घरफिचर्सअमराठी गळ्यातली मराठी!

अमराठी गळ्यातली मराठी!

Subscribe

किशोरकुमार, महेंद्र कपूर आणि सुधा मल्होत्रा या अमराठी गायकांनी मराठीत गाणीत गायलेली गाणी अजरामर झाली. मराठीचे तंतोतंत उच्चार येण्यासाठी त्यांनी बरेच मेहनत घ्यावी लागली. पण ती त्यानंतर ती गाणी इतक्या तन्मतेने आणि तरलतेने गायली की, ती अमराठी गायकांनी गायलेली आहे, हे ऐकताना मराठीजनांच्या लक्षातही येत नसे. हिच परंपरा आता शंकर महादेवन, श्रेया घोषाल, सोनू निगम पुढे चालवत आहेत.

‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ हे मराठी गाणं किशोरकुमारनी गाण्याआधीची गोष्ट…
महंमद रफी, तलत मेहमूद, महेंद्र कपूर वगैरे हिंदी सिनेमासृष्टीत नाव गाजवलेल्या मंडळींनी तोपर्यंत मराठी गाण्यांसाठी आपला आवाज दिला होता. राहिले होते फक्त किशोरकुमार. किशोरदांचं गाणं एव्हाना एक चतुरस्त्र गाणं म्हणून सिध्द झालं होतं. एखाद्या तशाच धिटांग गाण्यात ते तालासुरात यॉडलिंग पेश करतच, पण ‘तुम बिन जाऊ कहाँ’सारख्या उदासवाण्या गाण्यातसुध्दा यॉडलिंगचा वापर करताना त्या गाण्यातल्या उदास वातावरणाला ते किंचितही गालबोट लावत नसत. यॉडलिंग फक्त ‘मैं हूं झुमरू’सारख्या गाण्यासाठीच वापरलं जावं हा अलिखित नियमच जणू ते मोडून काढत. असो, तर अशा या अवलिया कलाकाराच्या वाट्याला तोपर्यंत मराठी गाणं आलं नव्हतं आणि हा अवलिया कलाकारही मराठी गाण्याच्या वाटेला कधी गेला नव्हता.

त्याआधी मराठी गाणी किशोरदा ऐकत आले होते. महंमद रफींची मराठी गाणी मराठीच नव्हे तर अमराठी लोकांनीही डोक्यावर घेतली होती हे त्यांना माहीत होतं. आपणही कधीतरी मराठी गाणं गावं असं त्यांना वाटत होतं. पण मराठी गाणं गाताना त्यांना मराठीतल्या ‘ळ’, ‘ण’ वगैरे अक्षरांच्या उच्चारांची काळजी वाटत होती. ही विशिष्ट अक्षरं असलेले शब्द आपल्याकडून त्या सहजतेने उच्चारले जातील की नाही? त्याचे उच्चार अस्सल मराठी वाटतील की नाही? अशी शंका त्यांच्या मनात होती. म्हणूनच ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ हे गाणं गाण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे आला तेव्हा त्यांनी ‘ण’ नीट घोटवून घेतला, त्यामुळे ते अक्षर उच्चारण्याची अडचण त्यांना जाणवली नाही, पण तरीही ‘ळ’ हे अक्षर मात्र शक्यतो गाण्यात आणू नका अशी त्यांनी विनंंती केली. बरं, किशोरदांसारखा महान कलाकार मराठीत गाणं गाण्यासाठी तयार होणार म्हटल्यावर त्यांची ही विनंती अमान्य करण्याचं धाडस कोण करू शकणार होतं!

- Advertisement -

अखेर व्यवस्थित रिहर्सल्स वगैरे करून किशोरदा हे गाणं गाण्यासाठी उभे राहिले आणि ‘प्रिये’ या गाण्यातल्या पहिल्या शब्दापासून ते गाणं असं काही गाऊन गेले की गाणं नितांत मराठी माणसाचं आणि मराठी गायकाचं वाटलं…आणि हो, त्या गाण्यातली मस्ती ओळखून किशोरदा त्या गाण्यात त्यांचं ते हातखंडा यॉडलिंग करायलाही विसरले नाहीत. खरंतर त्याआधी किशोरदा ‘कहानी किस्मत की’ या सिनेमातलं ‘रफ्ता रफ्ता देखो आँख मेरी लडी हैं’ हे गाणं गाताना गाण्याच्या शेवटी ‘पांडोबा, पोरगी फसली रे फसली’ असं म्हणून ‘ये जवळ ये लाजू नको’ ही एक मराठी ओळ गायले होते. पण ती गाताना त्यातल्या ‘जवळ’ या शब्दातला ‘ळ’ या अक्षराचा आपलाच उच्चार त्यांना तितका भावला नव्हता. म्हणूनच ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ गाताना किशोरदांनी मराठी भाषेची, मराठी शब्दांची, त्यातल्या मराठी भावार्थाची, मराठी भावभावनांची काठोकाठ काळजी घेतली…आणि मराठी गाणं तंतोतंत मराठमोळं पेश केलं.

महेंद्र कपूरनाही मराठी गाणं गाताना सुरूवातीला अशीच अडचण जाणवली होती ती ‘मधुचंद्र’ सिनेमातलं ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी गाताना’. महेंद्र कपूरजींचे मराठी गाणी गाण्याचे ते सुरूवातीचे दिवस होते. त्या गाण्यातला ‘चिंचेचे’ हा पहिला शब्द गाताना त्यांना काहीसं जड जात होतं. त्याचं कारण त्या एकाच शब्दात तीन वेळा ‘च’ हे एकच अक्षर येत होतं आणि ते रिहर्सल्समध्ये तो शब्द चुकून ‘चिंच्येच्ये’ असा म्हणत होते. कारण त्यांच्या बोलीला पंजाबी वळण होतं आणि त्या वळणाला ‘चिंचेचे’मधला मराठी ‘च’ सहजासहजी उच्चारला जात नव्हता. पण महेंद्र कपूरनी तो मराठी वळणाचा ‘च’ प्रयत्नपूर्वक घोटवून घेतला आणि ते गाणं सहजपणे पेश केलं. पुढे तर याच अमराठी महेंद्र कपूरनी हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतातली ‘ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणते’ ही कविता गायली…आणि त्याच्याही पुढे जाऊन ते दादा कोंडकेंच्या सिनेमातल्या संगीताचा अविभाज्य भाग बनले. विशेष म्हणजे हा पंजाबी माणूस रांगड्या दादांचा मराठमोळा आवाज बनला. ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळं’ ते ‘गंगू तारूण्य तुझं बेफाम’ अशी दादांच्या सिनेमातली कित्येक गाणी त्यांनी दादांसारख्या कसबी कलाकाराच्या मागणीबरहुकूम गायली. एका अमराठी गायकाने ही अशी एकामागोमाग एक मराठी गाण्यांची लडी पेश करत, वेगळ्या शब्दांत सांगायचं तर आपलं अमराठीपण पुरतं झाकोळून टाकलं होतं.

- Advertisement -

सुधा मल्होत्रा या अशाच एक पंजाबी गायिका. त्यांनाही मराठी उच्चारांची तशी फारशी माहिती नव्हती. पण ‘शुक्रतारा, मंद वारा’सारखं गाणं गाण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. पण प्रत्येक मराठी शब्दाचा उच्चार आणि त्यामागची भावना त्यांनी संगीतकार श्रीनिवास खळेंकडून नीट समजून घेतली. त्यासाठी असंख्य रिहर्सल्स चिकाटीने केल्या आणि अरूण दातेंसोबतचं ते भावगीत अजरामर करून दाखवलं. ‘शुक्रतारा’ हे मूळ गाणं अरूण दातेंसोबत सुधा मल्होत्रा नावाच्या पंजाबी गायिकेने गायलं आहे ही माहिती काही मराठी जनांना आजही धक्कादायक वाटते. कारण अनुराधा पौडवाल ते रंजना पेठेंपर्यंत इतक्या गायिकांनी हे गाणं अरूण दातेंसोबत गायलं आहे की सुधा मल्होत्रा ही या गाण्याची मूळ गायिका आहे हे कित्येकांच्या गावीच नसतं.

असो, याच सुधा मल्होत्रांनी गायलेलं असंच आणखी एक गाणं म्हणजे ‘विसरशील खास मला दृष्टीआड होता, वचनेही गोड गोड देशी जरा आता’. हे गाणं गातानाही सुधा मल्होत्रा सुरूवातीला ‘गोड गोड’ हे शब्द त्यांच्या पंजाबी लहेजाप्रमाणे ‘गोड्ड गोड्ड’ अशा उच्चारायच्या. पण ‘गोड’ या शब्दातला गोडवा त्यांनी समजून घेतला, तो त्यांना नीट समजला आणि मग ते अख्खं गाणं प्रत्येक मराठी मनाला त्या एका काळात वेड लावून गेलं. रेडिओच्या त्या काळात ‘आपली आवड’, ‘कामगार सभा’, ‘वनिता मंडळ’ या कार्यक्रमात हे गाणं तेव्हा हमखास लागायचं आणि ते गाणं एका अमराठी गायिकेने गायलं आहे हे कुणाच्या लक्षातही यायचं नाही.

…आजही शंकर महादेवन, श्रेया घोषाल, सोनू निगम वगैरे मंडळी त्याच परंपरेने मराठी गाणी गात असतात. मराठी जनांना आपल्या गायकीचा मराठीतून आनंद देत असतात. मराठीचा आनंद ते स्वत: घेत असतात आणि मराठीचा आनंद देतही असतात. मराठी संगीताला अमराठीही योगदान देऊन जातो असाच त्याचा अर्थ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -