घरफिचर्समानवी कवितेचा ‘काव्याग्रही’ सन्मान!

मानवी कवितेचा ‘काव्याग्रही’ सन्मान!

Subscribe

ताकदीचे कवी संतोष पद्माकर पवार यांच्या ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ या संग्रहाला नुकताच ‘पहिला काव्याग्रह पुरस्कार’ जाहीर झालाय. त्यानिमित्ताने ‘काव्याग्रह’ची दमदार साहित्य-सांस्कृतिक चळवळ आणि पवार यांच्या कवितेविषयीचे हे टिपण...

मराठी साहित्य परंपरेला नियतकालिकांनी सातत्याने बळ पुरवले आहे. मराठी साहित्याला वाचकांशी जाणिवेनं बांधणारा संवादपूल म्हणून नियतकालिकांनी मोठी भूमिका पार पाडलीय. काही मराठी नियतकालिके व प्रकाशनसंस्थांनी साहित्याच्या प्रसिद्धीबरोबरच पुरस्कार देऊन साहित्याचा यथोचित गौरवही केलाय. आजघडीला मराठी कवितेचा योग्य सन्मान करतील असे पुरस्कार हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. याच उणिवेचा विचार करून ‘काव्याग्रह’ने कवितेसाठी पुरस्कार सुरू केलाय.एखाद्या वाड़मयीन नियतकालिकाचे महत्त्व त्याचे किती अंक छापले गेले यावर ठरत नाही, तर त्या अंकात काय छापले व कुठल्या भूमिकेने ते नियतकालिक प्रभावित आहे यावर त्याचे महत्त्व आणि दर्जा ठरतो. मराठीत आजघडीला बरीच वाड़मयीन नियतकालिके निघतात. त्यातही केवळ कवितेला वाहिलेली नियतकालिके लिहिल्या जाणाऱ्या कवितेच्या तुलनेत फारच अल्पसंख्य आहेत.

नव्याने कसदार लिहू लागलेल्या कवींच्या वाट्याला ही नियतकालिके येत नाहीत. याच उणिवेचा विचार करून ‘काव्याग्रह’चा जन्म झाला. संस्थापक विष्णू जोशी, कवी संदीप जगदाळे, गजानन वाघ यांच्यासह असंख्य लोक आता या काफिल्यात जोडले गेलेत. काव्याग्रह अनेक अडचणींना धीराने सामोरं जात आपली वाटचाल करते आहे. काव्याग्रह अनियतकालिक असल्याने त्याचे आजपर्यंत मोजकेच अंक निघालेत. एक इंग्रजी अंकही प्रसिद्ध केला. हिंदी आणि गुजराती अंक येत्या काळात प्रसिद्ध होतील. ‘अ‍ॅन्ड्रॉईड फिवर’च्या जमान्यात एखादे छापील वाड़मयीन नियतकालिक चालवणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. मराठीतील इतर नियतकालिकांप्रमाणे ‘काव्याग्रह’लाही आर्थिक समस्या आहेत. सुरुवातीला वर्गणीच्या बळावर तगण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. ओढाताण झाली. आवडीचे काम आर्थिक अडचणींमुळे वेळेवर करता येत नाही याचे वाईटही वाटत राहिले. परंतु आमचा आग्रह पक्का आणि हुरूप अमाप होता. त्या-त्या वेळी काही मदतीचे सहभावी हात पुढे येत राहिले. काव्याग्रहने निग्रहाने एक-एक पाऊल पुढे टाकले. अलिकडेच सुरूवात केली असल्याने अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय याची आम्हाला पुरती जाणीव आहे.

- Advertisement -

काव्याग्रहच्या वाट्याला खूप प्रेम आले, त्याला लगडून अनेक जबाबदाऱ्याही आल्या, त्याचे भानही आहेच. त्याच जबाबदारीतून आम्ही एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला दरवर्षी ‘काव्याग्रह पुरस्कार’ देऊन सन्मानीत करायचे ठरवले.
आपल्याकडे स्मृतिप्रीत्यर्थ अशी टॅगलाईन असणारा एक पुरस्कारांचा प्रकार नव्यानेच फोफावलेला दिसून येतो. या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कारातून साहित्याची जाणिवेने सेवा करणारे फार अल्प लोक आहेत. सदर पुरस्कारांमागचा प्रधान हेतू लिहिणाऱ्या हातांना बळ पुरवण्याचा नसून आपल्या पूर्वजांचे व आपले नाव लौकिक पावावे हा असतो. कुठल्याही कृतीमागे स्वार्थ संभवत नाही, असेही नाही; तो असतोच. पण हा ही काळजी करण्याचा मुद्दा नाही.

पुरस्काराची रक्कम कमी असेल तर एकवेळ समजून घेता येईल, पण एका कवितासंग्रहाला पुरस्कार देण्याऐवजी पाच-पाच संग्रहांना दिला जातो. वरतून पहिला दुसरा तिसरा चौथा… अशी क्रमांकांची लेबलं चिटकवून पुरस्कार दिले जातात. याला कवितेचे मोल जपणे म्हणत नाहीत. ही धावण्याची स्पर्धा नाहीये तर जाणिवांच्या कक्षा विस्तारू पाहणाऱ्या नवसर्जनाच्या जीवनदायी कलेचा प्रांत आहे, इतकं साधं पुरस्कार देणाऱ्या संस्था समजून घेत नाहीत. चिमूटभर रकमेत लौकिक पावण्याच्या पुरस्कार योजनेचा सांप्रतकाळी सुळसुळाट झालेला असताना आपणही त्याचीच री ओढावी हे काही आम्हाला पटणारे नव्हते. म्हणून आम्ही काव्याग्रह पुरस्कार सुरू केला. कवीला लिहिण्यासाठी बळ आणि थोडी सन्मानजनक आर्थिक मदतही मिळावी यासाठी पुरस्काराची रक्कम ३१ हजार रुपये अशी ठेवली. भविष्यात पुरस्काराची रक्कम आम्ही वाढवणार आहोत.

- Advertisement -

यंदाचा पुरस्कार संतोष पद्माकर पवार यांच्या ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ या संग्रहाला जाहीर करण्यात आलाय. संतोष पवार हे मराठी कवितेतील महत्त्वाचे नाव असून त्यांचे नाव महत्त्वाचे असण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी लिहिलेली अत्यंत सशक्त आणि आगळीवेगळी कविता हेच आहे. आपल्याकडे कवी खूप आहेत, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने कविता लिहिली जाते. पण दुर्दैवाने त्या कवितांमध्ये बहिर्वक्र भिंग लावून काव्य शोधावे लागते! आज प्रत्येकालाच कवी म्हणून मिरवायचे आहे, नावलौकिकही मिळवायचा आहे; पण कविता मात्र लिहायची नाहीय. कविता गांभीर्याने घ्यायची आणि आत्मसात करायची गोष्ट असते हे कविता लिहिणाऱ्यांच्या गावीही असत नाही. परंतु हे मत सर्वच कवींबाबतीत लागू होत नाही. संख्या कमी असेल पण मराठीत चांगली कवितासुद्धा लिहिली जाते. त्यापैकी संतोष पवार हे एक ठळक नाव. पवार यांच्या ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ मधील कविता सर्वहारा माणसांच्या बाजूने ठामपणे उभी राहिलीय.

समाजाच्या तळागाळातल्या शोषित, पीडित, कष्टी मानवसमूहाला, त्याच्या दुःखाला सक्षमपणे उजागर करताना संतोष पवार यांनी व्यक्तिचित्रणाचा फॉर्म निवडलाय. सुट्या स्वरूपात व्यक्तीचरित्रात्मक कविता मराठीत बाहुल्याने लिहिली गेली, परंतु त्या कविता महापुरुष, समाजसुधारक, कवीच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती, आईवडील इत्यादींवर लिहिलेल्या आहेत. पण संतोष पवार यांच्या ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ या संग्रहातील कविता चेहरा हरवलेल्या सामान्य माणसांच्या कष्टप्रद जगण्याभोगण्याचे विविध पदर उकलून दाखविते. खुल्या आभाळाखालच्या निराधार, निराश्रित माणसांच्या व्यथा घेऊन येणारी ही कविता काळजात घर करून राहते. या संग्रहातील व्यक्तींचे जगणे एका विशिष्ट जातीच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या, भाषिक संस्कृतीच्या परिघातले असले तरी त्यांच्या दुःखाची जातकुळी जात, धर्म, प्रदेश भाषेच्या परिसीमा ओलांडून व्यापक होत जाते.

माणुसकीचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या या पाषाणकाळात ही कविता मानवतेच्या श्वासांसाठी पसायदान मागते. कवीनं उभी केलेली उघडीनागडी माणसं, त्यांच्या करुण कहाण्या आजच्या पांढरपेशी माणसांच्या कपाळावरील काळा डाग आहेत. अशा निष्पाप माणसांच्या शोषणावरच आपलं पांढरपेशी स्वप्नांचं जग फोफावलेलं आहे याची साक्ष देणाऱ्या या कविता म्हणूनच महत्त्वाच्या ठरतात. आपापल्या चिंचोळ्या चाकोरीत मग्न होणाऱ्या पांढरपेशी उरबडवी काळाच्या पार्श्वभूमीवर ही कविता मानवी दुःखाला वैश्विक परिमाण बहाल करते. तात्पर्य, ही कविता दुःखमुक्तीसाठी भूमिकेने झगडते, प्रचलित व्यवस्थेत हस्तक्षेप करून झापडबंद जगणाऱ्या लोकांसमोर जळजळीत प्रश्न उभे करते. या संग्रहाने मराठी साहित्यात विशेष भर घातली आहे म्हणून काव्याग्रह पुरस्कार देऊन या संग्रहाचा गौरव करणे आम्हाला कवितेच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे वाटले.


– डॉ. विनायक येवले
(लेखक ‘काव्याग्रह’चे कार्यकारी संपादक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -