घरफिचर्ससारांशहर कुत्ते का एक दिन...

हर कुत्ते का एक दिन…

Subscribe

नुकताच जागतिक श्वान दिवस किंवा शुद्ध मराठीत सांगायचं, तर इंटरनॅशनल डॉग डे झाला. आपल्या आजुबाजूला वावरणार्‍या आणि वेळीअवेळी स्कुटर, गाड्या किंवा अगदी पादचार्‍यांच्या मागे जीव खाऊन लागणार्‍या या चतुष्पाद प्राण्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची गरजच काय?

इंग्रजीत एक म्हण आहे. Every dog has his day! आपल्या राष्ट्रीय भाषेत त्याचं भाषांतर होतं, ‘हर कुत्ते का दिन आता हैं|’ नुकताच म्हणजे २६ ऑगस्ट रोजी तो दिवस येऊन गेला. हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिवस म्हणून साजरा केला जातो. तशा पद्धतीचा रीतसर ठराव होऊन २००४ पासून हा दिवस साजरा व्हायला सुरुवात झाली.

या आंतरराष्ट्रीय संस्थांचं हे एक बरं असतं. ‘आला दिवस साजरा करणे’ ही म्हण त्या तंतोतंत पाळतात. या दिवसांना काही घरबंधच नसतो. जागतिक महिला दिवस, डॉक्टर दिन, परिचारिका दिन, जागतिक पुरुष दिवस, वगैरे तर खूपच मातबर दिवस झाले. पण आंतरराष्ट्रीय शौचालय दिन वगैरेही पाळले जातात. नेमका अमुक दिवस अमुक दिवशीच साजरा करायचा हे कसं ठरतं, हेदेखील कोडं आहे. काही वेळा त्या संबंधित दिवसाशी निगडीत एखाद्या व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यूदिनी तो साजरा केला जातो. पण या जागतिक श्वान दिनाचं असं अजिबात नाही. तो २६ ऑगस्टला साजरा होण्याचं एकमेव कारण म्हणजे, तसा ठराव झालाय म्हणून!

- Advertisement -

तर ते एक असो! आता साहजिकच पुढला प्रश्न म्हणजे, तो का साजरा केला जातो? तर मंडळी, या प्रश्नाचं उत्तर जरासं गंभीरच आहे. जगभरात माणसांच्या एखाद्या समूहावर जसे अत्याचार होतात, तसेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अत्याचार मुक्या प्राण्यांवर होत असतात. या अत्याचारांची व्याप्ती आणि खोली प्रचंड आहे. पाळलेला कुत्रा अचानक म्हातारा झाला म्हणून लांब कुठेतरी सोडून येण्यापासून ते श्वानांचं लैंगिक शोषण करण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे आणि तरीही ‘पाशवी’, ‘पशुवत’ वगैरे विशेषणं आपण माणसंच वापरतो.

भारतासारख्या महाप्रचंड लोकसंख्येच्या देशात, जिथे माणसांच्या जगण्याचे आणि खाण्यापिण्याचे वांधे आहेत, तिथे हा असला श्वान दिवस वगैरे साजरा करण्याचे चोचले परवडणारे आहेत का, हा पुढला प्रश्न असतो. आता याचं उत्तर खरं तर ज्याचं त्याने ठरवायचं असतं. पण याच खंडप्राय आणि महाप्रचंड लोकसंख्येच्या देशात श्वानांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटना प्रचंड आहेत. साधारणपणे कुत्रं चावलं, या पलीकडे अनेकांचा कुत्र्यांशी संबंध येत नाही. वर्तमानपत्रांमध्ये ‘अमुक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत, तमुक भागात कुत्र्याने चार जणांचा चावा घेतला’ वगैरे बातम्या येतात. या गोष्टी नक्कीच भयावह आहेत. पण दर दिवशी कुत्र्यांवर होणारे अत्याचार, त्यांना मारले जाणारे दगड आणि काठ्या, गाडीखाली येऊन मरणारी त्यांची पिल्लं आणि अगदी निर्दयी, क्रूरपणे त्यांच्या शरीराशी खेळ करण्याच्या घटना यांच्या बातम्या छापायच्या म्हटल्या, तर रकाने ओस पडतील. पण त्या मुक्या प्राण्यांच्या हाती वर्तमानपत्रं नसतं आणि ते वाचक नसल्याने ‘वाचकांच्या पत्रव्यवहारा’त त्यांना स्थान नसतं.

- Advertisement -

मुळात भारतासारख्या देशात हा संघर्ष आहे तो, ‘मनुष्य-प्राणी संघर्ष’ या गटातला! आपल्याकडे असलेली जागा माणसांना राहण्यासाठीच पुरत नाही, माणसं भुकेने टाचा घासत मरतात, असे असताना कुत्र्यांचा किंवा अन्य प्राण्यांचा विचार कोण करणार, हा सार्वत्रिक युक्तिवाद असतो. पण निसर्गचक्रात आणि पृथ्वीतलावर स्वत:ला इतरांपेक्षा जास्त आणि अनन्यसाधारण महत्त्व देण्याची खाज माणसाला कशी काय सुटली, हे एकदा बघायला हवं. माणूस वगळता इतर प्राणिमात्र एकमेकांना सहसा धक्का लागू न देता जगत असतात. हरीण, माकडे वगैरे वाघसिंहांना घाबरतात. पण म्हणून ते त्यांच्या अंगावर काठ्या घेऊन जात नाहीत.

ते त्यांचा मार्ग बदलतात. एकच पाणवठा असेल, तर वेळा बदलतात. ससा तर झाडावरचं पान पडलं, तरी कावराबावरा होतो. पण म्हणून दात दिलेत म्हणून मुळाशी खणून उकरून तो झाड पाडत नाही. माणूस वगळता हुक्की आली किंवा विनाकारण राग आला म्हणून कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याला उगाचच मारत नाही. ही पृथ्वी, त्यावरची जमीन, झाडं, पाणी, हवा यांच्यावर जेवढा माणसाचा हक्क आहे तेवढाच किंवा त्याहीपेक्षा जास्त हक्क प्राणी आणि निसर्गातील इतर घटकांचा आहे. कारण हे घटक सहसा या निसर्गचक्रात ढवळाढवळ न करता आपलं आयुष्य जगत असतात.

जवळपास प्रत्येक धर्मात, प्रत्येक धर्मग्रंथात ‘प्रेम आणि करुणा’ यांचा संदेश दिला आहे. बायबलमध्ये तर सांगितलंय, ‘Love thy Neighbour’! पण इथे शेजारी याचा अर्थ माणसाने आपल्या घराच्या शेजारच्या घरात राहणारा माणूस, एवढ्या संकुचित अर्थाने घेतला. हा शेजार म्हणजे घराबाहेर असलेला कुत्रा, अंगणात असलेलं झाड, एवढंच कशाला तर त्या झाडाखाली असलेला कीटक, असाही होऊ शकतो, हेच स्वत:च्या प्रेमात असलेल्या माणसाला झेपलं नाही.

आता आणखी एक युक्तिवाद असतो, ‘एवढी कणव आहे त्यांची, तर घरात घेऊन जा!’ असं होत नसतं. ते जिथे जन्माला आलेले असतात, ते त्यांचं घर असतं. माणूस जेव्हा त्याच्या चार भिंतींमधून बाहेर पडतो, तेव्हा तो दुसर्‍याच्या अधिवासात अतिक्रमण करत असतो. आपण त्यांच्या घरात जात असतो. त्यामुळे त्या घराचे नियम पाळूनच आपल्याला पुढे जावं लागेल.

‘लाड तर होतात पाळीव कुत्र्यांचे,’ हेसुद्धा एक असंच वाक्य! कुत्रे पाळणारे आणि त्यासाठी परदेशातील विविध जातींचे कुत्रे विकत घेणारेही एक प्रकारे प्राण्यांवरच्या अत्याचारांना खतपाणीच घालत असतात. Breeding हा प्रकार भारतात ज्या पद्धतीने होतो, ते अमानुष आहे. सर्व नियम पाळून Breeding करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अपवाद आहेत. पण बर्‍याचदा एखादं यंत्रं असल्यासारखं दर Breeding cycle ला त्या कुत्रीला पिल्लं द्यायला भाग पाडलं जातं. त्यासाठी तिचे मागचे दोन पाय एका साच्यात अडकवले जातात. मानदेखील अडकवून जबरदस्तीने कुत्रा-कुत्रीचा संबंध घडवून आणला जातो. मानवी कायद्याच्या भाषेत याला बलात्कार म्हणतात. पण त्या कुत्रीवर झालेल्या बलात्कारातून होणारी पिल्लं विकून आणि विकत घेऊन अनेकदा प्राणी प्रेम दाखवलं जातं.

या सगळ्याचा विचार करून पृथ्वीवरचा एक प्राणी म्हणून मनुष्यजमातीने किती खालची पातळी गाठली आहे, हे उमगतं. मग आपल्याच भाऊबंदांनी केलेल्य पापाचं काही प्रमाणात परिमार्जन करण्यासाठी हे असले दिवस साजरे करावे लागतात. जेव्हा परस्पर साहचर्य नावाची एक मूलभूत गोष्ट माणूस स्वत: शिकेल आणि येणार्‍या पिढ्यांना शिकवेल, तेव्हा हे आंतरराष्ट्रीय श्वान दिन, जागतिक व्याघ्र संवर्धन दिन, आंतरराष्ट्रीय देवमासा दिन वगैरे साजरे करण्याची गरज संपलेली असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -