घरफिचर्ससारांशजातसमूहाचे आत्मकथन

जातसमूहाचे आत्मकथन

Subscribe

प्रसिद्ध साहित्यिक अनिल भालेराव यांचे बालपण ज्या गावात गेले त्या गावातील भावबंदकीच्या गोष्टी, जगण्यासाठीच्या धडपडी, भावनिक संघर्ष, रीतीरिवाज, परंपरा, रूढी, वेगवेगळ्या जातींची वैशिष्ठ्ये त्यांच्या वाडगं या आत्मकथनात वाचायला मिळतात. मानवी स्वभावातील गुंतागुंत आणि परिस्थितीने भोगायला लावलेले भोग वाचताना अंगावर काटे येतात. या आत्मकथनातून फक्त लेखकच जगत नाही, तर अख्खं गाव, वाडा, भोवतालचा परिसर जगताना दिसतो हे या आत्मकथनाचे वैशिष्ठ्य आहे. लेखकाचे बालपण अठराविश्व दारिद्य्रात गेले तरी त्याच्या जगण्यातील आनंद आणि उत्साह पाहून दुःखाची तीव्रता जाणवत नाही.

मराठी साहित्यात अनेक आत्मकथने आहेत. प्रसिद्ध साहित्यिक अनिल भालेराव यांचे ‘वाडगं’ हे एक असेच अंतरंग उलगडणारे आत्मकथन आहे. लेखकाचे घर उकिरड्यावर होते. ते मातीचे आणि ताट्या लावलेले होते. त्यामागे एक मोकळी जागा असते. त्याला खान्देशी भाषेत वाडगं असे म्हणतात. याच वाडग्याच्या नावाने लेखकाने आपले आत्मकथन लिहिले आहे. या वाडग्याचे लेखकाने वेली, फुले आणि झाडे लावून एका छोट्या बागेत रूपांतर केले होते. वाडग्यातील पालापाचोळा एकत्र करून आणि सांडपाण्यापासून खत तयार करून ते वडिलांनी शेतीसाठी वापरले होते. या वाडग्याप्रमाणे लेखकानेदेखील आपले जीवन उकिरड्यावर जरी जगावे लागले तरी जीवनाचे नंदनवन केले आहे. प्रयत्नपूर्वक आपल्या जीवनात जीवनरूपी जी बाग फुलवली त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हे खरंतर या आत्मकथनाचे वैशिष्ठ्य आहे.

हे आत्मकथन वाचून माणूस नक्कीच अंतर्मुख होतो. लेखकाचे बालपण अठराविश्व दारिद्य्रात गेले, तरीही शिक्षण घेत उंच भरारी घेत सारे आकाश लेखकाने कवेत घेतलेले दिसून येते. या आत्मकथनात लेखकाचे बालपण अनेक समस्यांनी, संकटांनी भरलेले दिसते. तरी जीवन संघर्षात ते प्रत्येक संकटाला पुरून उरतात आणि एका यशस्वी आयुष्यापर्यंत पोहचतात हे या आत्मकथनातून बोध घेण्यासारखे आहे. हे आत्मकथन निव्वळ लेखकाचा जीवनप्रवास नाही, तर विविध जातसमूहांचे अंतरंगसुद्धा उलगडून दाखवणारे अनोखे असे आत्मकथन ठरते. लेखक जे जगला तेच प्रामाणिकपणे या आत्मकथनात मांडले आहे. विशेषतः म्हणजे कुठे लपवाछपवी केली नाही. मग ते वडिलांचे दोन संसार असतील किंवा चुलत मावशीने आणि तिच्या मुलींनी केलेला देहविक्री व्यवसाय असेल.

- Advertisement -

लेखक ज्या गावात वाढले ते गाव बारा बलुतेदार आणि अलतेदारांचे आहे. गाव तसे छोटे पण सगळ्या जातीच्या लोकांची वस्ती, त्यातही जातीनिहाय वस्त्या! त्यामुळे या बारापगड जातीच्या लोकांचा वावर या आत्मकथनात पानोपानी दिसतो. या आत्मकथनाचा प्रवास लेखकाच्या दहावीच्या शिक्षणापर्यंतच्या घडामोडीचा आणि घटनाक्रमाचा आहे. खेड्यातील श्रमिकांच्या, शेतमजूर आणि शेतकर्‍यांच्या समस्या आणि त्या परंपरेने सोडवण्याच्या पद्धती, त्यात काळानुसार घडत जाणारे बदल लेखकाने उत्तमरीतीने मांडले आहेत.

लेखकाचे बालपण ज्या गावात गेले त्या गावातील भावबंदकीच्या गोष्टी, जगण्यासाठीच्या धडपडी, भावनिक संघर्ष, रीतीरिवाज, परंपरा, रूढी, वेगवेगळ्या जातींची वैशिष्ठ्ये या आत्मकथनात वाचायला मिळतात. मानवी स्वभावातील गुंतागुंत आणि परिस्थितीने भोगायला लावलेले भोग वाचताना अंगावर काटे येतात. या आत्मकथनातून फक्त लेखकच जगत नाही, तर अख्खं गाव, वाडा, भोवतालचा परिसर जगताना दिसतो हे या आत्मकथनाचे वैशिष्ठ्य आहे. लेखकाचे बालपण अठराविश्व दारिद्य्रात गेले तरी त्याच्या जगण्यातील आनंद आणि उत्साह पाहून दुःखाची तीव्रता जाणवत नाही. अनेक वाईट गोष्टी जीवनप्रवासात घडत असताना लेखक स्वतःचे जीवन फुलवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बालपणापासूनच तो समजदार आणि कष्टाळू असा आहे. जोडीला शिक्षणाची आवड, या सार्‍या गोष्टी या आत्मकथनातील प्रमुख दुवा आहेत. हा संदेश लेखकाने वाचकांना दिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- Advertisement -

या आत्मकथनात लेखक म्हणतो की, माझं गाव प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं. आषाढी, एकादशीला गावागावातून दिंड्या गावात यायच्या. गावावर वारकरी सांप्रदायाचा प्रभाव असल्यामुळे उघडउघड जातीयवाद कधीच दिसला नाही. शालेय जीवनातील अनेक मजा-मस्ती, विनोदी प्रसंग, गंभीर प्रसंग लेखकाने हलक्याफुलक्या भाषेत मांडले आहेत. जे वाचकांना त्यांचे बालपण आठवण्यास भाग पाडते. अशा प्रकारे वाडगं हे वाचनीय झालं आहे. त्याचप्रमाणे अनेक घडामोडींचा मागोवा घेणारे ऐतिहासिक दस्तावेजदेखील ठरले आहे. छपाई सुंदर आणि आकर्षक आहे. मुखपृष्ठ अंतर्मुख करणारे आहे. प्रत्येकाने हे आत्मकथन नक्कीच वाचावे.

=पुस्तकाचे नाव : वाडगं
=लेखक : अनिल भालेराव
=प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे
=पाने : १४४
=किंमत : रुपये २७०

–डॉ. रवींद्र जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -