मा. गर्गे यांचा फारसी साधन ग्रंथांच्या अनुवादांविषयीचा उपरोक्त अभिप्राय अनुवाद ग्रंथांचे मोल स्पष्ट करणारा आहे. सुमारे पाच हजार पृष्ठांचा फारसी भाषेतील मजकूर त्यांनी मराठी भाषेत अनुवादित करून इतिहास लेखकांना कायमचे ऋणी करून ठेवले आहे. पगडी यांच्या समग्र लेखनाचे डबल क्राउन आकाराचे ८ खंड सेतू माधव पगडी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश, हैदराबादद्वारा ऑगस्ट २०१० मध्ये प्रकाशित करण्यात आले. भारत सरकारने १९९१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला. मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानाची पदवी दिली. पगडी यांच्या जीवनसेतु, छत्रपती शिवाजी या त्यांच्या ग्रंथांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले. अशा या महान लेखकाचे १४ ऑक्टोबर १९९४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -