घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशिवाजी पार्क मैदान : अंत्यसंस्कार, स्मारक की खेळासाठी !

शिवाजी पार्क मैदान : अंत्यसंस्कार, स्मारक की खेळासाठी !

Subscribe

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसकडून करण्यात येत आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी स्मारकाच्या केलेल्या मागणीनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवाजी पार्क मैदानात लतादीदींचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मारकाच्या मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लोकप्रियतेमुळे होणार्‍या अलोट गर्दीचा विचार करून विशेष बाब म्हणून मुंबई पालिका प्रशासनाने शिवाजी पार्कवर अंत्यसंस्काराला परवानगी देण्याचा निर्णय घेतला, पण हा पायंडा पडू नये. त्यामुळे यापुढे शिवाजी पार्क मैदानावर क्रिकेटसाठी नेट लागतील. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचे ढिग लागणार नाहीत हीच अपेक्षा करूया.

एखादे मैदान ही काही फक्त मोकळी जागा नसते. ती मूक साक्षीदार असते अनेक गोष्टींची. त्यातही जर ते मैदान शिवाजी पार्क असेल, तर तो एक दुवा असतो इतिहासाशी आपल्याला जोडणारा, अनेक पिढ्यांचा वारसा जपणारा, एखाद्या आधारस्तंभासारखा! दादर-माहिमच्या सीमेवरचे शिवाजी पार्क. आज जिथल्या जागेचे भाव उच्चमध्यम वर्गाच्याही आवाक्यातले नाहीत, तिथे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी लोकांना सवलती देऊन राहायला बोलावले जात होते. या परिसरात राहिलेल्या अनेक प्रसिद्ध लोकांची नावे आणि त्यांच्या निवासस्थानाची माहिती चाळताना शिवाजी पार्कला असणारे ग्लॅमर का आणि कसे आले हेही लक्षात येते. शिवाजी पार्कच्या इतिहासातले सोनेरी पान होते, ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा.

मुंबईतील ज्या काही मोजक्या वास्तूंचा, ठिकाणांचा आणि मैदानांचा उल्लेख केल्याशिवाय मुंबईची ओळख पूर्ण होत नाही असेच ठिकाण म्हणजे शिवाजी पार्क. हे केवळ मैदान नसून मागील 97 वर्षांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवाजी पार्क मैदानाचा सिंहाचा वाटा आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेकांना अंगाखांद्यावर या मैदानाने खेळवलंय, नावारुपाला आणले आहे. याच ठिकाणी अनेकांच्या करियरला कलाटणी मिळाली तर अनेकांना नवसंजीवनी मिळाली. असा एकही मुंबईकर नसेल ज्याने शिवाजी पार्कला भेट दिली नसेल की असा एकही पर्यटक नसेल जो मुंबई दर्शन करताना इथे आला नाही.

- Advertisement -

शिवाजी पार्क या मैदानाचे मूळ नाव माहिम पार्क होते. हे मैदान 1925 मध्ये मुंबई नगरपालिकेने जनतेसाठी खुले केले. या मैदानावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा 1966 मध्ये उभारण्यात आला. शिवाजी पार्क मैदानाने सर्वांना सामावून घेतले आहे. पार्काचा कट्टा तरुण मंडळींसाठी गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे. त्यामुळेच गोलाकार मैदानाची एकही इंच जागा रिकामी नसते. शिवाजी पार्क म्हटले की लक्षात येते ते म्हणजे शिवसैनिकांनी खचाखच भरलेले शिवतीर्थ (शिवसेना शिवाजी पार्कला शिवतीर्थ संबोधते) आणि भाषणासाठी कमरेवर हात ठेऊन उभे असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांच्या प्रत्येक घटनेला शिवाजी पार्क साक्षीदार आहे. या 28 एकरांच्या खुल्या मैदानाच्या चारही बाजूंना मराठी वस्ती आहे.

उद्यान गणेशाचं मंदिर, मैदानात खेळले जाणारे क्रिकेट आणि समर्थ व्यायाम मंदिरातला दोरीवरचा मल्लखांब ही शिवाजी पार्कची खास ओळख. या मैदानाचे नामकरण 10 मे 1927 रोजी शिवाजी पार्क असे करण्यात आले. त्यानंतर 1966 मध्ये लोकवर्गणीतून इथे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. खरे तर शिवाजी पार्कला ‘शिवतीर्थ’ म्हणायला सुरुवात केली आचार्य अत्रेंनी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी या मैदानाचा शिवतीर्थ असा उल्लेख करायला सुरुवात केली. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मार्च 2020मध्ये महासभेत या मैदानाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज मैदान करण्याचा ठराव मांडला. या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. त्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठरावाला मंजुरी दिली. अखेर मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानाच्या नावाची पाटी बदलून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी केली.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १७ नोव्हेंबर २०१२ रोजी लाखो शिवसैनिकांनी साश्रूनयनांची याच मैदानात अखेरचा निरोप दिला. बाळासाहेबांवर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या शिवाजी पार्कच्या एका भागामध्ये त्यांचे स्मृतीस्थळ आहे. शिवाजी पार्कपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या महापौर बंगल्यामध्ये आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक आकार घेत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार्‍या लता मंगेशकर या दुसर्‍या व्यक्ती आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी त्यांच्या अधिकारात ज्या दिवशी अंत्यसंस्कार होणार होते, त्याच दिवशी तातडीने परवानगीचे आदेश दिले. विशेष परिस्थितीतील अपवादात्मक बाब म्हणून शिवाजी पार्क मैदानाच्या अंदाजे 2000 चौरस फूट जागेवर लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला.

‘भारतरत्न लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कोट्यवधी चाहते, संगीतप्रेमी आणि हितचिंतकांच्या वतीने लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात यावे, ज्या ठिकाणी त्या पंचत्वात विलीन झाल्या ते स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, अशी मागणी करणारे पत्र भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. राम कदम यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही लोकांनी लतादीदींच्या स्मारकाची मागणी केली आहे. पण त्यांना मागणी करण्याची गरज नाही. लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण करु नका, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कमध्येच त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणार्‍या भाजपला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी चांगलेच फटकारले आहे. ‘या मागणीला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला हवे, त्याची स्मशानभूमी होऊ नये. शेजारी दुसरी चांगली मोठी स्मशानभूमी आहे. शिवाजी पार्क हे एकमेव मोठे ग्राऊंड आहे. ज्यावर मुलांना खेळता येते. तिथे शाळा, कॉलेज किंवा इतर मुलांचे खेळाचे सामने होतात. व्यक्तीचे स्मारक करायचे असेल तर इतर अनेक जागा आहेत, परंतु मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानांवर अतिक्रमण करणे चुकीचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

लता मंगेशकर यांचं स्मारक उभारणं ही काही इतकी सोपी बाब नव्हे. त्या काही राजनेता नव्हत्या. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या आहेत आणि जगाच्याही आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशाप्रकारचं लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारं स्मारक महाराष्ट्रात नक्की उभारलं जाईल. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार नक्की त्याचा विचार करेल. लता मंगेशकर या देशाचा अनमोल ठेवा आहे, असेही संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शिवाजी पार्कमध्ये स्मारक करण्यास विरोध दर्शविला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मैदानावर कोणतेही अतिक्रमण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी राजकीय पक्षांकडून पुढे येऊ लागली. त्यावरून वादही सुरू झालेत. भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला आहे. कदम यांच्या मागणीनंतर स्मारकावरून चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवाजी पार्क मैदानात लतादीदींचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. लतादीदींच्या स्मारकाला भेट दिल्यावर त्यांच्या जादुई, गोड आवाजाचे स्मरण होईल, पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असे भव्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क येथे उभारावे, असे पटोले यांंनी म्हटले आहे.

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून कुणीही नाहक राजकारण करू नये. लतादीदींना कुणीही कधीही विसरणे शक्य नाही. जोपर्यंत आकाशात चंद्र-तारे आहेत तोपर्यंत गानकोकिळेचा मधूर आवाज सर्वांच्या लक्षात राहील. त्या एक महान व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांचे स्मारक हे त्यांच्या उंचीप्रमाणे उभारणे आवश्यक आहे. लतादीदी या निस्सीम क्रिकेटप्रेमी होत्या. संगीत, गाण्याशिवाय लतादीदी जर कुणावर प्रेम करत होत्या तर ते क्रिकेट होते. 1983 चा क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकल्यानंतर आपल्या खेळांडूना आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनी संगीत रजनीचे आयोजन केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे क्रिकेटवर त्या भरभरुन बोलायच्या. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यांचे नाते क्रिकेटमुळे घट्ट झाले. सचिन त्यांना आई म्हणायचा.

त्यामुळे लतादीदींच्या स्मारकावरून जो आता वाद सुरू आहे तो पाहता खुद्द लतादीदीनांही क्रिकेटचे मैदान अशी ओळख असलेल्या शिवाजीपार्कवर आपले स्मारक व्हावे असे वाटले नसते. तसेच ज्याप्रकारे त्यांनी पेडर रोड उड्डाणपुलाला विरोध केला त्याचप्रकारे त्यांनी शिवाजी पार्कवरील स्मारकाला विरोध केला असता. लतादीदी या निस्सीम क्रिकेटप्रेमी असल्याने खेळाच्या मैदानावर त्यांचे स्मारक करणे त्यांना पटले नसते. त्यामुळे लतादीदींची महानता पुढे करून जर कुणी स्मारक उभारण्याचे राजकारण करणार असेल तर त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ होवो. कारण मुंबईची जनता दूधखुळी नाही, मूर्ख तर अजिबात नाही. त्यामुळे सरस्वती ज्यांच्या कंठातून गात होती त्या लतादीदींना तरी राजकारणासाठी आणि तुमच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी वापरू नका. कारण लतादीदी कधीही कुठल्या पक्षाच्या नव्हत्या. त्या संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाने राजकारणात ओढू नये.

लतादीदींचे वास्तव्य हे मुंबईत जरी असले तरी त्यांची नाळ मंगेशी, इंदोरशी जोडलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यांचे स्मारक व्हायलाच हवे, पण ते शिवाजी पार्कमध्ये नको. मुंबईत आता फारशी मैदाने शिल्लक नाहीत. जी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत त्यावर अतिक्रमणे झालीत किंवा खेळ सोडून दुसरेच उद्योग सुरू आहेत. खेळाच्या मैदानावर अंत्यसंस्कार करणे समर्थनीय नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लोकप्रियतेमुळे होणार्‍या अलोट गर्दीचा विचार करून विशेष बाब म्हणून पालिका प्रशासनाने शिवाजी पार्कवर अंत्यसंस्काराला परवानगी देण्याचा निर्णय घेतला, पण हा पायंडा पडू नये. त्यामुळे यापुढे शिवाजी पार्क मैदानावर क्रिकेटसाठी नेट लागतील. अंत्यसंस्कारासाठी लाकडांचे ढिग लागणार नाहीत हीच अपेक्षा करूया.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -