घरफिचर्ससारांशअ‍ॅनिमल : माणसातल्या जनावराची फसलेली गोष्ट

अ‍ॅनिमल : माणसातल्या जनावराची फसलेली गोष्ट

Subscribe

– संजय सोनवणे

अर्जुन रेड्डी, कबीर सिंग त्यानंतर आता अ‍ॅनिमल, तरुण दिग्दर्शक संदीप रेड्डी वँगानं तोच बाज कायम ठेवला आहे. बेफिकिर, व्यसनी, मद्यपी, रागिष्ट, कोपिष्ट हिरोच्या रेड्डीच्या सिनेरांगेत ‘अ‍ॅनिमल’ही दाखल होतोय. चित्रपटावर दक्षिणेच्या चित्रपट सादरीकरणाचा प्रभाव असल्याने अतर्क्य गोष्टी विचाराधीन नाहीत. संदीप रेड्डीच्या सिनेमाला गर्दी करणारी तरुणाई ‘अ‍ॅनिमल’साठीही थिएटरबाहेर रांगेत येणार हे ओघाने आलेच.

- Advertisement -

‘हर आदमी में एक जानवर होता है, कुछ लोग उसे बाहर निकाल देते है’ कुठल्याशा गाजलेल्या सिनेमाचा हा डायलॉग इथंही चित्रपटभर प्रसंगातून पसरलेला असतो. बक्कळ हाणामारी, पसरलेला आगडोंब, स्नॅपर, स्टेनगन, सुटातल्या पिस्तुलधारी बाऊंसर्सकडून गोळ्यांचा वर्षाव, बॉम्बगोळ्यांनी आगी लागलेली ठिकाणं असलं सगळं पडदाभर पसरलेलं असतं. बापलेकाच्या चित्रपटांच्या रांगेत ‘अ‍ॅनिमल’ बसत नाही. बलबीर सिंग (अनिल कपूर) आणि रणविजय सिंग (रणबीर कपूर) या बापलेकाची ही स्टोरी, तशी स्टोरी नाहीच. ‘बिझनेसके सिलसिलेमें’ बलबीरनं शाळकरी रणविजयकडे दुर्लक्ष केलंय. रणविजय त्यामुळे काहीसा बेजबाबदार झाल्यानं त्यानं दोन्ही बहिणींना सुरक्षित भवताल देण्याची हमी घेतलीय. रणविजयचा बाप बलबीर जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत आहे, मात्र पैशांच्या मागे लागल्याने त्याचं घर, कुटुंबाकडे दुर्लक्ष झालंय.

परिणामी रणविजयसारखा तापट, संतापी, हिंसक, हट्टी मुलगा त्याच्या पोटाला आलाय. चित्रपटातून बापलेकाच्या नात्यातले भावनिक कंगोरे निकालात काढलेले नाहीत, मात्र त्यांना उगाच सिनेमॅटीक मेलोड्रॅमेटीक केलेलं नाही. बापलेकाच्या सिनेमांच्या रांगेत मुघल ए आझम, शक्ती, त्रिशूल एवढंच येत नाही. बापावर अतोनात मोहब्बत असलेला नायक संजय दत्त (यलगार), जॅकी श्रॉफ (गर्दीश), अनिल कपूर (गुरुदेव) अशी ही यादी वाढत जाते, पण २०२३ मध्ये बापलेकाचं प्रेम बदललंय. बापाच्या काळजीनं व्हिलनच्या विरोधात कायदा हातात घेण्याचं कथानक दोन दशकाआधीच रद्दबातल ठरलंय. आता बाप हतबल नसतो आणि मुलगाही. बापाच्या केसाला धक्का लावणार्‍या व्हिलनला संपवण्यासाठी गोळीबार, स्फोटांच्या जाळाचा पाऊस पाडला जातो.

- Advertisement -

‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरमधलं जनावर बाहेर येण्यासाठी आवश्यक घटना गुंडाळलेल्या असतात. मूळ पंजाबमधल्या आणि आता परदेशात स्थायिक झालेल्या सधन कुटुंबातला रणविजय सिंगसाठी नैतिक-अनैतिक, चांगलं-वाईट, संस्कार, संगोपन असलं काही नसतं. सधन कुटुंबात जगण्यासाठी निश्चित अशी धावपळ आणि संघर्ष नसतो. जगातली प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची, त्याचा मालक होणं सहज शक्य असतं. त्यामुळे करण्यासारखं काहीही नसतं. कुठलीही आव्हाने नसतात, संघर्ष नसतो. त्यामुळे माणूस म्हणून माणसाचा विकास खुंटतो. ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची क्षमताच विकसित झाली नसल्यामुळे माणूस हट्टी आणि हेकेखोर प्रसंगी हिंसकदेखील होतो.

आनंद देणारी प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची क्षमता असल्यामुळे मर्यादेच्या पलीकडील आनंद मिळवण्याचा प्रयत्न ही नेहमीचीच बाब होते. त्यातून व्यसन, लैंगिक इच्छा मर्यादित राहत नाहीत. हाच प्रकार रणविजय सिंगच्या बाबतीत ‘अ‍ॅनिमल’मध्ये होतो. चित्रपटात विशेष असं काही नाही. रणबीर कपूरसाठी बनवलेला हा चित्रपट स्पष्ट आहे. अतिशय सधन आणि आर्थिक ताकद असलेल्या कुटुंबातील नातेसंबंध मात्र कमकुवत असतात. हाच ‘अ‍ॅनिमल’चा प्लॉट आहे. अनिल कपूरने आपल्या वयाला साजेसा असा बलबीर सिंग उद्योगपती साकारला आहे. रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर यांनी इमरान हाश्मीचा विक्रम मोडला आहे.‘अ‍ॅनिमल’मध्ये बॉबी देओलनं साकारलेला व्हिलन संतुलित आहे. चित्रपटातील संवाद पुरेसे परिणामकारक आहेत.

‘अ‍ॅनिमल’मध्ये उपेंद्र लिमयेने साकारलेला मराठमोळा लीडर छोट्याशा भूमिकेतही भाव खाऊन गेला आहे. महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्ग पकडून ठेवण्यासाठी उपेंद्र लिमयेने दिलेली कामगिरी चोख बजावली आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये व्हीएफएक्स आणि साऊंड इफेक्ट्स वारेमाप वापरले आहेत. अलीकडच्या सिनेमांमधून पटकथा नाहीशी झाल्याचं ‘अ‍ॅनिमल’ हे उदाहरण आहे. रणबीर कपूरच्या चाहत्यांनी हा चित्रपट पाहायला हरकत नाही, पण वास्तववादी आणि सशक्त कथानक असलेले सिनेमे पाहण्याची इच्छा असणार्‍यांनी ‘अ‍ॅनिमल’च्या वाट्याला जाऊ नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -