घरफिचर्सयुगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर

युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर

Subscribe

बाळ सीताराम मर्ढेकर हे अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी तसेच नवकविता व नवटीका ह्यांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक. त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1909 रोजी सातारा जिल्ह्यातील मर्ढे ह्या गावी झाला. त्यांचे कुटुंब परंपरेने रामदासी पंथाचे होते. त्यांचे वडील आरंभी शिक्षक होते. पुढे ते शिक्षणक्षेत्रातील एक अधिकारी झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण खानदेशात धुळे येथे (१९२० घेतल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. १९२९ साली आय. सी. एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील वाङ्मयीन चळवळींचा त्यांनी अभ्यास केला.

टी.एस.एलियट, जेम्स जॉइस, व्हर्जिनिया वूल्फ ह्यांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांचा, तसेच क्लाइव्ह बेल, रॉजर फ्राय, हर्बर्ट रीड ह्यांसारख्या समीक्षकांचा त्यांच्या वाङ्यीन अभिरूचीवर आणि आकलनावर परिणाम झाला. लंडनच्या ‘किंग्ज कॉलेजा’त शिकत असताना प्राध्यापक जेम्स सदरलंड ह्यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्यावर पडला. १९३२ साली ते भारतात परतले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचे सहसंपादक धारवाड, मुंबई, अहमदाबाद येथील सरकारी महाविद्यालयांतील प्राध्यापक अशा नोकर्‍या त्यांनी केल्या, परंतु त्यात ते रमले नाहीत. १९३८ साली त्यांनी ऑल इंडिया रेडिओत नोकरी पत्करली आणि अखेरपर्यंत ते त्या नोकरीत राहिले.

- Advertisement -

कविता काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१), कांदबर्‍या-रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८) नाटक (१९४४), संगीतिका (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७), समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय-आर्ट्स अँड मॅन (१९३७), वाङ्यीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन इस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्या आणि साहित्य (१९५५). इत्यादी साहित्य त्यांनी लिहिले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जात असली, तरी पूर्वपरंपरेशी तिचे निश्चित नाते आहे. ओवी-अभंग लिहिणार्‍या संतांच्या मनोभूमिकेशी मर्ढेकरांची स्वतःची भूमिकाही अनेक ठिकाणी जुळते. संतकवितेतून प्रत्ययास येणारी ईश्वरनिष्ठा, संसारातील वैयर्थ्याबद्दलची खात्री, पारलौकिक स्पर्शाची ओढ आणि गूढ उदात्तता ही सर्व वैशिष्ठ्ये यंत्रयुगातील आणि युद्धोत्तर जगातील भेदक वास्तवाचे दर्शन घडवून मानवी जीवनाच्या अर्थशून्यतेची प्रचिती देणार्‍या मर्ढेकरांच्या कवितेतही आढळतात.

कवितेप्रमाणे कादंबरीच्या क्षेत्रातही मर्ढेकरांनी नवे प्रयोग केले. समीक्षेच्या क्षेत्रातील मर्ढेकरांची कामगिरी संस्मरणीय ठरली. सौंदर्यशास्त्रीय विचारांत कलेतील माध्यमाच्या विचारापासून कलेतील साधनाचे स्वतंत्र स्थान स्पष्ट करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. मराठीतील खूपसे वाङ्मय हिणकस आहे असे मर्ढेकरांना वाटे आणि ते तसे का आहे, ह्याचे विवेचन त्यांनी वाङ्मयीन महात्मता ह्या ग्रंथात केले आहे. केवळ इंग्रजी साहित्याच्या ओंजळीने पाणी प्यायल्यास मराठी साहित्याची गुणवत्ता आणखी खालावत जाईल, ही महत्वाची जाण त्यांनी साहित्यिकांत उत्पन्न केली. अशा या युगप्रवर्तक कवीचे २० मार्च १९५६ रोजी निधन झाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -