घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराज ठाकरेंना अयोध्येला जाण्याची गरजच काय?

राज ठाकरेंना अयोध्येला जाण्याची गरजच काय?

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५ जूनला होणार्‍या अयोध्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशात भाजपच्या एका खासदाराने काही महंतांना सोबत घेऊन विरोधी आंदोलन सुरू केले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविषयी राज यांनी पूर्वी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे ही मंडळी नाराज आहेत, पण मुद्दा असा आहे की, राज ठाकरे यांना ज्या गोष्टी महाराष्ट्रात बसून करणे शक्य आहे, त्यासाठी अयोध्येत जाण्याची काय गरज आहे. कारण भोंगे उतरवण्यावरून त्यांना हिंदुत्ववादी नेता म्हणून राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. त्याचा प्रभाव विरोधी वातावरणात अयोध्येला जाऊन कमी कशासाठी करून घ्यावा, यावर राज ठाकरे विचार करतील काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांच्या या भेटीचे सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार स्वागत केले. त्यामुळे उत्तर प्रदेशला जाण्यासाठी मनसेकडून काही रेल्वेगाड्या आरक्षित करण्यात आल्या. अयोध्येला प्रभूरामांच्या दर्शनाला जाण्याची मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. ही सगळी तयारी रंगात येत असताना भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी अचानक उसळी घेतली आणि सगळा माहोल बदलून गेला आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत यायचे असेल तर त्यांनी अगोदर उत्तर प्रदेशातील लोकांची माफी मागावी, उत्तर प्रदेशातील लोकांना आपण महाराष्ट्रात जी वागणूक दिली तसे पुन्हा करणार नाही, असे वचन द्यावे, अशी मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांंनी ही मागणी लावून धरताना उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी सभा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील महंतांनाही राज ठाकरेंच्या विरोधातील मोहिमेत उतरवले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील वातावरण तापत आहे. ५ जूनला अजून वेळ आहे. त्यामुळे वातावरण तापत जाऊन त्याचे आणखी काही पडसाद उमटतात की वातावरण शांत होते ते पाहावे लागेल.

राज ठाकरे त्यांनी शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याला झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा विषय काढला. सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत भोंगे उतरविण्याचा आदेश दिला आहे. आवाजावर मर्यादा घातली आहे, तसेच भोंगे लावायचे असतील तर कुठल्याही धर्मस्थळाला पोलिसांची परवानगी घेण्याची गरज असते, ती घ्यायला हवी, पण या आदेशाचे पालन केले जात नाही. आपण राज्यातीलच नव्हे तर देशभरातील मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी ईदपर्यंत अल्टिमेटम देत आहोत. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांसह हिंदू धर्मियांनी ज्या मशिदींवरील भोंग्यांतून अजान होते, त्या मशिदींसमोर जाऊन दुप्पट आवाजात लाऊड स्पीकरवरून हनुमान चालीस वाजवा, असे आदेश दिले. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. त्यामुळे अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, पण राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सांगितल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात उत्तर प्रदेशात झाली.

- Advertisement -

त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रशासनाने भोंगे उतरवले, पण राज ठाकरे यांच्या आवाहनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने घेत नव्हते, पण हळूहळू भोंग्यांचे गांभीर्य वाढू लागले. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याची सभा घेतल्यानंतर ठाण्यात उत्तर सभा घेतली. ती अधिकच आक्रमक झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत: पुण्यात हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केले. त्यामुळे वातावरण अधिकच तापू लागले. मशिदींवर दिवसातील चोवीस तासात पाच वेळा वाजणारी मोठ्या आवाजातील अजान हा अनेकांच्या त्रासाचा विषय होता, पण धार्मिक कारणामुळे कुणी त्याची तक्रार करत नव्हते, पण राज ठाकरे यांनी अनेकांच्या जे मनात होते, ते बोलल्यामुळे त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. त्यात पुन्हा राज ठाकरे यांनी भाजपला पूरक ठरू शकेल, अशी भूमिका घेतल्यामुळे भाजपचाही त्यांना पाठिंबा होता. या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारला सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्या आवाजावर न्यायालयाच्या निर्णयानुसार मर्यादा आणावी लागली.

अनधिकृत भोंगे उतरवण्यात आले. अनेक मशिदींमधून भोंगे न वापरता अजान देण्यात आली. मशिदींप्रमाणेच हिंदूच्या पहाटे आणि रात्री १० नंतर भोंग्यावर होणार्‍या आरत्या बंद करण्यात आल्या. धर्मस्थळे किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये आवाजाचा होणारा अतिरेक टाळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच दिला आहे, पण त्याची अंमलबजावणी कोण करणार हा प्रश्न होता. कारण लोकांच्या विशेषत: मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून कुठलेच सरकार आवाजावरील मर्यादेचा नियम लागू करू इच्छित नव्हते. अगदी भाजपचे सरकार केंद्रात आणि काही राज्यांमध्ये असूनही भोंगे उतरविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती. ती राज ठाकरे यांच्या हनुमान चालीसाच्या अल्टिमेटममुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला करावी लागली. अनेक मशिदींवर भोंग्याविना नमाज देण्यात आली. शिर्डी, पंढरपूर या देवस्थानांमध्ये होत असलेल्या सकाळच्या काकड आरत्या भोंग्याविना कराव्या लागत आहेत.

- Advertisement -

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेेते आहेत, पण मशिदींवरील भोग्यांच्या विषयांमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. कारण हा विषय अनेक हिंदूंच्या भावनेला हात घालणारा होता. या विषयाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे राज ठाकरे यांचाही आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे हा संघर्ष पेटलेला आहेच. सभांसाठी लाखोंची गर्दी खेचणार्‍या आणि वृत्तवाहिन्यांचा प्राईम टाईम व्यापून टाकणार्‍या राज ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीत आपले डिपॉझिटही वाचवणे अशक्य होऊन बसते. याच वेळी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली आणि ते मुख्यमंत्री झाले.

राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची स्थापना महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी केलेली होती. मराठी माणूस हा केंद्रस्थानी होता. सुरुवातीला पक्षाचा झेंडा चौरंगी होता. शिवसेनेची स्थापन हीदेखील महाराष्ट्रातील मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेली होती. जसा शिवसेनेचा प्रवास हा मराठी माणसापासून हिंदुत्वापर्यंत झाला, तसाच प्रवास राज ठाकरे करत आहेत. अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही शिवसेनेचा महाराष्ट्राच्या बाहेर प्रसार करण्याचा प्रयत्न झालेला होता. शिवसेनेने गेली अनेक वर्षे अन्य राज्यांमधील निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवले, पण त्यात त्यांना यश तर सोडाच उभे केलेल्या उमेदवारांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही. गोव्यात मोठ्या संख्येने मराठी भाषिक आहेत.

त्या बाजूच्या राज्यातही अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. आपल्या पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर प्रसार व्हावा, असे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना वाटत आलेले आहे. त्यासाठी त्यांनी मागील काही वर्षे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलेले नाही. खरे तर त्या दोन्ही पक्षांनी आपली स्थिती महाराष्ट्रात अधिक मजबूत बनवायला हवी होती. शिवसेनेचे ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार यांना राज्यभर आपल्या पक्षाचा विस्तार करून स्वबळावर सत्ता स्थापन करता आलेली नाही. जे जयललिता, ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला, चंद्राबाबू नायडू यांना आपल्या राज्यांमध्ये जमले. ज्यांना आपल्या राज्यांमध्ये आपल्या पक्षाची बहुमताची सत्ता स्थापना करता आली नाही, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करावा, हे अतार्किक म्हणावे लागेल.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणूस’पासून ‘हिंदुत्वा’पर्यंत प्रवास केला. त्यांच्यानंतर त्यांच्या जागी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका अधिक प्रखर करताना त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपशी संघर्षाचा पवित्रा घेतला. सध्या तर त्यांच्यातील विरोध शिगेला पोहोचला आहे. भाजपवर सरशी मिळवण्यासाठी शिवसेनेचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करून श्रीरामांचे दर्शन घेतले होते. तसेच शरयू नदीवर आरती केली होती, पण त्याचा त्यांच्या पक्षाचा त्या भागात विस्तार होण्यासाठी उपयोग झालेला नाही. श्रीराम हे हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे त्यांचे दर्शन घेतल्यावर आपल्याला अखिल भारतीय हिंदुत्वावर छाप उमटवता येईल, असे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना वाटत आहे.

अशा प्रकारे आपल्याला भाजपवर मात करता येईल असा त्यांचा अंदाज आहे. तीच परिस्थिती राज ठाकरे यांची आहे. त्यांनीही आता हिंदुत्वाची शाल अंगावर घेतली आहे. त्यांना आता खरे हिंदुत्ववादी आम्हीच असा दावा करणार्‍या शिवसेनेवर मात करायची आहे. त्यासाठीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, पण त्यांनी मराठी युवकांना न्याय मिळावा म्हणून मुंबईत जी उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे अयोध्येत त्यांच्या येण्यावरून मोठा विरोध निर्माण झालेला आहे. भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आम्ही उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही, हजारोंच्या मृतदेहांवरून त्यांना राम मंदिरापर्यंत पोहोचावे लागेल, अशी आक्रमक भाषा केली. त्यात आता महाराणा प्रताप सेनेने शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या १० जूनच्या अयोध्या दौर्‍याला विरोध केला आहे.

मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शिवसेना आणि मनसे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. राष्ट्रीय पातळीवर विस्तार व्हायला त्यांना मर्यादा आहेत. हिंदुत्वाची शाल पांघरून हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्यांचा विस्तार करू पाहत आहेत. त्याचा तसा काही उपयोग होताना दिसत नाही. खरे तर राज ठाकरे हे अयोध्येला जाऊन काय मिळवणार आहेत, हाच खरा प्रश्न आहे. उलट भोंग्यांच्या मुद्यावर त्यांनी जे परिवर्तन घडवून आणले त्यामुळे त्यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उजळून निघाली आहे. महाराष्ट्रात राहून त्यांना हिंदुत्ववादी नेता म्हणून देशभर लोकप्रियता मिळाली आहे. सध्याच्या स्थितीत त्यांनी अयोध्येत जाण्याचा अट्टाहास केला तर त्यातून तणाव वाढेल. त्यातून मुंबई आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज यांच्या आता निर्माण झालेल्या हिंदुत्ववादी नेतेपणाला धक्का बसेल. ज्या गोष्टी राज यांना महाराष्ट्रात बसून करणे शक्य आहेे, त्यासाठी त्यांना उत्तर प्रदेशात जाण्याची आवश्यकता नाही. कारण महाराष्ट्र हाच त्यांच्यासाठी बालेकिल्ला आहे. तिथूनच त्यांना देशाच्या राजकारणावर आपला प्रभाव निर्माण करता येईल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -