Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग श्रीगणेशाच्या आगमनासोबत कोरोनाचे निर्गमन व्हावे !

श्रीगणेशाच्या आगमनासोबत कोरोनाचे निर्गमन व्हावे !

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने गणेश मंडळे आणि भाविकांवर काही निर्बंध घातले आहेत. ते सगळ्यांच्याच हिताचे आहे, पण तरीही बाजार, बसस्टँड अशी ठिकाणे पुन्हा गर्दीने फुलत आहे. अशा परिस्थितीत सण उत्सवात नागरिकांनी कोरोनाबाबत बेफिकीरीने वागणे धोकादायक आहे. श्री गणेशाचे आगमन होत असताना तिसरी लाट आणि नव्या स्ट्रेनचा धोकाही वर्तवला जाऊ लागला आहे. कोरोनाचे विघ्न नष्ट व्हावे, यासाठी विघ्नहर्त्या श्रीगणेशाची प्रार्थना करतानाच, नागरिकांनी स्वतःही जबाबदारीने वागून गणेशोत्सवातील उत्साह कोरोना संक्रमणासाठी कारण ठरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

Related Story

- Advertisement -

धर्म अस्मितांचे अनाठाई राजकारण करून संपूर्ण मानवजातीला धोक्यात टाकण्याचे प्रयत्न गणेशोत्सवानिमित्त राजकारण्यांकडून होता कामा नयेत. शासनाने जे निर्बंध लागू केले आहेत, त्याला कुठलीही शिथिलता गणेशोत्सव काळात देण्यात आली नाही. त्यामुळे या काळात कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, नागरिक मास्कचा वापर करतील तसेच सामाजिक अंतराचे पालन होईल, याची काळजी घ्यायलाच हवी. श्रींचे आगमन आणि विसर्जन यांच्या मिरवणुकीवर बंदी आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाऊ नये आदी सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. ही बंधने पाळून सर्वांनी श्री गणेशाचा उत्सव सुरक्षित पद्धतीने आणि शांततेत साजरे करावा, असे आवाहन सरकारने केलेले आहे.

कोरोनाकाळात मागील दीड वर्षाच्या काळात जवळपास सर्वच सण उत्सवांवर निर्बंध आलेले आहेत. आपल्याकडे कुठलाही सण उत्सव मानवी जाणिवा, श्रद्धांपेक्षा धर्म, अस्मिता, संस्कृती रक्षणासाठीच उपयोगात आणण्याची अहमहमिका सुरू असते. राजकीय सत्तेसाठी हे गरजेचे आहे. कार्यक्रम नसलेले रिकामे कार्यकर्ते बिथरण्याची शक्यता असते. त्यांना कायमच अस्मितांच्या दावणीला बांधून ठेवण्यासाठी अशा गोष्टी राजकारणात गरजेच्या असतात, यातून सत्ताधारी किंवा विरोधकांना अडचणीच्या ठरणार्‍या आणि खरोखरंच नागरिकांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या महत्वाच्या प्रश्नांनाही बगल देण्याची सोय असते. राजकारणात कार्यकर्त्यांना कायमच काहीना काही कार्यक्रम द्यावा लागतो. विरोधक आणि सत्ताधारी किंवा पक्षांंतर्गत द्वंद्व कायमच ठेवणे त्यासाठी आवश्यक असते. राजकारणात संघर्ष असावाच लागतो, संघर्षाशिवाय राजकारण करताच येत नाही, या कायम सुरू असलेल्या संघर्षामुळेच कार्यकर्ते आपले आणि त्यांचे असा फरक ओळखण्यासाठीची ही कसोटी महत्वाची असते. अस्मितांचे निखारे तप्त राहावेत यासाठी त्यावर आस्थेच्या प्रश्नांची फुंकर कायमच घालावी लागते, यातच प्रश्न जातीय आणि धार्मिक संकल्पनांचा असेल तर कायदा, लोकशाही अशा इतर सर्वच बाबी निकालात काढणं सोपं जातं.

- Advertisement -

मागील वर्षी कोरोनाकाळच्या सुरुवातीला तबलिगींच्या विषयावरून हा वादंग पेटवण्याचा राजकीय प्रयत्न झाला. तबलिगींमुळे कोरोना कसा वाढतोय, याची गहन चर्चा न्यूरुमध्ये आदळाआपट करून केली जात होती. त्यावेळी आता या जमातीमुळे संपूर्ण मानवजात कशी धोक्यात आली आहे. माणसांवरील हे संकट कोरोनापेक्षाही भयानक आहे. त्याला जबाबदार तबलिगींना माध्यमांनी थेट आरोपींच्या पिंजर्‍यात उभं केल्याचं जगाने पाहिले. न्यायालयाने त्या काळात झालेल्या बेजबाबदार वार्तांकनावर ताशेरे ओढताना माध्यमांना नुकतंच फटकारलं आहे. कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात वैद्यकीय उपाययोजना, सरकारी धोरणे, लोकांना दिलासा देण्याचे काम करण्यापेक्षा धार्मिक उन्मादाच्या बाजूने राष्ट्रीय पत्रकारिता मानल्या जाणार्‍या न्यूजरुम्सची चर्चा झुकली होती. ही स्थिती धर्माधिष्ठीत अस्मितांच्या सत्तेचं राजकारण करणार्‍यांना पोषकच होती, त्यांनी याचा पुरेपूर फायदा उचलत कोरोनाच्या मूळ प्रश्नांना सविस्तर बगल दिली. नोटबंदी, डिजिटल इंडिया आणि काळे धन देशात पुन्हा आणण्याच्या वल्गना आता पुरत्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात राममंदिराचा विषय निकालात निघाल्यानंतर त्याचेही राजकीय मूल्य संपुष्टात आले आहे. त्यामुळे धार्मिक अस्मितेच्या मुद्यांवर अनेक दशके राजकारण करणार्‍या पक्षांना त्यांच्या कार्यकर्त्यांना भावनिक करण्यासाठी नव्या मुद्यांचा वारंवार शोध घ्यावा लागत आहे. त्यासाठी दहीहंडी, ईद, गणेशोत्सवासारख्या उत्सवांना वेठीस धरलं जात आहे.

दहीहंडीच्या थरांबाबत निर्बंध आल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात काही ठिकाणी स्थानिक पक्षांनी थर उभारून सरकारला थेट आव्हान दिले होते. मनसे त्यात आघाडीवर असताना सत्ताधार्‍यांनीही मनसेच्या आव्हानाला मोडून काढण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यातील दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते कामाला लावण्यात आल्यानंतर पोलिसांकडून झालेल्या किरकोळ कारवाया हे आंदोलन राजकीयच असल्याचे स्पष्ट करणारे होते. सत्ताधारी शिवसेनेने या आंदोलनादरम्यान भाजपाच्या तुलनेत मनसेला जास्त गांभिर्याने घेण्यामागे भाजपाला शह देण्याचाच प्रयत्न स्पष्ट होता. या शिवाय भाजपने नुकतेच मंदिरे उघडण्याठी राज्यभर आंदोलने केली. या आंदोलनांनाही राज्यातील सत्ताधार्‍यांनी गांभीर्याने घेतले नाही. मंदिरे उघडण्यासाठी राज्यात मनसेनेही घंटानाद केल्यानंतर मंदिरांंबाबतची भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली. मंदिरं उघडू की, दवाखाने हे आंदोलनकर्त्यांनी एकदाचे ठरवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आणि मंदिर प्रवेशापेक्षा सरकारला नागरिकांची काळजी असल्याचे स्पष्ट केले. राज्यात अस्मिता, धर्माच्या मुद्यांवर मनसे आणि भाजपमध्ये किमान समान कार्यक्रम असल्यासारखी स्थिती निर्माण व्हावी, यातच सत्ताधार्‍यांचे यश आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे शिवसेनाप्रमुखांच्या काळातील प्रखर हिंदुत्व आघाडीमुळे डागाळले असल्याचा प्रचार भाजपाकडून केला जात असताना मनसेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विषय ठाकरेंभोवतीच फिरत राहील याची योग्य ती काळजी घेतली. गणेशोत्सवावरील निर्बंधांच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण धर्म अस्मिता, आस्था या विषयांवरच राहाणार आहे. पुन्हा सरकारविरोधात भाजपा आणि मनसे असा संघर्ष सुरू झाला आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या मिरवणुका, मूर्तींच्या उंचीवरही मर्यादा आल्या आहेत. या शिवाय प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आल्यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याकडे यंदा मूर्तीकारांचा कल आहे. मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा आल्यावर त्याविषयावरून सत्ताधारी शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर बोट उचलण्याचे काम विरोधकांनी केले होते. मागील वर्षाच्या तुलनेत कोकणातील गणेशोत्सवासाठी निर्बंध शिथिल केल्यामुळे भाजपासोबत गेलेल्या तळकोकणातील शिवसेनेच्या तीव्र विरोधकांना संधी दिली नाही.

आगामी काळातील मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या कोकणातील कार्यकर्त्याला आणि मतदारांना नाराज न करण्याचे धोरण अंमलात आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. मुंबईला लागून असलेल्या महापालिका आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये पुढील दिवसात गणेशोत्सवानिमित्त मंडप, वीज पुरवठा, मर्यादित वेळेबाबत असाच लुटुपुटूचा संघर्ष सुरू होईल. त्यावेळीही हा वाद शिवसेना आणि मनसे असाच केंद्रीभूत ठेवण्यासाठी प्रयत्न होतील. मंडपात प्रत्यक्ष दर्शनासाठी न जाता ऑनलाईन दर्शनासाठी होणारा आग्रह या लुटुपुटूच्या लढाईची सुरुवात आहे. कोरोना निर्बंधामुळे देवस्थाने आणि गणेशोत्सव मंडळांचा आर्थिक स्रोत कमालीचा आटणार आहे. राज्यातील भाविकांची श्रद्धास्थाने असलेल्या अनेक मंदिर व्यवस्थापनांनी कोरोना काळात भक्तांविना मंदिरांतील द्रव्यदेणग्या कमी झाल्याच्या तक्रारी सुरू केल्या आहेत. आषाढीच्या निमित्तानेही देवस्थान, भक्त संप्रदाय आणि सरकार यांच्यात वाद झाला होताच. एकादशी संपल्यावर तोही वाद संपला.

हे सारे होत असताना गणेशोत्सातील खरे विघ्न कोरोनावाढीचे आहे. हे विघ्न बाप्पांच्या आशीर्वादाने आणि कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन केल्यानंतरच दूर होणार आहे. दीड वर्षानंतर कोरोनाचे गांभीर्य कमालीचे कमी झाले आहे. बाजार गजबजू लागले आहेत. तिकिट, पाससाठी मर्यादा असतानाही लोकलमधील गर्दी कोरोनाकाळाआधी जशी होती तशीच होत आहे. पुन्हा उद्योग व्यावसाय, दुकाने सुरू झालेली आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याविषयी चर्चा होत आहेत. नाट्यगृहे, सिनेमागृहे सुरू करण्याविषयीही शिथिलता आणली जात आहे. सर्व पुन्हा पहिल्यासारखे होण्याची प्रतिक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे. परंतु कोविडचा नव्या स्ट्रेनचा धोका आणि तिसर्‍या लाटेचा होणारा परिणाम याबाबत अद्यापही खात्रीशीर अंदाज वर्तवला जात नाहीए. हा धोका खरंच वाढला तर पुन्हा शंभर टक्के निर्बंधाकडे नाईलाजाने वळावे लागणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या कमालकाळात निर्जन रस्त्यांवर फिरणार्‍या कोविड रुग्णवाहिकांचा वाजणारा सायरन केवळ ऐकायला येत होता. हा आवाज पुन्हा ऐकायचा नसेल तर नाईलाज म्हणून निर्बंधातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर व्हावा. निसर्गतत्वात असलेल्या त्या निराकाराची सेवा करण्यासाठी केवळ मनातली श्रद्धा पुरेशी आहे. त्याचे उत्साही उत्सवीकरण त्यालाही मान्यच नाही. ते टाळण्याची सुबुद्धी गणपती बाप्पाने द्यावी…एवढेच.

- Advertisement -