घरफिचर्सनाट्यसंम्मेलनाच्या अध्यक्षपदामुळे माझ्या कारकिर्दीचा सन्मान

नाट्यसंम्मेलनाच्या अध्यक्षपदामुळे माझ्या कारकिर्दीचा सन्मान

Subscribe

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर 'आपलं महानगर आणि मी' या फेसबुक लाईव्ह दरम्यान त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सविस्तर संवाद साधला.

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंम्मेलनाच्या अध्यक्षपदी नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमध्ये येऊन आपली भूमिका व्यक्त केली. नाट्य संम्मेलनाच्या अध्यक्षाला फार काही अधिकार नाहीत. मात्र एखाद्या रंगकर्मीचा सन्मान म्हणून नाट्य संम्मेलनाचे अध्यक्षपद दिले जाते. मी देखील आजपर्यंत नाट्यक्षेत्राला जे योगदान दिले, त्याचाच हा सन्मान समजतो. त्यापेक्षा अधिका अधिकार काय आहेत? वैगरेच्या भानगडीत मी तरी पडत नसल्याचे परखड मत गज्वी यांनी व्यक्त केले.

प्रायोगिक रंगभूमीसाठी काही विशेष योजना

प्रायोगिक नाटकांसाठी थिएटर उपलब्ध नाहीत, अशी ओरड अधून मधून केली जाते. मात्र मुंबईत बरेचसे प्रायोगिक थिएटर आहेत, त्यांचे भाडेही नाममात्र आहे. मात्र प्रश्न असा आहे की, प्रायोगिक नाटक करणारा तरुण आज अस्तित्वात आहे का? काही मंडळी वर्षातून एकदा प्रायोगिक नाटक बसवतात. पण ते महाराष्ट्र टाइम्स किंवा झी सारख्या माध्यमसमूहांच्या मंचावर ते सादर करतात. बाकी वर्षभर प्रायोगिक रंगभूमीसाठी काम करणारे किती जण आहेत? हा प्रश्नच आहे. मग फक्त त्यांनाच वेगळे थिएटर हवे आहे का? हे देखील तपासून पाहिले पाहीजे. प्रायोगिक रंगभूमीसाठी काय केले पाहीजे, याचा विचार नाट्यपरिषद करेल. मात्र नाट्य संम्मेलनाचे अध्यक्ष काहीही करु शकत नाही.

- Advertisement -

बोधी नाट्य परिषदेची गरज काय

आपल्याकडे ‘कलेसाठी कला की, जीवनासाठी कला’ हा वाद कायम आहे. यात तिसरं काही असू शकतं की नाही? याबाबत मी विचार करायला सुरुवात केली. त्यातूनच बोधी नाट्य चळवळ साकार झाली. बोधी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान.. जगातली कुठलीही कला ज्ञानासाठी वापरली जाऊ नये का? तर नक्कीच वापरली जावी. यातूनच बोधी नाट्य परिषद निर्माण झाली. गंभीरपणे लेखन करणारे लेखक आहेत का ? तर याचे उत्तर नाही आहे. तेंडूलकर यांच्यानंतर गंभीर नाटक करणारे कुणी नाही. आपल्या जीवनात आजही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. आजच्या प्रश्नांना कवेत घेणारे लेखक-नाटककार नाहीत. गंभीर किंवा नवीन नाटक देण्याचे काम बोधी नाट्य परिषद करत आहे. वेगळे काही देण्यासाठी गाडून घेऊन काम करण्याची गरज आहे. बोधी नाट्य परिषदेच्या मार्फत कला दिन साजरा केला. भारतात मान्यताप्राप्त पाच कला आहेत. पण शब्दकला याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. शास्त्रीय गायन, कविता, कथेची कार्यशाळा आम्ही घेत असतो. त्यातून कलाकारच घडावा असे नाही. पण त्यापर्यंत कला तरी पोहोचली पाहीजे. आज आपण म्हणतो ग्लोबल व्हिलेज झालेले आहे. मग असे होत असताना कला लोकांपर्यंत पोहोचली पाहीजे.

किरवंत भारतभर गेल्याचा आनंद

किरवंत या नाटाकाचे आतापर्यंत कन्नड, तेलगू, बंगाली, इंग्रजी आणि हिंदीमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. एका लेखकासाठी त्याचे नाटक विविध भाषांमध्ये अनुवादित होत असेल तर ते कधीही सुखकारकत असते. मी महाराष्ट्रात बरं काम करत असेल तर आणि तो विषय जर देशभर जात असेल तर कुणासाठीही ती चांगली बाब आहे.
हे नाटक १९८१ ला लिहिले होते. जयवंत देसाई यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक आम्ही पहिल्यांदा केले होते. पण ही प्रथाच अस्तित्वात नाही, असे परिक्षकांनी सांगत नाटक बाद ठरवले. त्यानंतर या नाटकाचे पुर्नलेखन केले आणि त्याला व्यावसायिक रंगभूमीवर उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र हे नाटक कुणीही करण्यास तयार नव्हते. अखेर हे नाटक मी डॉ. श्रीराम लागू यांच्याकडे पाठवले. नाटक वाचल्यानंतर त्यांनी फोन आणि पत्र लिहून या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आंधळा मागतो एक डोळा… अशीच माझी त्यावेळी अवस्था झाली होती. डॉ. लागू यांच्यासारखा समर्थ आणि सर्वसमावेश असा नट या नाटकाला दुसरा मिळालाच नसता. बुद्धीवादी लोकांसाठी डॉ. लागू यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचा आजही मोठा आधार आहे. किरवंत जेव्हा लिहिले तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मुळात हा विषय तुम्हाला सापडला कसा? असेही प्रश्न अनेकांनी विचारले.

- Advertisement -

नवोदित लेखकांना व्यावसायिक पाठबळ नाही

आपली मराठी रंगभूमी मनोरंजनाच्या चौकटीत अडकलेली आहे. सतीश आळेकर आणि त्यांचे समकालीन नाटककार व्यावसायिक रंगभूमीवर आले नाहीत. सांगली येथील इरफान मुजावर नावाचा लेखक काही नवीन देऊ इच्छितो. पुण्यामध्ये आशुतोष पोद्दार, अरुण मिरजकर, नाशिकमध्ये भगवान हिरे, अशोक हंडोरे असे नवीन लेखक नवनवीन प्रयोग करत आहेत. जे वेगळा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना निर्माते मिळत नाहीत. कारण आपल्याकडे गल्ला जमवणारे नाटकांना निर्माता मिळतो. याला सरकार आणि निर्माता कारणीभूत आहेत. सरकार हाऊसफुल्ल नाटकांना अनुदान देते. पण ज्या नाटकांना हाऊसफुल्ल होत नाही, त्यांचा विषय चांगला आहे. त्या नाटकांना अनुदान दिलं पाहीजे. आज मोठ मोठे चॅनेल्स नाटकांमध्ये उतरले आहेत. पण त्यांनीही हेम्लेट आणि नटसम्राट सारख्या नाटकांनाच उचलून धरले आहे. त्यांनी प्रायोगिक नाटकांना आधार द्यायला हवा. नवीन पिढीच्या लेखकांना व्यावसायिक पाठबळ लाभलेले नाही, त्यामुळे जुनीच नाटके पुन्हा पुन्हा केली जात आहेत.

Premanand Gajvi
प्रेमानंद गज्वी

नाना बिलंदर माणूस…

माझ्या तनमाजोरी या नाटकात नाना पाटेकर यांनी काम केले आहे. नानावर प्रेम करावे असा बिलंदर माणूस आहे. नाना शिस्तीचा कडक माणूस. आपण नाटकांसाठी पैसे घेतो त्यामुळे आपले काम चोख झाले पाहीजे, हा त्याचा शिरस्ता. नाना सोबत काम करणे हा चांगला अनुभव होता. निळू फुले आणि नाना पाटेकर महाराष्ट्राला पडलेली दोन सुंदर स्वप्ने आहेत.

तरुणांनो चांगलं नाटक लिहा

मी स्वतः नाटकाचा व्यवसाय केला नाही. मी नवोदित लेखकांना एवढंच सांगतो की चांगलं नाटक लिहा. निर्मात्याला आवडेल असं चांगलं नाटक नाही. तर तुम्हाला आवडेल ते लिहा. एकांकिका स्पर्धेकडे पाहीले तर अनेक नवनवीन संकल्पना येत आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर दर दोन मिनिटांनी विनोद निर्माण करण्याची स्पर्धा लागली आहे. एकांकिकेत मात्र अजून तसे झालेले नाही. आपल्या देशात आणीबाणी लागली, बाबरी मस्जिद पाडली किंवा दर पाच वर्षांनी निवडणुका होतात, त्यात भ्रष्टाचार होतो. त्यावर आजपर्यंत एकही नाटक लिहिलेले नाहीत. आपली नाटके कुटुंब आणि प्रेम प्रकरणाच्या पुढे गेलेली नाहीत. मग इतर प्रश्न हे प्रश्न नाहीत का? ज्या गोष्टींवर देश उभा आहे, त्याबद्दल काहीच लिहिले जात नाही. आपल्या देशावर आपले प्रेम असेल तर या प्रश्नांकडेही आपण लक्ष दिले पाहीजे. तरिही मी सांगतो तसेच लिहा, असे माझे मत नाही. मात्र जाणीवा विकसित होतील, अशी नाटके लिहिली गेली पाहीजे. आपल्या देशाचा इतिहास ५ हजार वर्षांपूर्वीचा आहे, असं म्हणतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, या देशाचा इतिहास ८ हजार वर्षापूर्वीचा आहे. मग या इतिहासात आर्य कधी आले, बुद्ध कसा झाला? मुघल कधी आले? ब्रिटिश कधी आले? या देशाच्या मातीवर आपले प्रेम असेल तर आपली जबाबदारी आहे की, इतिहासावर देखील आपली नाटके आली पाहीजेत.

नाटक हे अभिव्यक्तीसाठी आहे

मालिका या व्यवसायासाठी आहेत. अभिव्यक्ती करायची असेल तर स्वतःला सुचले पाहीजे. वाडा चिरेबंदी हा महेश एचंकुलवार यांना पडलेला प्रश्न आहे. कोण्या निर्मात्याने ते सुचवलेले नाही. आपल्या देशात आजही खुप मोकळे वातावरण होते. आणीबाणीच्या काळातही अनेकांनी मोकळेपण अनुभवलेले आहे. नेमकी आणीबाणी कशी आणि का आली? याच्यावर लिहिले गेले पाहीजे. पण आपण खोलवर जाऊन कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. कोणत्याही गोष्टीला कार्यकारण भाव असतो, तो शोधला पाहीजे. मला सिनेमा आणि मालिका याच्यात वेळ घालवायचा नाही. मला जमत नाही असं नाही. पण मला त्यात रस नाही.

मी मनोरंजनासाठी नाटक करणार नाही… किरवंत पाहीलं तर तुमचे मनोरंजन होतेच की. रडणं म्हणजे हेही देखील एक मनोरंजन आहे. तुमच्या काळजात चर्र होणे, हे देखील मनोरंजन आहे. किरवंत मधला ब्राह्मण दशक्रिया विधी करतो, तुमच्या माणसांना स्वर्गात नेतो, मग त्या व्यक्तीला तुम्हाला चारचौघात अपमानित का करता? किरवंत ज्याने सुचवले त्याने सांगितले की स्वर्ग किंवा नरक असे काही नाही. मग या सर्व विधीचा काय उपयोग काय? देव किंवा विधी यामुळे आपलं जगणं थाबंत नाही. मात्र गरज नसलेल्या गोष्टींना आपण कवटाळून बसतो.

अभिव्यक्तीसाठी किमंत मोजावी लागते

कलेच्या माध्यमातून काय सांगायचे आहे. समाजाला पुढे न्यायचे आहे का? हा प्रश्न कला निर्मिती करणाऱ्याला पडला पाहीजे. एखादे वाक्य किंवा प्रसंग त्या कलाकृतीला आवश्यक आहे का? याचा विचार केला गेला पाहीजे. जर ते आवश्यक असेल तर कोणत्याही कलावंताने ते गाळता कामा नये. हुसेन यांनी आपली चित्र मागे घेतली नाहीत, प्रंसगी त्यांनी देश सोडला. कलाकाराला आपल्या कलाकृतीची जबाबदारी घेऊन किमंत चुकवावी लागते. जर कलाकार त्याची एखादी कलाकृती मागे घेत असेल तर तो कलेशी प्रामाणिक नाही, असं दिसतं. लेखकाने आपल्या लेखनाची जबाबदारी घेतली पाहीजे. मी माझ्या सर्व लिखाणाची जबाबदारी घेतो, त्यातील एकही वाक्य मी आजवर गाळलेले नाही. त्यासाठी किमंत मोजावी लागली तरी त्यासाठी मी तयार आहे.

Marathi writer Premanand gajvi fb live
प्रेमानंद गज्वी

कलावंत असणं म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न मला पडतो. कलावंताला सामान्य माणसाला येणाऱ्या अडचणीही असतात. यात शासनाची खुप मोठी जबाबदारी आहे. आपले कलावंत जपायचे की नाही? याचा विचार शासनाने केला पाहीजे. चांगले कलावंत निवडूण त्यांना घर आणि काही भांडवल दिले पाहीजे. तसेच दर पाच वर्षांनी त्याच्या कामाचा रिव्हू केला पाहीजे. जर कलावंत चांगले काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहीजे.

हा देशच राखीव लोकांचा होईल की काय अशी भीती वाटते

छावणी हे नाटक सध्या सेन्सॉर बोर्डात अडकलेले आहे. भारताच्या सध्याच्या ज्वलंत मुद्द्यावर हे नाटक भाष्य करते. सध्या आरक्षणाने सर्वांचा भेजा फ्राय झालेला आहे. एकही जात अशी नाही जी स्वतःला राखीव जागा नको असे म्हणत नाही. हा देशच काही दिवसांनी राखीव होईल की काय? अशी शंका येते. आपला देश गरीब अजिबात नाही. मात्र देशाची संपत्ती काही विशिष्ट लोकांपुरतीच मर्यादित राहिलेली आहे. असा एकंदर छावणी या नाटकाचा विषय आहे. देशाच्या विकासाबाबत एक व्यक्ती ब्लू प्रिंट घेऊन येतो, अशी या नाटकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. हे नाटक भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे, असे उत्तर आम्हाला सेन्सॉर बोर्डाने दिले आहे. नाटक चालेल का? याचे भय आम्हाला वाटत नाही. आम्हाला जगात परिवर्तन करायचे नाही. माझे नाटक बघून एका व्यक्तीमध्ये तरी परिवर्तन झाले तरी ते महत्त्वाचे असते. सेन्सॉरकडून हे नाटक सुटले तर ते प्रत्यक्षात येईल. नाहीतर ते पुस्तक स्वरुपात छापू.

नाटक कसं तयार होतं?

तुम्ही साधा दगड भिरकावलात तरी त्यातून नाटक तयार होतं. नोकरी नाही.. हा प्रश्न पडला तरी त्यातून नाटक तयार होतं. नाटक करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? याच तंत्र अवगत केलं पाहीजे. त्याची भाषा कळली पाहीजे. योग्य तंत्राचा वापर झाला पाहीजे. अश्वघोष यांनी भारतातलं पहिलं नाटक लिहिलं. तेव्हा नाटकाचा विकास व्हायला सुरुवात झाली. ग्रीकांनी जेव्हा आपल्यावर आक्रमन केलं. तेव्हा त्यांच्यासोबत ते त्यांच्या कला घेऊन आले. अश्वघोषाचा एक किस्सा आहे, तो प्रभा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. आणि त्या प्रेमातून नाटक लिहित जातो. अश्वघोष नाटकाच्या प्रवाहात इतका वाहत गेला की त्याने वैदिक धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्यानंतरही त्याने नाटक लिहिले. माझ्याबाबतीत बोलायचे झाल्यास, मला लहानपणापासून कलेची आवड होती. नाटककार झालो नसतो तर कव्वाली गायक किंवा नट झालो असतो. पण योगायोगाने मुंबईत आलो. त्याआधी शिक्षणासाठी बडोद्यामध्ये गेलो होतो. जिथे तिथे गेलो तिथे मला नाटकच भेटत गेलं. नाटकातले सहकारी भेटत गेले.

कलेमध्ये मोकळेपणा हवा

कले मध्ये एक मोकळेपण आपण निर्माण केला पाहीजे आणि तो मोकळेपण प्रेक्षकांना अनुभवता आला पाहीजे. आपल्या मेंदूत सहजासहजी चांगले विचार येत नाहीत. शास्त्रज्ञांनी अशी लस शोधली पाहीजे की ती दिल्यावर त्याच्या मेंदूतली विकृती नष्ट व्हावी. भारताबाहेर लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना तेवढ्या वाचनात येत नाहीत, जेवढ्या भारतातून त्या ऐकायला येतात. त्यामुळे भारतातल्या माणसांच्या मेंदूना लस देण्याची गरज आहे. भारत अध्यात्मिक देश आहे, असं म्हणतात मग ही किड कुठून आली, यावर विचार केला पाहीजे.

नाट्य संम्मेलनाच अध्यक्ष झाल्यानंतर मी काही वेगळा विचार अद्याप केलेला नाही. नाट्य परिषद आणि मी एकत्र बसून काही नवीन करायचे का? यावर चर्चा विनिमय करु. जर शक्य असेल तर वास्तवात आणण्याचा प्रयत्न करु. लेखक, दिग्दर्शक, नैपथ्यकार असे नाटकाशी निगडीत असलेल्या सर्वांना एकत्र आणून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -