घरफिचर्ससारांशआयुष्य बदलवणारा एक क्षण

आयुष्य बदलवणारा एक क्षण

Subscribe

एका बिजातून हजारो लाखो बिजोत्पत्ती होत असते म्हणजेच प्रत्येक बिजात शेकडो घनदाट वने उभारण्याचे सामर्थ्य असते. एकातूनच अनेक गोष्टींची उत्पत्ती होत आहे हे निसर्ग आपल्याला वर्षानुवर्षांपासून शिकवतोय. तेच तुमच्याबाबतही घडू शकते. एखाद्या दिवशी एखाद्या यशाने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसात एक संकल्प दडलेला असतो. संकल्प हा फक्त नवीन वर्ष सुरू होणार म्हणून करायचा आणि एक-दोन दिवसांनी विसरून जायचा अशा अर्थाचा नसून तो पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न असतो. म्हणजे मग आपण दररोज एक संकल्प करू शकतो. तीच तुमची सुरुवात असेल.

– निकिता गांगुर्डे 

आता काहीच दिवस उरलेत नवीन वर्ष सुरू होईल. अनेक लोक संकल्प करतील आणि खूप कमी लोक ते पूर्ण करतील. संकल्प करण्यासाठी काही जास्त लागत नाही, पण पूर्ण करण्यासाठी ‘सातत्य’ हे ठेवावे लागते आणि स्वत:सोबत प्रामाणिकसुद्धा राहावं लागतं. नवीन वर्ष येतंय म्हणूनच तुम्ही संकल्प केला पाहिजे असं अजिबात नाही. प्रत्येक दिवस वेगळा आहे. प्रत्येक दिवशी संधीसुद्धा नवीन असतात. काहींना प्रत्येक सकाळ, प्रत्येक क्षण सारखा वाटू शकतो, पण ते सत्य नाही. म्हणून आपल्या प्रत्येक क्षणावर एक वेगळा व नाविन्यपूर्णतेने जगण्याचा प्रयोग करून पाहा. कोणता क्षण कधी, कोणत्या क्षणी निसटून जाईल हे आपल्याला ठाऊक नसते किंवा ही संधी कधी, किती वर्षांनी येईल हे माहीत नसते. एका दिवसानंतर येईल, काही वर्षांनंतर येईल, पण तुमचा दिवस येईल हे नक्की.

- Advertisement -

तुम्ही मागे जाऊन एक नवी सुरुवात करू शकत नाहीत. त्यामुळे आजपासूनच नवी सुरुवात करा. चांगल्या सुरुवातीची अखेरही चांगली होऊ शकते. वाटेल त्या परिस्थितीतून तुम्ही प्रारंभाची सुरुवात करू शकता. सहा वर्षांच्या अध्ययनानंतर गौतम बुद्धांनाही असाच अनुभव आला आणि चाळीसाव्या वर्षी पैगंबरांनी हीच अनुभूती घेतली. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी तिसाव्या वर्षी, कर्नल सेंन्डर्स यांना वयाच्या पासष्टाव्या वर्षी आणि या सर्वांप्रमाणे इतर महान लोकांनाही असाच अनुभव आला.

अनेक महान विभूतींचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी स्वप्न त्यांच्या चांगल्या काळात पाहिले नसून वाईट परिस्थितीत पाहिले होते. धीरूभाई अंबानींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न १९९९ साली पाहिले होते, मात्र तेव्हा भारतात संवाद किंवा संपर्क करणे खूप कठीण गोष्ट होती. मानवी गरजांमध्ये अन्न, वस्र व निवारा याव्यतिरीक्त माहिती आणि संपर्काची सर्व साधने असण्याचे ते स्वप्न आज साकार झाल्याचे आपण पाहत आहोत. रतन टाटांनीदेखील असेच एक स्वप्न पाहिले होते. मध्यमवर्गीयांना एक लाख रुपयांपर्यंत कार उपलब्ध करून देण्याचे आणि न्यानोच्या रूपात ते सत्यातही उतरवले. देश पारतंत्र्यात असताना महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते. इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारताची वर्ल्ड क्लास विमान बनवण्याची पात्रता नव्हती.

- Advertisement -

त्यावेळी मिसाईलमेन एपीजे अब्दुल कलामांनी असेच स्वप्न पाहिले होते आणि अंतराळ क्षेत्रातील आजचे भारताचे स्थान उल्लेखनीय आहे हे आपण सर्वच जाणतो. या सर्व गोष्टी सांगण्याचा मुद्दा हाच आहे की या नेत्यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वप्न पाहिले होते आणि पुढे त्यांच्याच स्वप्नाच्या जोरावर संघटना, देश आणि मानवता एकवटली गेली. नेत्याने स्वप्न पाहिले पाहिजे. एक माणूस या नात्याने आपणही स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती स्वप्ने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण या स्वप्नांच्या जोरावर समाजात, वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. स्वप्न पाहताना मोठी स्वप्ने पाहा आणि नुसती स्वप्नं पाहून सोडून देऊ नका. ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. कारण कृतीशिवाय नुसती कल्पना करीत राहणे म्हणजे भरून आलेले आभाळ असते, जे फक्त पावसाची हुलकावणी देत राहते, मात्र बरसत कधीच नाही.

आपण गृहीत धरतो की आपल्याकडे खूप दिवस आहेत. आज नाही तर उद्या करू, पण हा उद्या कधीच उगवत नाही. आपला आजच फक्त आपला आहे हे पूर्णत: विसरूनच गेलोय जणू. वस्तुस्थिती हीच आहे की कोणताही दिवस आपल्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरू शकतो. आयुष्याकडे पाहण्याचा हा वेगळा दृष्टिकोन आहे. उर्वरित भविष्याकडे पाहण्याचा आजचा पहिला दिवस आहे असे तुम्ही समजा आणि मग अशा नवीन दृष्टीने तुमच्या वर्तमानाकडे पाहता येईल. याच दृष्टीने भविष्याची सुरुवात आजपासूनच करता येऊ शकते.

ज्याप्रमाणे एका बिजातून हजारो लाखो बिजोत्पत्ती होत असते म्हणजेच प्रत्येक बिजात शेकडो घनदाट वने उभारण्याचे सामर्थ्य असते. एकातूनच अनेक गोष्टींची उत्पत्ती होत आहे हे निसर्ग आपल्याला वर्षानुवर्षांपासून शिकवतोय. तेच तुमच्याबाबतही घडू शकते. एखाद्या दिवशी एखाद्या यशाने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसात एक संकल्प दडलेला असतो. संकल्प हा फक्त नवीन वर्ष सुरू होणार म्हणून करायचा आणि एक-दोन दिवसांनी विसरून जायचा अशा अर्थाचा नसून तो पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न असतो. म्हणजे मग आपण दररोज एक संकल्प करू शकतो. तीच तुमची सुरुवात असेल.

एकदा ठेच लागली की माणूस चालणे सोडून देतो, मात्र वास्तव हे आहे की ज्या ठिकाणी आपल्याला ही ठेच लागते समजून जा की आपल्या आयुष्याचा खजिना इथेच दडलेला आहे. आयुष्यात एखादी चांगली सुरुवात करण्यासाठी कधीही विलंब झालेला नसतो. तुमचे भविष्य तुमच्यासमोर आहे. भूतकाळ सोडून द्या आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करा. गणितामध्ये एक नियम आपण सर्व शिकलो आहोत की एखाद्या संख्येचे मूल्य, अक्ष शून्य ते एक यादरम्यान आले असेल तर त्या अक्षवरील पुढील अंकही सकारात्मकच असतात. म्हणजे जर परिणाम नकारात्मक अक्षावर आल्यास अनंत आकड्यापर्यंत परिणाम नकारात्मकच असतील असा निष्कर्ष निघतो. सांगण्याचे तात्पर्य हेच की एखाद्या गोष्टीचे परिणाम हे एखाद्या विशिष्ट बाजूने झुकल्यास त्या गोष्टीच्या संपूर्ण बाबी त्याच दर्जाच्या असतात.

गरूड पक्षी सर्वांनाच माहीत आहे. सर्वात वेगाने व उंच उडणारा पक्षी म्हणून आपण त्याला ओळखतो. म्हणूनच एखादा व्यक्ती मोठे यश संपादित करतो तेव्हा त्या यशाची तुलना गरूडझेपेशी केली जात असते. अनेक मोठ्या व्यक्ती जेव्हा यशस्वी होतात, आपण नकळत बोलून जातो की एका रात्रीत एवढे यश मिळवले, पण ते चुकीचे आहे. आपल्याला जे दिसतं ते फक्त त्या व्यक्तीचे आजचे चित्र असते, परंतु त्या व्यक्तीचा आजपर्यंतचा प्रवास जर पाहिला तर लक्षात येईल की यशामागचे खरे वास्तव काय होते ते. सुंदर रस्ता पाहून आपला मार्ग निवडणे व खाचखळगे, चढउतार असलेला रस्ता निवडून तो अनेक प्रयत्नांनी सुंदर बनविणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. महान लोक आपला रस्ता स्वत: बनवतात व तो नंतर इतरांसाठी जीवन आदर्श बनून जातो. ती अनेकांसाठी गरूडझेप असते, पण पंखांत बळ येण्यासाठी गरूडाच्या सहनशक्तीचादेखील अंत पाहिला जात असतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला सोनेरी क्षणात रूपांतरित करा, जेणेकरून ही सोनेरी क्षणांची शृंखला तुमचे पंख मजबूत आणि सशक्त करेल.

(लेखिका करिअर मार्गदर्शक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -