घरफिचर्ससारांशनिसर्गसुलभ अभिनयाचे वरदान! शलाका पवार

निसर्गसुलभ अभिनयाचे वरदान! शलाका पवार

Subscribe

प्रत्येक पावलागणिक सोशल मीडियावर मी आता काय करतेय?....मी काय विकत घेतेय?... वगैरे गोष्टी मला सांगाव्याशा वाटत नाहीत. मला स्वतःचं जीवन तेवढं एक्स्पोज करायचं नाही.

-संतोष खामगांवकर

तिला आपण बर्‍याचदा छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. ती तिथे जेवढी सहज असते तेवढाच रंगमंचावरचा तिचा वावर निसर्गसुलभ असतो. आपण नाटकांमध्ये अनेक विनोदी पुरुष कलाकारांना हशा आणि टाळ्या मिळवताना पाहिलं आहे. अभिनेत्री शलाका पवारही तिच्या वाट्याला आलेलं नाटकातील विनोदी पात्र, त्याची संवादफेक अचूक टायमिंगसह बखुबी साकारते. मग ती पूर्वीच्या ‘यदा कदाचित’ मधील द्रौपदी असो किंवा सध्या रंगभूमीवर हिट ठरलेल्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकातील वहिनी.

- Advertisement -

अभिनयामध्ये करिअर करायचं असा काही इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या शलाकाचा विचार नव्हता, परंतु तिचे आजोबा कॉम्रेड श्रीधर देसाई यांना आपल्या नातीनं अभिनय क्षेत्राचा अनुभव जरूर घ्यावा असं वाटायचं. त्यामुळे अभिनयाकडे जाणारी वाट तिला तिच्या घरच्यांनीच मोकळी करून दिली. शलाका म्हणते की, फॉर्च्युनेटली मी संतोष पवारबरोबरच लग्न केलं. त्यामुळे मी रंगभूमीशी निगडित राहिले.

बदलापूरला लहानाची मोठी झालेली शलाका सांगते की, अगदी लहानपणापासून राजा बडेंबरोबर बालनाट्य करण्याचा तिचा अनुभव होताच. त्यातच आठवीला असताना तिच्या आजोबांचेच मित्र रवी भाटेवडेकर यांनी हौशी रंगमंचावर ‘एकच प्याला’ हे नाटक बसवायचं ठरवलं. शलाकाने त्यात साकारलेली गीताची भूमिका एकदा मधुसुदन कोल्हटकर यांनी पाहिली. त्यावेळी त्यांचं व्यावसायिक ‘एकच प्याला’ रंगमंचावर चालू होतं. एकदा त्यातील गीताची भूमिका करणारी अभिनेत्री येऊ शकली नाही. म्हणून त्या बदल्यात ते पात्र साकारण्याची जबाबदारी शलाकावर आली. शलाका म्हणते, त्या नाटकात माझ्यासमोर चक्क राजा गोसावी उभे होते आणि शलाकाचा हा रंगमंचावरला पहिलाच अनुभव यशस्वी ठरला.

- Advertisement -

विजय मोंडकर दिग्दर्शित ‘मला काय माहीत?’ या तिच्या पहिल्या व्यावसायिक नाटकातून तिचं रंगमंचावर पदार्पण झालं. पुढे तिच्या संपर्कात असलेल्या दत्ता घोसाळकरांनी तिला संतोष पवार दिग्दर्शित ‘यदा कदाचित’ नाटकाचं दार उघडून दिलं. हे नाटक प्रचंड लोकप्रिय झालं. या नाटकातील त्यावेळी नवोदित असलेल्या अनेक कलाकारांची आज करिअर घडली आहेत. शलाकाही त्याच कलाकारांपैकी एक आहे, मात्र तिच्याबाबत एक वेगळी गोष्ट म्हणजे ती आज ‘शलाका संतोष पवार’ आहे. या नाटकाच्या तालमींदरम्यान शलाका आणि संतोषची मैत्री दृढ होत गेली. कळत नकळत त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं विवाह बंधनात झालं.

शलाका सांगते की, अभिनयात करिअर करायचं असा काही मी विचार कधीच केला नव्हता. ‘यदा कदाचित’चे प्रयोगांवर प्रयोग होत गेले आणि अभिनयाची झिंग चढली. त्यातील तिची द्रौपदीची भूमिका तिने अफलातून साकारली होती, जी रसिकांना खूप भावली. पुढे संतोषसोबतच्या प्रेमविवाहामुळे तिच्यासाठी हे शिक्कामोर्तब झालं की इथून पुढे आपल्याला अभिनयच करायचा आहे.

दिवसागणिक शलाकाची अभिनयाची समज आणि रंगमंचावर विनोद डिलिवर करण्याचं टाइमिंग विकसित होत गेलं. याचे श्रेय ती संतोष पवारलाच देते. प्रसंगी कामात कसूर झाल्यावर तिने संतोषचा ओरडाही खाल्लेला आहे. तिचा पहिला टीकाकार संतोष पवारच असतो. शलाकाला एकूण अभिनय कारकिर्दीमध्ये अशोक सराफ, विजय चव्हाण, प्रशांत दामले अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यासाठी ती स्वतःला भाग्यवान समजते. ती सांगते की, हे सगळेच मोठे कलाकार हे उगीचच मोठे झालेले नसतात. आपल्या सहकलाकाराला सांभाळून घेण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं.

शलाकाने रंगमंचावर प्रदीर्घ काळ घालवलेला आहे. त्यामुळे आजचा प्रेक्षक आणि पूर्वीचा प्रेक्षक याबद्दल शलाका सांगते की, प्रेक्षक हा दर्दीच असतो, म्हणूनच तर तो आम्हाला पाहण्यासाठी थिएटरपर्यंत येतो, पण मला असं वाटतं की पूर्वीचे प्रेक्षक फार ओपन माइंडेड होते. त्यामुळे नवं काहीतरी पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. उदाहरणार्थ नवीन कलाकारांच्या ऊर्जेला ते प्रतिसाद द्यायचे. आजचा प्रेक्षकही देतोय, मात्र आज सोशल मीडियामुळे किंवा इतर माध्यमांमुळे असेल म्हणा, पण नवोदित कलाकारांपेक्षा नामांकित कलाकारांकडे त्यांचा ओढा जास्त असतो.

शलाका तिच्या नेहमीच्या जीवनामध्ये सोशल मीडियाचा वापर करताना फार कमी दिसते. याबद्दल तिला विचारलं असता ती सांगते की, आज सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे हे मला मान्य आहे. मीही त्याचा वापर करते, पण प्रमाण फार कमी असतं. कदाचित मी जास्त ओपन नसल्यामुळे प्रत्येक पावलागणिक सोशल मीडियावर मी आता काय करतेय? मी काय विकत घेतेय?… वगैरे गोष्टी मला सांगाव्याशा वाटत नाहीत. मला स्वतःचचं जीवन तेवढं एक्स्पोज करायचं नाही, पण हा व्यक्तिनुरूप प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे.

शलाका जेवढी दिलखुलासपणे बोलते, व्यक्त होते, तेवढंच तिला कुठे थांबायचं याचंही भान आहे आणि हाच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा खास पैलू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -