घरफिचर्सलोकप्रिय राष्ट्रनेते लालबहादूर शास्त्री

लोकप्रिय राष्ट्रनेते लालबहादूर शास्त्री

Subscribe

लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान नेते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत शारदाप्रसाद व रामदुलारीदेवी या दाम्पत्याच्या पोटी कायस्थ कुटुंबात झाला. वडील शारदाप्रसाद सुरुवातीस प्राथमिक शिक्षक होते; पुढे ते शासकीय लिपिक झाले. आई पारंपरिक धार्मिक वृत्तीची होती.

लालबहादूर शास्त्री हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये मॅट्रिकला असताना महात्मा गांधीजींनी असहकाराची चळवळ सुरू केली (१९२१). शास्त्रींनी शाळा सोडली व गांधीजींच्या विचारसरणीकडे ते आकृष्ट झाले. पुढे त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला व ते पूर्णतः गांधीवादी बनले. त्यांनी मोठ्या कष्टाने काशी विद्यापीठातून तत्वज्ञान या विषयात पहिल्या वर्गात शास्त्री ही पदवी मिळविली (१९२५). विद्यार्थीदशेत डॉ. भगवानदास, गोपालशास्त्री या अध्यापकांचा आणि नंतर पुरुषोत्तमदास टंडन व लाला लजपत राय यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. लाला लजपत राय यांनी स्थापिलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल’ या संस्थेचे ते १९२५-२६ मध्ये आजीव सेवक झाले आणि अलाहाबादेत त्यांनी कायमचे वास्तव्य केले.

- Advertisement -

अलाहाबादला नेहरूंचे मार्गदर्शन व सहवास त्यांना लाभला. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील संघटनांतून बहुविध पदांवर काम केले. त्यांत प्रयाग नगरपालिकेचे सदस्य (१९२८-३५), उत्तर प्रदेश विधान सभेचे सदस्य, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव (१९३७), भूमि-सुधार समितीचे चिटणीस (१९३५-३६), जिल्हा काँग्रेसचे चिटणीस (१९३०-३५), प्रांतिक काँग्रेसचे चिटणीस (१९३७), अ.भा.काँ.कार्यकारिणीचे सदस्य व महासचिव इ. पदे भूषविली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांना सात वेळा अटक होऊन नऊ वर्षे कारावास भोगावा लागला. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून त्यांनी कार्य केले; पण पुढे त्यांना अटक झाली. तुरुंगात त्यांनी कांट, हेगेल, रसेल, हक्स्ली इ. विचारवंतांच्या ग्रंथांचे परिशीलन केले. मादाम क्युरीच्या चरित्राचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले.

उत्तर प्रदेश विधान सभेवर ते काँग्रेसतर्फे १९४६ मध्ये निवडून आले. १९५७ ते १९६४ दरम्यान त्यांनी संचार व परिवहन, उद्योग व व्यापार, गृह इ. खाती समर्थपणे सांभाळली; विशेषतः गृहमंत्रिपदाच्या काळात पंजाबी सुभ्याची चळवळ, दक्षिणेतील हिंदी विरोधी चळवळ, जम्मू-काश्मीरमधील धार्मिक तणाव यांसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. लाचलुचपत आणि भ्रष्टाचार यांना आळा घालण्यासाठी त्यांनी संथानम् आयोगाची नेमणूक केली. त्यांनी विशाखापट्टनम् येथे जहाजबांधणी कारखान्याची उभारणी केली, रशिया व चेकोस्लोव्हाकिया यांच्या सहकार्याने अवजड अभियांत्रिकी निगम स्थापन केला आणि चाळीस परकीय संस्थांशी व्यापारी करार केले. आसामची भाषिक दंगल (१९६०-६१), पंजाबची धार्मिक दंगल आणि मास्टर तारासिंगांची पंजाबी सुभ्याची चळवळ हे प्रादेशिक प्रश्न त्यांनी अत्यंत कौशल्याने व कणखर भूमिका घेऊन हाताळले. पंडित नेहरूंच्या निधनानंतर (२७ मे १९६४) काँग्रेसच्या संसदीय सभेने ९ जून १९६४ रोजी शास्त्रींची पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केली. अशा या महान राष्ट्रनेत्याचे ११ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -