घरफिचर्समायमहानगर ब्लॉगबुलंद भारत की बुलंद तस्वीर...

बुलंद भारत की बुलंद तस्वीर…

Subscribe

‘ये जमीं, ये आसमां.. हमारा कल हमारा आज.. बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज’ ९० च्या दशकातील अजरामर जाहिरात. ही केवळ जाहिरात नव्हती तर अन्य कंपन्यांसाठी प्रत्येक वस्तूंच्या मार्केटिंगसाठी ‘केस स्टडी’ होती. स्कूटर म्हणजे बजाज हे समीकरण ज्यांनी कुशलतेने रुजवले ते बजाज मोटर्सचे संस्थापक राहुल बजाज नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. खरे तर राहुल बजाज यांच्यामुळेच ‘हमारा बजाज’ जाहिरातीची निर्मिती झाली. म्हणूनच राहुल यांच्याबरोबर ही जाहिरातही अजरामर झाली. जाहिरातीच्या उद्गात्याच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर या यादगार जाहिरातीच्या जन्माची कहाणी..

साधारणत: १९८९ चा काळ आठवून बघा. दूरदर्शनवर बी. आर. चोपडा यांची ‘महाभारत’ मालिका कमालीची चर्चेत होती. महाभारत बघितल्यावरच रविवार साजरा झाल्याची जाणीव होत असे. ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या मनात ‘महाभारत’च्या आठवणींनी घर केले आहे, त्याचप्रमाणे बजाज स्कूटरची जाहिरातही त्याच आठवणींच्या घरात आजही वास करीत आहे. या जाहिरातीला ते कोट्यवधी भारतीय कसे विसरू शकतात, ज्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्याचा अविभाज्य भाग म्हणून बजाज स्कूटर होती. दूरदर्शनवर प्रसारित होणार्‍या या जाहिरातीने घरोघरी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. बजाज म्हणजे स्कूटर, हे समीकरण या जिंगलने यशस्वीपणे जुळवून आणले होते. दुसर्‍या कोणत्याही जाहिरातीने इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत दर्शकांच्या मनावर अधिराज्य केले नाही. १९८९ मध्ये ही जाहिरात लाँच झाली. घरात बजाजची स्कूटर असणे हे मध्यमवर्गीयांसाठी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. १९७० आणि १९८० च्या दशकात ज्यांचा जन्म झाला त्यापैकी क्वचितच अशी काही माणसे असतील ज्यांची स्वप्न पूर्ण करण्यात या स्कूटरची भूमिका नसेल.

राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालीच कंपनीने १९७२ मध्ये बजाज चेतक स्कूटरची निर्मिती केली. बजाज चेतक बजाज ऑटोची सर्वात प्रसिद्ध स्कूटर होती. अर्थात कंपनीने त्यानंतर बजाज सुपर आणि बजाज कब नावाचे मॉडल सादर केले. परंतु बजाजची ओळख चेतक स्कूटरच झाली होती. ती नवीन मॉडेल पुसू शकले नाहीत. बजाज चेतकचे डिझाइन हे इटलीच्या व्हेस्पापासून प्रेरित असल्याचे त्याकाळी बोलले गेले. या स्कूटरचे चेतक नाव ठेवण्यामागेही चाणाक्ष बुद्धिमत्ता होती. महाराणा प्रतापसिंह यांचा चेतक हा घोडा होता. हा घोडा प्रचंड स्वामीनिष्ठ होता. तो अतिशय दणकट, चपळ, न थकता मैलाचे अंतर कापणारा, शक्तीशाली आणि चतुर होता. अन्य घोड्यांच्या तुलनेने चेतकचा वेग अनेक पटींनी जास्त होता. त्यामुळे या घोड्याचा पाठलाग करणे शत्रूच्या घोड्यांना अवघड जात होते. चेतक घोड्याच्या बलस्थानांकडे अंगुलीनिर्देश करीत चेतक स्कूटर बनवण्यात आली. ती नावाप्रमाणे दणकट बनवण्यात आली. त्यामुळे चेतकनेही इतिहास रचला. त्यावेळी बाजारातील स्पर्धा थोडी वेगळी होती.

- Advertisement -

बजाजशी स्पर्धा करु शकेल अशी कंपनी भारतात नव्हती. बजाजची स्कूटर ही ‘ब्रँड’ समजली जात असे. १९८९ मध्ये स्कूटर इंडस्ट्री मोठ्या बदलांना सामोरे जात होती. बाजारात होन्डा, यामाहा आणि सुझुकी यांच्यासारख्या मोटरबाइकचा प्रवेश झाला होता. ग्राहकांनाही त्या आवडायला लागल्या होत्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाईक कंपन्यांनी त्यांची स्टाईल, मायलेज आणि तांत्रिक बाबींना बलस्थाने करीत जाहिराती केल्या. त्याचवेळी बजाजनेही बाईक निर्मितीची तयारी सुरू केली होती. याचवेळी स्कूटर निर्मितीच्या व्यवसायाला नुकसानीतून वाचवण्यासाठी एखाद्या जाहिरातीची योजना बनवली जात होती. ही जाहिरात सर्वसामान्य माणसांच्या भावनांशी जोडून तयार करण्यात यावी, अशी राहुल बजाज यांचीच इच्छा होती. या जाहिरातीची जबाबदारी लिंटास जाहिरात एजन्सीने शुम्रान्तो घोषाल यांच्याकडे सोपवली. त्यांनी या जाहिरातीला अस्सल भारतीय स्वरुप दिले.

एका मुलाखतीत शुम्रान्तो घोषाल यांनी जाहिरात निर्मितीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यात त्यांनी सांगितले की, १९८० च्या दशकात जनरल मोटर्सने ‘शेव्रोले’ ही कार नव्याने बाजारात आणली होती. या कारसाठी जनरल मोर्टसने ‘डार्टबीट ऑफ अमेरिका’ या टॅगलाईनखाली एका मोठ्या जाहिरातीचे अभियान हाती घेतले होते. ‘सर्वसामान्य अमेरिकन माणसाची कार’ असे या अभियानातून मांडण्यात आले. राहुल बजाज यांना या जाहिरातीने प्रचंड प्रभावीत केले होते. याच धर्तीवर बजाजचे कॅम्पेनींग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार लिंटास एजन्सी चालवणारे एलिक पद्मसी यांना बजाज ऑटोच्या कार्यालयातून बोलवून घेण्यात आले. त्यांना राहुल बजाज यांची कल्पना सांगण्यात आली. ही जाहिरात अशी असावी की जी भारतीयांना आपली वाटेल. घराघरात तिची चर्चा होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

अमेरिकन जाहिरातीचे भारतीयीकरण करणे सोपे काम नव्हते. कारण त्याकाळात विकासाच्या बाबतीत भारतापेक्षा अमेरिका कितीतरी पट पुढे होता. या दोन्ही देशांतील मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीतही मोठा फरक होता. परंतु या जाहिरातीचा कॉमन फॅक्टर म्हणजे मध्यमवर्गीय. बजाजची स्कूटर मध्यमवर्गीयांसाठी तयार केली होती. त्यामुळे या जाहिरातीत कुुठलाही अभिनेता किंवा नामांकित चेहरा घ्यायचा नाही, ही खूणगाठ बांधली गेली. खरेतर बजाज समूहाकडे जाहिरातीसाठी मोठे बजेट होते. मात्र ही जाहिरात खरी वाटावी म्हणून सर्वसामान्य चेहर्‍यांचा वापर केला. त्यामुळे ‘हमारा बजाज’ ही टॅगलाईन लोकांना भावली. ती सर्वांना आपली वाटली.

ही जाहिरात प्रसिद्ध जाहिरात निर्माता आणि रंगमंचावरील प्रसिद्ध कलावंत एलिक पद्मसी यांची निर्मिती होती. संगीतकार लुई बँक यांचा जाहिरातीत मोलाचा वाटा आहे. त्यासोबतच ‘हमारा बजाज’ ही टॅगलाईन लिहिणारे जयकृत रावत, सिनेमॅटोग्राफर बरुण मुखर्जी आणि गायक विनय मांडके यांच्यामुळे ही एक यादगार जाहिरात झाली. प्रत्यक्षात चित्रीकरण करताना ती एवढी लोकप्रिय होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. ही जाहिरात जेव्हा दूरदर्शनवरुन घराघरात पोहचली तेव्हा तिने कंपनीला मोठ्या उंचीवर नेऊन पोहचवले. जाहिरातीचे गायक विनय मांडके यांच्या मते, या जाहिरातीमुळे जिंगल इंडस्ट्री मोठी झाली. अनेकांना जाहिरातीने गाईड लाईन दिली. यावेळी चित्रपट गीताप्रमाणे लोक जाहिरातीचे जिंगल गुणगुणू लागले. बजाजने या जाहिरातीतून भारतीयांच्या मनात स्वदेशी वस्तू खरेदीची प्रेरणा दिली.

महत्वाचे म्हणजे, त्या काळात विदेशी कंपन्यांच्या वाहनांना सर्वाधिक पसंती दिली जात होती. परंतु बजाज ही त्यावेळी अशी कंपनी होती ज्यात विदेशी कंपनीचा सहभाग नव्हता. ती पूर्णत: स्वदेशी होती. या बाबीला जाहिरातीच्या माध्यमातून लोकांच्या मनात रुजवण्यात आले. लहान कुटुंबांसाठी आणि लहान व्यापार्‍यांसाठी योग्य, कमी किमतीच्या आणि कमी देखभालीसह बजाज ब्रँडच्या स्कूटर अल्पावधीत अफाट लोकप्रिय झाल्या. १९७० आणि ८० च्या दशकात लोकांना बजाज स्कूटर खरेदी करण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. त्या काळात अनेकांनी बजाज स्कूटरचे आगाऊ नोंदणी क्रमांक विकून लाखो रुपये कमावले आणि आपले घर बांधण्याचे स्वप्न साकार केले.

बाजारात लॅब्रेटा आणि विजय सुपरने बजाजशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु बजाजसमोर या दोन्ही स्कूटर फार काळ उभ्या राहू शकल्या नाहीत. राहुल बजाज यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजीव बजाज यांनी डायरेक्टर पदाची सूत्रे सांभाळली. ३५ वर्षांच्या यशस्वी घौडदोडनंतर बजाज चेतकचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये बजाज ऑटोने या स्कूटरचे उत्पादन घेणे बंद केले. परंतु या निर्णयावर राहुल बजाज खूश नव्हते. तरीही साधारणत: १३ वर्षांनंतर बजाजने स्कूटर निर्मितीचा निर्णय घेतला आहे.

१९९० च्या सुमारास भारतात उदारीकरणाला सुरुवात झाली. भारताची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेसाठी खुली झाली. जगभरातील अनेक उत्पादने थेट भारतीय बाजारपेठांमध्ये आली. तेे पाहून येथील लोकांच्या नजरा दिपून गेल्या होत्या. जपानी मोटर सायकल कंपन्या भारतात आल्याने भारतातील ऑटो कंपन्यांना जोरदार टक्कर द्यावी लागली. अशावेळी राहुल बजाज यांनी कंपनीचे सूत्रे हाती घेत आपला व्यवसाय सुरू ठेवला. बजाज समूहातील अव्वल कंपनी बजाज ऑटोचा व्यापार ७.२ कोटी रुपये होता. तो आज १२००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यात मोठे योगदान राहुल बजाज यांचे आहे. त्यांनी ‘हमारा बजाज’ जाहिरातीची निर्मिती केली नसती तर कदाचित बजाज हा लोकप्रिय ब्रॅण्ड होऊ शकला नसता हे तितकेच खरे !

बुलंद भारत की बुलंद तस्वीर…
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -