जग बंद आहे, कारण वटवाघुळ! मात्र वास्तव काय? वाचा सविस्तर!

why bat caused corona

आपण केलेल्या चुकांची फळे आपल्यालाच भोगावी लागतात त्याचे हे जिवंत उदाहरण आहे, म्हणून जगात वटवाघळांना दोष देण्यापेक्षा ज्या माणसाने गुहेतून त्याला बाजारात आणलं त्या मानवी वृत्तीला दोष द्यावा लागेल, द्यावाच लागेल. ऐकायला नवल वाटेल. मी २००१ पासून किमान साडेसहा हजार वटवाघुळं पकडली आणि पुन्हा निसर्गात सोडली. काहींचं डिसेक्शन करून त्यांच्या जाती शोधल्या. मात्र मला कधी करोना या विषाणूने त्रास दिला नाही. त्याचं कारण मी प्रिकॉशन अर्थातच काळजीपूर्वक त्यांचा अभ्यास करीत होतो. मात्र, एकदा मी राबर्स केव्ह अर्थात गुहेमध्ये वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी गेलो. अर्थात ती एवढी मोठी गुहा माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहत होतो. अशी कल्पनासुद्धा नव्हती. अगदी दीड ते दोन लाख वटवाघळं असणारी गुहा, एक ते दीड किलोमीटर लांबीची! एवढ्या अफाट गुहेसमोर मी कुठलेही मास्क न वापरता थांबलो. तेवढी मात्र सुरुवातीला चूक झाली आणि त्यात मी दहा दिवस खूप आजारी पडलो. अगदी न्यूमोनिया पर्यंत जाऊन आलो.

आपल्याला ऐकलं तर नवल वाटेल माझं वजन ६५ किलो होतं ते ३७ किलो झालं होतं. मात्र प्रतिकारशक्ती खूप चांगली
असल्यामुळे मी वाचलो. डॉक्टरांकडून १० दिवस केले जाणारे उपाय संपले आणि शेवटी काटेवाडी जवळ असणाऱ्या काजड बोरी गावातील एका गोसाव्याने माझ्या नाकात दोन इंजेक्शन भरतील एवढं लिक्विड सोडलं आणि त्यानंतर माझ्या नाकातून आणि डोळ्यातून पिवळसर पाणी वाहू लागलं. ते सातत्याने दोन दिवस वाहत होतं आणि तिसऱ्या दिवशी मी अर्धी भाकरी खाण्यापासून सुरुवात केली आणि मृत्यूचा दरवाजा ठोठावून बराही झालो. वीस दिवसांनंतर पुन्हा एकदा मी माझ्या संशोधनाकडे वळालो आणि शास्त्रीय पद्धतीने वटवाघुळं पकडणं त्यांना निसर्गात सोडून, त्यांच्या प्रजाती शोधणे, त्यांच्यापासून होणारे आजार याकडे बारकाईने लक्ष देत मी माझं संशोधन सुरू ठेवलं. एकदा कामाला लागलो तद्नंतर मात्र खूप कमी वेळा मी आजारी पडलो. मात्र मला करोना झालेला नव्हता, हे नीट वाचावे, नाहीतर लाईन लागेल काजड बोरीला औषधाला! कालच पाहिली आहे येड्यांची जत्रा!

जगात वटवाघळांची दहशत किती आहे, तर आख्खं जग बंद झालं.. हो जग बंद झाले आणि ते किती दिवस बंद असेल हे आज तरी कोणीही सांगू शकत नाही. अर्थात बंद होणे याला कारण ही माणूसच आहे. कारण वटवाघुळ गुहेतच राहिलं असतं तर कदाचित आज आपल्यावर ही वेळ आली नसती. मात्र आपल्या असंख्य चुकांमुळे आपण अनेक आजार आपल्यापर्यंत आणले. त्यातलाच हा एक आजार करोना. चिनी माणसाने गुहेतली वटवाघळे बाजारात आणली आणि
बाजारातल्या वटवाघळांनी त्यांचे सूक्ष्मजीव korona आपल्याला दिले, यात चूक नक्कीच आपलीच आहे. वटवाघळांची नव्हे, हे निमूटपणे कबूल करावंच लागेल. शिवाय आता आपल्या चुकीमुळे किती दिवस आपल्याला आपल्याच घरात बंदिस्त राहावे लागेल हेही सांगता येणार नाही.

अगदी सविस्तरपणे सांगायचं झालं तर जगभरात वटवाघळांचे मुख्य दोन प्रकार आहेत. त्यात एक फलहारी वटवाघळं आणि
दुसरी कीटकभक्षी. प्रत्येक वटवाघळांचा जगण्याचा नियम वेगळा आहे. अर्थात एक हजार पेक्षा जास्त जातीची वटवाघळे जगभरात आढळतात. २०% फलहारी वटवाघळे आहेत तर ८०% वटवाघळं कीटक भक्षी आहेत. आपण मुख्य मुद्याकडे वळूयात. गेल्यावर्षी निपाह व्हायरस आला. त्याच्या अगोदर सुद्धा अनेक प्रकारचे पक्षी व सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्याकडून आपल्यापर्यंत अनेक विषाणू पोहोचलेत. मात्र ते पोहोचण्यामागचं कारण माणूसच आहे. कारण आपण प्रत्येकाच्या अधिवासात जाऊन राहायला लागलो, तिथं मौजमजा करायला लागलो आणि याचा परिणाम आज आपण बघतोय की जग बंद आहे कारण वटवाघुळं आहे.

सर्वांच्या तोंडात वटवाघुळ कारण असलं तरीही त्याला नष्ट करता येणार नाही आणि ते करून सुद्धा काहीच उपयोग होणार नाही. कारण प्रत्येक सूक्ष्म जीवाला त्याच्या मित्र प्राण्याबरोबर राहावं लागतं आणि निपाह, रेबीज, कोरोना सूक्ष्मजीव वटवाघळांबरोबर राहतात. अर्थात प्रत्येक विषाणूला विविध प्राण्यांच्या शरीरात जगण्याचा अधिकार निसर्गानेच दिला आहे.
अनंत सूक्ष्मजीव असलेली ही पृथ्वी! प्रत्येक सुक्ष्म जीवाला जगण्यासाठी विविध प्राण्यांच्या शरीरात जगण्याचा अधिकार हा सुद्धा निसर्ग नियमच आहे. अर्थात यालाच तर सहजीवन म्हणतात.

सर्व जीव सृष्टी एकत्र जगत आहे. माणूस फक्त एकटा निसर्गाला सोडून राहतोय आणि परिणाम जग बंद! सातशे कोटी
लोकसंख्या असणारी ही पृथ्वी आज केवळ एका प्राण्यामधील एका व्हायरसमुळे बंद आहे. आता आपण जाणून घेऊयात की फलहरी वटवाघळांना मुळे माणसाला निपाह किंवा रेबीज हा आजार होऊ शकतो. किंबहुना तो गेल्याच वर्षी इंडोनेशिया मधील वटवाघळांमुळे जगात पसरण्याचा धोका होता. मात्र वेळीच सावधानता बाळगून जगाने त्यावर मात केली. आपले पूर्वज खूप हुशार होते. कारण रेबीज हा आजार वटवाघळांमुळे वन्यजीवाकडे आणि वन्यजीवांकडून आपल्यापर्यंत पोहोचतो. या गोष्टींची निरीक्षणे करून त्यांनी वटवाघळांकडे दुर्लक्ष करावं असा सल्ला दिला आणि त्यामुळे वटवाघुळाकडे भारतात पाहत नाहीत, पकडत नाहीत किंबहुना ती खातही नाहीत. काही आदिवासी लोक फलाहारी वटवाघळांना खातात. आपल्याकडे वात हा आजार बळावला तर अशा प्रकारची वटवाघळे पकडून त्यांना उकळत्या तेलात टाकून ते तेल शरीरावर मालिश करण्यासाठी वापरलं जातं. मात्र, अशाने आजारावर फरक पडत नाही. उलट विविध प्रकारचे जिवाणू पकडणाऱ्या आणि मालीश करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

आता आपण विचार करुयात की करोना विषाणूचा प्रसार कीटक भक्षी वटवाघळे करत आहेत, त्यामधील एक rhino lophous अशी प्रजातीची वटवाघळे खाल्ल्यामुळे हा आजार माणसापर्यंत पोहोचला. अर्थात मी जवळपास १०० पेक्षा जास्त या प्रजातीची वटवाघळे पकडून पुन्हा निसर्गात सोडली आहेत. अर्थात माझे संशोधन त्यांच्या प्रजाती शोधण्याचे होते. म्हणून मी ती पकडत होतो. कीटक भक्षी वटवाघळे रेबीज आणि करोना असे दोन घातक विषाणू आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात. मात्र, कोणाच्याही घरी येऊन त्यांनी असे आजारपसरवलेत असा आजपर्यंत कुठेही लेखी पुरावा नाही. किंबहुना कुठे अशी चर्चा सुद्धा नाही. मात्र चीन सारखा घाणेरडा देश अनेक प्रकारचे कीटक, पक्षी, वटवाघळे, साप, अनेक सस्तन प्राणी, खुलेआम खात असतात. हे खात असताना जंगलातील पकडून आणलेले प्राणी पिंजऱ्यामध्ये ठेवतात आणि त्यांची उपासमार सुरू होते. त्यातच ते वन्यप्राणी आजारी पडतात आणि आजारी पडलेल्या वन्यजीवांच्या शरीरावरचे अनेक प्रकारचे विषाणू त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यामुळेच तो वन्यजीव ज्यांनी खाल्ला त्याला पहिला करोना झाला आणि चीनच्या पहिला व्यक्तीमुळे आज जगभर करोना पसरला. अर्थात प्रत्येक विषाणूला वाटतं की आपला प्रसार जगभर व्हावा आणि म्हणून रेबीज हा विषाणू एखाद्याच्या शरीरात गेला की तो माणूस फक्त चावण्याचे काम करतो आणि पुढच्या शरीरात कसे जाता येईल याचाच विचार करतो.आज करोना विषाणू सुद्धा हाच विचार करीत आहे. जी बॉडी मिळाली ती त्याच्या भवितव्यासाठी खूप आशादायी आहे. म्हणून तो प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश करेल. आज तरी असंच वाटतंय. यावर उपाय एकच. करोनाला प्रवेश बंदी करायची असेल तर प्रत्येकाने आपल्या घरात थांबा. विनाकारण त्याला आमंत्रण द्यायला करोना बाधित माणसांकडे जाऊ नका. करोना झाला म्हणजे मरणच आहे असेही नाही. मात्र जे २% मरणार आहेत, त्यात आपलं नाव नसावं एवढी काळजी प्रत्येकाने घ्यावी हीच एक नम्र विनंती.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती खूप उत्तम ठेवावी. मानसिक स्थिती सांभाळायची असेल तर मराठी बातम्या फक्त सकाळीच बघा. पुन्हा त्या बघू नका! आणि शारीरिक स्थिती उत्तम ठेवायचे असेल तर रोजच्या आहारामध्ये खायचं लिंबू जास्त प्रमाणात वाढवा. विटामिन सी वाढवा आणि आपल्या कुटुंबासोबत बहुमोल वेळ
घालवा. झाडं, पाखरं, फुलपाखरं, चैत्रपालवी यांची अगदी बारकाईने निरीक्षणे नोंदवा. यातच आपल्या जीवनाचा खरा
आनंद आहे. सरतेशेवटी असं वाटतं की निसर्गापासून जे लांब गेलेत त्यांनी त्यांच्या जगण्यातला आनंद आणि समाधान गमावले आहेच. आपण आज पाहतोय आजच्या परिस्थितीत सुद्धा काही लोक पैसे कमवायची संधी पाहतायेत. ही तर निव्वळ भिकारी वृत्तीच. मात्र आपलं निसर्गाबरोबर नातं टिकवा आणि आपल्या जीवनात आनंद आणि समाधान कमवा.

यावर एकच पर्याय उरतो तो म्हणजे पृथ्वीवर सगळीकडे जंगलच असावं. त्या जंगलात इतर सर्व जीवांसमवेत सूक्ष्मजीव असावेत आणि शेवटी माणूस असावा. अर्थात गाव तिथे जंगल, शहर तिथे जंगल हीच भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. जंगल वाढवताना सुद्धा स्थानिक वृक्षसंपदा जोपासणे गरजेचे आहे. अगदी झाडे झुडपे वेली ही सगळी स्थानिक प्रजातींची असणे अत्यंत गरजेचे आहे. अत्यंत गरीब देश भूतान आज जगात निसर्गसंपदेने श्रीमंत आहे. तिथं जगण्यातील आनंद आणि समाधान जगात सर्वात जास्त आहे. भारत मात्र १३७ व्या क्रमांकावर आहे. आपली ही वृत्ती बदलणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक प्राणी जगला पाहिजे, प्रत्येक झाड वाचलं पाहिजे, त्यांच्या बरोबर असणारे आपले उपयोगी सूक्ष्मजीव आणि आपल्या विरोधातील सूक्ष्मजीव यांची लढाई होऊ द्या. माणसाने त्यात विनाकारण पडू नका. नाहीतर यापुढे फक्त स्मशान शांतता प्रस्थापित होईल!