घरफिचर्सतुमचं आमचं जमलं

तुमचं आमचं जमलं

Subscribe

काळू – ऐ….बाळू चल की रं भारतमाताला जाऊ…दादांचा शिनिमा…तुमचं आमचं जमलं बघायला, दिस उगवतीच्या खेळाला जाऊ पहिल्याच..कसं?

बाळू- जमनारंच हुतं…जमल्याबिगर र्‍हातंय हुई…

- Advertisement -

काळू- त्योच तुमचं आमचं जमलेलंच जाऊ बघायला…

बाळू- दादांच जमनं पडद्यावर…हितं हात नि घडाळ्याचं जमलंय. (बाळूचं पेपरात घातलेलं तोंड नि तोंडातलं पान )

- Advertisement -

काळू- हात नि घड्याळ? (लांबवर पिंक टाकून)

बाळू- पेपरात वाचलं न्हाईस…दोघांचं आकडं जमलं, शेवटाला घड्याळ हातात बांधलंच गड्या, सव्वाशे-सव्वाशेचं बोलनं झालंय असं लिवलंय आजच्या पेपरात.

काळू- आकडं.. कसलं आकडं…मटक्याचं आकडं…आं… छापायाला सुरुवात झाली काय गड्या पेपरात ?

बाळू- मटक्याच्या आकड्याचं न्हाई म्हनंत म्या काळू, आरं येड्या… ही आकडं जागा वाटपाचं असत्यात, नाक्यावर दोनचारपाच करनं सोडकी बाळ्या…आरं जिंदगी बर्बाद हुती मान्सावाची, या दोनचारपाचच्या आकड्यात…

काळू- छ्या…छ्या…काईतरींच काय? आकडं लावनं सोडलकी लका, बायकूला शब्द दिलाय, संसाराचा आकडा लावल्यावर रेशनच्या यादीतलं आकडं सोडून बाकी कुटल्याच आकड्यात जीव न्हाई रमावायचा?

बाळू- सुधारला की रं तू काळू…ही राजकारनाची आकडं मोठी लोकं लावत्याती..(तेवढ्यात चहा येतो, काळू कपाचा कान पकडून बशीत चहा ओतून बाळूला देतो. ) आता ही बघ कपनबशी, कपाबिगर बशी र्‍हाईची न्हाई. बशीबिगर कपाचा जीव न्हाई..याला संसारातली युती म्हनत्यात, राजकारनात बि अशीच युती व्हती, हात नि घडाळ्याची…तीच झाली, मराठी मुलूखाच्या निवडणुकीतल्या कांगरेसच्या हाताला आता १२५ बोटं उगवनारं हैत, तर बारामतीच्या घडाळ्यातबी तेवढंच आकडं झाल्याती..हाताची जेवडी बोटं, तेवडंच हातातल्या घड्याळ्यात काटं…त्यांच त्यांच्याच सारखं सारखं जमलंय. हात नि घडाळ्यात घोळात घोळ व्हायचा…कदी मनगट मोटं व्हायचं तर कदी घड्याळाच्या पिना आखूड व्हायच्या…हे आता बेस झालं बग, सारखं सारखं ठरलंय. जेवडा हात तेवडंच घड्याळ…एक जास्त न्हाई की एक कमी न्हाई….

काळू- तू काय बोलायला काय बी कळना लका..

बाळू- आर…बारामतीचं सायेबांनी बैटक बोलावली हुती…त्याला दोन्ही घरची मंडळी हजर होती.

काळू- बैटक…कसली रं….

बाळू- झालं बैटक ऐकलं की या बाळ्याचं असं होतंय लोकहो…ती बैटक न्हवं ही…आरं याला पक्षाची जागावाटपाची मिंटींग म्हनत्यात…लैच वरची मंडळी असत्यात त्या बैटकीत. या बैटकीला वाद हुत्यात, कदी कदी हमरीतुमरी, हानामारी, गोंदळधांदळ हुती…त्याला लोकशाईत चर्चा म्हनत्यात…ही चर्चा झाल्यावर कुनाला किती आकडा लागावा हे ठरतंय. पन, तू तुला लोकशाईतली आकडेमोड कळायची न्हाई…तू आपला रेशनच्या लाईनतलाच आकडा लावात जा…मतदानाचं

काळू – मंग काय करावं..मतदानाच्या यादीत नाव हाय का न्हाई याऊन घवातांदळाची यादीचं पडलंय मला. ही यादी भरली न्हाई तर चूल पेटावी कशी? आपल्या खिशाला झेपंल, आसली पोटापान्याची आकडेमोड आपली आपनंच रोजच्या रोज करावी….त्या पेपरातल्या आकड्यांच काय सांगू नकू…इतकं पेपरात छापलेलं विकासाचं मोटं आकडं माज्यासारख्यापर्यंत येईपर्यंत लईच छोटं व्हत्यात..तवा आपल्या रोजंदारीच्या आकड्याचं बघू…पर त्याआदी दादाचा ‘तुमचं आमचं जमलं’ जमतंय का ते तेवडं बग की लका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -