घरफिचर्सगौरव प्रामाणिक पत्रकारितेचा

गौरव प्रामाणिक पत्रकारितेचा

Subscribe

रविश कुमार यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी झालेली निवड ही भारत वर्षातील तमाम प्रामाणिक पत्रकारांना मिळालेला पुरस्कार आहे. ध्येयाशी जराही तडजोड न करता सत्तेपुढे दोन हात करणार्‍या पत्रकारांच्या पाठीवर विश्वासाची ही जशी थाप आहे तशी ती सत्तेपुढे लाचार पत्रकारितेला बसलेली थप्पड समजायला हरकत नाही. स्वातंत्र्य पूर्व काळातील पत्रकारिता ही एका ध्येय्याने प्रेरीत होती. तितकी नैतिकता बाळगणारी पत्रकारिता आजच्या काळात असंभव असली तरी तिला किमान कोणी तिला बाजारू संबोधू नये, इतकी अपेक्षा व्यक्त केली तर त्यात वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आज देशात बाजारू पत्रकारितेचे दिवस आहेत. बाजारू पत्रकारांनाच अधिक मान आहे. रविश यांनी पत्रकारिता करताना ही नैतिकता पाळलीच, शिवाय इतरांनी पत्रकारिता कशी करावी याचे धडेही दिले. ज्यांनी घ्यायचे ते घेतले. पण ज्यांनी स्वत्वच काहीच्या पायावर ठेवले त्यांच्याकडून अपेक्षा काय करावी? मॅगसेसे पुरस्कार हा आजवर विविध क्षेत्रातील मान्यवरांना मिळाला. यावेळी तो एका पत्रकाराला मिळावा यात आश्चर्य नाही. भारतातील परिस्थितीचं विद्यमान रूप पाहता रविश यांच्यासारख्या पत्रकाराला तो पुरस्कार जाहीर व्हावा, यातच सारं काही आलं. सगळ्याच पत्रकारांनी सरकारची भाटगिरी केली पाहिजे, अशी सत्ताधारी पक्षांची अपेक्षा असते. ती केली नाहीत तर पत्रकारांचं जिणं संकटात टाकण्याची टोकाची कृती सरकारी पक्षाची लोकं करत आहेत. पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. यामुळेच त्याची चौकस नजर असावी, अशी धारणा असते. मग राजकीय असो वा सामाजिक. ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होत असेल तिथे पत्रकाराने आपली लेखणी चालवलीच पाहिजे. हे काम रविश यांनी तत्परतेने केलं. ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. अभिषेक शर्मा असो वा प्रसुनकुमार बाजपेयी यांना याची किंमत चुकवावी लागली. महाराष्ट्रात निखिल वागळे आणि राजदीप सरदेसाई यांनी सरकारला सुनवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. अशा संवेदनशील परिस्थितीत सरकारशी दोन हात करण्याची हिंमत रविश यांनी दाखवली. रविश यांना मिळालेल्या पुरस्कारात असंख्य अंग आहेत. केवळ पत्रकार म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला असं मानण्यापेक्षा भारतातील एकूणच विद्यमान स्थितीची दखल या पुरस्कारात आहे, असं म्हणता येईल.
भारतात कधी नव्हे इतकं असहिष्णूतेचं वातावरण आहे. या वातावरणाची कोणी दखल घेतली की त्यांना पाकिस्तानात पाठवणार्‍यांची इथे कमी नाही. कोण्या कलाकाराने या परिस्थितीवर बोलण्याचा प्रयत्न केला की त्याला ट्रोल करून नामोहरम करणार्‍यांशी सत्ताधार्‍यांची बांधिलकी असल्याने ट्रोलवाल्यांवर कोणाचाच अंकुश नाही. उलट अशी माणसं सातत्याने शेफारत आहेत. गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिमांना जिवे मारणार्‍यांचं कौतुक केलं जातं. मॉब लिंचिंगचा उघड देखावा सुरू असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. देखल्या देवा दंडवत घालावा तशी थातूरमातूर कारवाई करण्याच्या तेवढ्या घोषणा होतात. कठूआचा बलात्कार असो वा उन्नावचा. बलात्कार्‍यांना पाठीशी घालण्यापर्यंतची हिंमत होऊ शकते, हेच भारतातल्या तपास यंत्रणांचं अपयश म्हणता येईल. अशा बलात्कार्‍यांसाठी चक्क वकील रस्त्यावर येत असतील, तर कायद्याची बूज कशी कोण राखेल? अशा कठीण परिस्थितीत पत्रकारिता करणं हे काही सामान्य काम नाही. आयुष्य हातावर घेऊनच हे काम करावं लागत आहे. ते रविश यांनी केलं. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात हे सगळं घडत असताना सजग पत्रकार गप्प बसेल, असं नाही. गेल्या काही वर्षात स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचा अवकाश आक्रसत असल्याचं वातावरण देशात आहे. चिंताजनक म्हणजे लोकसंमत एकाधिकारशाही अधिक जोमाने वाढते आहे. धार्मिक, वांशिक,आणि मूलतत्त्ववादी राष्ट्रवाद यामुळे विभाजनवाद, असहिष्णुता आणि हिंसा यांना आलेला भर हे आजचं भारतातलं चित्र आहे. रविश या धोक्यांविरोधातील एक आवाज बनले. बिहारच्या जितवारपूर नावाच्या खेड्यात ते लहानाचे मोठे झाले. आणि सार्‍या देशातील सामान्यांचे आधारवड बनले. केवळ वार्तांकन करणारे रविश प्राईम टाईम नावाचा कार्यक्रम सादर करतात तेव्हा त्यांच्या पत्रकारितेत सर्वसामान्यांचा आवाज असतो. सरकारला अगदी सहज खडेबोल सुनावणार्‍या रविश यांनी वाहिन्यांचा आवाज अधिक जोमदार केला. सत्ता कशी बेमूर्वतखोर बनते आहे, याचं चित्र त्यांनी आपल्या परीने उभं केलं. जे कोण हे करतात अशांना आपल्या जिवाची बाजी लावावी लागते आहे. ही बाजी लावली म्हणूनच एबीपीमधले अँकर अभिषेक शर्मा यांना दहशतीत त्यांच्या वृध्द मातोश्रीसह मेरठमध्ये राहावं लागत आहे. सत्तेविरोधात लेखणी चालवण्याची शिक्षा त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी भोगत आहेत. सत्ताधार्‍यांनी अभिषेक यांच्या पत्नीची बदली डेहराडूनमध्ये केली. लहान मुलांना आईची सोबत असावी, इतकी मानवता जे दाखवू शकत नाहीत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा काय करावी? नोकर्‍यांवर आफत आणणं असो वा जिवे मारण्याच्या धमक्या असोत. अशा घटना पत्रकारांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. या सगळ्या धोक्यांना जराही न जुमानता रविश यांनी आपली लेखणी कायम चालवली.
देशातील माध्यमातलं वातावरण राज्यसत्तेच्या हस्तक्षेपाने आधीच धोक्यात आलं आहे. त्यात अंध भक्त, निमित्ताचे राष्ट्राभिमानी, खोट्याचं खरं करणारे ट्रोलर्स आणि तद्दन खोट्या बातम्यांचे प्रसारक यांच्या वाढत्या घुसखोरीने वातावरण खूपच विखारी बनलं आहे. सनसनाटीपणा करणार्‍या अर्णव गोस्वामींसारख्यांची चलती बनली. या कथित पत्रकारांनी टीव्हीवरील चर्चांना इतकी खालची पातळी आणली की लोकं त्यांना चर्चेतच उघडपणे भाडखाऊ म्हणू लागले. आरडाओरड केली की आपण मोठे होतो, अशी या मंडळींची धारणा आहे. कर्कश आवाज करत आपलं म्हणणं दुसर्‍यावर लादण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यासाठी मुस्लीम म्हणजे देशशत्रू, अशीच व्याख्या बनली आहे. त्यांच्या या चर्चा म्हणजे उन्मादी गोंगाट समजावा अशा असतात. असल्या पत्रकारितेला धक्का देण्याचं तंत्र राजकारण्यांना अवलंबवावं लागतं आणि त्यांच्यावर बहिष्कार घालावा लागतो यातच या मंडळींचा पराभव आहे. पत्रकारिता ही कोणाची दलाली करण्यासाठी नसावी. सरकारने केलेल्या चांगल्या कामांचं कौतुक करताना त्यांच्या बदमाशीचं चित्रही वार्तांकनात यावं, यासाठी पत्रकाराने जनतेचा आवाज बनावं, ही सामान्यांची अपेक्षा फोल ठरत असताना रविश यांच्यासारखा पत्रकार एकहाती हा झेंडा फडकवतो, याचा साभार अभिमान देशातल्या तमाम प्रामाणिक पत्रकारांना आहे. पत्रकार कोणाला म्हणावं, हे अगदी थोडक्या शब्दात रविश यांनी नमूद केलंय. तुम्ही लोकांचा आवाज बनणार नसाल तर पत्रकार होऊ नका. सामान्यांचा आवाज बनलात तरच तुम्ही पत्रकार, या एका शब्दात श्रध्दीय पत्रकारितेचं रूप रविश यांनी स्पष्ट केलं आहे. २०१९चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार रविश कुमार यांना जाहीर करून विश्वस्तांनी उत्तम काम केलं आहे. पत्रकारितेबरोबरच देशाच्या लोकशाहीची मुल्यं जोपासणार्‍या सत्य आणि प्रामाणिक पत्रकाराचा गौरव हा सार्‍या प्रामाणिक पत्रकारांचा गौरव समजायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -