घरफिचर्ससकारात्मक प्रयोग

सकारात्मक प्रयोग

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या भारतीयांना करोना या जागतिक महामारीच्या विरोधात एकजूट दाखविण्यासाठी रविवारी, ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सर्वांनी घराच्या दरवाजाकडे किंवा बाल्कनीमध्ये नऊ मिनिटे दिवे किंवा मोबाइल टॉर्च लावून करोनाच्या विरोधातील लढाईमध्ये एकजूट दाखविण्याचे आवाहन केले होते त्याप्रमाणे अवघ्या भारतीयांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला, हा अभूतपूर्व प्रसंग अवघ्या जगाने पाहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन करोनाचा संसर्ग देशभरात पसरू नये म्हणून अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा विशेषत: पोलीस, वैद्यकीय आणि सामान्य प्रशासन विभाग यातील सर्वांना सोबत घेऊन करोनाची लढाई लढत आहेत. हे संकट जागतिक स्तरावर ओढावलेला आहे, ज्यामध्ये अमेरिका, स्पेन, इटली, ब्रिटेन, फ्रान्स यासारख्या युरोपियन देशांमध्ये संपूर्णआर्थिक सुबत्तता असूनही या देशांना या साथीच्या रोगाने नाकात दम आणला आहे.

आपल्याकडील आर्थिक सुबत्ततेच्या जोरावर आपण कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो या अतिआत्मविश्वासात हे सर्व देश राहिल्यामुळे या सर्व देशांना आता अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या देशांना करोनाला नियंत्रणात आणणे आता अशक्यप्राय झाले आहे, अशा देशांकडे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच पाऊले उचलून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे हे माहीत असूनही देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान मोदी यांनी हा कठीण निर्णय घेतला आहे. याला देशभरातील नागरिकांनी, उद्योजकांनी, राजकीय नेत्यांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे. अशावेळी आता या लॉकडाऊनमधील दोन आठवडे संपत आले आहेत, लोकांना घरात बसून मानसिक तणाव येऊ लागला आहे, लोकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली असली तरीही घरातच रहा आणि सुरक्षित रहा, असा संदेश सरकारकडून दिला जात आहे, वास्तविक मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा समाज बनतो, अशी समाजाची व्याख्या आहे, मात्र अशा परिस्थितीत लोकांना आपापल्या घरात तीन आठवडे बंदिस्त राहावे लागणे हे लोकांसाठी बरीच अस्वस्थता निर्माण करणारे ठरत आहे.

- Advertisement -

अशावेळी जनतेमध्ये चेतना, राष्ट्रभक्ती निर्माण करणे, त्यांना उत्साही बनविणे, त्याचबरोबर अशा बिकट परिस्थितीत आपल्या स्वकीयांना दूर ठेवून करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी हे रुग्णालयात दिवस-रात्र सेवा देत आहेत, तर पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून संरक्षण करत आहेत, त्यांचे कौतुक करणे तसेच त्यांचे मनोबल वाढवणे या सर्व उद्देशासाठी पंतप्रधान मोदी यांनी मागील आठवड्यातील रविवारी अवघ्या भारतीयांना घराच्या बाल्कनीत सायंकाळी ५ वाजता येऊन टाळ्या वाजवा, थाळी वाजवा, शंखनाद करा असे आवाहन केले होते. त्याला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, उद्योजकांनी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

यामुळे निराशेच्या वातावरणातही जनतेमध्ये सकारात्मकता वाढल्याचे दिसून आले होते. त्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी रविवारी, ५ एप्रिल रोजीही घरासमोर, बाल्कनीत दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यालाही जनतेने उदंड प्रतिसाद दिला, यावेळीही सर्व सामान्यांसह, उद्योग, सिनेसृष्टी, क्रीडा, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींनी प्रतिसाद देत दिवे लावले, ज्यामध्ये टाटा समुदायाचे अध्यक्ष रतन टाटा यांचा विशेष उल्लेख करणे अनिवार्य आहे. त्यामुळे नऊ मिनिटे का होईना देशात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते, यानिमित्ताने पुन्हा एकदा पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील घटकांच्या अथक प्रयत्नांना सलामी देण्यात आली.

- Advertisement -

मात्र इथे खेदाने नमूद करावे लागते की पंतप्रधान मोदी जेव्हा दिवे लावण्याचे आवाहन केले, तेव्हा त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, बसप, सपा अशा राजकीय नेत्यांनी विरोध दर्शविला. याप्रकारे आवाहन करून पंतप्रधान मोदी प्रसंगाचे गांभीर्य कमी करत आहेत, हा उत्सव साजरा करण्याचा प्रसंग नाही, याऐवजी त्यांनी गरिबांची विझलेली चूल कशी पेटेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली, तर काहींनी दिवे पेटवून करोना नष्ट होणार नाही, असेही म्हटले. वास्ताविक पंतप्रधान मोदी हे या आपत्काळात गरिबांसाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत आहेत, त्यांनी विविध घोषणाही केल्या आहेत ज्यामध्ये जनधन खाते असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पुढील तीन महिने दर महिन्याला पाचशे रुपये जमा करणे, उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळाला आहे त्यांना पुढील तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देणे, २ रुपये किलो दरात गहू, तांदूळ देणे निर्णय घेतले आहेत.

टाळ्या वाजवून किंवा दिवे पेटवून करोना नष्ट होणार नाही, हे खरंच आहे, आम्हीही याला संमत आहोत, मात्र पंतप्रधान मोदींचा यामागील उद्देशही असा नव्हता, केवळ सर्वसामान्यांमध्ये एकजुटता यावी, सकारात्मकता वाढावी, राष्ट्रप्रेम निर्माण व्ह्यावे, तसेच याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे या करोनाच्या लढाईत जे वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस जीवाची बाजी लावून लढत आहेत, त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे हाच होता, हेही विरोध करणार्‍यांनी लक्षात घेणे अपेक्षित आहे. आज पंतप्रधान, सर राज्यातील मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस एकजुटीने प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान वेळोवेळी माहिती देत आहेत, तर केंद्रीय मंत्री, अधिकारी दररोज पत्रकार परिषद घेऊन सर्वसामान्यांना या संसर्गाबाबत अवगत करत आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अधिकारी हेही राज्याच्या जनतेला वेळोवेळी विश्वासात घेत आहेत, अशा वेळी सर्वसामान्य जनतेचेही कर्तव्य आहे, की त्यांनीही आपण राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, महापौर आहोत असे समजून जबाबदारीने वर्तन करावे, लॉकडाऊनचे नियम पाळावे, हेच आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -