घरफिचर्सडीलाईल रोडवरची स्वप्नांनी भरलेली खोली

डीलाईल रोडवरची स्वप्नांनी भरलेली खोली

Subscribe

खरंतर मुंबईच्या लोअर परेलमध्ये डिलाईल रोडवर असणारी मंडळाची खोली म्हणजे गावाकडून येणाऱ्या तरुणांसाठी राहण्याची सोय असते. पण आता हा विभाग पुर्नविकासाच्या मार्गावर आहे. गावातील मुलांचा मुंबईतला संघर्षाची माहिती करून देणारा हा लेख नक्की वाचा ......

खरंतर मुंबईच्या लोअर परेलमध्ये डिलाईल रोडवर असणारी मंडळाची खोली म्हणजे गावाकडून मुंबईत नोकरीसाठी येणार्‍या प्रत्येक मुलासाठी स्वप्नाचे घरटेच असत. याच मंडळाच्या खोलीत राहून शून्यातून आयुष्याची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी आज हजारो मुले दररोज झटत आहेत. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक छोट्या गावातील तरुण आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी या खोलीत आपलं बस्तान मांडून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत.

आई- वडीलांच्या खर्चातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांना आणि घरच्यांना आधाराची गरज असते. जो आधार घरातला तरुणच देऊ शकतो. म्हणून सगळ्या स्वप्नांना मारून आपलं अस्तित्व शोधण्यासाठी २०व्या वर्षांपासून ते आपल्या ४०शी पर्यंत काम करत असतो. छोट्या-मोठ्या खेड्यातून आलेली ही मुलं हक्काची राहायची सोय नाही म्हणून मंडळाच्या खोलीत अतिशय गर्दीत दिवस काढतात. खरं तर मुंबईकर म्हणजे गावाकडे लोकांना अतिशय प्रोफेशनल लाईफ, हायप्रोफाईल जगणं आणि सुखासमाधानात घालवलेल आयुष्य अशीच ओळख आजही आहे. पण वास्तव असं नाहीच आहे. पुरेशी झोप , मिळेल ते अन्न आणि डोक्यात भरमसाठ स्वप्नं याच आशेवर स्वतःच्या कित्येक स्वप्नांना मूठमाती देणारा हा मुंबईकर हे फक्त त्यालाच जाणवत असत.

- Advertisement -

डिलाईल रोड हा खरतर कोल्हापूरवासियांच्या वास्तव्यास असणारा भाग म्हणून चांगलाच ओळखला जातो. कारण इथे वास्तवास असणारी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक माणसं ही कोल्हापूरची आहेत. खास करून आजरा, गडहिंग्लज आणि कोल्हापुरातल्या बर्‍याच तालुक्यातली तरुण मंडळी या खोल्यांमध्ये वास्तव्याला आहेत. एका खोलीत जवळपास १५-२० आणि त्याहीपेक्षा अधिक तरुण स्वतःची नोकरी सांभाळत गुजराण करत आहेत. पिढ्यांपिढ्यापासून चालत आलेल्या या मंडळांच्या खोलीचा आधारवड आता मात्र धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एखाद्या नवख्या पोराला मुंबईत येऊन सुरुवात करायची म्हटलं तर अतिशय कमी किमतीत राहण्याची ही सोय म्हणजे जणू वाळवंटात मिळालेलं पाणीच. मुंबईच शून्य ज्ञान, कसं सावरायंच आणि कसं घडायचं हे सगळं त्या रूममध्ये आतापर्यंत आयुष्य घालवलेली मंडळी आपोआप शिकवतात.

प्रत्येकाची कामावर जाण्याची वेगवेगळी वेळ आणि त्यानुसार चाललेली तयारी, पहाटे ५ वाजल्यापासून प्रत्येकाची धडपड. एरवी गावी आम्ही सकाळी ८ वाजेपर्यंत अंथरूणातून उठत नाही पण इथे उठावंच लागत. मी मंडळाच्या खोलीत कधी राहिलो नाही, पण माझे बरेचसे मित्र या खोल्यांमध्ये आपले दिवस घालवत आहेत. सुट्टीच्या दिवशी दुपारी घेतलेली गाढ झोप आणि टाचणी पडल्यावर आवाज होईल इतकी निरव शांतता, पोटमाळ्यांवर खचाखच बॅगांचे पडलेले ढीग, अंथरूणाची अडचण आणि ढीगभर कपडे आणि यामध्ये घालवलेला प्रत्येक क्षण हा जिव्हारी लागण्यासारखाच आहे. या खोलीत राहणारा प्रत्येक मुलगा गावी गेल्यावर या सगळ्या अनुभवांचं ओझं कुणावरही लादत नाही, कारण त्यालाही माहिती आहे मुंबईत राहून दिवस काढायचे असतील तर हे सगळं आपल्या वाट्याला येणारच.

- Advertisement -

डिलाईड रोडवरच्या या जुन्या इमारतींच आता पुनर्विकासाच काम होणार आहे, त्यांमुळे भविष्यात या खोल्यांची किंमत करोडोंच्या घरात जाऊ शकते. त्यामुळे गावातील अंतर्गत राजकारणाचे वारे सध्या या खोलीतल्या भिंतींवर आदळू लागले आहेत. पण त्याच खोलीत आपल्या कुटुंबाला कशाचीही कमतरता भासू नये म्हणून राबणारे कितीतरी हात सध्या विश्रांती घेत आहेत. भविष्यात या खोल्यांचं अस्तित्व धोक्यात येईल की काय हा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतोय. त्याहीपलीकडेजाऊन नवी सुरुवात करू पाहणार्‍या गावातल्या कित्येक तरुणांना आसरा देणार्‍या या खोलीच अस्तित्व आहे त्याच पद्धतीने अबाधित ठेवणे आज गरजेचं आहे. सगळ्याच गावाच्या मंडळांच्या खोल्या या भागात नाहीत आणि सध्याच्या घडीला मुंबईत खोली घेण्याची इच्छा असूनही ती पूर्ण होईल का ? याचीही शाश्वती नाही. त्यामुळे स्वप्नांनी भरलेल्या या चार भिंतींना सुरक्षित ठेवण्याची नितांत गरज आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक मुलाला याची जाणीव होणं गरजेचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -