घरफिचर्ससंपादकीय - उन्मादी गोंगाट आणि राजकीय संस्कृती!

संपादकीय – उन्मादी गोंगाट आणि राजकीय संस्कृती!

Subscribe

वय वाढतं तसं केस पांढरे होतात ते अनुभव आणि शहाणपणामुळेच. हल्लीचे राजकारणी मात्र त्यास मानायला तयार नाहीत. पांढरे झालेले केस रंगवून काळे केले म्हणजे वाट्टेल तसं वागायला आपण मोकळे, असाच जणू प्रघात सध्या पडलेला दिसतो. भल्या-बुर्‍याचे भान न राखता आपल्याच उन्मादात वावरणार्‍या अशा मंडळींमुळे राजकीय संस्कृतीचा पूर्णत: र्‍हास होऊ पाहत आहे. अशाच उन्मादी गोंगाटाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आझम खान असोत, की ३७० रद्द झालं म्हणून उन्मादाने नाचणारे नाशिकचे पालकमंत्री असोत, या मंडळींनी राजकीय संस्कृतीची पुरती त्रेधा उडवून दिली आहे. आझम खान यांनी तलाख संदर्भातील विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या खासदार रमा देवी यांच्याविषयी जे काही उद्गार काढले, ते कोणत्याही सुजाण-सुसंस्कृत नागरिकाला चीड आणणारे आहे. ‘तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत राहावंसं वाटतं,’ असं विधान आझम खान यांनी लोकसभेत केलं. विशेष म्हणजे, रमादेवी त्यावेळी अध्यक्षस्थानी बसलेल्या होत्या आणि याही गोष्टीचं भान खान यांना राहिलं नाही. आझम खान यांनीच यापूर्वी अभिनेत्री व माजी खासदार जया प्रदा यांच्याविषयीदेखील असंच वक्तव्य केलं होतं. २००९ मध्ये जया प्रदा यांची खान यांनी ‘नाचनेवाली’ अशा शब्दांत खिल्ली उडवली होती. याच शब्दाचं मराठीत रूपांतर करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना खिजवलं. काश्मीरमधील कलम ३७० रद्द झाल्याने आनंद व्यक्त करण्यासाठी महाजन हे नाशिकमध्ये मनसोक्त नाचले. ते केवळ नाचलेच नाही तर इतरही कार्यकर्त्यांना नाचण्यासाठी प्रोत्साहित करत होते. एकीकडे गोदावरी नदीच्या महापुरामुळे हजारो रहिवाशांचे संसार उघडे पडले असताना दुसरीकडे हे मंत्रीमहोदय नाचण्यात मग्न होते. पूरग्रस्तांना मदत करून फावल्या वेळात आनंद व्यक्त केल्याचं महाजन यांनी सांगितलं असलं तरीही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी आपल्या ‘नृत्यकौशल्याला’ आवर घालणंच योग्य ठरलं असतं. त्यांच्या नृत्याची दृकश्राव्य फित समाज माध्यमांमध्ये वार्‍यासारखी पसरली. नाशिकचं हे नृत्य पूरग्रस्त सोलापूरमध्येही जाऊन पोहचलं. तेथील एका सभेत भाषण करताना अजित पवार यांनी महाजनांच्या नृत्याचा समाचार घेत त्यांना नाच्या म्हणून संबोधले. ‘नाच्या’ हा असंस्कृत शब्द आहे का हा वादाचा मुद्दा असला तरी सामान्यपणे तो खिजवण्यासाठीच वापरला जात असल्याने महाजनांचं पित्त खवळलं. त्यांनी पवारांना प्रत्त्युत्तर देताना, ‘दुष्काळ पडलेला असताना आपण लोकांना काय म्हणाले? धरणात पाणी नाही मग मी काय करू.. मी तो शब्द वापरत नाही’ असा पलटवार केला. हे करताना त्यांनी अजितदादांनी यापूर्वी वापरलेला शब्द न उच्चारण्याचा शहाणपणा दाखवला. त्यातून त्यांच्यात थोडीफार प्रगल्भता शिल्लक आहे, असं वाटत होतं. अजितदादांना प्रत्त्युतर देताना त्यांनी जो शब्द न उच्चारण्याची काळजी घेतली, तोच शब्द त्यांच्याच एका जवळच्या बेअक्कल नगरसेवकाने चक्क फलकावर मोठ्या अक्षरात झळकावून महाजनांनी घेतलेल्या काळजीवर पाणी फिरवलं, पण त्यामुळे महाजनांचीच पातळी दिसून आली. हा फलक वाचून कोणत्याही सुसंस्कृत माणसाची विशेषत: महिला वर्गाची मान शरमेने खाली झुकली असेल. हा फलक कोणत्या वेळेत आणि परिस्थितीत लागला हे बघणंही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यातील वादानंतर रात्रीच्या वेळी देशभरात एक मोठी दु:खद वार्ता आली. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी अखेरचा निरोप घेतल्याची. संपूर्ण देशात या बातमीने हळहळ व्यक्त होत होती. ‘भाजपेयीं’साठी तर हा एक मोठा धक्का होता. अशा गंभीर परिस्थितीचे भान न बाळगता नाशिकमध्ये चक्क महाजनांची तरफदारी करणारी आणि अजितदादांनी यापूर्वी जी शिवराळ भाषा वापरली त्याचे अनुकरण करणारी फलकबाजी करण्यात येत होती. हा निव्वळ पोरकटपणाच नाही तर अकलेचे दिवाळे काढणारा प्रकार होता. ज्यामुळे राजकारण किती खालच्या स्तरावर गेलं हे स्पष्ट झालं. शिवाय पार्टी विथ डिफरन्सचा टेंभा मिरवणार्‍या भारतीय जनता पक्षातही अश्लाघ्य माणसं प्रस्थापित झाल्याचं दिसून आलं. अशी भाषा वापरणारी एक व्यक्ती नसते तर ती प्रवृत्ती असते. तिने आता विकृतीचं रूप घेतलं आहे. या विकृतीचाच परिपाक म्हणून या फलकबाजीकडे बघितलं जावं. या विकृतीने कळस गाठला तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या किळसवाण्या आंदोलनाने. पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अशाच शिवराळ ‘संस्कारां’चं संक्रमण होत असल्याने वेगळी ती काय अपेक्षा करणार? पक्षाच्या एका कार्यकर्त्याने या फलकावर लघुशंका करीत त्याचा व्हिडिओ थेट समाज माध्यमांवर टाकला. असं किळसवाणं कृत्य विकृत प्रवृत्तीचा अर्क म्हणून ओळखता येईल. निषेध करण्यासाठी आंदोलनांचा आधार घेणं हे लोकशाही व्यवस्था बळकट असण्याचं लक्षण मानलं जातं, परंतु असे अश्लाघ्य वर्तन हे लोकशाहीला मारकच ठरेल. अलीकडे फोफावलेली अशी फलकबाजी सामाजिक शांततेला बाधक ठरणारी असल्याने संबंधितांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची अपेक्षा आहे. नेत्यांवर प्रेमच जर व्यक्त करायचं असेल, तर त्यांच्या गळाभेटी घेत बसावं. फलकांमधून हे प्रेम का ऊतू जावं? शिवाय आपल्या पक्षाचा प्रचार करण्याऐवजी दुसर्‍याचा अपप्रचार करण्याचा अधिकार या फलकबहाद्दरांना दिला कोणी? मुळात विकासाच्या मुद्यांना तिलांजली देऊन नुसतीच चमकोगीरी करणारे नगरसेवक, पदाधिकारी वा कार्यकर्त्यांवर पक्षाचा वचकच राहिलेला दिसत नाही. कारण नेताच असं वागत असेल तर त्यांनी तरी मागे का राहावं? मागे नाशिकमधील एका नगरसेविकेच्या पतीने पक्षाला न विचारता एका छोट्याशा रस्त्याला थेट खासदार संजय राऊत यांचं नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला होता. दुसरीकडे याच नगरसेविकेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे फलक लावून भाजपला आव्हान दिलं होतं. भाजपमध्ये ‘महाभरती’ची शृंखला सुरू झाली तेव्हा काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने शहरभर या महाभरतीवर टीका करणारे फलक झळकावले होते. अशाप्रकारच्या फलकबाजीतून पक्षाचा प्रचार नव्हे अपप्रचारच होणार आहे, ही बाब या मंडळींच्या लेखी कोठेही दिसत नाही. विशेष म्हणजे संबंधित पक्षाचे वरिष्ठही अशा कृत्यांची गांभीर्याने दखल घेत कारवाई करीत नसल्याने असे कृत्य करणारे फोफावतात. मंत्र्याने कशाचाच उन्माद करायला नको. इथे ते नाचले तेही उन्मादानेच. तेव्हा पवारांनी त्यांना उघडपणे नाच्या संबोधलं. राज्यातील जनता याहून वेगळं काय म्हणणार? अशा मस्तावलेल्या धेंडांच्या उन्मादी गोंगाटाला वेळीच लगाम न घातल्यास राजकीय संस्कृतीची र्‍हास झालीच म्हणून समजा. म्हणूनच पोरकट कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यापेक्षा चिकित्सक, चिंतनशील आणि कृतिशील कार्यकर्ते तयार केल्यास राजकीय संस्कृतीचे निश्चितच जतन होईल, परंतु त्यापूर्वी नेत्यांनी आपल्या स्वत:मध्ये हे गुण रुजवणं गरजेचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -