घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमारुती कांबळेचं काय झालं?

मारुती कांबळेचं काय झालं?

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूवरून राज्यातील भाजप नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलीस यांच्यावर पक्षपातीपणाच्या फैरी झाडताना आकाशपाताळ एक केले. सुशांतची हत्या झाली असून याचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायचा असेल तर तो केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जायला हवा, असा त्यांचा प्रयत्न होता. महाविकास आघाडी सरकार या प्रकरणात सरकारमधील कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा भाजप नेत्यांचा आरोप होता. पुढे सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेली. पण सीबीआयने एम्सकडून जो सुशांतच्या व्हिसेराचा अहवाल मागवला, त्यात सुशांतने आत्महत्या केली असे म्हटले आहे. त्यानंतर भाजपचा विरोध मावळला आहे. त्याचे आश्चर्य लोकांना वाटत आहे, त्यामुळे ते, मारुती कांबळेचं काय झालं, याच धर्तीवर विचारत आहेत, सुशांतचं नेमकं काय झालं ?

काही वर्षांपूर्वी ‘सामना’ या गाजलेल्या चित्रपटातील हा अतिशय चित्तवेधक आणि लोकांच्या तोंडात रुळलेला एक संवाद होता, तो आजही जेव्हा बड्या धेंड्याच्या स्वार्थी उपद्व्यापामुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण होते, तेव्हा वापरला जातो, तो होता, ‘मारूती कांबळेचं काय झालं?’ या चित्रपटातील गावाचा प्रमुख राजकीय नेता आणि सर्वेसेर्वा असलेला हिंदूराव त्याला अडथळा ठरणारा निवृत्त सैनिक मारूती कांबळे याचा रातोरात काटा काढतो. त्यामुळे मारुती कांबळे अचानक गायब होतो. त्याच्या संशयास्पद गायब होण्यामुळे गावातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसता; पण त्याने हिंदूरावाशी पंगा घेतलेला होता, हे गावातील लोकांना माहीत असते. हिंदूरावाची पूर्वकिर्ती लोकांना माहीत असल्यामुळे कांबळेला बहुतेक त्याने पोचवलेलाच असणार, अशी शंका गावातील लोकांना वाटत असते; पण उघडपणे बोलण्याची कुणाची हिंमत नसते. त्यामुळे ते दबक्या आवाजात, ‘मारुती कांबळेचं काय झालं,’ अशी चर्चा करत राहतात. कारण जाहीरपणे बोलले तर आपलाही मारुती कांबळे होईल, अशी त्या गावातील लोकांना भीती वाटत असते.

टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधील उठवदार अभिनयामुळे नावारुपाला आलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला. काहीचे म्हणणे होते की, त्याची हत्या करण्यात आली. तर काहींचे म्हणणे होते की, त्याने आत्महत्या केली. सुशांतची कशी हत्या झाली, त्याच्या शक्यता दाखवणार्‍या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर वेगाने फिरत होत्या. दोन महिने अगोदर सुशांतची मॅनेजर असलेली दिशा सॅलियन हिचाही संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर सुुशांतचा मृत्यू झाला. या सगळ्याच्या मागे सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आहे, असा अंदाज बांधून प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांवर रिया चक्रवर्तीच्या नावाने आगडोंब सुरू होता. परिणामी रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशी करून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

- Advertisement -

आता एक महिन्यानंतर तिला जामीन मंजूर झाला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या सीबीआयने दिल्लीतील एम्सकडून (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) सुशांतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात जो पोस्टमॉर्टेम आणि व्हिसेरा यांचा पुनर्तपासणी रिपोर्ट मागवला होता, त्यातून सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली, असे म्हटले आहे. एम्ससारख्या प्रख्यात संस्थेने दिलेल्या या अहवालाला आव्हान देणे कठीण आहे. त्यामुळे आता जवळजवळ हा अहवाल अंतिम असेल, अशीच स्थिती आहे. त्यामुळे सुशांतची हत्या झाली होती, या शक्यतेवरून जे रान पेटवण्यात आले होते, मुंबई पोलीस, बिहार पोलीस, महाराष्ट्र आणि बिहारची राज्य सरकारे यांच्यात जे घमासान झाले, भाजपने जो प्रतिष्ठेचा मुद्दा करून केंद्रीय शक्तीचाही वापर केला, त्या सगळ्यावर एम्सच्या अहवालाने पाणी पाडले आहे. त्या प्रकरणातील हवाच काढून टाकली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण हा जो काही गहजब सुरू होता, तो सुशांतची हत्या झाली, या गृहितकावर आधारलेला होता. आता एम्सच्या अहवालाने ती शक्यताच मोडीत काढली आहे. त्यानंतर दररोज करण्यात येत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आता थंडावल्या आहेत.

सुशांतच्या संशयास्पद मृत्यूला लागूनच बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अमली पदार्थांचा वापर करण्याच्या प्रकरणाने जोर धरला. त्यातून आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन हिला चौकशीसाठी बोलावण्यात आले. कंगना राणावत या अभिनेत्रीने सुशांतच्या संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जी काही विधाने केली, त्याने तर बॉलिवूडकरांचे वस्त्रहरण करून टाकलेे. अर्थात, बॉलिवूडमधील ड्र्रग्जचा वापर, कास्टिंग काऊच आणि चित्रपटात काम देण्यासाठी नट्यांचे होणारे लैंगिक शोषण, बॉलिवूडला अंडरवर्ल्डकडून होत असलेला पैशाचा पुरवठा, त्यातूनच डॉन मंडळींशी काही नट्यांशी होणारी जवळीक हे विषय काही नवीन नाहीत. ते अधून मधून उफाळून येत असतात. त्यावरून गरमागरम चर्चा होते. काही काळानंतर ती थंड होऊन जाते. पुन्हा होते तसे काम सुरू राहते.

- Advertisement -

काही वर्षापूर्वी एका न्यूज चॅनेलने बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचा पर्दाफाश केला होता. काही अभिनेत्यांना कास्टिंग काऊच करताना रंगेहाथ पकडले होते. त्यांची मालिकाच तयार केली होती. त्यात पहिले प्रकरण शक्ती कपूरचे होते, त्यानंतर आणखी एक अभिनेता दुसर्‍या भागात होता. या अशा प्रकारामुळे बॉलिवूडची छी थू होऊ लागली. न्यूज चॅनेलच्या प्रमुखाने सांगितले, असे अनेक भाग माझ्याकडे आहेत. मी बॉलिवूडमधील बर्‍याचजणांना कास्टिंग काऊचमध्ये पकडलेले आहे. हे ऐकल्यानंतर मात्र बॉलीवूडमधील बड्यांचे धाबे दणाणले, मग त्या वेळच्या एका बड्या सत्ताबाह्य केंद्राकडे जाऊन ते प्रकरण तिथेच थांबवायला त्या न्यूज चॅनलच्या प्रमुखाला भाग पाडण्यात आले.

सुशांतच्या मृत्यूला लागून बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यावर आणि त्यात दरदिवशी स्टार मंडळींची नावे येऊ लागल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर दिवसा तारे चमकायला लागले. गेल्या सात महिन्यात कोरोना महामारीमुळे बॉलिवूडचा व्यवसाय ठप्प झाला आहे. अनेकांचे शूटिंग रखडले आहे, सिनेमागृहे बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्यात पुन्हा ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील प्रसिद्ध नट, नट्या अडकल्याचे सिद्ध झाले. उद्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन तुरुंगवास झाला, तर त्यांची जनमानसातील प्रतिमा डागाळेल, त्यांचे चित्रपट पहायला लोक जाणार नाहीत. त्यांच्यावरील हा बहिष्कार बॉलीवूडच्या मुळावर येईल, याची भीती बॉलिवूडमधील मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसना आहे. या सगळ्याचा उगम हा सुशांतची हत्या झाली या शक्यतेतून झालेला आहे. पण ती शक्यताच एम्सच्या अहवालाने बदलून टाकली आहे. सुशांतने आत्महत्या केली, असा अहवाल केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयला एम्सकडून मिळाला. त्यानंतर यावरून बॉलिवूडमधील नटनट्यांची ड्रग्ज प्रकरणावरून होत असलेली चौकशी आणि मीडियावरील गदारोळ शांत झाला आहे.

सुशांतची हत्या झाली आहे, मुंबई पोलीस सत्तेतील कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी आरोपांची राळ राज्यातील भाजपच्या नेत्यांनी उडवायाला सुरूवात करून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयपर्यंत नेऊन ठेवली. भाजप-शिवसेना असे द्वंद्व सुरू असताना हे प्रकरण केंद्रविरुध्द महाराष्ट्रातील राज्य सरकार असे होऊन, त्यात बिहारमधील सरकारही सक्रिय झाले. सुशांत प्रकरणावरून महाराष्ट्र, बिहार आणि केंद्र सरकार असे राजकारण ढवळून निघाले. असे सगळे सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची अनपेक्षित अशी भेट झाली. त्यावेळी लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. मग ती भेट फडणवीस यांच्या घ्यावयाच्या मुलाखती संबंधात होती, असा खुलासा राऊत यांनी केला. खरे तर या भेटीनंतर सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सीबीआयला एम्सकडून सुशांतने आत्महत्या केली असा अहवाल मिळाला. त्यानंतर आजवर जे भाजप नेते, बिहार सरकार सुशांतची हत्या झाली आहे, ही शक्यता घेऊन भुई बडवत होते, ते आश्चर्यकारकरित्या शांत झाले आहेत. हे असे कसे काय झाले, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना नक्कीच पडला असेल. दबक्या आवाजात तेही एकमेकाला विचारत असतील, मग सुशांत सिंहच नेमकं काय झालं? जसा तो ‘सामना’ चित्रपटतील लोक विचारत होते, मारूती कांबळेचं काय झालं, खरं तर हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. कारण राजकीय नेत्यांच्या साठमारीत असे अनेक सुशांत सिंह आणि मारूती कांबळे गायब होत असतात.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -