घरफिचर्ससाहित्यिक रणजित देसाई

साहित्यिक रणजित देसाई

Subscribe

प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1928 रोजी झाला. प्रसिद्ध कादंबरीकार, कथालेखक, नाटककार अशी त्यांची ख्याती होती. रणजित देसाई मूळचे कोल्हापूरच्या कोवाडचे. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली. इंटर नापास असलेल्या देसाई यांनी 1947 मध्ये प्रसाद मासिकाने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत भैरव ही कथा लिहिली. त्यांच्या कथेला पारितोषिक मिळाले. या पारितोषिकामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले. रुपमहाल (1952) , कणव (1960) , जाण (1962), कातळ (1965), गंधाली (1971), कमोदिनी (1978), आलेख (1979), मधुमती (1982), मोरपंखी सावल्या (1984) असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले. ते खूप लोकप्रिय झाले.

सामाजिक आशयाच्या ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ठ्ये जाणवतात. खेडुतांच्या जीवनाचे चांगुलपणा मांडणार्‍या आकर्षक शैलीतील कथा त्यांनी लिहिल्या. बारी, माझा गाव, या प्रारंभीच्या कादंबर्‍यांनंतर 1962 मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली. या कादंबरीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतरच्या ‘श्रीमान योगी’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेल्या कादंबरीने त्यांची कादंबरीकार म्हणून असलेली लोकप्रियता अधिकच वाढली. रणजीत देसाई यांना ‘स्वामी’ ही माधवराव पेशव्यांच्या जीवनावर ऐतिहासिक कादंबरी लिहिली. त्यातून माधवराव पेशव्यांचे आयुष्य कमी असले तरी त्यांनी त्या कालावधीतही अनेक कर्तृत्ववान माणसे निर्माण केली असे दिसून येते.

- Advertisement -

तसेच त्यावेळी पानिपतच्या तिसर्‍या लढाईतील पराभवामुळे मराठा साम्राज्याचा मोहर गळून गेला होता. अशा वेळी अत्यंत धैर्याने आणि हिमतीने त्यांना मराठी लोकांना मानसिक आधार देऊन मराठा साम्राज्य नव्या ताकदीने उभे केले आणि पानिपतातील पराभवाचा सूड घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर देसाईंनी लिहिलेल्या ‘श्रीमान योगी’ या कांदबरीमध्ये त्यांनी महाराजांचे जीवन आणि त्याचबरोबर हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम याविषयी बारकाईने विश्लेषण केले आहे. शिवाजी महाराज एक व्यक्ती म्हणून त्यांची काय सुख दु:खे होती, यावर त्यांनी मंथन केले आहे. या कांदबरीला इतिहास अभ्यासक नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांनी पारंपरिक विचारसरणीमध्ये बदल केला. त्यामुळे त्यांना विजय संपादन करणे शक्य झाले, यावर प्रकाशझोत टाकला आहे.

ऐतिहासिक वातावरणाचे वैभव आणि व्यक्तीरेखांना दिलेली भावोत्कट उंची यामुळे त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांनी लोकमानस जिंकले. स्वामीतील माधवराव आणि त्यांची पत्नी रमा तसेच श्रीमान योगीतील शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या नात्याला देसाई यांनी वेगळी परिमाणे दिली. लक्ष्यवेध (1980), पावनखिंड (1980), कर्णाच्या जीवनावरील राधेय (1986), राजा रविवर्मा (1986) अशा अनेक ऐतिहासिक, पौराणिक कादंबर्‍या लिहून देसाई यांनी या प्रकारच्या कादंबर्‍यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले.

- Advertisement -

गरुडझेप (1973), रामशास्त्री (1983), स्वरसम्राट तानसेन, हे बंध रेशमाचे, कांचनमृग, धन अपुरे, वारसा, स्वामी, आदी नाटकेही त्यांनी लिहिली. नागीण, रंगल्या रात्री अशा, सवाल माझा ऐका या चित्रपटांचे पटकथालेखन, स्नेहधारा, मी एक प्रेक्षक असे लेखसंग्रहही त्यांनी लिहिले. अशा या थोर साहित्यिकाचे 6 मार्च 1992 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -