मोदींच्या फटफजितीमुळे काँग्रेसला गुदगुल्या!

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्यानंतर मोदींना माघारी फिरावे लागले. त्यानंतर भटिंडा विमानतळावर आल्यावर, मी जिवंतपणे सुखरूप पोहोचलो, असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, असे मोदींनी तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांना सांगितले. दुसर्‍यांदा बहुमताने पंतप्रधान झालेल्या मोदींचा दौरा फसला म्हणून काँग्रेसवाल्यांना गुदगुल्या होत आहेत, पण पंजाबमधील खलिस्तानवाद्यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांच्या माध्यमातून हत्या केली होती, याचा काँग्रेसवाल्यांना विसर पडलेला दिसत आहे.

पंजाबमध्ये फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा आंदोलकांनी अडवला आणि त्यानंतर ते परत फिरले. पंजाबमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची सभा होणार होती ती होऊ शकली नाही. थोडक्यात, काय तर मोदींची फटफजिती झाली यामुळे विशेषत: काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मनाला फार गुदगुल्या होत आहेत. कारण सध्या मोदी हे देशातील लोकप्रिय नेते मानले जातात, त्यांना देशातील जनतेने दुसर्‍यांदा केंद्रात बहुमत देऊन पंतप्रधान होण्याची संधी दिली. मोदींच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येत असतात. अशा लोकप्रिय नेत्याला सभा रद्द करून माघारी परतावे लागले, हा काँग्रेसचे नेते आपला नैतिक विजय मानत आहेत. कारण मोदींना थेट पराभूत करण्याचे सामर्थ्य सध्या काँग्रेसमध्ये नाही. मोदींनी २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसमुक्त भारताचे जे आवाहन केले, त्याला जनतेने जो काही भरघोस प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली आहे. मोदींच्या करिष्म्यामुळे मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष असा काही डबघाईला आलेला आहे की, त्यांना लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून बसण्यासाठी जेवढ्या जागा लागतात, तेवढ्याही जिंकता आल्या नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुतांश काळ केंद्रात आणि राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसची ही अशी दारूण अवस्था झालेली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढणारा नेताही त्यांना मिळेनासा झाला आहे. ज्यांच्यावर त्यांची सगळी भिस्त आहे आणि ज्यांच्याकडे ते भावी पंतप्रधान म्हणून पाहतात, ते राहुल गांधी तर बराच आग्रह करूनही काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे सोनिया गांधी ती जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसला कुणी नेता नाही, अशी स्थिती आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यामध्येही नेहमीच काँग्रेसचाच दबदबा राहिलेला आहे, पण आता त्या पक्षाला केवळ मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीत सहभागी होऊन तिय्यम भूमिका घेऊन तग धरून राहण्याची वेळ आली आहे. देशात राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला प्रादेशिक पक्षांच्या पालखीचे भोई होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अशा स्थितीत मोदींची केवळ कोंडी केली तरी काँग्रेसवाल्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यातही नेतृत्वावरून बर्‍याच कुरघोड्या सुरू आहेत, त्यातूनच काँग्रेसने ज्यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील निवडणूक जिंकली त्याच अमरिंदर सिंग यांना बाजूला करून चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यात आले आहे.

मोदींना टक्कर देऊ शकेल असा कुणी नेता राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसकडे नाही, त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला प्रादेशिक पातळीवर जिथे रोखता येईल, त्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू असते. पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवण्याचा जो काही प्रकार झाला, त्यात त्यांची प्रादेशिक पातळीवर कोंडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पंतप्रधान ज्या वेळी राज्याच्या दौर्‍यावर असतात, त्यावेळी त्यांच्या दौर्‍याची व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असते, पण पंतप्रधानांनी अचानक हेलिकॉप्टरने जाण्याचे टाळून रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे असा अनपेक्षित प्रकार घडला असे मुख्यमंत्री चन्नी यांचे म्हणणे आहे. तर फिरोजपूर येथील एका पुलावर मोदींचा ताफा अडवल्यानंतर ते भटिंडा विमानतळावर माघारी आले. त्यामुळे ते संतापलेले होते. त्यांनी तेथील सुरक्षा अधिकार्‍यांसमोर आपला रोष व्यक्त करताना सांगितले की, ‘मी जिवंत पोहोचलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा.’ मोदींचा हा उद्वेग खरे तर धक्कादायक आहे. कारण पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती जेव्हा आपण एखाद्या राज्यातून जिवंत सुखरूप आलो, असे म्हणते तेव्हा त्यामागे नक्कीच काही तरी तसे कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मोदी हे काही आपल्या जीवाला घाबरणारे व्यक्ती नाहीत. कारण स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना पंतप्रधानांना बुलेटप्रूफ काचेच्या आवरणात उभे केले जात असे, पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ते आवरण काढून टाकले. ते खुल्या व्यासपीठावरून लाखोंच्या जनसमूहासमोर भाषण करतात. इतकेच नव्हे तर ते जेव्हा विदेशात दौर्‍यावर जातात, तेव्हाही तेथील लोकांमध्ये अगदी सहज मिसळतात. आपल्यासोबत जास्त सुरक्षा रक्षक घेत नाहीत. नरेंद्र मोदींच्या सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांवरून विशेषत: पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आक्रमक झाले होते. त्यांनी काही महिने सिंघू सीमेवर या कायद्यांच्या विरोधातील आंदोलन चालविले होते. त्यात काही शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला. हे शेतकरी जेव्हा दिल्लीत घुसले तेव्हा त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. इतकेच नव्हे तर आपली वाहने घेऊन येणार्‍या आंदोलक शेतकर्‍यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले होते. काही केल्या शेतकरी हटत नव्हते. शेवटी मोदींनी संसदेत तीन कृषी कायदे मागे घेतल्यावर काही दिवसांनंतर या शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे पंजाबमधील शेतकर्‍यांचा मोदींवर रोष आहेच हे वेगळे सांगायला नको. त्यांची परिणती त्यांच्या पंजाबमधील फसलेल्या दौर्‍यात झालेली आहे, असे म्हणायला वाव आहे. कारण यापूर्वी मोदींना असा कुठे अनुभव आलेला नव्हता.

काँग्रेसची सध्या देशात जी बिकट अवस्था झाली आहे, त्याला मोदी जबाबदार आहेत, हे माहीत असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी शक्य असलेल्या सगळ्या मार्गांचा अवलंब करायला काँग्रेसवाले तयार आहेत. मोदींचा पंजाबमधील दौरा फसला, त्याचबरोबर जागतिक पातळीवरील उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात असताना पंतप्रधान म्हणतात, मी जीवानिशी वाचलो. याला काय म्हणावे. अशा प्रकारे काँग्रेसवाले खिल्ली उडवत आहेत. या सगळ्याची न्यायालयांमार्फत चौकशी करण्यात यावी, असे उपरोधिकपणे सांगत आहेत. काही काँग्रेसवाले तर म्हणत आहेत की, हा भाजपचाच प्रसिद्धी स्टंट आहे. कारण मोदींंच्या सभेला फारसे कुणी आलेच नव्हते. काँग्रेस आणि भाजप हे दोन एकमेकांचे विरोधक असलेले राष्ट्रीय पक्ष आहेत. पण त्यामुळे आरोप-प्रत्यारोप हा भाग येतो, पण याच वेळी काँग्रेसने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, पण त्याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडताना दिसत आहे. पंजाबमधूनच वेगळ्या खलिस्तान या देशाच्या निर्मितीची मागणी खलिस्तानवाद्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे पंजाबमध्ये जनसामान्यांचा आणि पोलीस, लष्करी जवानांच्या रक्ताचा सडा सांडवला होता. त्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर ताब्यात घेतले होते. त्यावेळी हे प्रकरण धार्मिकदृष्ठ्या अतिशय संवेदनशील बनल्यामुळे शासकीय यंत्रणा खलिस्तानवादी दहशतवाद्यांसमोर हतबल झाली होती.

खलिस्तानी दहशतवाद्यांना बाजूलाच असलेल्या पाकिस्तानचा पाठिंबा मिळत होता, पंजाबमधील निरपराधांचा नरसंहार रोखणे अवघड होऊन बसले होते, अशा वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या सहकार्याने ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवले, त्या माध्यमातून सुवर्ण मंदिराच्या आश्रयाने हल्ले करणार्‍या खलिस्तानी दहशतवाद्यांचा बिमोड केला. पण त्यासाठी इंदिराजींना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. तर अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली. जसा भारताचा भूप्रदेश तोडून पाकिस्तान बनवण्यात आला. तसा भारतापासून पंजाब तोडून त्याचा खलिस्तान बनविण्याचे मनसुबे बाळगणारे पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत. ते अधूनमधून डोकी वर काढत असतात. विशेषत: कॅनडामध्ये पंजाबमधील लोकांची मोठी संख्या आहे. काही महिन्यांपूर्वी खलिस्तानवाद्यांकडून कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांना खलिस्तानच्या प्रकरणाला हवा देण्यास भाग पाडण्यात आले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतविरोधी शक्तींना बळ देऊ नका, असा इशारा त्यांना दिला होता. काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यामुळे पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. त्याचसोबत राम मंदिर उभारणीमधील न्यायालयीन गुंता सोडवून मोदींनी राम मंदिराची पायभरणी केली, याचा पाकिस्तानला फारच मोठा पोटशुळ आलेला आहे, तो त्यांच्या धार्मिक नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यातून दिसून येत आहे. इंदिरा गांधी यांची हत्या होण्यापूर्वी पंजाबमध्ये हिंदू विरुद्द शीख असा संघर्ष सुरू झाला होता. त्यातून खलिस्तानवाद्यांना अधिक बळ मिळत गेले. हिंदूंना विरोध होत असल्यामुळे आणि भारताची आणखी एक फाळणी होणार असल्यामुळे पाकिस्तानचा त्याला पाठिंबा होता, त्यामुुळे एक हिंदू म्हणूनच इंदिराजींना लक्ष्य करण्यात आले हे आजचे काँग्रेसवाले विसरत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी भटींडा विमानतळावर पोहोचल्यावर तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की मी जिवंत पोहोचलो, असे तेथील अधिकार्‍यांना सांगितले, या विधानाकडे पाहिले पाहिजे. पंजाबमधील सगळे लोक खलिस्तानवादी नाहीत, ते देशप्रेमी आहेत, पण त्यांच्या समूहामध्ये शिरून काही कट्टर खलिस्तानवादी आपला डाव साधत असतात. त्यांना पंतप्रधान भाजपचा असो नाही तर काँग्रेसचा याच्याशी काही देणे घेणे नसते. देश तोडण्याचा त्यांचा हेतू साध्य करायचा असतो. देश तोडून निर्माण झालेल्या पाकिस्तानने दहशतवादीच निर्माण केले. खलिस्तानवादी देश तोडून तेच निर्माण करणार आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यांना रोखणारे धडाडीचे नेते त्यांना नको असतात, त्यांना रोखणार्‍यांचा ते काटा काढतात, इंदिराजींचे काय झाले ते काँग्रेसवाल्यांनी लक्षात घेऊन मोदींच्या फटफजितीमुळे त्यांना जो आनंद होत आहे, त्याचा गांभीर्याने विचार करावा. पण सध्या ते त्या मन:स्थितीत दिसत नाहीत.