घरफिचर्ससारांशलाल चिखल थांबणार कधी?

लाल चिखल थांबणार कधी?

Subscribe

मागील आठवड्यात येवला तालुक्यातील एका तरुण शेतकर्‍याचा टोमॅटो रस्त्यावर फेकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. टोमॅटोच्या 20 किलो वजनाच्या क्रेटला बाजारात अवघा 15 ते 20 रुपये भाव मिळाला. त्यामुळे उद्विग्न झालेल्या या तरुण शेतकर्‍याने टोमॅटोची बाजारात विक्री न करता बाजाराजवळच्या चौकात स्वत:च्या वाहनातील टोमॅटोचे क्रेट बाहेर काढून रस्त्यावर ओतून देण्यास सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात संताप होता. त्याने त्या दिवशी जेवणही केलेले नव्हते. हे त्यानेच रडत रडत सांगितले. लोक भोवती गोळा होत होते. त्याला धीर देत होते. मोबाईलवरुन शुट करीत होते. त्यांच्याशी बोलतानाही त्याला शब्द फुटत नव्हते.

तरुण शेतकर्‍याने आणि त्याच्या कुटुंबाने त्या दिवशी दिवसभर टोमॅटोची खुडणी केली होती. पूर्ण पिकाची लागवड, पिकसंरक्षण, तार बांबू, खत पाणी हे सोडून दिले तरी त्या बाजाराच्या दिवशीचा मजुरी व वाहतुकीचा खर्चसुध्दा वसूल झाला नव्हता. बाजारात हतबल झालेल्या त्या तरुणाचा संताप, उद्वेग सहज समजता येण्यासारखा आहे. मात्र तो कुणीच समजून घेत नाही हेही वास्तव आहे. त्या तरुणाच्या कुटुंबाने मागील 4 महिने रात्रंदिवस काळजी घेऊन काबाडकष्ट करुन पिकवलेल्या टोमॅटोचा त्या दिवशी येवल्याच्या बाजारात चिखल झाला. कारण अनेकांच्या पायाखाली व अनेक गाड्यांच्या टायरखाली तो माल चिरडला गेला. ही घटना अस्वस्थ करणारी आहे, पण ही घटना नवीन नाही. सोशल मीडियात ही दु:खाची कहाणी प्रसिध्द झाली.

नटरंग मधल्या ‘तुझ्या पायरीशी कुणी सान थोर न्हाई, तरी देवा कळंना हे दु:ख कशापाई’ या प्रसिध्द गाण्याचा आर्त सूर हे दृष्य अधिकच करुण करीत होता. कारुण्याच्या गाथा मांडणारे असे व्हिडीओ असे सातत्याने येत राहतात. आपलं समाजमन याला चांगलंच सरावलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर पहिल्यांदा किंचित हळहळ होते आणि आपण पुन्हा दुसर्‍या व्हिडीओकडे स्क्रोल होतो. शेती आणि आजुबाजूच्या एकूण प्रश्नांबाबतची बधीरता फार ठळकपणे दिसते. शेती, तोटा, राजकीय व सामाजिक अनास्था या बाबी अशा एकमेकांत मिसळल्या गेल्या आहेत. या बाबी सततच्या झाल्यात. रोज मरे त्याला कोण रडे ही स्थिती सार्वत्रिक झाल्याने या समाज मनाला आणि एकूणच व्यवस्थेला ही बधीरता आली आहे.

- Advertisement -

शेतकर्‍याच्या टोमॅटोला मातीमोल भाव ही बातमी वृत्तपत्रांत प्रसिध्द झाली. त्यात कृषि अधिकार्‍यांनी याबाबत शेतकर्‍यांच्या कंपन्यांनी पुढाकार घेत प्रक्रिया उद्योग उभारावेत, असे सल्ले देत जबाबदारी झटकली तर यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे, असे ठोकळेबाज उत्तर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिले.

लाल चिखल तसाच
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची ‘लाल चिखल’ही कथा या निमित्ताने अनेकांना आठवली. आपल्यापैकी अनेकांना ही कथा शालेय जीवनातच वाचायला मिळाली आहे. या कथेतील नायकही बाजारात टोमॅटो बेभावात विकला गेल्यामुळे बाजाराच्या रस्त्यात टोमॅटो फेकून देतो. आपल्या शेती व्यवस्थेतील 40 वर्षांपूर्वीचा लाल चिखल अजूनही तसाच आहे.

- Advertisement -

परिस्थिती बदलायला तयार नाही. त्यासाठी कुणी पुढे यायलाही तयार नाही. यासाठी कुणी पुढाकार घ्यायचा? शासनाने? कृषि विभागाच्या यंत्रणेने? की शेतकर्‍यांनी? की सर्वांनीच? हेच नेमकं ठरत नाही. सर्व यंत्रणा ही फक्त उत्पादनापुरतीच काम करते. लागवड तंत्रज्ञानाच्या बाबतीत कृषि विद्यापीठे, शास्त्रज्ञ, कंपन्या यांचे सेमिनार, वेबिनार होतात. त्यात दुर्दैवाने टोमॅटोच्या काढणीनंतरचे व्यवस्थापन, बाजार व्यवस्थापन हा विषय फारसा चर्चिला जात नाही. शेतकरी म्हणून आपण फक्त उत्पादन घ्यायचे. त्यासाठी अहोरात्र कष्ट घ्यायचे. मात्र उत्पादन निघाल्यानंतर पुढची जबाबदारी आपली नाही. आपण फक्त व्यापार्‍याला नेवून द्यायचे. तो जो भाव देईल तो घ्यायचा. ही पध्दत सर्वत्र रुढ आहे. या पारंपारिक व्यवस्थेत बाजाराचे नियंत्रण व्यापार्‍यांच्या हातात आहे ते जोपर्यंत उत्पादकाच्या हातात येत नाही तोपर्यंत ही दुर्दशा अशीच सुरु राहणार आहे.

अचूक आकडेवारीचा दुष्काळ
टोमॅटो लागवड क्षेत्र, उत्पादन, बाजार, मागणी या बाबतची अचूक आकडेवारी उपलब्ध नसणे ही एक यातील सर्वात मोठी समस्या आहे. अपेडा, नाफेड तसेच कृषि विभागाच्या तसेच पणन महामंडळाच्या संकेतस्थळावर अशी अद्ययावत आकडेवारी असणे आवश्यक आहे. ती बर्‍याचदा तशी नसते. त्याबाबत कुठल्याच पातळीवर पाठपुरावा होत नसल्याने या सांख्यिकीच्या कामाकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नाही.

टोमॅटो हे महाराष्ट्राचे महत्वाचे भाजीपाला वर्गीय पीक आहे. 6 महिन्यांमध्येच एकरी 3 लाख रुपये मिळवण्याची क्षमता असलेल्या पिकांमध्ये टोमॅटोचा नंबर वरचा आहे. जगभरातील ग्राहकांच्या आहारात प्रामुख्याने टोमॅटो, बटाटे आणि कांदे या तीन भाज्या असतात. भाजीपाला पिकांच्या एकूण खपात 50 टक्के वाटा या तीन पिकांचा आहे. त्यात कांदा आणि टोमॅटो उत्पादनातील महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. नाशिक, सांगली, पुणे त्याच बरोबर मराठवाड्यातील काही भाग इथे टोमॅटो पिकतो, त्यात नाशिक, अकोले, संगमनेर, नारायणगाव हा टोमॅटो उत्पादनातील महत्वाचा पट्टा समजला जातो.

ध्येयनिष्ठ नेतृत्व हवे
जगाची असो की देशांतर्गत बाजारपेठ असो ती सांभाळणे हे आपले ध्येय असायला हवे. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकतो. भाव कोसळल्यावर तो रस्त्यावर फेकला जातो. त्याच वेळेस खूप मोठ्या प्रमाणात चीनमधून आपल्याकडे टोमॅटो पेस्ट आयातही होते. हे असे का होते, तर चीनमध्ये प्रक्रियेच्या यंत्रणा उभ्या राहिल्या तशा सक्षम यंत्रणा उभ्या करण्याकडे आपण पुरेसे लक्ष दिले नाही. जगाच्या बाजारातील स्पर्धेत टिकतील व व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करतील अशा ताकदवान यंत्रणा उभ्या करणे ही आपली दिशा असायला हवी. त्यासाठी टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांमधून प्रामाणिक व ध्येयनिष्ठ नेतृत्वाने पुढे येणे गरजेचे आहे.

व्यापक यंत्रणा हवी
एकात्मिक फळ हाताळणी व प्रक्रिया यंत्रणा उभ्या राहणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे दुधात ताजा दुधाबरोबरच प्रक्रिया केलेल्या दुधाची विक्रीही एकाच जागेवर होते. तसंच टोमॅटोच्या बाबतीत आपल्याला करावे लागेल. त्या यंत्रणा मोठ्या ताकदीच्या कराव्या लागतील. स्पर्धेच्या युगात छोट्या प्रक्रियेच्या यंत्रणांना वाव नाही. केवळ ताजा फळांची विक्री न करता फ्रेश आणि प्रक्रिया या दोन्हींसाठी एकत्रित नियोजन झाले तर टोमॅटोला स्थिर भाव मिळण्यास मदत होणार आहे. प्रक्रियेच्या यंत्रणा मोठ्या प्रमाणात वाढणं आणि त्यातून फ्रेश आणि प्रक्रिया या दोन्हींची एकत्रित साखळी सभासदांच्या पातळ्यावर उभ्या राहणं. हे घडलं तर टोमॅटोचे चांगले भाव स्थिरावण्यास मदत होईल. त्यातून टोमॅटोचे शेतकर्‍यांना परवडणारे अर्थशास्त्र प्रत्यक्षात येईल.

शाश्वततेसाठी ‘सह्याद्री’चे प्रयत्न..
‘सह्याद्री’च्या पातळीवर टोमॅटो उत्पादकांची एकत्रित यंत्रणा बांधण्याचा प्रयत्न मागील 3 वर्षांपासून सुरू आहे. त्या प्रयत्नात टोमॅटोचे फ्रेश मार्केटिंग, देशांतर्गत बाजारात वितरण, प्रक्रिया ते निर्यातीपर्यंतची यंत्रणा एका जागेवर उभारली आहे. मागील वर्षी 55 हजार टन टोमॅटोची हाताळणी सह्याद्रीने केली. यातून भाव स्थिर होण्यास तसेच टोमॅटो हे एक शाश्वत पीक म्हणून स्थिरावण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना एका ठराविक भावाची खात्री देऊ शकलो तर मार्केटच्या पडत्या काळातही शेतकरी उभा राहू शकतो. सह्याद्रीने आपल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी सभासदांना किमान 80 रुपये क्रेट भावाची खात्री मिळेल या दृष्टीने यंत्रणा उभी केली आहे. यात अजूनही भरपूर काम करण्याची गरज आहे. अशा यंत्रणा टोमॅटो पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उभ्या राहण्याची गरज आहे. त्या टोमॅटो उत्पादकांनीच उभ्या करण्याची गरज आहे.

–ज्ञानेश उगले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -