घरफिचर्समायमहानगर ब्लॉगग्रामपंचायत निवडणूक मनसेला तारेल का?

ग्रामपंचायत निवडणूक मनसेला तारेल का?

Subscribe

निवडणुकीच्या राजकारणात फारसे यश मिळत नसल्यामुळे सध्या मुख्य प्रवाहापासून बाजूला पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना फर्मान सोडले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा. सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, असे आदेश दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच दिले आहेत. त्यामुळे मेट्रो शहरात असणारे कार्यकर्ते आता सोशल मीडियावरून गावागावात पोहोचलेत. अब नही तो कब नही... प्रमाणे झोकून देऊन संघटनेतील शिलेदारांनी आता कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवे. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी काहीतरी ठोस कार्यक्रम देण्याची गरज आहे. शहरी भागात यश मिळत नसलेल्या मनसेला ग्रामपंचायत निवडणूक तरी तारेल का, हे आता पहावे लागेल.

पुढील 15 दिवसांत कॅलेंडरवरील 2020 हे कोरोनाचे वर्ष संपेल आणि नवे वर्ष 2021 ची सुरुवात होईल. कोरोनाच्या महामारीत आणि जैविक संकटात ‘सिर सलामत तो पगडी पचास’ अशीच अवस्था प्रत्येकाची झाली होती. त्यामुळे मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसुत्री आपण सर्वांनी तंतोतंत पाळली. राजकारण्यांनीही पाळली. त्यामुळेच एप्रिल ते सप्टेंबरच्या काळात सत्ताधार्‍यांप्रमाणे विरोधी पक्षही कोरोनाच्या उपाययोजना आणि दूरगामी परिणाम याच्या जाळ्यात अडकल्यामुळे सर्वांचाच जीव कासावीस झाला होता. मात्र दिवाळीच्या दरम्यान झालेल्या बिहार विधानसभेची निवडणूक आणि दिवाळीनंतर झालेली राज्यातील विधान परिषदेची निवडणूक यामुळे दोन्ही पक्षात उत्साह संचारला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी जाणवू लागला. बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला तर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचा सपशेल धुव्वा उडाला आणि तीन पक्षांची महाविकास आघाडी सरस ठरली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाती घेतला त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला चार जागा मिळाल्या तर भाजपला काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरिश पटेल यांच्या विजयाने भोपळा फोडता आला. शिवसेनेला अमरावतीची जागा राखण्यात अपयश आल्याने मजल शून्यावरच मारता आली. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड आत्मविश्वास आला तर दुसरीकडे गटातटाच्या राजकारणात विखुरल्याने आणि योग्य उमेदवार न दिल्याने भाजपाने आपले परंपरागत गड असलेल्या नागपूर आणि पुण्याच्या तीनही जागा गमावल्या. त्यामुळे भाजपच्या तंबूत सध्या शांतता आहे.

- Advertisement -

शांतता असल्यास राजकारण्यांना अस्वस्थता येते आणि गावात गोंधळ असल्यास राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांचीही किंमत वाढते. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर असणारे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता पार पाडण्यासाठी असल्याने राज्यातील बारा कोटी जनतेच्या हातात ठोस काहीही लागले नाही. मात्र, अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर राज्य निवडणूक आयोगाने 14,234 ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि आचारसंहितेला सुरुवात झाली. एक महिन्याने 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यांतील 14,234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून निकाल 18 जानेवारीला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक कोणतीही असो जोशात तयारीला लागले असून पुढील महिन्याभरात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला दिसेल.
याच दरम्यान शहरी पक्ष असलेल्या आणि सध्या मुख्य प्रवाहापासून थोडासा अडगळीत असणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना फर्मान सोडले. आगामी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढवा. सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, असे आदेश दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच दिल्याने मेट्रो शहरात असणारे कार्यकर्ते आता सोशल मीडियावरून गावागावात पोहोचलेत. पाच दशकांपूर्वी राज ठाकरे यांचे काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष घरोघरी गेला पाहिजे यासाठी प्रत्येक घरावर धनुष्यबाण आणि शिवसेनेचा वाघ पोहोचवला होता. त्यामुळेच पक्षाच्या स्थापनेनंतर 40 वर्षांनी 1995 साली शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकला होता आणि मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली होती.

काकांच्याच पावलांवर पाऊल टाकत राज ठाकरे राजकारणात आले; पण शिवसेनेपासून वेगळे होऊन आता 15 वर्षे झाली तरी अजूनही स्थिरस्थावर झाले नाहीत. पण आता कोरोनानंतर राजकारणच काय सगळंच बदललंय. त्यामुळे राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करायला हवे. मुळात ज्या ग्रामपंचायत निवडणुकीतून राज ठाकरे आपले शक्तिप्रदर्शन करू इच्छितात त्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसते. मुक्त चिन्हाने निवडणूक लढवावी लागते. त्यामुळे पुढील महिन्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत धनुष्यबाण, कमळ, हाताचा पंजा, घड्याळ, रेल्वे इंजिनासह इतर राजकीय पक्षांची चिन्हे नसणार. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने वितरीत केलेले निवडणूक चिन्ह घ्यावे लागेल. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेचे रेल्वे इंजिन घरोघरी पोहचण्याची शक्यता कमी आहे. पण ‘देर आये दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे शहरी भागात तितकासा प्रभाव न पाडणार्‍या मनसेला आता ग्रामीण भाग सत्तेसाठी खुणावू लागला आहे हेही नसे थोडके.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर फेब्रुवारी ते एप्रिल 2021 च्या दरम्यान मुंबई महानगर प्रदेशात ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांचा समावेश होतो, त्यापैकी तीन जिल्ह्यांत निवडणुका आहेत. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, वसई-विरार महापलिका, नवी मुंबई महापालिका, कुळगाव-बदलापूर नगर परिषद आणि अंबरनाथ नगर परिषद या निवडणुका पुढील 100 दिवसात होणार आहेत. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेची मुदतही संपल्याने तिथेही निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर मार्चच्या सुमारास होईल. त्यामुळे पुढील तीन महिन्यात पुन्हा एकदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा एकाकी लढत देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळेच मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत घेतलेली उडी ही भाजपच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. अधूनमधून भाजप आणि मनसेची युती होण्याच्या ब्रेकिंग न्यूज, बातम्या आदळत असतात. राज यांच्यानंतर पक्षाची धुरा असणार्‍या बाळा नांदगावकर यांनी ‘अब नही तो कब नही…’ प्रमाणे झोकून देऊन संघटनेतील शिलेदारांना बळ द्यायला हवे. कारण केवळ बाईटमास्टर नेत्यांमुळे मनसे पक्ष हॉल आणि डायनिंगवरील टीव्हीच्या स्क्रीनवरच दिसला आणि सोशल मीडियातून झळकला. तेव्हा पुन्हा कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी काहीतरी ठोस कार्यक्रम देण्याची गरज आहे.

हैदराबाद महापलिका निवडणुकीत ओवेसी बंधूंच्या एमआयएम पक्षामुळे भाजपला 4 जागांवरून 49 जागांवर मुसंडी मारता आली. हैदराबाद महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने सत्तेचे गणित अजून जमलेले नाही. टीआरएस यांना एमआयएम किंवा भाजपशी हातमिळवणी केल्याशिवाय महापौर बसविता येणार नाही. त्यामुळेच राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. याच न्यायाने 2021 मध्ये होणार्‍या महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपला मनसेची दृश्य अथवा अदृश्य साथ लाभल्यास निवडणुकांचे निकाल वेगळे लागलेले दिसतील. कारण विधान परिषद निवडणुकीत तीन पक्षांच्या ताकदीची कल्पना भाजपला न आल्यानेच पराभव झाल्याची कबुली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यामुळेच भाजपमधील एक गट राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही आहे तर दुसरा गट निवडणुकीनंतर सोबत घेऊ यावर आकडेमोड करण्यात गुंतला आहे.

राज ठाकरे यांना स्वतंत्र राजकारणाच्या पीचवर अजून हवे तसे रन्स काढता आलेले नाहीत. त्यामुळेच आता राज ठाकरे यांना यापूर्वीच्या चुका सुधाराव्या लागतील. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आघाडी सरकारने त्यांना हवे तेव्हा राज यांना हवा दिली आणि मतलब संपल्यावर वार्‍यावर सोडले. मनसेच्या अनेक आंदोलनांची फलनिष्पत्ती काय यावर शोधनिबंध लिहावा लागेल. पण आजही विरोधी पक्ष भाजप असला तरी मनसेचा एक आमदार असूनही भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे यात दुमत नाही. पण सातत्य राखण्याबरोबर मैत्रीच्या पलीकडेही राजकारण असते याची जाणीव मागील 15 वर्षांत राज ठाकरे यांना नक्कीच झालेले असेल. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे केडीएमसी, वसई-विरार, नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी ठरविले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडचे पाणी पळवू शकतात. महाविकास आघाडीला धक्का देण्याची ताकद ही सध्या केवळ मनसेमध्येच आहे. कारण आजही विरोधी पक्ष भाजप असूनही न्यायनिवाडा, मागण्या घेऊन लोक राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवरच जातात. राज ठाकरेही सत्तेत नसूनही समांतर मंत्रालय चालवताना कोरोनाच्या काळात सर्वांनाच दिसले. पक्ष स्थापनेनंतर 15 वर्षांनी तरी राज ठाकरे यांच्या मनसेला उभारी मिळो आणि केवळ निवडणुकांपुरते सातत्य न राखता पुढील 500 दिवस राज ठाकरे केवळ राजकारणच करोत हिच अपेक्षा…

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -