ओपड दी गुड गुड दी अनैक्स दी….

पाकिस्तान काय आहे आणि भारत काय आहे, असा सवाल वेडे विचारू लागतात. कारण त्यांना याचा अर्थच लागत नाही. टोबाटेक सिंह नावाचा वेडा म्हणतो, ‘मी ना पाकिस्तानात जाणार ना भारतात जाणार, मी या झाडावरच थांबणार.’ वर्ष, तारीख, महिना आदी सारेच संदर्भ तो विसरुन गेला आहे. ‘ओपड दी गुड गुड दी अनैक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल उफ दी लालटैन’ असं तो पुन्हा पुन्हा बडबडतो आहे.

एका सरांनी मला व्हॉट्सअ‍ॅपवर इमेज पाठवली. त्यावर लिहिलेलं वाचलं आणि मला यत्किंचितही आश्चर्य वाटलं नाही. फिरोदिया करंडक या अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या नाट्यस्पर्धेत आयोजकांनी कलम 370/35 (अ), अयोध्या, हिंदू-मुस्लीम आदी विषयांवर नाटक सादर करता येणार नाही, असा नियम निर्धारित केला. या संदर्भातले ते डॉक्युमेंट होते. तुम्ही काय कसं खावं, प्यावं, ल्यावं सार्‍याच नियमांची संहिता आजकाल सांगितली जात आहे. त्यामुळे यात विशेष ते काय ! त्यामुळे आता नाटक कशावर असेल हे आम्ही ठरवू, अशी सारी नाटकं सुरू झाली आहेत.

कलेची सत्ताधीशांना भीती वाटते, असं म्हटलं जातं. अर्थात कलाकार, साहित्यिक यांना समाज-राजकीय भान असेल तर. अन्यथा राजाच्या मांडीवर बसून कला सादर करणार्‍या कलाकारांकडून काही अपेक्षा करणंही गैर आहे.

फिरोदियाच्या नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने का कोण जाणे, पण मला मंटोची आठवण झाली. सआदत हसन मंटो या लेखकावर खटले झाले. तो अश्लील लिहितो, असे आरोप केले गेले. कोर्टात भलेभले लोक त्याच्या विरोधात बोलले. आज मंटो असता तर कदाचित मंटोने अमुक लिहू नये, असे केवळ त्याच्यासाठी नियम लिहावे लागले असते, एवढं त्याचं लेखन मर्मभेदी आणि प्रभावी होतं.

भारताने फाळणीच्या ज्या जखमा भोगल्या त्या वेदनांचा सारा दस्तावेज मंटोच्या लेखनाच्या स्वरूपात आपल्याला दिसतो. मंटोचं सारं आयुष्यच अशा संक्रमणाच्या काठावरचं आहे. स्वातंत्र्यपूर्व भारत आणि त्यानंतर शकलं होऊन निर्माण झालेले दोन भूप्रदेश हे सारंच त्यानं पाहिलं होतं. अलीकडेच नंदिता दास या गुणी अभिनेत्रीने दिग्दर्शित केलेला ‘मंटो’ हा सिनेमा या संदर्भात महत्त्वाचा आहे. एक असा भारत जिथे हिंदू असो की मुस्लीम, कोणातच भेद नाही. सगळ्यांच्या मनात एक सहभाव आहे, असा काळ ते लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत असा फाळणीचा काळ, हे सारंच स्फोटकासारखं मंटोच्या आतमध्ये साचलेलं. त्याच्या कथांमधून ते उफाळून वर आलं. त्याने वेदनेला शब्द दिला. विद्रोहाला अर्थ दिला.

मंटोची एक अत्यंत प्रसिद्ध कथा आहे- ‘टोबाटेक सिंह’. भारतातील वेडे मुस्लीम आणि पाकिस्तानातील वेडे हिंदू आणि शीख यांची रवानगी अनुक्रमे पाकिस्तान आणि भारतात केली जावी, अशी मागणी होते. पाकिस्तान काय आहे आणि भारत काय आहे, असा सवाल वेडे विचारू लागतात. कारण त्यांना याचा अर्थच लागत नाही. टोबाटेक सिंह नावाचा वेडा म्हणतो, ‘मी ना पाकिस्तानात जाणार ना भारतात जाणार, मी या झाडावरच थांबणार.’ खरं तर त्याचं नाव बिशन सिंह आहे पण टोबाटेक सिंह हे नाव त्याला दिलं जातं. वर्ष, तारीख, महिना आदी सारेच संदर्भ तो विसरुन गेला आहे. ‘ओपड दी गुड गुड दी अनैक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल उफ दी लालटैन’ असं तो पुन्हा पुन्हा बडबडतो आहे. शब्दांचे अर्थ लागत नाहीत; पण तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. अखेरीस भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषांच्या मधोमध असणार्‍या भूभागावर तो पहुडलेला वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि डोळे पाणावतात.

शहाण्यांना सीमा कळतात आणि वेडा सार्‍या सीमारेषा ओलांडून पुढे जातो ! वेड्याला ‘आंखो का कोई वीजा नही होता’ आणि ‘सपनों की कोई सरहद नहीं’, हे गुलजार न वाचताही त्याला समजलेलं असतं. आधुनिक सभ्यतेसोबत सत्तासंघर्षातून आलेली परिभाषा त्याला कळत नाही तो ‘ओपड दी गुड गुड दी अनैक्स दी बे.’ हे म्हणत राहतो. हिंदू-मुस्लीम-सीख अशा धार्मिक अस्मिताग्रस्तांना टोबाटेक सिंहची भाषा कळत नाही. माणसाची भाषा समजून घ्यायला माणूस उरलाच कुठे, असं अगदी नेमकेपणानं म्हणणारा मंटो आज पुन्हा आठवतो.

मंटोची आठवण येण्याचं कारण आहे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदवही याबाबत सरकारने उचललेल्या पावलांचं. जाणीवपूर्वक मुस्लिमांचा उल्लेख वगळून समाजामध्ये फूट पाडण्याचा केला गेलेला प्रयत्न हा निंदनीय आहे. निषेधार्ह आहे. मुळात म्हणजे असंवैधानिक आहे. भारताचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचं कटकारस्थान याद्वारे रचलं गेलं आहे.

1905 ला बंगालची फाळणी करणारा लॉर्ड कर्झन नव्या रुपात अवतरला आहे. प्रशासकीय कारणं देत जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा सर्वसामान्य माणूस रस्त्यावर आला. हिंदू-मुस्लीम भेद रुजवण्याचा हा प्रयत्न नागरिकांनी ओळखला. 1911 ला हा निर्णय मागे घ्यावा लागला. हे सारं पाहणार्‍या टागोरांनी ‘घरे बाइरे’ ही कादंबरी लिहिली आणि 1985 ला कथेवर आधारित याच शीर्षकाचा सिनेमा सत्यजित रे यांनी केला. घरादारापासून ते सार्वजनिक जीवनात फाळणीची बीजं कशी रोवली जातात, याचं चित्रण यात झालं. कमलेश्वरांच्या ‘कितने पाकिस्तान’ या कादंबरीतही आपल्याला आपल्या समाजाच्या आणखी किती चिरफाळ्या करायच्या आहेत, असा आर्त सवाल विचारलेला आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे प्रतिज्ञेतलं वाक्य आपण विसरून जावं म्हणून धर्माच्या नावावर नंगानाच सुरु असताना विवेकी नागरिकांनी सावध व्हायला हवं. आपल्या क्रूर मशिनरीच्या सहाय्याने विरोध मोडीत काढण्याचं सत्तेचं षड्यंत्र समजायला हवं. देशावर प्रेम तर सर्वांचंच आहे; पण हे प्रेम सिद्ध करण्याची कुठली परीक्षा असू शकत नाही किंवा कोणत्या घोषणेनं त्याचं प्रमाणपत्र बहाल करता येत नाही.

सीमारेषा हा खुळचट प्रकार आहे.
जो हद चले सो औलिया, अनहद चले सो पीर,
हद अनहद दोनों चले, उसका नाम फकीर।

कबीराचं हे गाणं समजून घ्यायचं तर टोबाटेक सिंहचे हे ओपड दी गुड गुड दी अनैक्स हे शब्द समजून घ्यावे लागतील नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही और सच कहूं तो हम सबका मंटो भी नाराज हो जाएगा !

-श्रीरंजन आवटे