Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स क्रीडा जगताला करोनाचा विळखा

क्रीडा जगताला करोनाचा विळखा

करोनाच्या संसर्गामुळे ऑलिम्पिकबरोबरच इतर अनेक खेळांच्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजनही अधांतरीच आहे. कारण करोनावर मात केल्याखेरीज कुणालाच पुढे जाता येणार नाही. यंदा यापुढे अनेक स्पर्धा, शर्यती होणार नाहीत, असे जाहीर करण्यात येऊ लागले आहे. त्यामुळेच सर्वत्र एकच मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे. खेळाडूंपुढे वेगळाच प्रश्न आहे. बहुतेक खेळ आता व्यावसायिक बनले आहेत. त्यामुळे खेळाडूंसाठी ते उत्पन्नाचे, चरितार्थाचे साधन बनले आहे. कारण ते पूर्ण वेळ खेळाला देतात. स्पर्धांतील सहभाग आणि कामगिरी यांवरच त्यांचे पोट अवलंबून असते.

Related Story

- Advertisement -

खेळाडूंना करोनाने निर्माण केलेल्या संकटावर मात करायची आहे. क्रीडा जगतात सध्या खूपच अस्वस्थता आहे. तसं घाबरण्याचं कारण नाही, खेळाडू चांगले तंदुरुस्त आहेत, त्याबाबत काळजीचे कारण नाही, पण ते चिंतीत आहेत हे मात्र खरं आणि महत्त्वाची गोष्ट अशी की, त्यांची ही चिंता कधी दूर होईल, हे आज तर कोणी निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यांना पोखरणारी चिंता आहे, ऑलिम्पिक आणि तशाच काही महत्त्वाच्या स्पर्धांच्या आयोजनाची. खरे तर त्यांना निदान त्या स्पर्धा थोड्या काळाने का होईना, होतील हे माहीत आहे. पण केव्हा? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी त्या स्पर्धांचे आयोजकही सांगू शकत नाहीत. कारण … अर्थातच कोविड 1९. सार्‍या जगालाच ग्रासणार्‍या करोना या भयानक वेगानं पसरणार्‍या रोगानं आज सर्वांनाच हैराण करून सोडलंय आणि सर्वसाधारण काय अव्वल खेळाडूही याला अपवाद नाहीत. त्यामुळे ते स्वतःची काळजी चांगल्याप्रकारे घेत आहेत.

रात्रंदिवस अगदी खूप अभ्यास करून तयारी केली आणि एकदम परीक्षा होणार का नाही, असा पेच पडला, तर विद्यार्थ्यांची जी अवस्था होईल, तशीच काहीशी अवस्था दर्जेदार खेळाडूंसकट सर्वच खेळाडूंची आहे. उच्च स्तरावर चांगली कामगिरी करून मोठ्या यशाची अपेक्षा बाळगायची, आपली क्षमता तूल्यबळांबरोबर आजमावून पाहायची आणि त्यात बाजी मारायची हे तर खेळाडूंचं ध्येय असतं. साधारण प्रतिस्पर्ध्यांवरचा विजय हा विजयच, पण त्यापेक्षा मोठ्या स्पर्धांत मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना मागं टाकून मिळवलेला विजय हा त्यांच्यासाठी खरोखरच अभिमानास्पद आणि स्मरणीय असतो. म्हणूनच ऑलिंपिक, जागतिक स्पर्धा, वा जागतिक दर्जाच्या विश्वचषक वीस-वीस (टी-ट्वेंटी-20) क्रिकेट, आणि विम्बल्डन, खुल्या फ्रेंच, अमेरिकन टेनिस, फुटबॉल लीग आणि त्या सारख्या अन्य खेळांतील मोठ्या स्पर्धा या त्या त्या खेळातील खेळाडूंसाठी एक आव्हान असतात आणि त्याला सामोरे जायला ते उत्सुक असतात.

- Advertisement -

पण काहीही झाले तरी या सर्वांमध्ये बहुमानाचं स्थान असतं ऑलिम्पिकला. कारण इतर काही स्पर्धा एक-दोन वर्षांच्या अंतरानं होतंच असतात, पण दर चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिकचा मान सम्राटाचा. साहजिकच आहे, अनेक खेळांच्या त्या एकत्रित स्पर्धा-शर्यती असतात आणि जास्तीत जास्त देशांचा त्यात सहभाग असतो. त्यामुळेच आपल्या खेळाला तेथे प्रवेश मिळावा, म्हणून अनेक खेळांच्या संघटना प्रयत्न करत असतात. अर्थात आयोजकांनाही मर्यादा असतात. त्यामुळे कधी काही खेळ कमी करून दुसर्‍या खेळांना संधी दिली जाते. कालांतराने पुन्हा ते वगळलेले खेळ येतात, कारण इतर काही खेळांना या ना त्या कारणानं वगळलं जातं. सुरुवातीनंतर कालानुरूप देशांची आणि खेळांचीही संख्या वाढत गेल्यानं, स्पर्धेत सर्वांना प्रवेश देणं अवघड होत होतं, त्यामुळंच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. त्यांत विशिष्ट दर्जाची कामगिरी करणाार्‍यांनाच ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळू लागला. अर्थात सर्वसमाविष्ट धोरण असल्यानं ज्या देशाच्या खेळाडूंना हा दर्जा गाठता आला नसला, तरीदेखील काही शर्यतींमध्ये व वैयक्तिक स्पर्धांत त्यांच्या किमान एक एक एका खेळाडूला संधी दिली जाऊ लागली.

मात्र एवढ्यानं आपल्याला खेळांचा प्रसार पूर्णपणे करता येणार नाही, हे जाणवल्याने ऑलिंपिक समिती आपल्या निधीतून लहान, संपन्न नसलेल्या देशांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या देशामध्येही खेळांची योग्य प्रकारे जोपासना होईल याची काळजी घेते. अमेरिकेसारखे काही देश अशा देशांतील होतकरू खेळाडूंना शिष्यवृत्तीही देतात आणि अशा प्रकारे संधी मिळालेल्या खेळाडूंनी नंतर ऑलिम्पिकही गाजवल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच अनेक देशांतील खेळाडूंना अमेरिकेत जाऊन आपल्या खेळाचा दर्जा वाढवून देशाचे प्रतिनिधित्व करायचे असते आणि ते तेथील प्रशिक्षण आणि अन्य सुविधांमुळे त्यांना शक्यदेखील होते. या संदर्भात आपल्याकडील परदेशात प्रशिक्षण घेऊन नाव कमावणार्‍या काही खेळाडूंची नावे क्रीडाप्रेमी वाचकांना आठवतीलच.

- Advertisement -

यावरून ऑलिम्पिकचे महत्त्व का आहे, हे समजेल. आणि आता या कोविड 19 मुळे म्हणजेच करोनामुळे यंदा जुलै-ऑगस्टमध्ये टोकियोत होणारेे ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलले गेले आहे, त्यामुळे अस्वस्थता का वाढली आहे हे कळेल. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये गेल्या शतकामध्ये दोन्ही महायुद्धांच्या काळात ते रद्द झाल्याची नोंद आहे, पण अशा प्रकारे पुढे ढकलले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे ऑलिम्पिक आणि लीप इयर हे ऑलिम्पिकच्या जन्मापासून, म्हणजे इसवी सन पूर्व 776 मध्ये जुलै महिन्यात पहिले ऑलिम्पिक झाल्याची नोंद आहे तेव्हापासून ते आधुनिक ऑलिम्पिक 1896 मध्ये सुरू झाले तेव्हापासूनचे समीकरणही बिघडणार आहे. प्राचीन ऑलिम्पिक नंतर 1000 वर्षे, दर चार वर्षांनी होत होतेे. त्याकाळी ऑलिम्पिकच्या काळात सर्वत्र युद्धविराम होत असे. यावेळी मात्र जग कोविड 19 या महान तरीही अनोळखी शत्रूबरोबर लढत असल्याने त्याच्याशी कसे लढायचे याचे निश्चित डावपेच आखताच येत नाहीयेत. त्यामुळे या लढाईत युद्धविराम नाही, तर युद्धसमाप्तीचीच आवश्यकता आहे. तसे होऊन, समजा पुढील वर्षी (2020चे) ऑलिम्पिक झालेच (कारण आयोजन समितीचे तोशिरो मुुटो यांनी त्याबाबत आत्ताच ठामपणे सांगणे अवघड आहे, असे म्हटले आहे, आणि कुणी जबाबदार सदस्य ते नक्कीच होणार असेही ठामपणे सांगत आहेत), तरी नंतरचे ऑलिम्पिक आधीच्या कार्यक्रमानुसार 2024 ला होणार की 2021 नंतर चार वर्षांनी 2025 ला, हा नवाच प्रश्न या बदलामुळे निर्माण झाला आहे. अर्थात हे ऑलिम्पिक 2020 च म्हणूनच झाले तर मग पुढचे 2024 ला होईल.

ऑलिम्पिकबरोबरच इतर अनेक खेळांच्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजनही अधांतरीच आहे. कारण कोविड 19 वर मात केल्याखेरीज कुणालाच पुढे जाता येणार नाहीय. यंदा यापुढे अनेक स्पर्धा, शर्यती होणार नाहीत, असे जाहीर करण्यात येऊ लागले आहे. त्यामुळेच सर्वत्र एकच मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे. खेळाडूंपुढे वेगळाच प्रश्न आहे. बहुतेक खेळ आता व्यावसायिक बनले आहेत. त्यामुळे खेळाडूंसाठी ते उत्पन्नाचे, चरितार्थाचे साधन बनले आहे. बड्या खेळाडूंचा अपवाद अर्थातच असेल कारण त्यांची कमाई कोट्यवधींत आहे, पण साधारण खेळाडूंचे काय? त्यांनी काय करावे. सर्वच संघटना काही भारतीय क्रिकेट नियामक मंडळासारख्या गब्बर नाहीत. त्यामुळे त्या काही आपल्या खेळाडूंना फारशी मदत करू शकत नाहीत. त्यांच्या स्पर्धांतून मिळणार्‍या उत्पन्नावरच त्यांचे आणि बर्‍याच प्रमाणात खेळाडूंचेही भवितव्य अवलंबून असते. उत्पन्नाविना दिवस काढावे लागले तर काय? ही चिंता या खेळाडूंना आहे.

रिकाम्या क्रीडांगणांत प्रेक्षकांना प्रवेश न देता स्पर्धा घ्याव्यात, असा एक पर्याय सुचवला जातो, पण बहुसंख्य खेळाडूंना हे मान्य होण्यासारखे नाही. भले प्रेक्षकांना वाटत असते, की आपण आपापल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन देतो आणि आपल्या चिअरिंगुळेच त्याचा/त्यांचा खेळ चांगला होतोय! पण खरंच सांगायचं तर खेळाडूचं लक्ष त्यांच्या आवाजाकडे, हातवार्‍यांकडे अजिबात नसते. कारण तो / ते, आपले ध्यान फक्त खेळावर केंद्रित करत असतो / असतात. (जलतरण शर्यतींमध्ये तर स्पर्धक पाण्यातच असल्यामुळे आणि कान झाकलेले असल्यामुळे या सार्‍यापासून तो दूरच असतो. अर्थात शर्यत सुरू होण्याआधी, वा रीले शर्यतींमध्ये एका खेळाडूनंतर जाण्यासाठी पुढचा तयार असतो, त्याला या उत्तेजनाचा फायदा होतोच.) हे खरे असले, तरीही शर्यत किंवा सामना संपल्यानंतर, एखादा गुण घेतल्यानंतर जो वेळ असतो, तेव्हा खेळाडू प्रेक्षकांचा उत्साह वा गोेंधळ अनुभवतात. त्याची मौज लुटतात. हे आपण पाहतोच. प्रेक्षकदेखील त्यामुळे खूश होतात आणि पुढच्या सामन्याला, स्पर्धेला नक्की यायचे असेही ठरवतात. पण प्रत्यक्ष खेळ चालू असताना मात्र खेळाडूंना गोंधळ, गोंगाट अजिबात चालत नाही, कारण त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होते. याला काही प्रमाणात अपवाद मॅरेथॉन, टूर द फ्रान्स यांसारख्या शर्यती असू शकतात. कारण तेथे प्रेक्षकांशी जुळणे स्पर्धकांना शक्य होते. त्यामुळे आपणही शर्यतीत असल्याचे समाधान काही प्रमाणत पेक्षकांना मिळते. त्यांच्या उत्तेजनाचा स्पर्धकांना फायदाच होतो. अगदी स्टेडियममधील शर्यतींमध्येही मागे राहिलल्या खेळाडूला शर्यत पुरी करण्यासाठी प्रेक्षकांच्या उत्तेजनाचा हातभार लागतो, हे अनेकांनी पाहिले असेल. केवळ क्रीडाप्रेमामुळे येणार्‍या प्रेक्षकांची उपस्थिती यादृष्टीनेही महत्त्वाची म्हणता येईल. सांघिक स्पर्धामध्येही ते कित्येकदा दुबळ्या संघांना वा अंडरडॉग्ज समजल्या जाणार्‍यांना उत्तेजन देतात, हे आपल्या अनुभवाचे आहे. त्यांच्या या सर्वांनाच उत्तेजन देण्याच्या खिलाडूवृत्तीमुळेेच खेळ जिवंत राहायला मदत होते, असे म्हटले तरी ते वावगे होणार नाही.

सांघिक खेळांबाबत मात्र (काही प्रमाणात) असे म्हणता येत नाही. कारण तेथे प्रत्यक्ष खेळ एकदोघेच खेळत असतात, आणि क्षणोक्षणी चेंडू पुढे जाईल तसतसे ते बदलत असतात. त्यावेळी बाकीचे तयार राहून आपल्यावर खेळ पुढे नेण्याची जबाबदारी कधी येते याकडे लक्ष ठेवून असतात. म्हणजे फुटबॉल, हॉकी अशा खेळांत. क्रिकेट, टेनिस, बडमिंटन सारख्या खेळांत भले खेळाडूच्या कानावर प्रेक्षकांचा आवाज पडत असो, तरीही त्याचे लक्ष मात्र चेंडूवर आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंवर असते. क्रिकेट तर सध्या खेळाडूंएवढाच प्रेक्षकाचा खेळ झाला असल्याचे भासते, एवढा त्यात प्रेक्षकांचा सहभाग असतो (बॉक्सिंग आणि कुस्तीमध्ये तर ते हमखास जाणवते). तरीही फलंदाज पवित्रा घेतो, आणि गोलंदाजही चेंडू टाकण्यापूर्वी धाव घेतो, तेव्हा त्यांना प्रेक्षकांनी शांत बसावे, एवढेच काय पण उगाचच एकडे तिकडे फिरू नये, असे वाटते. आणि समजा तसे काही झाले, तर ते खेळ थांबवून त्या दिशेने इशारा करतात. अर्थात या सामन्यांमध्ये, चांगला फटका मारल्यानंतर, बळी मिळवल्यावर, गोल लागल्यावर वा सामना जिंकल्यावर पाठीराख्यांच्या होणार्‍या जल्लोषामुळे त्यांना खूपच बरे वाटते हेही तितकेच खरे आणि त्याची दाद म्हणून ते मैदानात चक्कर मारून प्रेक्षकांना अभिवादन करतात. दूरचित्रवाणीवर हे सारे पाहणार्‍यांनाही यामुळे स्फुरण चढल्यासारखे होते आणि मग फटाके लावून आतषबाजी आणि जयघोष केला जातो.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रेक्षक जेवढे जास्त असतील, त्या प्रमाणात त्या मैदानावर वा कोर्टवर जाहिरातीचे फलक लावण्यासाठी जाहिरातदारांमध्ये जास्त स्पर्धा असते आणि त्यामुळे अर्थातच आयोजकांना चांगली प्राप्ती होते. दूरचित्रवाणी वाहिन्यांना सामन्याच्या वा स्पर्धा शर्यतीच्या प्रक्षेपणाचे हक्क विकूनही त्यांना मोठा पैसा कमावता येतो. तिकीटविक्रीतूनही, नाही म्हटलं तरी बरी कमाई होत असते. अशा परिस्थितीत प्रेक्षकांविना सामने, हा विचारच अनेकांना नकोसा वाटतो. कदाचित म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात कोण तयार होईल, हा प्रश्नच आहे. यामुळे आपल्या आयपीएल बद्दलही काही ठाम निर्णय अद्यापही घेतला गेलेला नाही. कारण पाच वर्षांच्या स्पर्धांच्या हक्कातून दूरचित्रवाणी वाहिनीकडून त्यांना भरघोस कमाई झाली आहे. आता एक वर्ष स्पर्धा घ्यायची नाही, तर त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील अशी भीती त्यांना आहे, कदाचित कोर्ट कचेर्‍या कराव्या लागतील ही भीती तर अधिकच वाटणे शक्य आहे. पण त्यामुळेच स्पर्धा नाही तर खेळाडूंना पैसे द्यायचे की नाही, हा प्रश्न (खरे तर सर्वच व्यावसायिक स्पर्धांबाबत) निर्माण झाला आहे. आयोजक, पुरस्कर्ते, संघांचे मालक, व इतर अनेकजण संभ्रमातच आहेत. या दुधारी तलवारीच्या भीतीने सारेच हतबल झाल्यासारखे दिसतात.

दुसरा प्रश्न आहे, तो प्रामुख्याने ऑलिम्पिकमधील खेळ व इतर खेळांचा. खेळाडूंना तारखा अगोदरच माहीत असल्याने ते व त्यांचे प्रशिक्षक-कोच, सराव वा प्रशिक्षणाचे आयोजन अशा प्रकारे करतात की, स्पर्धेच्या तारखांदरम्यान त्याची क्षमता सर्वोच्च स्तरावर असायला हवी. त्यामुळेच तो आपली सर्वात चांगली कामगिरी नोंदू शकतो व अर्थातच त्याच्या यशाची शक्यता वाढते. (अर्थात ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले की आभाळाला हात टेकले, असे समजणार्‍यांची गोष्टच वेगळी, ते व त्यांच्या बरोबरचे अधिकारी ऑलिम्पिकला जातात ते पर्यटन आणि खरेदी या उद्दिष्टाने. सुदैवाने असे प्रकार आता कमीकमी होत आहेत!) त्यामुळे त्यांना आता नव्या तारखा डोळ्यापुढे ठेवूनच आपल्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे लागणार. त्यातच प्रत्यक्ष मैदानावर वा कोर्टवर जाऊन प्रत्यक्ष सराव कधी करता येईल याचा अद्याप तरी काहीच अंदाज नाही. त्यामुळे केवळ जास्तीत जास्त तंदुरुस्त-फिट-राहणे, शक्य तेवढा आपल्या खेळासाठी पूरक असलेला व्यायाम करणे एवढेच ते करू शकतात. शिवाय एकीकडे उत्पन्नाची चिंता त्यांना सतावतच असणार (कारण स्पर्धांत खेळताना त्यांच्या पोषाखावर पुरस्कर्त्या कंपन्यांचे लोगो लावण्याबद्दल देखील त्यांना पैसा मिळतो) त्यांना असणारच. यासाठीच त्यांचे मन स्पर्धांसाठी तयार रहावे, निराशा येऊ नये, म्हणून प्रयत्न करावे लागतील. काळजीवरही त्यांना मात करावी लागेल. यासाठी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक यांची मदत त्यांना मिळायला हवी.

प्रख्यात बॅडमिंटन खेळाडू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही आम्ही खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी कार्यक्रम आखला आहे, आम्ही नेहमी आमच्या अ‍ॅकेडमीच्या संपर्कात असतो, असे म्हटले आहे. त्यांनी त्यांची प्रसिद्ध बॅडमिंटन प्रशिक्षण अ‍ॅकेडमी सुरू केल्यापासून प्रथमच ती बंद ठेवावी लागली आहे, त्याबाबत त्यांना आता तुम्ही काय करता असा प्रश्न विचारला गेल्यावर त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्यांनी स्वतः पायाला दुखापत झाल्यावर दीड दोन महिने घरीच बसून राहावे लागले होते तेव्हा ते फिटनेससाठी काय करत याचे सविस्तर वर्णन त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. उदा. खुर्चीवर बसून रॅकेट व शटलच्या सहाय्याने समोरच्या भिंतीवर फटके मारणे, त्याचप्रमाणे पायात ताकद यावी म्हणून एक किलो मिठाची पिशवी पायाला बांधून खुर्चीवर बसूनच व्यायाम करणे. इ. इतर वेगवेगळ्या खेळांच्या संघटना, स्पर्धांचे आणि खेळाडूंचे पुरस्कर्ते, देणगीदार आणि काही (फारसे पैसे नसलेल्या संघटनांच्या) खेळांच्या बाबतीत सरकारही क्रीडा खात्याच्या सहाय्याने या प्रकारची मदत करू शकेल. इच्छाशक्ती मात्र हवी. तेच तर महत्त्वाचे! अखेरचा मुद्दा आहे दूरदृष्टीचा. ऑलिम्पिक आणि विम्बल्डन स्पर्धेच्या आयोजकांनी ती दाखवून स्पर्धा रद्द झाल्यास भरपाई मिळावी म्हणून आधीच विमा उतरवला होता व त्यामुळेच त्यांच्या होणार्‍या नुकसानात घट होणार आहे. आयपीएलच्या फ्रँचाइसीजना- संघमालकांना- मात्र ही दूरदृष्टी दाखवता आली नाही. आपापल्या केंद्रांवर-स्टेडियमवर- होणार्‍या त्या स्पर्धेतील सामन्यांचा विमा उतरविण्यासाठी स्पर्धा अगदी जवळ येण्याची वाट बघितल्याचा पश्चात्ताप त्यांना नक्कीच होत असेल.आजघडीला तरी क्रीडा जगतचे हे चित्र आहे. पुढे काय होते याची वाट पाहताना पूर्वीच्या रंगतदार सामन्यांचे प्रक्षेपण बघायचे किंवा त्यांची वर्णने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायचा एवढेच आपण करू शकतो!

- Advertisement -