घरफिचर्सख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर

ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर

Subscribe

हिराबाई बडोदेकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या. त्यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म २९ मे १९०५ रोजी महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या. ताराबाई बडोदे सरकारच्या सेवेत होत्या. या दांपत्यास सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, कृष्णराव माने, कमलाताई बडोदेकर, सरस्वताबाई राणे ही पाच मुले. 1922 मध्ये ताराबाई अब्दुल करीमखाँपासून वेगळ्या झाल्या आणि त्यांनी सर्व मुलांची आडनावे बदलली. त्याचवेळी हिराबाईंचे बडोदेकर हे आडनाव लावण्यात आले. हिराबाईंना घरी चंपूताई असे संबोधत असत. गाण्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या हिराबाईंना लहानपणापासून गाण्याची आवड होती; पण ताराबाईंना आपल्या मुलींनी शिकून समाजात प्रतिष्ठितपणे जगावे असे वाटत होते.

कारण त्याकाळी घरंदाज मुलींनी गाणे शिकण्याची प्रथा नव्हती. हिराबाईंनी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. पण त्यांच्या मूळ आवडीप्रमाणे त्या संगीताकडे वळल्या. त्यांचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण ताराबाईंकडे आणि मोठे बंधू सुरेशबाबूंकडे झाले. त्यांच्याकडून हिराबाईंना संगीताचे सतत मार्गदर्शन लाभत असे. ताराबाई तबल्यावर ठेका धरणे, स्वरलेखन करणे अशा गोष्टी लीलया करत. ताराबाईंचे हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्यानंतर हिराबाईंनी आग्रा घराण्याचे उस्ताद महंमदखाँ यांच्याकडे त्यांनी तालीम घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. हिराबाईंना किराणा घराण्याची रीतसर तालीम अब्दुल वहीद खाँ यांच्याकडून 1918 पासून 1922 पर्यंत मिळाली.

- Advertisement -

हिराबाईंचे पहिले जाहीर गायन वयाच्या 16 व्या वर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेमध्ये मुंबईत झाले (1921). तेथे त्यांनी पटदीप हा राग गायला. त्यांचे गाणे लोकांना आवडले व प्रसिद्धीही मिळाली. ताराबाईंनी अर्थार्जनासाठी म्हणून गिरगाव टेरेसेस या इमारतीत ‘नूतन संगीत विद्यालय’ सुरू केले होते (1920). 1922 पासून हिराबाई संगीताच्या व्यवसायात उतरल्या आणि त्यांनी स्वतंत्र जलसे करायला सुरुवात केली. 1923 साली एच.एम.व्ही. (हिज मास्टर्स व्हॉइस) या संस्थेने हिराबाईंची ‘जया अंतरी भगवंत’ ही मराठी भजनांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. त्याचबरोबर ‘सखी मोरी रुमझुम’ ही हिंदी ध्वनिमुद्रिकाही काढली. ध्वनीमुद्रिकांसाठी आवश्यक असणारे नेमके आणि मर्यादित वेळेत प्रभावीपणे गाण्याचे तंत्र हिराबाईंनी अचूकपणे साधले होते.

त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना खूप लोकप्रियता व मागणी लाभली. त्यांच्या गायनाच्या सुमारे 175 ध्वनिमुद्रिका निघाल्या. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून 1928 सालापासून त्यांनी गाण्यास सुरुवात केली. जवळपास 40 आकाशवाणीकेंद्रांवरून त्यांचे गाणे प्रसारीत होई. आकाशवाणी आणि ध्वनिमुद्रिका यांतून त्यांचे गाणे सर्वदूर पसरले. पुण्याच्या आर्यभूषण थिएटरमध्ये हिराबाईंनी पहिला जाहीर संगीत जलसा केला. स्वत:च कार्यक्रम लावण्यापासून ते जाहिरात करून तिकिटविक्रीपर्यंत सर्व कामे हिराबाई व त्यांच्या भावंडांनी केली. एखाद्या स्त्रीने तिकिट लावून असे जलसे करणे व त्यात शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करणे ही संकल्पना तेव्हा नवी होती. यास विरोधही झाला. तो पत्करून हिराबाईंनी असे जलसे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही यशस्वी केले. हिराबाईंचे 20 नोव्हेंबर 1989 रोजी पुणे येथे निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -