घरफिचर्ससारांशविवेकी दिवाळी...

विवेकी दिवाळी…

Subscribe

दिवाळीसारख्या सणामध्ये सलग आठ-दहा दिवस कानठळ्या बसवणारा, असह्य आवाज आपल्याला निमूटपणे ऐकावा लागेल. उघडपणे ह्या सर्व अनिष्ट, अविवेकी प्रकाराचा प्रतिकार करण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही याची आपल्याला खात्री असते. कारण तो देवाधर्माच्या नावाखाली समाजाच्या, जातीच्या, रूढींच्या, परंपरेच्या वर्तनाचा भाग अनिवार्य असल्याचा विचार वर्षानुवर्षे समाजाच्या माथी मारलेला आहे. अलीकडच्या काळात त्याचे सामाजिक टोक तर अतिशय अनुकूचीदार, तीक्ष्ण झालेले आहे असे अनेक सामाजिक घटनांवरून दिसून येते.

माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. म्हणून कोणत्याही कारणाने त्याला सण-उत्सव साजरा करायला आवडते. निसर्गाशी नाते जोडण्यासोबतच सण-उत्सव साजरे करताना कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात. त्यामुळे त्याला भौतिक सुखासोबतच मानसिक आनंदही मिळतो. परिणामी दैनंदिन कामात बदल घडतो, विश्रांती मिळते. दररोजच्या जीवनातील कटकटी, ताणतणाव थोडेफार सैल होतात. काही प्रमाणात शांतता लाभते. सण-उत्सव साजरे करण्यामागे हे अपेक्षितच असते आणि त्यासाठीच सण-उत्सव साजरे करायचे असतात, मात्र मागील काही वर्षांपासून नववर्षारंभ, वाढदिवस, राजकीय नेत्यांच्या मिरवणुका, विवाह-समारंभाची मिरवणूक अशा अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परिणामी प्रचंड धूर आणि कानठळ्या बसवणारा आवाज यामुळे अनेकांना बहिरेपणा येण्याचा, अपघात घडण्याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात वातावरणाचे प्रदूषण होते. अशा वेळी जीवघेणे कोरोनाचे जागतिक संकटही त्यापुढे फिके पडते. लहान बालके, वृद्ध व्यक्ती, हृदयविकाराचे रुग्ण, परीक्षार्थी विद्यार्थी यांना या फटाक्यांचा अतोनात त्रास होतो. प्राणी-पक्षी भीतीने सैरावैरा पळत सुटतात, पण उत्सवाची नशा एवढी चढलेली असते की अशा प्रचंड दुष्परिणामांचा विचार करायला कुणाकडेही वेळ नसतो.

फटाके निर्मिती करणार्‍या कारखान्यांमध्ये नेमके काम कसे चालते हे जर आपण पाहिले तर आपल्याला असे दिसून येते की त्या ठिकाणी फटाक्यांच्या कागदी पुंगळ्या अतिशय लहान असतात आणि त्यामध्ये स्फोटकांची दारू भरण्यासाठी लहान बोटांचीच गरज असते. साहजिकच लहान मुलांची बोटं बारीक असतात आणि म्हणून लहान मुलांना तेथे जास्तीची मजुरी देऊन कामाला ठेवले जाते. या लहान मुलांचे पालकही त्यांच्या गरिबीमुळे या बालकांची शिक्षणाची दारं कायमची बंद करतात आणि त्यांना आयुष्यभर मोलमजुरीच्या दावणीला बांधतात. अशा वेळी उघडपणे बालमजुरीच्या विरोधातला कायदा धाब्यावर बसवला जातो, मात्र संबंधित तिकडे जाणीवपूर्वक अर्थपूर्ण डोळेझाक करताना दिसतात. फटाके निर्मितीच्या कारखान्यांना अनेक वेळा अचानक आग लागून प्रचंड स्फोट होतो. त्यामध्ये काम करणारी सर्व माणसे अर्थात त्यात ही लहान मुलं पोटापायी मृत्युमुखी पडतात. हे आपल्याला अनेक वेळा वाचायला आणि पाहायला मिळते.

- Advertisement -

अशा दुर्घटनेच्या वेळी समाजातील काही संवेदनशील व्यक्ती हळहळतात, दुःख व्यक्त करतात, मदतीसाठी धावतात. प्रासंगिक दुर्घटना म्हणून शासनही मदत जाहीर करते, मात्र ती मदत खरोखर मृत व्यक्तींच्या कुटुंबांना मिळते की नाही याची नंतर कुणी फारशी दखल घेताना दिसत नाहीत. कारण कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी अनेक जण ती जागा सोडून परागंदा होतात. खरंतर कोणत्याही स्वरूपातील मदतीने ही गेलेली माणसं कधीच परत येणारी नसतात. हे सर्व अतिशय वाईट, अमानवीय घडत असतानाही केवळ स्वतःच्या आनंदासाठी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून अविवेकी वर्तनातून आनंद शोधायला निघालेली माणसंच त्या निष्पाप जीवांचे बळी जाण्यास जबाबदार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

खरंतर याची बूज समाजातील सर्वच संवेदनशील घटकांनी राखायला हवी, मात्र तसे घडताना दिसत नाही. कारण येऊ घातलेला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी धूमधडाक्यात फटाक्यांची खरेदी होताना आजही दिसत आहे. सहाजिकच पुढील आठ-दहा दिवसांत सातत्याने मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाईल. प्रचंड मोठ्या प्रमाणात श्वासाला अडथळा निर्माण करणारा विषारी धूर आसमंतात घर करून राहील. ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीचे प्रमाण प्रचंड असते. पंधरा ते वीस लाख लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये किमान २०० कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होते असा अंदाज आहे. म्हणून एकट्या दिवाळीच्या सणात संपूर्ण भारतात अब्जावधी रुपयांची अनाठाई उलाढाल होते हे उघड आहे.

- Advertisement -

म्हणजे आपण असे जरी मानले की आपल्याकडील सर्व सण-उत्सव हे निसर्गपूजा करणारे, निसर्गाशी साधर्म्य राखणारे आहेत, तरीही प्रत्यक्षात सण-उत्सव साजरे होतानाचे चित्र मात्र अतिशय भयानक आणि विकृत असल्याचे दिसते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काही व्यक्ती, गट हे जाणीवपूर्वक सण-उत्सवांचे बाजारीकरण आणि व्यापारीकरण करतात असे आपल्या लक्षात येईल. शिवाय आपल्याकडे जातीधर्माच्या नावाने अनेक कालबाह्य, अनिष्ट, अघोरी रूढी, परंपरा जतन करून त्या जोपासल्या जातात. त्यामुळे त्यांची चिकित्सा करणे म्हणजे त्या जातीला किंवा धर्माला विरोध असे मानले जाते. त्यामुळे आपल्यातील अनेकांना विनाकारण हा त्रास सहन करावा लागतो.

दिवाळीसारख्या सणामध्ये सलग आठ-दहा दिवस कानठळ्या बसवणारा, असह्य आवाज आपल्याला निमूटपणे ऐकावा लागेल. उघडपणे या सर्व अनिष्ट, अविवेकी प्रकाराचा प्रतिकार करण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही याची आपल्याला खात्री असते. कारण तो देवाधर्माच्या नावाखाली समाजाच्या, जातीच्या, रूढींच्या, परंपरेच्या वर्तनाचा भाग अनिवार्य असल्याचा विचार वर्षानुवर्षे समाजाच्या माथी मारलेला आहे. अलीकडच्या काळात त्याचे सामाजिक टोक तर अतिशय अनुकूचीदार, तीक्ष्ण झालेले आहे असे अनेक सामाजिक घटनांवरून दिसून येते. असे जरी असले तरी खर्‍या अर्थाने शिक्षणाचा वसा समाजात रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षण संस्था, समाजाभिमुख कुटुंबं आणि समाजातील काही सुज्ञ, पर्यावरणप्रेमी व्यक्ती, संघटना यांनी ठरवून या सगळ्या अनिष्ट बाबींना, रूढी-परंपरांना बर्‍याच मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो असे कृतीशीलपणे दाखवून दिले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे अशा सृजनात्मक कामांमध्ये युवा पिढी आघाडीवर आहे. दिवाळीचा फराळ, जुने किंवा नवीन कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, विद्यार्थ्यांना गणवेश किंवा खेळाचे साहित्य, अंध-अपंगांनाही विविध प्रकारे मदतीचा हात देणे अशा अनेक समाजोपयोगी कार्यात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसते.

फटाके उडवल्याने मानव तसेच इतर प्राणी यांच्या आरोग्यावर होणारे प्रचंड दुष्परिणाम, मोठ्या प्रमाणात होणारे पर्यावरण प्रदूषण, अपघात, बालमजुरीला प्रोत्साहन अशा सर्वच अहितकारक गोष्टी घडतात. याची जाणीव शालेय वयातच विद्यार्थ्यांना करून दिली तर फटाक्यांसाठी मोठ्या प्रमाणात व्यर्थ खर्च होणारी रक्कम ही वाचनीय पुस्तकं तसेच आवडीच्या खेळाचे व छंदाचे साहित्य खरेदी करणे, बचत केलेली रक्कम खर्च करून कुटुंबात जास्तीचे फराळ करणे आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते गरजूंना वाटप करणे अशा अनेक विधायक गोष्टी करता येतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागील १२ वर्षांपासून महाराष्ट्रभर शाळाशाळांमधून याबाबत विद्यार्थ्यांना कृतीशील प्रबोधन करून संकल्प-पत्रं विद्यार्थ्यांकडून भरून घेतली आहेत. त्यातून दरवर्षी अनेक कुटुंबांत कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. साहजिकच त्यामुळे समाजातील अनेक अनिष्ट, अविवेकी गोष्टींनाही आळा बसण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. अनेक शहरांमधून अंनिसचे कार्यकर्ते फटाक्यांच्या दुकानाशेजारीच पुस्तकांची दुकानं लावतात आणि आश्चर्य म्हणजे लाखो रुपयांची पुस्तकं तेथे विकली जातात.

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे लाखो शेतकरी कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी पुढील काही महिन्यांमध्ये अजूनही अनेक शेतकरी कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. आज अनेक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. अतिवृष्टीमुळे पिकं नष्ट झाली आणि अनेक ठिकाणी शेतजमीनही वाहून गेली. साहजिकच सध्या आणि पुढील काही वर्षे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. जवळपास सर्वच वस्तूंचे भाव आज गगनाला भिडलेले आहेत. भविष्यात महागाई अजून विक्राळ स्वरूप धारण करेल अशी चिन्हे आहेत. शिवाय अजूनही प्राणघातक रोगराई संपूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. समाजमनावर आलेली ही अविवेकाची काजळी नष्ट करण्यासाठी विवेकाची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित करून ती सतत तेवत राहण्यासाठी प्रत्येकाला खर्‍या अर्थाने दिवाळीचा आनंद देण्यासाठी हे चोहोबाजूंनी घोंघावणारे संकट म्हणजे संधी आहे असे समजूया आणि विवेकाने विवेकी दिवाळी साजरी करूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -