घरमहाराष्ट्रनागपूर अधिवेशनाआधी मुंबईत रस्त्यावरची लढाई

नागपूर अधिवेशनाआधी मुंबईत रस्त्यावरची लढाई

Subscribe

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे, परंतु अधिवेशनाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शनिवारी मोर्चाकारण रंगले. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येत शनिवारी मुंबईत महामोर्चा काढत सरकारविरोधात हल्लाबोल केला, तर भाजपच्या नेत्यांनीही मुंबईसह ठिकठिकाणी माफी मांगो आंदोलन करीत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे, परंतु अधिवेशनाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शनिवारी मोर्चाकारण रंगले. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येत शनिवारी मुंबईत महामोर्चा काढत सरकारविरोधात हल्लाबोल केला, तर भाजपच्या नेत्यांनीही मुंबईसह ठिकठिकाणी माफी मांगो आंदोलन करीत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. यासोबतच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या सत्ता भागीदारी पक्षांनी ठाण्यात कडकडीत बंद पाळून मविआच्या नेत्यांचा निषेध केला. एकंदरीतच शनिवारी राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार मोर्चाकारण रंगल्याने अधिवेशनापूर्वीच रस्त्यावरची लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार यात शंकाच नाही.

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीपर्यंतच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फेब्रुवारी महिन्यामध्ये कोसळणार, असे भाकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चादरम्यान वर्तविले. राऊत यांच्या या भाकितानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली असून याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

- Advertisement -

राऊत म्हणाले, या मोर्चाने इशारा दिला आहे की शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही. महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता वाट पाहत आहे की हे सरकार केव्हा उलथवून टाकायला मिळते ते. हा मोर्चा म्हणजे सरकार उलथवून टाकण्याचे पहिले पाऊल आहे. आपण ज्या लढाईची सुरुवात केली आहे, त्यामुळे सरकार हतबल झाले आहे, लटपटायला लागले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असे राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन विरोधी पक्षातील भाजपच्या नेत्यांकडून मविआ सरकार पडण्याच्या तारखा घोषित करण्याचे सत्र सुरू होते, परंतु राज्यात जून महिन्यात सत्तांतर झाले आणि त्यानंतर विरोधात बसलेल्या मविआच्या नेत्यांकडून सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा अनेकदा करण्यात येत आहे. याचे कारणही तसेच आहे. जानेवारी महिन्यात सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार कोसळणार असल्याच्या दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिन्यामध्ये कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

…तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही सरकार स्थापन केले – फडणवीस 

तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही सरकार स्थापन केले, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शनिवारी दिले.

त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही, ते आज दुसर्‍यांचे सरकार पडण्याबाबत भाकिते वर्तवत आहेत, मात्र आम्ही त्यांच्या नाकाखालून त्यांचे सरकार घेऊन गेलो. त्यामुळे ते कशाच्या वल्गना करताहेत? आमचे हे सरकार राहणार आणि पुन्हा आमचेच सरकार सत्तेत येणार, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही
महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आज आपण सर्व एकत्र आलो आहोत. जे सत्तेवर आहेत तेच आज महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आज ३५० वर्षांनंतरही अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. आता माफी मागितली तरी तरुण शांत बसणार नाहीत. मी ५५ वर्षांत अनेक राज्यपाल पाहिले. तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याचेच काम केले, मात्र हे राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. महात्मा फुलेंचे नाव देशभरात आदराने घेतले जाते, मात्र हे राज्यपाल त्यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्ये करतात.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्रद्रोह्यांच्या शेवटाची सुरुवात
बर्‍याच वर्षांनंतर इतका मोठा मोर्चा देशाने पाहिला आहे. सगळे महाराष्ट्रद्रोही एकत्र येऊन महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी तुटून पडत आहेत. या महाराष्ट्रद्रोह्यांचा आपण राजकीय शेवट करणार आहोत. आजच्या मोर्चात महाराष्ट्रप्रेमी सहभागी झाले आहेत, महाराष्ट्रद्रोही नाहीत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणणारे तोतयाही नाहीत. राज्यपाल महापुरुषांविरोधात वक्तव्ये करतात. मंत्रीदेखील महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये करतात. राज्य मंत्रिमंडळात महिलांबाबत अपशब्द वापरणारे मंत्री आहेत. मुंबईचे लचके तोडले जात आहेत. आम्ही सत्तेत असताना अनेक प्रकल्प सुरू केले, मात्र आता प्रकल्प इतर राज्यांत पळविले जात आहेत. मुंबईचे पालकमंत्री खोकेवाल्या सरकारची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी करीत आहेत. चंद्रकांत पाटील आक्षेपार्ह वक्तव्ये करीत आहेत. कर्नाटक असो वा इतर शक्ती महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी तुटून पडत आहेत. या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करावा लागणार असून हा महामोर्चा ही त्याचीच सुरुवात आहे.
– उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

हे डबल इंजिन सरकार
हे सरकार भक्कम सरकार आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. २ लाख कोटी विकासासाठी दिले आहेत. मागे कोणी म्हणाले होते की एका महिन्यात हे सरकार पडेल, परंतु आता पाच महिने झाले. हे सरकार मजबूत आहे. लोकांच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. विकास हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे लफंगे कोण आहेत आणि लफंगेगिरी कोणी केली हे सर्वांना माहीत आहे. खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार सोडून कोणी काय केले हे सर्वांनी पाहिले आहे. काम करणार्‍यांची होते चर्चा आणि बिनकामाचे मोर्चा काढतात. या मोर्चापेक्षा कालची आमची कोकणची सभा मोठी होती.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -