घरफिचर्सअस्वच्छता दूर ‘करो’ना!

अस्वच्छता दूर ‘करो’ना!

Subscribe

करोनाची भीती सर्वदूर पसरली आणि ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. करोनाचा विषाणू स्पर्शातून पसरत असला तरी ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यावर तो अधिक तीव्रतेने ‘अ‍ॅटक’ करतो. म्हणूनच शहरांसह गावपातळीवर स्वच्छतेवर भर दिला जातोय. आपल्याकडे अशा मोहिमांसाठी एखादा मोठा आजार यावा लागतो ही शोकांतिका आहे. त्यानंतर स्वच्छतेचे सोहळे घेऊन परिस्थिती अटोक्यात आणण्याचा प्रयत्न होतो, पण आपण आपले घर साफ ठेवतो तसेच अंगणही साफ असावे, आपले गाव साफ असावे, शहर साफ असावे असं मानणारे किती आहेत? दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतकेच. अस्वच्छतेच्या ‘महत’कार्यात सर्वच एकदिलाने सहभागी होताना दिसतात. गाडीवरून चालताना पुढच्या-मागच्याचा अजिबातही विचार न करता पचकन थुंकले जाते. स्वत:ला सुशिक्षित समजणारे रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना सर्रासपणे आढळतात. स्वयंशिस्त नावाचा प्रकार नाहीसा होतोय. शहरांसह गावांत सर्वाधिक अस्वच्छ असतील तर ती सरकारी कार्यालये. महापालिका, जिल्हा परिषद, इतर सरकारी व सहकारी कार्यालयांत अस्वच्छता हमखास बघायला मिळते.

काही कार्यालयांत थुंकण्यासाठी थुंकी पात्र ठेवण्यात आली आहेत; परंतु ‘पिचकारी बहाद्दर’ थुंकीपात्राऐवजी खिडकी वा कार्यालयांच्या कोपर्‍यांचा अधिक वापर करतात. ‘स्वच्छता पाळा’ या वाक्यांचा काही कर्मचारी व अधिकारी वर्गाला अर्थबोध न झाल्याने कार्यालयात जाण्यासाठी असणारे जिने, खोल्यांचे कोपरे, खिडक्या अशा ठिकाणी मावा, गुटखा, तंबाखूच्या पिचकार्‍या मारल्याचं दिसते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणारी बसही अस्वच्छतेच्या गर्तेत अडकलेली दिसते. बसमध्ये सूचना लिहिलेली असते की, धुम्रपान करण्यास मनाई आहे. परंतु, बसचालकच त्या नियमांचे पालन करत नाही. मग शिक्षा कुणाला करायची, असा प्रश्न निर्माण होतो. रस्ते आणि फुटपाथ अशा सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ शिजवणार्‍यांवर बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेे दिला असतानाही, या आदेशाचा गंध प्रशासनाला अद्याप आलेला नाही. त्यामुळे आजही आरोग्य प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रस्ते आणि फुटपाथवर खाद्यपदार्थ शिजवून त्यांची विक्री सुरू असतेे. दुसरीकडे उघड्यावर सर्रासपणे मांसविक्रीही सुरू असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय.

- Advertisement -

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 18.1 टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. महाराष्ट्रात 10.5 टक्के लोक झोपडपट्ट्यांत राहतात. देशातील एकूण झोपडपट्ट्यांतील कुटुंबांपैकी 17.8 टक्केे कुटुंब महाराष्ट्रात राहतात. त्यामुळे या ठिकाणी आरोग्याची काळजी अतिशय काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. मात्र, झोपडपट्ट्यांमध्येच सर्वाधिक अस्वच्छता आढळून येते. या ठिकाणीच पाणी साचून जलजन्य आजार उद्भवतात. या भागांत असे आजार उद्भवण्यास परिसरातील रहिवाशांची उदासीनता जेवढी कारणीभूत आहे तितकीच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभूत ठरते. आजारांना निमंत्रण देण्यासाठी पाण्याचं दुर्भिक्ष्य हेदेखील एक कारण आहे. बहुसंख्य शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा तशी ठीकठाक आहे. फिल्ट्रेशन प्लाण्टमधून बाहेर पडणारे पाणी हे बाटलीतील मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध असते, पण हे पाणी पाइपलाइन्समधून घरातील नळापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या शुद्धतेची खात्री देता येत नाही. बहुसंख्य पाइपलाइन्स चाळीस ते पन्नास वर्षे जुन्या असतात.

एवढ्या वर्षांत गंजल्याने त्यांना अनेक ठिकाणी तडे गेलेले असतात. वाहिन्यांच्या फुटलेल्या भागातून माती, घाण आत जाऊन पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. पाणी नसणे हेही आजारांंचे कारण आहे. बहुसंख्य झोपडपट्ट्यांतील शौचालयांत पाण्याची व्यवस्था नसते. अशा ठिकाणी अस्वच्छता कळस गाठते. एकूणच सार्वजनिक स्वच्छता, किंबहुना अस्वच्छता हा आपल्या देशातील एक दुर्धर आजार बनला आहे. विशेषतः महानगरांमध्ये रोज टनांवारी साचत असलेल्या कचर्‍यामुळे आरोग्याचे अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक आजार या कचर्‍यामुळेच फैलावताना दिसतात. अशा वेळी या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी सुविहित यंत्रणा तयार करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. त्यादृष्टीने केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून ‘स्वच्छ भारत मिशन’ सुरू केले खरे; पण त्याअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यात आलेल्या निधीचा विनियोगच अनेक राज्यांनी अद्यापपर्यंत केलेला नाही.

- Advertisement -

आज ‘स्वच्छ भारत मिशन’ म्हणजे केवळ सेलिब्रिटींनी रस्त्यावर झाडू मारून फोटो काढण्यापुरती योजना असावी, असा समज ही योजना राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर प्रामुख्याने आहे, त्या राज्य सरकारांचा झालेला दिसतो. केंद्रातील सत्तारूढ पक्ष आणि राज्यातील सत्तारूढ पक्ष एकच नसतील, तर आणखी समस्या निर्माण होतात, हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात दिसून येतेय. खरे तर, सार्वजनिक स्वच्छता हा भारतासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या देशाने प्राधान्याने हाती घेण्यासारखा प्रश्न आहे. याचे कारण वेगाने वाढत असलेली आपली महानगरे सर्वप्रथम या समस्येचा बळी ठरणार आहेत. आपल्या देशात कुठेही प्रवास केला असता, आपल्या शहरांतील स्वच्छतेची विदारक स्थिती जागोजागी आढळते. मुळात स्वच्छता हा एक संस्कार आहे. तो एखाद्या देशाच्या ‘डीएनए’तूनच रुजून यावा लागतो. आपल्या देशाच्या जनुकांत तो नाही, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.

देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणार्‍या गाडगे महाराजांनी एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभीच स्वच्छतेचा मंत्र दिला होता. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केलं. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यातून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्‍यांना शब्दाने फटकारत तर कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणे करत आणि हे वागणे फक्त शब्दांपुरते मर्यादीत नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. गाडगेबाबांनंतर हे व्रत अनेकांनी अंगीकारले, त्याचा प्रचार आणि प्रसार केला…स्वातंत्र्यानंतर मात्र पहिले पाढे पंचावन्न! खरं तर गाडगेबाबांनी जो वसा घेतला होता तोच वसा घेण्याचे काम, नव्हे तर कर्तव्य सर्वसामान्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि शासन सेवेतील कारभार्‍यांनी केले तर करोनासारख्या आजाराच्या फैलावाची चिंता तरी राहणार नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीनुसार, गाडगेबाबांना भेटलेला स्वच्छतेतील परमेश्वर कधी तरी आपल्या यंत्रणांनाही भेटेल, अशी आशा करण्यापलीकडे आपल्या हातात सध्यातरी काही नाही हेच खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -