‘अनिता’ नावाची एक डेरेदार सावली!

अनिता सडेतोड, काहींच्या भाषेत फटकळ होती, पण मला नेहमी तिचा हा स्वभाव म्हणजे एक रचनात्मक विद्रोह वाटत आलाय. एक बाई म्हणून जगताना, त्यातही एक खालच्या म्हणवल्या गेलेल्या जातीतील, गरीब, छोट्याशा वस्तीतलं जगणं अनुभवलेली, फारसे प्रिव्हीलेजेस नसलेली बाई म्हणून तिला आलेले अनुभव, त्यातून पुढे जाऊन ती पाहत असलेलं सगळ्या बायकांच्या मुक्तीचं स्वप्न आणि ह्या सगळ्यातसुद्धा पुन्हा पुन्हा त्याच पितृसत्तात्मक विचारांच्या माणसांचा करावा लागणारा सामना या सगळ्यातून येणारी हतबलता काय पातळीची असेल हे वर्णन करून सांगता येणार नाही. माझ्यासारख्या अनुभवांचं मडकं आताच कुठे भरायला सुरुवात झालेल्या कार्यकर्तीसाठी भर उन्हात चालून आल्यानंतर एखाद्या डेरेदार झाडापाशी शांततेत सावली अनुभवत बसावं असं होतं. वंचितांची सावली असलेल्या अनिता पगारे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

दोन आठवड्यापूर्वी ह्याच पुरवणीत महिला दिनासाठी लेख लिहिशील का? म्हणून चर्चा केलेल्या व्यक्तीवर आज लगेचच त्याच पुरवणीत श्रद्धांजलीपर लेख लिहिणं हे हात थरथरवणारं आहे. अजूनही, अनिता गेलीय, अनिता पगारे इज नो मोर हे मनाला पटलेलं नाही पण फेसबुकवर दिसणार्‍या तिच्याविषयीच्या अनुभवांच्या पोस्टस बघून मेंदू सतत सतत ती नसल्याची आठवण करून देत राहतो.

अनिताची आणि माझी पहिली ओळख खरंतर फोनवरच्या एका छोट्याशा भांडणातून झाली. असं कसं तुम्ही करता? ही काय पद्धत झाली का? हे एका घटनेच्या अनुषंगाने तिच्यात आणि माझ्यात झालेल्या संवादाचा किंवा विसंवादाचाच म्हणा काय तो सारांश होता. नंतर सामाजिक क्षेत्रात जरा रुळल्यानंतर अनिता पगारे हे नाव सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, सोशल मीडियावरच्या खर्‍याखुर्‍या अनुभव लेखनामध्ये, पोलीस स्थानकांमध्ये, अनेक महिलांच्या तोंडून, पुस्तकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये ऐकून, वाचून अनिता जरा जास्त ओळखीची झाली आणि असं कसं तुम्ही करता? ही काय पद्धत झाली का, हा प्रश्न अनेक ठिकाणी वर्षानुवर्षांपासून उभ्या असलेल्या संरचनांना विचारून हादरे देणारी प्रचंड पावरफुल बाई आहे हे कळलं.

जिथे जिथे प्रश्न विचारण्याच्या, प्रतिप्रश्न करण्याच्या शक्यता कुणीतरी पुसून टाकल्या आहेत अशा ठिकाणी प्रश्नांची पोती घेऊन त्यांची उत्तरं मिळाल्याशिवाय परत न फिरणारी अनिता ही एक चिकित्सक, ज्ञानपिपासू आणि खमकी बाई होती अशी ती हळूहळू मला उमगत गेली. पण मला एखाद्या लेखात वाचताना भेटलेली अनिता आणि प्रत्यक्ष कुठल्यातरी कार्यक्रमात भेटून पाठीवर धप्पा देऊन काय मॅडम काय म्हणताय? असं म्हणणारी अनिता खूप सारखी होती. म्हणजे तिच्या लेखणीत, प्रत्यक्ष ट्रेनिंग घेण्याच्या पद्धतीत किंवा फक्त टपरीवर उभं राहून अघळपघळ गप्पा मारण्याच्या शैलीत कुठेच काहीच फरक नव्हता. भाषा, टोन, शब्द, लकब ह्यात अजिबात दोन समांतर बाजू उभ्या न करता ती त्याच सरलतेने आणि तरलतेने सुद्धा बोलायची. कदाचित याच गोष्टीमुळे अनिता सगळ्यांना आणि विशेषत: माझ्यासारख्या तरुण आणि नव्याने आपल्या कामाची नाडी ओळखू पाहणार्‍या कार्यकर्त्यांना जवळची, आपली आणि आपल्यासारखी वाटायची.

अनिता सडेतोड, काहीच्या भाषेत फटकळ होती पण मला नेहमी तिचा हा स्वभाव म्हणजे एक रचनात्मक विद्रोह वाटत आलाय. एक बाई म्हणून जगताना, त्यातही एक खालच्या म्हणवल्या गेलेल्या जातीतील, गरीब, छोट्याशा वस्तीतलं जगणं अनुभवलेली, फारसे प्रीव्हीलेजेस नसलेली बाई म्हणून तिला आलेले अनुभव, त्यातून पुढे जाऊन ती पाहत असलेलं सगळ्या बायकांच्या मुक्तीचं स्वप्न आणि ह्या सगळ्यातसुद्धा पुन्हा पुन्हा त्याच पितृसत्तात्मक विचारांच्या माणसांचा करावा लागणारा सामना या सगळ्यातून येणारी हतबलता काय पातळीची असेल हे वर्णन करून सांगता येणार नाही. पण हा राग, क्रोध सगळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होणार्‍या व्यवस्थात्मक शोषणातून येतो आणि हा शोषितांचा आक्रोश आक्रस्ताळेपणाने नाही पण प्रचंड रचनात्मक पद्धतीने मांडून ती या व्यवस्थेविषयीचा आपला राग, आपली नाराजी इतकी संतुलितपणे व्यक्त करत असे की, माझ्यासारख्या अनुभवांचं मडकं आताच कुठे भरायला सुरुवात झालेल्या कार्यकर्तीसाठी भर उन्हात चालून आल्यानंतर एखाद्या डेरेदार झाडापाशी शांततेत सावली अनुभवत बसावं असं होतं.

स्त्रीवादी पद्धतीला जगण्याची पद्धत म्हणून निवडल्यानंतर प्रत्येक, प्रत्येक नाही कदाचित पण जवळपास सगळ्याच पावलांवर भेटणार्‍या प्रचंड पितृसत्ताक वल्लींकडे पाहून राग, चीड, हतबलता आणि निराशा वाट्याला येत जाते. हे आतलं संचित व्यक्त करण्याच्या पुरेशा सुरक्षित आणि योग्य जागाही फारशा उपलब्ध नसतात. पण ह्याच सगळ्या नकारात्मक भावनांचा निचरा करण्यासाठी, त्या त्या वेळची ती निराशा, शब्दांना कुठलंच फिल्टर न लावता व्यक्त करण्याची जागा माझ्यासाठी अनिता होती. ह्या सगळ्या नकारात्मक उर्जेला आणि वाईट अनुभवांना एकत्र बांधून ह्यातून रचनात्मक विचार कसा जन्माला घालायचा ह्याचं कौशल्य आणि त्याच वेळेला अनुभवांवर आधारित भक्कम वैचारिक बैठक अनिताकडे होती. सगळ्यांनाच आणि विशेषत: तरुण कार्यकर्त्यांना अशा डेरेदार सावलीच्या जागा अनिताने देऊ केल्यात. त्यासाठी तिला खूप थँक्यू म्हणायचं राहून गेलंय.

तरुण वयापासूनच परिवर्तनवादी चळवळीत कार्यकर्ती म्हणून जोडली गेलेल्या अनिताने पुढे अशा अनेक चळवळींचं नेतृत्व केलं. डाव्या, परिवर्तनवादी, दलित आणि सम्यक विचारांच्या जागांवर, चळवळीमध्ये अनिता पगारे हे नाव मोठ्या आदराने सगळ्यांच्याच आतून बाहेर यायचं. फक्त सामाजिक क्षेत्रातचं नाही तर अगदी कोर्पोरेटमध्ये काम करून तिथल्या सुद्धा अनुभवाचं एक गाठोडं घेऊन ती आपल्या कामाचे आयाम अधिकाधिक विस्तारत होती आणि हाच तिचा स्वभाव होता. पोलीस स्थानकांमध्ये महिला सेलमध्ये समुपदेशक म्हणून किंवा नंतर संगिनी महिला जागृती केंद्राच्या माध्यमातून अनेक बायका, त्यांची आयुष्य, त्यांच्यावर होणारी हिंसा, बायकांचे अधिकार, स्वत:ची जाणीव अशा विषयांवर ती खूप भरीव काम करत होती. जेंडरसोबतच जात प्रश्नाविषयीसुद्धा अनिताची समज खूप पक्की होती. आपण ज्या जातीत जन्माला आलो ती नाकारणं आणि तिच्याच बर्‍यावाईटाची चिरफाड करून नव्या वाटा, नवे पर्याय शोधणं ही तिची ह्या सगळ्या सामाजिक संरचनांना प्रश्न विचारण्याची पद्धत होती. एखादी गोष्ट समजावून सांगण्याची तिची पद्धत आणि हातोटी तर आपली खूप जवळची व्यक्ती, आपल्यासारखीच भाषा बोलणारी आपल्याच घरातली कुणीतरी कान पिळून किंवा प्रेमाने समजावून सांगतेय असं वाटावं इतकी विलक्षण आणि रोजच्या जगण्यातलं वाटावं अशी होती.

अनिताचं नेतृत्वकौशल्य अफाट आणि विलक्षण होतं. ती एक उत्तम संवादक आणि उत्तम संघटकसुद्धा होती. सम्यक विचार मांडणारी आणि मांडलेला प्रत्येक विचार जगणारी ती एक द्रष्टी बाई होती. मी पुन्हा अनिताला व्यक्ती न म्हणता ‘बाई’ असं म्हणतेय ते एका कारणाने. माझं आणि अनिताचं नातं त्याच एका बाईपणाच्या धाग्याने जोडलेलं होतं. तिच्यातलं भक्कम आणि लढाऊ स्त्री तत्वच मला नेहमी तिच्याकडे खेचत आलं. आपल्यासारखं जगणारी आणि आपल्यासारखाच विचार करणारी पण तरी अनुभवांनी अख्ख्या दोन पिढ्या पुढे असलेली एक खमकी बाई म्हणून ती माझ्यासाठी माझ्याच प्रतलातली एक समांतर रेष होती.

अजूनही होती हा शब्द लिहिताना थोडं बिचकायला होतंय. पण हे आता स्वीकारायला हवं हेही समजतंय. मला आठवतं काही महिन्यांपूर्वी अनिताला मी शेवटचं भेटले होते ते संगिनीच्या नव्या ऑफिसात. तिच्या डेस्कजवळ बसून बाहेरच्या मोठ्याच मोठ्या आणि दाट झाडांमध्ये काही काळ माझी तंद्री लागली तेव्हा मध्येच तंद्री न मोडता नंतर ती हळूच म्हणाली की, माझ्याकडे बायका असं नवर्‍याचं, सासरच्या लोकांचं गार्‍हाणं घेऊन येतात आणि बोलता बोलता अशाच या बाहेरच्या झाडांमध्ये हरवून जातात. नवर्‍याने रात्री दिलेला बेदम मारही त्या काही काळ विसरतात. अशाच हिंसेचे, पितृसत्तेचे दुखरे व्रण घेऊन आलेल्या बायकांना काही काळ तरी त्यांचा वर्तमान विसरून ही झाडं आणि ही जागा आनंद देऊ शकते म्हणून मला ही जागा खूप आवडते! कधी प्रत्यक्ष तर कधी अशी विचारांची आधाराची, प्रेमाची आणि धीराची सावली देणारी अनिता त्याच झाडांमध्ये एखाद्या बाईचं बोट धरून हरवली असेल का? कुणास ठाऊक? आता अशा प्रश्नांमध्ये फारसा अर्थही नाही.

पण जेव्हा जेव्हा लढाई करण्याची वेळ येईल, आपलं म्हणणं ठासून सांगण्याची आणि प्रसंगी त्यासाठी मागे लागून कृती घडवून आणण्याची वेळ येईल, कुठलीतरी वस्तीतली मुलगी शिक्षण पूर्ण करायचं म्हणून आई वडिलांशी भांडून हवं ते करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा त्या प्रत्येक वेळी अनिताची आठवण येईल. शोधिनी म्हणून काम करणार्‍या गावातल्या सगळ्या मुलींनाही अनिताने त्यांचं केलेलं भरभरून कौतुक आठवतंय. तुम्ही माझ्या हिरोइन्स आहात! असं म्हणत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून पाठीवर कौतुकाची आणि आधाराची थाप देणार्‍या मुली खरंच एक दिवस सगळ्यांच्याच हिरोइन्स होतील अनिता, हे नक्की!

ज्या सदरात आता अनिताविषयी हा आदरांजलीपर लेख लिहितेय ते ‘जेंडर गोष्टी’ नावाचं सदरसुद्धा अनिताचंच! इथेसुद्धा एक डेरेदार सावली माझ्या हाती देऊन त्याच वेळी आणखी अनेक झाडांना जन्म देण्याचं, त्यांना सावली देऊन आधार देण्याचं काम तू केलं आहेस. ह्या जबाबदारीची मला जाणीव आहे आणि तू लढत असलेल्या मूल्यांसाठी, तत्वांसाठी आणि तू स्वप्न पाहत असलेल्या समताधिष्टीत जगासाठी आणखी कसोशीने प्रयत्न करणं, हतबलतेचीसुद्धा एका मोठ्या रचनात्मक उद्दिष्टासाठी रचनात्मक मांडणी करणं आणि व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून आणि बाई म्हणून सन्मानाने उभं राहणं, अनेकांना उभं करणं ही तुझी शिकवण स्वत:त आणण्यासाठी काम करायचंय. अनिता, तुला सतरंगी सलाम!
तू असताना हा लेख लिहिला असता तर वाचून चटकन सकाळीच फोन फिरवून मन भरून कौतुक केलं असतंस आणि इतका मस्का का मारलास मला म्हणून जरा सुनावलंसुद्धा असतंस. तो फोन मला आला असं मी समजते!