Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी १३ जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

१३ जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

Subscribe

डॉ. जितेंद्र आव्हाड

काल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले. खरतरं ‘भारतरत्न’ सारखा पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जातो. पण, संपूर्ण जगभर त्याचे प्रक्षेपण केले जाते. हा कार्यक्रम देखील त्यापद्धतीने करता आला असता. ह्या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असं दाखवायचं हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होतं.

- Advertisement -

स्वत: सरकारतर्फे आव्हान केले जाते की, काम नसेल तर उन्हामध्ये जाऊ नका आणि इथे मात्र सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावलं होतं. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही. प्रचंड ऊन. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते.

त्यामुळे आता भाविकांच्या मनात प्रचंड राग आहे. मतांच्या राजकारणासाठी एका संताचा वापर होऊन त्या संतांच्या भाविकांचा मृत्यू होणे हे त्या संतांना मानणा-या कुटुंबापैकी कोणालाच आवडणारे नाही. किंबहुना माझे तर असे मत आहे की, हे संतांनाही आवडलं नसेल. त्या वादात मला पडायचं नाही. पण, ह्या मृत्यूची जबाबदारी कोणालातरी घ्यावीच लागेल. जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का ? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते ? हा कार्यक्रम संध्याकाळी देखिल घेता आला असता. भरदुपारी सूर्य माथ्यावर असतांना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती ?

- Advertisement -

संतांचा आणि धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. आणि नंतर मतं आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे…. यापुढे देखिल येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची?

(लेखक माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत) 

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -